उणीव

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आत्तापर्यंत अनेकवेळा आपण 'I miss you', 'We will miss you' असे म्हटले असेल.. ग्रूपमधला एक जण कुठे बाहेर जाताना, एखादा जवळचा मित्र/ नातेवाईक लांब कुठे गेला असेल तर.. वगैरे.. पण कधी विचार केलाय, आपण नसू तर किती जण म्हणतील, 'I miss you...'???

आपलं एक सुरक्षित छानसं जग असतं. आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर सुखेनैव आयुष्य चालू असतं. यामधे आपणच नसू, तर या वर्तुळाला काही फरक पडेल का खरंच? आपल्या जीवलगांना पडेल, नक्कीच पडेल, पण हळूहळू तेही पूर्ववत जगायला लागतीलच की. आपली 'आठवण' त्यांना निश्चित येत राहील, पण आपली 'उणीव' त्यांना भासेल का?

फक्त 'मायबोली' आणि माझ्याबद्दल जेव्हा मी असा विचार करते, तेव्हा वाटतं, किती यःकश्चित आयडी आहे माझा! कारण मी व्यक्ति म्हणूनही सामान्यच आहे! सतत 'हुशार' कोट्या करणं, चटपटीत बोलणं, उत्तरं देणं, उत्तम, सर्वांना आवडेल असं साहित्य लिहिणं, किंवा राजकीय, सामाजिक विषयावर बोलणं- असा कोणता विभाग आहे जिथे मी माझा ठसा उमटवू शकलेय? कोणताच नाही! सामाजिक विषयावर लिहिण्याइतका माझा अभ्यास नाही, साहित्यावर बोलावं इतकं वाचन नाही, सतत गप्पा माराव्यात इतकं मोठं वर्तुळ नाही! मग का आहे मी इथे? काय होईल जर मी इथे आलेच नाही उद्यापासून कधीच तर? काहीच नाही होणार! दोन-चार लोक विचारतील, 'हल्ली दिसत नाही' आणि 'कामात असेल' असं समजून स्वतःची समजूतही काढतील. पुढे सरकतील. माझी आठवण येईल कदाचित, पण 'उणीव' भासेल? अंहं, नाही.

या विचाराने मी घाबरते, घुसमटतेच! मला एक तरी वर्तुळ हवंय, एक तरी जागा हवीय जिथे मी 'मी' आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. मग मी काय करायला हवं ज्याने मायबोलीकर मला नित्य स्मरतील? प्रत्येक धाग्यावर जाऊन लोकांशी बोलायला हवं? सगळ्यांची 'विचारपूस' करायला हवी? काहीतरी जबरी, अफाट लिहायला हवं? गेलाबाजार काहीच नाही, तरी सनसनाटी बोलायला तरी हवं?

त्या मानानी मग डुप्लिकेट आयडी बरे वाटतात मला. बुरख्याआडून का होईना, बेछूट बडबड करून, वादळ निर्माण करून ते स्वतःची छाप तरी निर्माण करतात! आजही जुने मायबोलीकरही 'हा डुप आयडी काय लिहायचा, काय नव्हेच ते' करत काही लोकांच्या आठवणी काढतात की! पण उलट मी काय करते? माझी प्रतिमा जपली जावी म्हणून, शक्यतो कोणी दुखवायला नको म्हणून मोजूनमापून बोलते, टीका करत नाही, केली तरी चार वेळा ती संपादित करून, त्यातले जहाल शब्द कमी करते, एखादी गोष्ट अगदीच पटली नाही, तर किमान ५० मायबोलीकर जिथे असतील तिथे गर्दीत जाऊन 'बघा ना' असं हळूच म्हणते, प्रत्येक ठिकाणी 'दिवे देते' आणि एक सामान्य आयडी बनते. इतका सामान्य, की तो असला-नसला तरी काही फरकच पडत नाही!

पण मी इतकी सामान्य आहे हे मला स्वतःला मोकळेपणाने स्वीकारताही येत नाही! मी धडपडते, प्रयत्न करते की लोक मला विचारतील, माझं मत तिथे महत्त्वाचं ठरेल, किमान विचारात तरी घेतलं जाईल. पण आडातच नाही, तर पोहोर्‍यात कुठून येणार? जे आयडीज येत नाहीत, म्हणून त्यांची उणीव भासते त्यांच्यात एक उपजत स्पार्क असतोच, जो माझ्यात नाही. पण हे कळूनही वळत नाही मला आणि मी उदास बनते. एखादा दिवस मायबोलीवर येतच नाही, आणि बघते, किती लोक काढतात बरं माझी आठवण? एखादा चुकार काढतोही, आणि तेवढाच आधार मला पुरेसा होतो- पुन्हा इथे येऊन माझं अस्तित्व जपायला. मी असले, नसले तरी फरक न पडणार्‍यांना हे दाखवायला, की 'मी आहे'. खोल कुठेतरी मलाही हे माहीत असतं की Maayboli does'nt miss me, I miss Maayboli.

या आभासी जगातच मी इतकी सामान्य, तर प्रत्यक्षातल्या जगण्यात तर मी किती क्षुल्लक? हे 'माझे' लोक असं म्हणेपर्यंतच अनेक लोक मला दुरावतात, मलाही जे जवळचे वाटत असतात, ते अचानक नकोसे वाटायला लागतात. एखादी व्यक्ति कायमचा गैरसमज करून घ्यायचा तो घेतेच आणि एखादी लांब जायला नको असते ती जातेच. माझ्या हातात काय असतं? Nobody is indispensable हे तर मला माहीतच असतं. यावर कोणता टोकाचा उपाय करावा इतकीही हिम्मत नसते माझ्यात. मी फक्त करू शकते विचार. माझं जगणं मात्र सामान्यच रहातं, इथल्याच माझ्या सामान्य आयडीसारखं!

Will you miss me? हा प्रश्न मला विचारावासा वाटतो, पण नाही विचारत, कारण त्याचं उत्तर- Umm, yes, we might remember you, but MISS you? Not really! - हे आहे आणि हे मी ऐकू शकेन इतकं धैर्य माझ्यात नाही! म्हणूनच मी इथे येत रहाते, येत रहाते, चिवटपणे चिकटून रहाते.. या आशेवर येत रहाते, की हो, कोणालातरी माझी उणीव भासेल!

विषय: 
प्रकार: 

पूनम, छान लिहिले आहेस Happy
जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिल कार्य काय? हेच खरं.. Happy

खूप सही पूनम Happy , माझ्या मनातलं ... अगदी परवा असेच विचार मनात आले होते पण तू इतक्या छान शब्दात ते मांडलस Happy
मला माबो च व्यसनच लागलय , मी गेले ५-६ महिने रेग्युलर येतोय कोणाचीही अनुपस्थिती असेल तर त्याचे विचार नक्की येतात मनात ..
Maayboli does'nt miss me, I miss Maayboli. >> हे पटलं , थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाच्या मनातलं

पुनमताई, अहो खूप दिवसात काही वाचलं नाही तुमचं. खूप miss करायला लावलत. Happy

पुनम, छान लिहीलयेस, एकदम मनातल, प्रामाणिक.

>>या विचाराने मी घाबरते, घुसमटतेच! मला एक तरी वर्तुळ हवंय, एक तरी जागा हवीय जिथे मी 'मी' आहे म्हणून माझं अस्तित्व आहे.

मलाही असच वाटायच, हि असुरक्षिततेची भावना का वाटते, नक्की काय हवय हे कळाल कि मग कशाच काही वाटत नाही.

तुझी आठवण काढणारे तर भरपुर जण आहेत मायबोलीवर, ते स्थान मिळण सुद्धा खुप झाल. उणीव जाणवणारे पण असु शकतात, कोणी बोलुन दाखवत कोणी नाही इतकच. Happy

लिहीत रहा.

वा पूनम, खूप छान लिहिलंयस... दिवाळी अंकातल्या साजिर्‍याच्या डायरीनंतर हे असं हे पहिलं लिखाण आहे की जे मला खूप जवळचं वाटलं... Happy

मला स्वतःला अजिबात लिहिता येत नाही त्यामुळे उदास वाटतं कधीकधी... पण मग मायबोलीवर काही चांगले लेख, कथा वाचल्या आणि मनापासुन छान लिहिलंय अशी प्रतिक्रिया दिली की जातो तो उदासपणा... Happy

पूनम, तुझ्या कथा येऊ देत बघ परत जोमानं. म्हणजे असे विचार मनातही यायचे नाहीत तुझ्या.. भरभरुन प्रतिक्रिया, काही सुचना, (योग्य तिथेच) टीका ह्या सगळ्यात इतकी गुरफटशील की आपण केवळ मायबोलीवरचा एक आयडी ही भावनाच मुळी स्पर्श करायची नाही. Happy तेव्हा आता पुढच्या कथेची वाट पहाते..

Happy
कोणी कधीच कोणाला miss नाही करत पूनम. म्हणजे कोणाची कोणाला उणीव नाही भासत. miss you असं जरी म्हटलं तरी त्यामागचा अर्थ 'आठवण आली' असाच होतो. एखाद्या छान पिकनिक किंवा पार्टीला येऊ न शकलेल्या मैत्रिणीला दुसर्‍या दिवशी we missed you म्हणतो आपण तेव्हा 'तू असतीस तर बरं झालं असतं, तुझी आठवण आली' असंच किंवा 'you missed all the fun' Wink असं.

उणीव ही गरजेतून येते किंवा एखाद्यावाचून अडते तेव्हा. आणि ही परिस्थिती फार काळ टिकत नाही, जगात कोणाचे कोणावाचून अडत नाही. लोक मार्ग शोधतात. तेव्हा उणीव भासण्यापेक्षा माझ्या मते (चांगली) आठवणच जास्त महत्वाची. त्यामुळे आपल्याकडे जे काही देण्यासारखे असेल ते दुसर्‍याला द्यावे. आपण एखादी गोष्ट खूप चांगली करत असलो तर ती दुसर्‍यांना शिकवावी. साधं उदाहरणच द्यायचं झालं तर समजा मी एक पदार्थ खूप चांगला करते आणि माझ्या मुलाला तो तसाच खूप आवडतो, तर तो त्याला शिकवलेला बरा. म्हणजे पुढे खावा वाटला उणीव भासणार नाही आणि आईने शिकवला ही चांगली आठवण राहील. (कुणी करुन घालणारं असेलच तर 'माझ्या आईसारखा जमला नाही' असं चुकून बोलून पुढं युध्दजन्य परिस्थितीला तोंड देण्यापेक्षा स्वतःच करेल. Happy )

चांगल्या गोष्टीसाठी लोकांनी आठवण काढणे आणि तुम्ही सुरु केलेले एखादे चांगले कार्य तुमच्या अनुपस्थितीतही पुढे चालू राहणे यातच आपलं यश मानलं पाहिजे.

राहता राहिली इथली गोष्ट. इथेही तेच. उणीव नाही, आठवण आहे. तर काही टोकाचा उपाय वगैरे नको. Happy लोक तुझी काढतील/ठेवतील. देण्यासारखं काहीतरी प्रत्येकाकडे असतं. ते इथं दिसलं पाहिजे असं काही नाही. मायबोली म्हणजे तुमचं आयुष्य नव्हे. पण त्याचा एक भाग आहे हे मात्र खरं. आणि तो कधी कोणासाठी न थांबता/अडता असाच वर्षानुवर्षं चालू रहावा.

>>कोणालातरी माझी उणीव भासेल
नाही. (वयानुसार) शक्य होईल तोवर मी तुझी आठवण ठेवेन. Proud

लालू, मस्तच लिहिलय. पटल. Happy

तुझ पोस्ट वाचल्यानंतर आठवण आणि उणीव यामधे माझाही घोळ झालेला नक्की काय म्हणायचय. तुझ्या लिखाणावरुन वाटत कि उणीव म्हणजे गरज, जस कि कोणालाच कोणाची गरज नसते म्हणजे उणीव जाणवत नाही.

पण मला पुनम ने लिहीलेल थोड वेगळच वाटल. उणीव in the sense की अनुपस्थिती जास्तच जाणवण मग ते लिखाणाची असो किंवा अस्तित्वाची.

>>कोणालातरी माझी उणीव भासेल

त्यात आपल्याकडे काहीतरी चांगल आहे किंवा आपल्याला काहीतरी चांगल येत हि भावना समाधान देते. मला वाटत उणीव त्याची असावी.

पुनम माझ्या सारख्या विदेशात रहाण्यारांना कायमच 'I miss you', 'We will miss you' अस ऐकायला मिळत. Uhoh
असो, लेख मात्र फारच उत्तम.

************************
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधिला पेटली न वात...
************************

सही लिहिलय.

उणीव अशी कोणाची अथवा कशाची भासते खरंच ? लालूला अनुमोदन.
एक 'माणूस' म्हणून लक्षात राहणे हे पुरेसे आहे ना ? किंबहुना, विचारवंत, साहित्यिक, कलाकार अशा लेबलांमुळे लक्षात राहण्यापेक्षाही 'माणूस' म्हणून लक्षात राहणे फार अवघड आणि फार सुंदर आहे असं मला तरी वाटतं... ते जमत असेल तर कशाला अ/सामान्यत्वाची काळजी करावी ?
येनकेनप्रकारेण उणीव भासवण्याचे मार्ग उपलब्ध असूनही ते अवलंबतेस का ? नाही. भल्या-बुर्‍याची जाण असणे आणि ती जाण टोकाची नसणे हे मलातरी मुळीच क्षुल्लकपणाचे लक्षण वाटत नाही. "मी सामान्य (माणूस) आहे" या विधानात 'सामान्य' या शब्दावरच आपण इतके लक्ष केंद्रित करतो की त्यात अध्याहृत असलेल्या "मी 'माणूस' आहे" या स्वतःलाच दिलेल्या सुंदर कबुलीजबाबाकडे मात्र दुर्लक्ष होते. ती प्रामाणिक कबुली जोपर्यंत स्वतःला आणि इतरांनाही देता येत आहे, तोपर्यंत सर्व आलबेल आहे Happy

    blackribbon1.jpg

    slarti, अगदी मनातलं लिहिलंयत. खूप चांगलं.

    पूनम, छान लिहलं आहेस.

    इथेच खरंतर कर्मण्येवाधिकारस्ते ... लागु होतं. तुला गरजच का भासावी कुणी तुला मीस करावं याची? आपल यायचं (जमेल तेंव्हा), वाटेल ते (वाट्टेल ते नव्हे) खरडायचं आणि मोकळं व्हायचं.

    मरावे परी किर्तीरुपे उरावे यातिल किर्ती म्हणजे मीम्स, आईडीयाज (आयडी चे प्लुरल आयडीज नव्हे). ती किर्ती देखिल कधितरी हरवून जातेच विश्वाच्या पसार्‍यात.

    काही खास लोकांनी तुला मीस करावं असं वाटत असेल तर त्यांना काय आवडतं हे पहायच आणि शक्य झाल्यास तसं वागायचं (हा उपदेश मला स्वतःला आहे).

    जे काही तु लिहिलस, त्याची जाणीव झाली ते पण महत्वाच आहे. ग्रेट कोणीच नसतं. ज्यांना आपण ग्रेट आहोत असं वाटतं ते तर खचीतच नाहीत.

    जितक्या जास्त लोकांच्या जवळ पोचशील तितकं तुला मीस केल्या जाईल (हाही उपदेश मला स्वतःला आहे). पण इतकही पोचु नकोस की ते तुझ्यावर अवलंबुन राहतील ... Happy

    --------------------------------------------------------------
    ... वेद यदि वा न वेद

    "मी सामान्य (माणूस) आहे" या विधानात 'सामान्य' या शब्दावरच आपण इतके लक्ष केंद्रित करतो>>
    स्लार्टी,पुर्ण अनुमोदन.
    मुळातच 'सामान्य' म्हणजे कमी प्रतीचे असा समज आपण करुन घेतो.सामान्य,सरळ आणी सहज जगणं ही फार अवघड गोष्ट आहे.ती जर आपल्याला जमली तर लोक आपल्याला मीस करतात की नाही हा प्रश्नच महत्वाचा रहात नाही.
    *************************************************************
    द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

    मनापासून पटलं.
    अगदी मनातलं पानात आणलंस.. Happy

    --
    .. नाही चिरा, नाही पणती.

    सगळ्यांचे सविनय आभार मित्रहो.
    एका आवेगात हा लेख लिहून गेले. प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!
    ------------------------------------------
    हवे ते लाभले असूनी निजेची याचना..
    असे मी मोठमोठ्यांचे दिवाळे पाहिले..

    छानच लिहीलंय गं. यासाठी गोष्टी लिहीत नाहीयेस का नवीन? Wink
    आय मिस युवर स्टोरीज. चला येऊ देत आता.
    >> एका आवेगात हा लेख लिहून गेले.
    म्हणूनच तो सगळ्यांना इतका जवळचा वाटतोय कारण आवेगात सफाई, फिनिशिंग, मॉडिफिकेशन्स, मॅनिप्युलेशन्स यांना वाव नसतो. म्हणूनच आवेगात घडलेल्या गोष्टी सुंदर असतात आणि म्हणूनच लोक पुन्हा पुन्हा अशा आवेगात घडून गेलेल्या गोष्टींची आठवण काढतात आणि झुरतात Wink

    सुंदर लिहिलयंस .... प्रत्येक शब्द मनापासून, अगदी आतून आलाय...ताबडतोब मनाला भिडतंच.

    इतकं सुरेख लिखाण माझ्याकडून मिस झालं... Sad

    हा उपदेश मला स्वतःला आहे >> बहुधा पूनमने (slarty नी लालू ने) पण स्वत:साठीच लिहिलय सगळे.

    पुनम, खुप सुंदर लिहिलयस. मनाला भिडते एकदम.
    तुम्ही सगळे एवढे छान लिहुन तरी व्यक्त होऊ शकता, पण माझ्या सारख्या सामान्याला तर हे लिहुन जाउदे, बोलुन सुध्हा व्यक्त होता येत नाही. आम्ही ईकडे आलो नाहीतर कोणालाही आमची उणीव भासणार नाही, पण तुम्हा सगळ्या लेखक मंडळींची आम्हाला नेहमीच आठवण असते. असेच खुप छान छान लिहित जा. मी तुझा ब्लॉग पण नेहमी वाचते.

    तुझ्या आजवरच्या कथा व इतर लिखाणापेक्षा हे सगळ्यात प्रामाणिक वाटले आणि आवडले.
    आपलं सामान्यपण आपल्या आत, आपल्यासाठी ठळक होणं ही भयावह अवस्था असते.
    अगदी खरं!!
    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home

    खरय खरय पण फार मनाला लाउअन घेउ नकोस... आणि हो तु फार असामान्या आयडी आहेस... हे नक्की कारण असामान्य आयडीच असे लिहु शकतो.. बाकी हाय काय नी नाय काय..

    -- खोल कुठेतरी मलाही हे माहीत असतं की Maayboli does'nt miss me, I miss Maayboli. >> हे मात्र अंतिम सत्य आहे.

    पुनम, छान लिहिलयेस , आवडलं खुप..

    -----------------------------------------------------------------------
    ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
    अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
    रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
    धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

    पुनम,
    >>एखादी व्यक्ति कायमचा गैरसमज करून घ्यायचा तो घेतेच आणि एखादी लांब जायला नको असते ती जातेच.<<
    उत्तम विचार मान्डले आहेत. प्रत्येकाच्याच मनातले.

    लालू,
    >>उणीव ही गरजेतून येते किंवा एखाद्यावाचून अडते तेव्हा.<<
    >>'माझ्या आईसारखा जमला नाही' असं चुकून बोलून पुढं युध्दजन्य परिस्थितीला तोंड देण्यापेक्षा स्वतःच करेल.<< हा हा हा... १००%

    तरी काही लोकान्ना 'कोणाला आपली उणीव वाटली' यात जास्त समाधान वाटत. हे पण स्वाभाविक आहे म्हणा... कोणाला आपली उणीव (गरज) वाटली की ती व्यक्ती आपल्याशी contact करायचा प्रयत्न करेल... आपल्याला काही शन्का विचारेल... आपल्याला धन्यवाद देइल... आपल्याला महत्व मिळेल... ही आशा!
    या उलट, कोणाला आपली आठवण आली तर ते आपल्याला कळेलच असे नाही...
    आपण ... (निदन मी तरी...) किती जणान्ना contact करतो फक्त आठवण आली म्हणून?!!

    असो.. लेख अतिशय आवडला.

    पूनम... एकदम प्रामाणिकपणे आणि आवेगात लिहिलंयस हे जाणवतंय.
    गंमत अशी असते की प्रत्येकाला कुणाची ना कुणाची तरी (त्यावेळेपुरती) उणीव भासते (म्हणजे भासतेच !) पण ज्याची उणीव भासते त्याला/तिला माहिती नसतं इतकं(च) !!!

    माझ्या मनातलं ... असेच विचार मनात आले होते पण तू इतक्या छान शब्दात ते मांडलस

    पूनम,

    स्फुट आवडलं.. पोचल. यावर सर्वांच्या प्रतिक्रीयाही बोलक्या आहेत.. पण उणीव आणि गरजेचा जोडलेला लालूने जोडलेला संबंध मला तरी पटला नाही, अर्थात तेही वैयक्तीक मत आहे. "एखाद्यावाचून अडत" तो गरजेचा भाग झाला, पण "उणीव" हे अधिक "qualitative" आहे असा माझा अनुभव आहे. जसे:
    पानात पंचपक्वान्न असूनही "आईच्या हातच्या आमटीची" उणीव भासली.
    किव्वा अजूनही इथे बेटीच्या कवितांची प्रचंड उणीव भासते. त्या गरजेच्या आहेत का, मा.बो. साठी नक्कीच नाहीत, इथे येवून कविता म्हणून वाचण्याचे परमोच्च समाधान मिळण्याच्या द्रुष्टीने त्यांची ऊणीव भसते का? निश्चीतच!

    आणि खर तर आठवण आणि उणीव यातला सुप्त सम्बन्ध लक्षात घेतला पाहिजे, त्यात गल्लत करून कसे चालेल?
    अरेरे! तो असता तर किव्वा ती असती तर! अशी आठवण काढताना त्यातली "उणीव" अधोरेखीत होते असे मला वाटते. तेव्हा गरज ही तात्पुरती भावना असू शकते पण उणीव मात्र "कायम" भवना आहे असे वाटते.
    We will miss you! यात खर तर उणीवेचा भागच अधिक होता, गेली अनेक वर्षे जसे बोली भाषा अन लिखीत भाषा यात एक संकर दिसून येतो तसेच या we will miss you expression चे झाले आहे, आजकाल तो सर्रास "आम्हाला तुमची आठवण येत राहील" या अर्थी वापरला जातो. त्यातूनही अमेरिकेत अनेक म्हणींचे अनेक वेगवेगळ अर्थ निघतात्/वापरातात हा माझा वैयक्तीक अनुभव आहे Happy (no offense to anyone)

    हा, आता कुणावाचून कुणाच काहीही अडत नाही हे एक वैश्विक सत्त्य वगैरे मांडल तर त्या अर्थी गरज, उणीव, जाणिव, कुठलेही शब्द वापरा, काहीच फरक पडत नाहीये.. Happy आणि जसे मा.बो. हा आयुष्यातील एक घटक आहे तसेच मा.बो. ही सुध्धा प्रचंड महाकाय नेट वरील एक वेबसाईट आहे... तेव्हा कुणाचे कुठेच अडत नाहीये Happy

    एखाद्यावाचून अडत" तो गरजेचा भाग झाला, पण "उणीव" हे अधिक "qualitative" आहे
    गरज ही तात्पुरती भावना असू शकते पण उणीव मात्र "कायम" भवना आहे असे वाटते.
    >>>
    योग! Happy
    ------------------------------------------
    Times change. Do people??

    LOL
    'उणीव ही गरजेतून येते किंवा एखाद्यावाचून अडते तेव्हा' असे वाक्य आहे ते. त्याचा अर्थ उणीव=गरज असा काढून योग तुम्ही पुढे उणीव आणि गरजेतला फरक मांडलाय! असो. Happy आता कळले का? पहिल्या पॅरामधला विनोदाचा भागही कळला असेल अशी अपेक्षा आहे.

    >>कविता म्हणून वाचण्याचे परमोच्च समाधान मिळण्याच्या द्रुष्टीने त्यांची ऊणीव भसते का? निश्चीतच
    याचा अर्थ तुम्हाला हे समाधान मिळण्यासाठी बेटीच्याच कविता वाचल्या पाहिजेत असे आहे का? तसे असेल तर तुम्ही ती गरज करुन ठेवली आहे. मला वाटते हेच समाधान दुसर्‍या कोणीही लिहिलेल्या उत्तम कविता वाचून मिळू शकते. असा विचार तुम्ही केलात तर ती उणीव भासणार नाही.

    उणीव भासणार आहे की नाही हे लोकांवर अवलंबून आहे. त्यामुळे 'मी काय करावं म्हणजे माझी जगाला उणीव भासेल' हा विचारच चूक आहे.

    >>"उणीव" हे अधिक "qualitative" आहे
    म्हणजे काय मला कळले नाही.
    >>खर तर आठवण आणि उणीव यातला सुप्त सम्बन्ध लक्षात घेतला पाहिजे, त्यात गल्लत करून कसे चालेल
    exactly.
    >>अशी आठवण काढताना त्यातली "उणीव" अधोरेखीत होते असे मला वाटते.
    हे तुमचे वैयक्तिक मत झाले. माझे मत याच्या अगदी उलट आहे.

    पूनम, तू जसा विचार लिहिलास तसा असाम्याने म्हटल्याप्रमाणे या बाबतीत स्वतः कसा विचार करेन तेच लिहिले गेले आहे. प्रतिक्रिया मोठी झाल्याबद्दल दिलगीर आहे.

    Pages