माझ्या आयुष्यातील प्रभावशाली स्त्रिया

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2014 - 00:33

prabhavshali.jpg

महिला दिनाची संकल्पना अस्तित्वात येऊन शंभराहून अधिक वर्षं झाली आहेत. स्त्रियांना समाजात समान हक्क मिळावेत यांसाठी अनेक स्त्री-पुरुषांनी लढा दिला. त्यांमधले अडथळे पार करत अनेक चळवळी घडवल्या. त्यांतल्या खाचखळग्यांना समर्थपणे सामोरे जात स्त्रीशक्तीची जाणीव तिला स्वतःला आणि जगालाही करून दिली. भूतकाळाच्या तुलनेत वर्तमानातली स्त्री अधिक स्वतंत्र आहे, मोकळी आहे. स्वतःविषयी सजग झाली आहे, स्वतःसाठी, स्वकीयांसाठी नवं काही घडवू पाहते आहे. या प्रत्येकीमध्ये खास काहीतरी आहे, जे आपल्यावर प्रभाव पाडून जातं.

कामाचा उरक, शिस्त, स्वभावगुण, दृष्टीकोन, ध्येयपुर्तीचा प्रवास, परिस्थिती हाताळण्याची क्षमता, वागण्या-बोलण्याची लकब, आवाज, राहणीमान... स्त्रिच्या या आणि अश्या अनेक गोष्टी आपल्याला दिपवून टाकतात. आपल्या आचारविचारांत, आपल्या गुणांवगुणांत बदल घडवतात. आपल्याही नकळत आपण तिचं अनुकरण करू लागतो.

यंदा महिलादिनानिमित्त आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या स्त्रियांमधल्या आपण अनुभवलेल्या गुणांबद्दल, विशेष कुवतीबद्दल लिहिण्याचं आवाहन आम्ही करत आहोत. या स्त्रियांमधील कोणते गुण, विचार, दृष्टिकोन, क्षमता, तडफदारपणा हे कळत-नकळत आपणही आचरणात आणलेत किंवा तसा प्रयत्न केलात, त्यांच्या व्यक्तिमत्वातील कोणत्या गोष्टी आपल्याला प्रभावित करून गेल्या, आपल्या आयुष्यावर त्यांचा काही दूरगामी परिणाम झाला का, ह्याबद्दलही अवश्य लिहा.

आपली आई-बहीण-मावशी-आत्या इत्यादीच नव्हे तर आपल्या शिक्षिका, आपल्या डॉक्टर, स्त्री सहकारी, शेजारी किंवा अगदी क्षणभरासाठी सामोरी आलेली स्त्री... यातल्या कुठल्याही आपल्यावर प्रभाव पाडणार्‍या स्त्रीबद्दल इथे लिहू शकता.

आपले अनुभव याच धाग्यावर लिहायचे आहेत आणि त्यासाठी शब्दमर्यादा नाही.

जात-धर्म-पंथ-पद निरपेक्ष असे हे अनुभव आपल्या सर्वांनाच चांगलं काही शिकवून जातील याची आम्हाला खात्री आहे!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, पूर्वीही वाचले होते आताही आवडले.
प्राची, मस्त. सौ गौर बद्दल अजून तपशीलात वाचायला आवडेल.
आर्मी लाइफ बद्दल लिहि हे आता मी तुला सांगणारच नाहीये. Happy

माझी आई गेल्यावर वर्षभराने मी तिच्यासंदर्भाने काही लिहिले होते. माझ्या आयुष्यातील प्रभावशाली स्त्रिया संदर्भाने लिहिताना मला पहिल्या स्थानावर तेच परत म्हणायचंय. माबोवरही तो लेख आहे. त्यामुळे इथे कॉपी पेस्ट करण्यापेक्षा लिंक देते.
(हे उपक्रमाच्या नियमानुसार योग्य नसेल तर लिंक उडवावी)

माझ्या आईसंदर्भाने मी लिहिलेला लेख 'मिनीची आई'

प्राचीनेही मस्त लिहिले आहे पण अतिशयच थोडक्यात हां. हे म्हणजे आमच्या समोर बसून बेसन भाजायचा, लाडू वळायचे आणि मग सगळे डब्यात भरून डबा फडताळात ठेऊन कुलुप लावण्यासारखं आहे.

अजून सविस्तर टंका बरं.

अन्विता, मस्त लिहीले आहेस.
नी, अजून लिही की तुझे अनुभव.

मामी, मी लिहीनच ग. पण तूही लिही की तुला भेटलेल्या स्त्रियांबद्दल. Happy

मी शाळेत असताना माझी कै. गंगूताई पटवर्धनांशी पहिली भेट झाली. त्या भेटीतले मला फारसे काही आठवत नाही. फक्त माझ्यासोबत असलेल्या आईशी त्या बर्‍याच आस्थेने बोलत होत्या, त्यांनी माझ्याकडे पाहून माझी चौकशी केली आणि 'वा वा! खूप अभ्यास कर, मोठी हो!' अशा अर्थाचे काहीतरी म्हणाल्या होत्या असे अंधुकसे आठवते आहे.

नंतर गंगूताईंना मी अनेकदा शाळेच्या आवारात संस्थेच्या कामासंदर्भात ये-जा करताना, विद्यार्थिनी - शिक्षिकांची विचारपूस करताना, खेळाच्या मैदानाजवळ थबकून मुलींचा खेळ-सराव कौतुकाने न्याहाळताना पाहिले. धुवट पांढर्‍या रंगाचे ओचे पदर खोचलेले नऊवारी लुगडे, कोपरापर्यंत येणारे धुवट पांढरे पोलके, हातात सायकल, लुगडे सायकलच्या चाकात अडकू नये म्हणून पोटर्‍यांमध्ये चढवलेल्या रिंग्ज अशा वेषात तेव्हा वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या गंगूताईंना शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येताना पाहाणे हे तसे सवयीचे होते. अगदी साध्या राहायच्या त्या! त्यांचा आवाज बराचसा पुरुषी, घोगरा होता. आवाजात एक जबरी कमांड होती. त्यांनी कोणाला हाक मारली आणि त्या व्यक्तीला ऐकू गेले नाही असे क्वचितच व्हायचे! त्या आल्या आल्या शाळेतले पहार्‍यावरचे शिपाई एकदम खडबडून ताठ उभे राहात. सार्‍या पर्यवेक्षिका, शिक्षिका मग जरा जास्तच दक्ष असत. गंगूताईंना कोणी आपले काम सोडून त्यांच्यामागे आलेले आवडत नसे. मुलींनी तास सोडून इकडे-तिकडे फिरलेलेही त्यांना चालत नसे. त्या तसे फटकारायला मागेपुढे पाहात नसत. त्यांचा उत्साह, काटेकोर नजर, वागण्यातली शिस्त, दरारा आणि शाळा - विद्यार्थिनी व शिक्षिकांबद्दलची कळकळ हे त्यांच्या शाळेतील वावरावरून सहजच जाणवायचे.

एक-दोनदा मी पर्यवेक्षिकांच्या खोलीत बसले असताना त्या तिथे आल्याचे आठवते. त्यांनी माझे नाव विचारल्यावर पर्यवेक्षिका बाईंनी सांगितले, ''अहो, ही आपल्या अमक्या तमक्या (विद्यार्थिनीची) मुलगी.'' मग गंगूताईंनी मी कोणत्या इयत्तेत शिकते, धाकटी बहीण आता कितवीत आहे, माझे बाबा - आजी इत्यादींची चौकशी केली. नंतर मला कळाले की त्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेतील त्यांच्या कार्यामुळे माझ्या आजीला व त्यामुळे आमच्या समस्त परिवाराला ओळखत होत्या. मला तेव्हा खूप नवल वाटले होते की एवढी मोठी व्यक्ती आपल्या आजीला कशी काय ओळखते! पण तो काळच तसा होता.

गंगूताईंच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल मी शाळेत असताना मला फारसे माहिती नव्हते. पण मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी बरेच काम केले आहे एवढे ठाऊक होते. संस्थेच्या कार्यक्रमांना अनेकदा त्या प्रमुख पाहुण्यांमध्ये स्टेजवर बसलेल्या असत हे आठवते. कधी त्यांनी मला त्यांच्यासमोरून जाताना ओळखले तर हसून किंवा मान हलवून ओळख दाखवत. मला तेव्हा त्यांच्याबद्दल खूप कुतूहलही वाटे आणि अमाप आदरही! त्या वयातही त्या ज्या उत्साहाने व ऊर्जेने वावरत ते खरोखरी प्रेरणादायी होते.

नंतर मग हळूहळू ऐकू यायला लागले की गंगूताई थकत चालल्या आहेत. आता त्यांना शाळेत पूर्वीसारखे यायला जमत नाही. त्यांना ऐकू कमी येते. त्यांचे शाळेच्या कार्यक्रमांना येणेही कमी झाले आणि मग पूर्ण बंदच!

अतिशय साधी, शिस्तीची राहणी, कमी गरजा, तपस्विनीची वृत्ती, त्यांचे शिक्षण कार्यासाठी वाहून घेणे, कृत्रिमतेचा अभाव, निगर्वी वागणे, वृद्धत्वातही जाणवणारा जोश - उत्साह, मुलींच्या शिक्षणाविषयीची अमाप कळकळ आणि संस्थेबद्दलचे त्यांना वाटणारे प्रेम ह्या गोष्टी गंगूताईंचे नाव काढल्याबरोबर डोळ्यांसमोर उभ्या राहातात. त्यांचा विचार मनात जरी आला तरी नवे बळ, प्रेरणा व उभारी मिळते.

वा अकु..
त्यांना शाळेत नेहमीच पाह्यलेलं आहे. आमच्या वर्गातल्या शिल्पा पटवर्धनला त्या नेहमी बोलवून घ्यायच्या आल्या की. ती कुठल्या नात्यात होती म्हणे त्यांच्या. त्यामुळे त्या आल्यात हे कायमच कळायचं.

त्यांच्याबद्दल खूप माहिती नव्हती. आज कळली.

या स्त्रीला मी मिसरूड (आणि शिंगे) फुटायच्या काळात भेटलो. बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश (कसाबसा) मिळाला. त्या नशेत लागलेच कॉलेज बघायला गेलो. सायंकाळच्या पाच वाजल्या होत्या. कॉलेजच्या प्रांगणात तिरप्या सावल्या पसरायला लागल्या होत्या. तशी तुरळकच मुलंमुली बाहेर होती. गेटमधून आत शिरल्यावर समोर कार्यालय आणि दोन्ही बाजूस दोन विंग. मी गेटमध्ये किंचित गोंधळलो आणि क्षणात आधी उजव्या विंगला भेट देऊ असा निर्णय घेऊन तिकडे वळलो. विंगमध्ये शिरणार इतक्यात समोरून एक स्थूलशी व्यक्ती हॉस्पिटलात डॉक्टर घालतात तसा गुडघ्यापर्यंत शुभ्र गाऊन घालून विंगच्या प्रवेशद्वाराकडे येत असलेली दिसली. पण माझं पुरेसं लक्ष जाण्याआधीच ती व्यक्ती गर्रकन वळून पुन्हा विंगच्या दरवाजातून आत गेली. ती व्यक्ती जितक्या पटकन मागे फिरली तितक्याच पटकन मीही तिथून प्रतिक्षिप्त क्रियेने सरळ उलट्या दिशेला वळून माझा मोर्चा डाव्या विंगकडे वळवला. बापरे! हे मेडीकल कॉलेजही आहे आणि आपल्याला माहीतही नाही, वगैरे विचार करत असतानाच माझ्या डोळ्यांनी नोंदवलेली आणखी एक नोंद मेंदूपर्यंत पोचली होती. अरे! त्या व्यक्तीच्या दोन्ही हातांत दोन नीळसर करड्या कुबड्याही होत्या. नक्की डॉक्टर होता की पेशंट देव जाणे!

यथावकाश कॉलेज सुरू झाले. गेल्यावर्षीच्याच वेळापत्रकावर चालणारे वर्षाच्या सुरुवातीचे काही दिवस निघून गेले आणि आम्हाला रितसर नवे वेळापत्रक मिळाले. नव्या वेळापत्रकावरचा नवा दिवस सुरू झाला आणि पहिल्याच तासिकेवर आमच्या वर्गावर आमच्या वर्गशिक्षिका गुडघ्यापर्यंत घातलेल्या सैलसर पांढर्‍या शुभ्र अ‍ॅप्रनमधला आपला स्थूलसा देह कुबड्यांच्या साहाय्याने निळ्या जीन्समधल्या आणि पोलिओची शिकार झालेल्या आपल्या दोन्ही पायांवर सावरत हळुहळू वर्गात प्रवेश कर्त्या झाल्या. तिशीच्या आसपासचे वय असावे. सहज बुटकी म्हणता येईल अशी उंची. गोरापान चेहरा. कपाळावर रुळणारे केस, सोनेरी गोल फ्रेमच्या चष्म्यातून दिसणारे मोठे डोळे आणि 'खडूस' असूनही चेहर्‍यावर एक निरागस भाव आणण्यास कारणीभूत असलेले गोबरे गाल. कपाळावर सौदिंडीयन लावतात तसे चंदन.

प्रो. दीप्ति चंद्रन!

वर्गाच्या उजव्या कोपर्‍यापासून सुरुवात केलेली त्यांची नजर स्वतःबरोबर जरबेची शांतता पसरवीत वर्गाच्या मध्यावर स्थिरावली.
काहीच क्षणात एक अवाक्षरही न काढता शांतता प्रस्थापित करणार्‍या काही घटना मी पाहिल्या त्यातली ही एक!

मग किंचित हालचाल करून दोन कुबड्यांवरील आपला भार एकाच कुबडीवर तोलून दुसरी कुबडी उचलून स्टेजवरच्या खुर्चीकडे दाखवीत पुढच्या रांगेतील विद्यार्थ्याला उद्देशून म्हणाल्या,

'Please pull the chair down!'

स्टेजवर चढून तिथल्या खुर्चीत स्थानापन्न होण्यात त्यांना कितीतरी शक्ती आणि वेळ खर्च करावा लागला असता. आधीच्या तासाची घंटा होण्यापूर्वीच कर्रेक्ट दोन मिनिटं आधी वर्गाबाहेर येऊन थांबणार्‍या या स्त्रीला स्टेजवरच्या खुर्चीत जायला लागणर्‍या वेळेची आणि शक्तीची उधळपट्टी कधीच मानवली नसती.

कॉलेजातही शाळेच्या वर्गाची शिस्त या स्त्रीने अनुभवायला दिली. आठवड्याला लेखी टेस्ट झालीच पाहिजे. टेस्टच्या उत्तरपत्रिकेसाठी वापरल्या जाणार्‍या कागदाला चारी बाजूने हिरव्या स्केचपेनने एक सेंटीमीटरचा समास सोडलाच पाहिजे. खरे म्हणजे तिचे खिळल्या जागी बसून शिकवणे हे इतके प्रभावी होते परीक्षेपूर्वी तिच्या नोट्सवर एखादी नजर पुरेशी व्हायची. तिच्या लेक्चरला बसायचा कसलाच आग्रह किंवा जबरदस्ती तिने कधी केली नाही आणि तरीही वर्षभर १०० टक्के हजेरी अनुभवणारी ही एकच प्रोफेसर आमच्या कॉलेजात होती. एकदा कॉम्पुटर लॅब चालू असताना अचानक हादरा आल्यासारखा आवाज झाला आणि दोनेक क्षण सगळे हादरले. आजूबाजूच्या लॅब्ज् मधून एकदम गोंगाट करत सगळे बाहेर पडू लागले. आम्हीही घाईघाईने एसीबंद लॅबच्या चिंचोळ्या दरवाजाकडे धाव घेतली. पण लगेचच लक्षात आले की लॅबमध्ये दीप्तिमॅडमही आहेत. झटकन सगळे मागे वळले आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी दरवाजा मोकळा केला. पण चेहर्यावरची रेषाही न हलवता आस्थेच्या सुरात त्या म्हणाल्या,

'No kids.. First you all have to get out of the lab. I will manage myself. Common move fast!'

वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला नावानिशी लक्षात ठेवणारी ही एकच प्रोफेसर मी माझ्या कॉलेजच्या आयुष्यात बघितली. ती ज्या ज्या वर्गांना शिकवायची त्या सगळ्या वर्गातल्या सगळ्या मुलांना नावानिशी हाक मारायची. इतर प्रोफेसरांपुढे फुटलेली शिंगे दाखवायची उर्मी या स्त्रीपुढे आपोआपच जिरायची आणि खरोखरच तिच्यापुढे 'किड' असल्यासारखे वाटायचे. कॉलेज संपल्यानंतरही तिचे विद्यार्थी आवर्जून येऊन वेळ काढून तिला भेटतात. आणि त्या माजी विद्यार्थ्याच्या क्षेत्रात आवड असलेल्या एखाद्या आजी विद्यार्थ्याची त्याच्याशी अगदी आवर्जून ती गाठ घालून देते.

एकदा सिस्टीम प्रोग्रॅमींच्या प्रोजेक्टसाठी तिने आम्हाला गट पाडून दिले. पण आम्ही आगाऊपणा करून दोन गटातील सदस्यांची (दोस्ती यारी च्या बॅसिसवर) परस्पर अदलाबदल केली. हे तिला कळले. मग सगळ्यासमक्ष आमची तासणी झाली. मला ते फार झोंबले. दोन दिवस मी त्यांच्यापुढे गेलोच नाही. नो लेक्चर्च. नो प्रॅक्टीकल्स. (वा वा, काय पुर्षार्थ! ). पण मग स्वतःलाच अपराधी वाटू लागले. तिसर्‍या दिवशी सगळा इगो बिगो बाजूला ठेवून स्टाफ रूम मध्ये गेलो आणि वर न बघताच 'सॉरी' म्हणालो. तर म्हणाल्या 'मला माहीत होतं.. तू येशील. पण तुझ्यातला मेंढा किती काळ टिकतोय ते बघत होते!'

दीप्ति मॅडमची छाप त्या काळात माझ्यावर चांगलीच पडली होती. किंबहुना त्यांच्या प्रत्येक विद्यार्र्थ्यावर पडते. नंतरही केंव्हा केंव्हा त्यांच्याबद्दल आठवत राहायचे. चार वर्षांच्या काळात त्यांनी आमची टणक होऊ घातलेली मडकी कधी प्रेमाने, कधी कठोरतेने आणि बर्‍याचदा स्वतःच्या वर्तनाने चांगलीच थोपटली. रोज संध्याकाळी त्यांचा ठरलेला रिक्षावाला कॉलेजच्या गेटपाशी ठरलेल्या वेळी हजर व्हायचा. कधी त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसे असेल असेही प्रश्न त्यांच्या प्रेमापोटी पडायचे. कधी आता कॉलेजमध्ये जावून त्यांना भेटावे आणि इतक्या वर्षांनंतरअजूनही त्यांनी मला नावानिशी ओळखले ही गोष्ट मिरवावी वाटते.

( लॅपटॉप सध्या जवळ नाही. अगदीच राहावले नाही. ही सगळी पोस्ट फोनवरून टाईप केली आहे. शुद्धलेखन आणि विस्कळीत वाटल्यास कृपया माफ करा.)

बी, प्राची, अकु, गजानन - सर्वांचेच अनुभव अतिशय ह्रद्य आणि प्रेरणादायी ....

बी यांची अकृत्रिम लेखनशैली भुरळ घालणारी ......

बी, प्राची, अन्विता, गजानन छान लिहिले आहे सगळ्यांनी.

प्राची, नियमित लिहीत रहा. तुझी लेखनशैली खूप सहज आहे, त्यामुळे लेखन वाचताना अगदी भिडते, सरळसोट पोचते.

गजानन, खूप सुंदर लिहिले आहेस. खूपच छान! हे सगळे फोनवरून टाईप केलेस त्याबद्दल तुला सा.न.

येथिल सर्वच लेख मनापासून आवड्लेत!धन्यवाद!

आमच्या मावशिंची आठ्वण झाली.

त्यांच्या शब्दबध्द केलेल्या आठ्वणी ह्या धाग्यावर...

http://www.maayboli.com/node/42338

शक्तिस्वरुपा 'स्त्रि' स वंदन..!'नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमः!!

बी, प्राची, अकु, गजानन - सर्वांचेच अनुभव अतिशय ह्रद्य आणि प्रेरणादायी ....+१

२०२१ च्या गणेशोत्सव धाग्यात, माझे एवढे दागिने मिरवुन झाले. पण 'हर्ट' यांनी वर्णन केलेल्या डोरल्याची सर एकालाही नाही. काय सुंदर लिहीले आहे. वाह!!!

Pages