माझ्या आयुष्यातील प्रभावशाली स्त्रिया

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2014 - 00:33

prabhavshali.jpg

महिला दिनाची संकल्पना अस्तित्वात येऊन शंभराहून अधिक वर्षं झाली आहेत. स्त्रियांना समाजात समान हक्क मिळावेत यांसाठी अनेक स्त्री-पुरुषांनी लढा दिला. त्यांमधले अडथळे पार करत अनेक चळवळी घडवल्या. त्यांतल्या खाचखळग्यांना समर्थपणे सामोरे जात स्त्रीशक्तीची जाणीव तिला स्वतःला आणि जगालाही करून दिली. भूतकाळाच्या तुलनेत वर्तमानातली स्त्री अधिक स्वतंत्र आहे, मोकळी आहे. स्वतःविषयी सजग झाली आहे, स्वतःसाठी, स्वकीयांसाठी नवं काही घडवू पाहते आहे. या प्रत्येकीमध्ये खास काहीतरी आहे, जे आपल्यावर प्रभाव पाडून जातं.

कामाचा उरक, शिस्त, स्वभावगुण, दृष्टीकोन, ध्येयपुर्तीचा प्रवास, परिस्थिती हाताळण्याची क्षमता, वागण्या-बोलण्याची लकब, आवाज, राहणीमान... स्त्रिच्या या आणि अश्या अनेक गोष्टी आपल्याला दिपवून टाकतात. आपल्या आचारविचारांत, आपल्या गुणांवगुणांत बदल घडवतात. आपल्याही नकळत आपण तिचं अनुकरण करू लागतो.

यंदा महिलादिनानिमित्त आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या स्त्रियांमधल्या आपण अनुभवलेल्या गुणांबद्दल, विशेष कुवतीबद्दल लिहिण्याचं आवाहन आम्ही करत आहोत. या स्त्रियांमधील कोणते गुण, विचार, दृष्टिकोन, क्षमता, तडफदारपणा हे कळत-नकळत आपणही आचरणात आणलेत किंवा तसा प्रयत्न केलात, त्यांच्या व्यक्तिमत्वातील कोणत्या गोष्टी आपल्याला प्रभावित करून गेल्या, आपल्या आयुष्यावर त्यांचा काही दूरगामी परिणाम झाला का, ह्याबद्दलही अवश्य लिहा.

आपली आई-बहीण-मावशी-आत्या इत्यादीच नव्हे तर आपल्या शिक्षिका, आपल्या डॉक्टर, स्त्री सहकारी, शेजारी किंवा अगदी क्षणभरासाठी सामोरी आलेली स्त्री... यातल्या कुठल्याही आपल्यावर प्रभाव पाडणार्‍या स्त्रीबद्दल इथे लिहू शकता.

आपले अनुभव याच धाग्यावर लिहायचे आहेत आणि त्यासाठी शब्दमर्यादा नाही.

जात-धर्म-पंथ-पद निरपेक्ष असे हे अनुभव आपल्या सर्वांनाच चांगलं काही शिकवून जातील याची आम्हाला खात्री आहे!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

खूप सुंदर लिहिलं आहे वरती. माझ्या आईवर लिहिलेला हा एक लेख मी इथे देत आहे. ह्यापुर्वी इथे अनेकांनी वाचलेला आहे. पण मोह आवरत नाही म्हणा किंवा आज इथे द्यायला योग्य वाटतो आहे म्हणून म्हणा इथे देत आहे...

हा लेख लिहिताना माझ्या नकळत काही शब्द वर्‍हाडी भाषेतून लिहिल्या गेलेत. त्यात परत बदल न करता आणि शुद्धलेखनाच्या भरभक्कम चुकांसहीत मी हा लेख तसाचं इथे आपल्यासमोर मांडत आहे. धन्यवाद!

आईच डोरलं
लग्नात तिला पितळेचं डोरलं मिळालं. काळ्या मण्यांची पोथ आणि त्यामधे शिंपल्याच्या आकारच इवलसं डोरलं. पितळेच असूनही ती फार जपायची त्याला. स्नानाला जाताना अलगद गळ्यातून काढून पाणी लागू न देता भिंतीवर ठेवायची. हळूहळू ते चपायला लागलं म्हणून त्यात तिनी लाख भरली. मग ते कसं चपणार! अधुनमधुन चिंचेच्या वा शिकेकईच्या पाण्यानी त्याला घासून चकचकीत करायची. आईला सारखी आस होती बाबा तिला कधीतरी सोण्याच डोरलं घेऊन देतील म्हणून. पण मग इतकी अपत्य झाल्यानंतर तिने ही अपेक्षा केली नाही की तिला सोण्याच डोरलं मिळेल म्हणून. मी दुसरीत असेल, तेंव्हा बाबांना दिवाळीचा बोनस मिळाला आणि त्यांना वाटल आईसाठी डोरलं कराव. आई, बाबा आणि मी आम्ही तिने जण दुकानात गेलो आणि शेवटी ३६० रुपये मोडून बाबांनी आईची डोरल्याची हौस पुर्ण केली.
आईच्या अवतीभवती खेळताना दमून मी तिच्या गळ्याभोवती हात टाकायचो तेंव्हा ते डोरलं मला दिसायच. पदरा आडून तिचे डोरले कधी दिसायचे नाही. कधी सुपात ज्वारी पाखळताना तिचा पदर क्षणभर डोक्यावरून ढळायचा आणि तिच्या वात्सल्यमय गौर कांतीवर ते पिवळेधम्म डोरले लखलखायचे. ते डोरले अगदीच चिकुकले होते. त्याच्या आजूबाजूला उजवीकडून सोण्याचे दोन मणी आणि डावीकडूनही सोण्याचे दोन मणी होते. शिंपल्याच्या आकाराचं ते डोरल... त्यावर मधे जांभळट गुलाबी रंगाचा खडा होता. तो काळोखात लकाकायचा. त्याच्याकडे टक लावून बघता बघता मला कधी झोप येत असे माहिती देखील पडायचे नाही.
ऐके दिवशी आई सुपात काहीतरी पाखळत असताना मी असेच दोन हात तिच्या गळ्याभोवती टाकलेत आणि ती म्हणाली पोथ तुटेल माझी. हे डोरलं तुझ्या शिक्षणासाठी. ऐरवी आईनी मला कधी अभ्यास कर, पुस्तक घे, धडा वाच, गणित सोडव असे म्हंटले नाही. ती फक्त एकच म्हणायची हे डोरल माझ्या शिक्षणासाठी. वर्षाकाठी ती एक एक मणी वाढवायची. मी तिला म्हणत असे माझ्या शिक्षणापर्यंत तुझी ही पोथ गळाभर सोण्यानी भरून जाईल. त्यावर ती म्हणायची वेळ आली की ह्यातल सोणं मोडून देईन मी तुला, तुझ्या शिक्षणासाठी.
आईच हे वाक्य मला माझ्या बालवयात एक प्रेरणा देऊन गेलेंलं आहे. त्याही पेक्षा नकळत घरातील परिस्थितीच वर्णन तिच्या त्या एका वाक्यात होत. मला काय करायला हवं ते सार काही ते वाक्य सांगयचं. मी.. आई.. तिच डोरलं.. माझ शिक्षण.. असे एक समीकरण आपोआप माझ्या डोक्यात तयार झालं होत. कुठलीही परिक्षा जवळ आली, एखादी चाचणी असली की मला हे वाक्य आठवे. मग मी मनलावून अभ्यास करायचो. खूप छान गुण मिळालेत की आईला त्याच्याबद्दल काही सांगण्या अगोदरच तिला उमजायचे की मला अभ्यासात यश आलेय म्हणून. तिची मुद्रा प्रसन्न हसायची आणि डोरल झळकायचं.

आईच डोरलं मोडायचं काम अखेर पडलच नाही. पण तिच्या परिने तिने मी लहान असतानाच माझ्या पुढच्या भविष्याची काळजी केली होती हे महत्त्वाचे. तिच्या पोतीतले मणी पाहिले तर काही मणी गोलसर, तर काही अष्टकोणी, काही मण्यांवर बारीक नक्षीकाम केलेले, काही मणी पंचकोनी, काही मण्यांचा व्यास मोठा तर काहींचा लहान! मी झाल्यापासून तिने वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे मणी पैसे येतील त्याप्रमाणे विकत घेतले. तिची बचत, तिची पुंजी, तिला आपल्या परिस्थितीचे भान, वास्तव्याची चाहूल हे सर्व त्यातून प्रतित होते. सिंगापुरहून मी आईला सोण्याच्या बांगड्या घेऊन गेलो त्यावेळी आईने त्या बांगड्या क्षणभर हातात घातल्यात आणि परत तिच्या आवडत्या, तिला तिच्या माहेरहून आंदणात आलेल्या, एका पितळेच्या डब्यात ठेवून दिल्यात. मी तिला विचारलं, आई घाल ना आता ह्या बांगड्या नेहमीसाठी. त्यावर ती उत्तरली, "नाही नाही.. ह्या तुझ्या लेकरांसाठी मी जपून ठेवते. त्यांच्या शिक्षणासाठी कामा येतील." तिच्या मऊसुत हातांनी तिने त्या बांगड्या डब्यात ठेवल्यात. सर्वात तळाशी तिचं, तिला तिच्या लग्नातल मिळालेलं, पितळेच डोरलं होत. पिवळधम्म! चकचकीत!! तिच्याकडे पहाता पहाताचं खिडकीतून तिन्हीसांजेचं सोनसळी उन्ह घरात सांडलं. मला वाटतं तो दिवस माझ्यासाठी खरचं सोन्याचा होता!
+bee

लग्नानंतरचे १लेच युनिट होते माझे. आर्मी लाइफ कसे असते, काय असते काहीही माहिती नव्हते. नवराही नुकताच जॉइन झाल्याने आम्हांला सांगणारेही कोणी नव्हते. अश्या काळात आम्हांला एक जोडपे भेटले. माझ्या नवर्‍याच्या एका सिनिअरने आम्हांला आपल्या पंखाखाली घेतले. त्यांची बायको म्हणजे सौ. गौर, यांच्याबद्दल मी काय लिहू?
एखादया मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांनी माझ्यावर माया केली. अगदी कसे वागावे, कसे बोलावे, आर्मीचे रितीरिवाज, संकेत कसे, कुठे पाळावेत हे तर सांगितलेच. पण एका आर्मी ऑफिसरचे घर कसे ठेवावे, घरात काय आणि किती वस्तू असाव्यात, असलेल्याच वस्तूंमध्ये कसे भागवावे हेही शिकवले.
हे सगळे शिकवतानाच एक स्त्री म्हणूनही कसे प्रगल्भ व्हावे हेही नकळत रुजवले माझ्या मनात. आर्मीत स्त्रियांना मिळणार्‍या मानाचा, आदराचा दुरुपयोग करू नये हे स्वतःच्याच वागण्यातून दाखवून दिले. आर्मीत बायकांना खूपच प्रोटेक्ट केलं जातं, पण याची सवय करून घेऊन आपण परावलंबी होऊ नये हे कुठेतरी मनावर ठसवले माझ्या. मनासारखी संधी नाही म्हणून घरी न बसता मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन कामाला लागावे हेही सांगितले. आर्मीकडून मिळणार्‍या सुविधांचा दुरुपयोग करू नये, ऑफिस प्रॉपर्टीचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करू नये हेही दाखवून दिले.
घरापासून दूर असूनही त्यांनी कधीही घराची उणीव भासू दिली नाही. अगदी बहिणीच्या मायेने माझे कौतुकही केले आणि माझ्या दु:खातही मला जवळ घेतले.

काय आणि किती शिकले मी त्यांच्याकडून इकडे लिहीणे अशक्य आहे मला. हे सगळे जाणूनबुजून, अगदी शिकवणी लावल्यासारखे नाही शिकवले त्यांनी. रोजच्या भेटींतून, त्यांच्या स्वतःच्या वागण्याबोलण्यातून त्यांनी हे माझ्या मनावर ठसवले. मीही अधाशासारखे टिपून घेतले सगळे. आज मी एक सिनिअर लेडी म्हणून वावरताना जे काही करते, जसे करते त्यामागे त्यांचा माझ्यावर असलेला जबरदस्त प्रभाव आहे. एक सिनिअर लेडी कशी असावी हे त्यांनी मला शिकवले. खरे तर, १ल्याच युनिटमध्ये अशी सिनिअर लेडी मिळणे हे मी माझे भाग्यच समजते आणि माझ्या ज्युनिअर्सपण माझ्यासारख्याच भाग्यशाली ठराव्यात म्हणून प्रयत्न करत असते. Happy

बी.. तुम्ही इतकं छान लिहित असाल अशी याआधी कल्पना नव्हती..
शिक्षणाचं महत्व अश्याप्रकारे तुमच्यावर बिंबवणार्‍या आणि तुम्हाला घडवणार्‍या तुमच्या आईला माझा सलाम..

अवांतरः पाणी काढलंत डोळ्यातुन Sad

बी , फार मस्त लिहिलय
प्राची , माझ्या बहिणीच्यअ युनीट मधे , तू केलेल्या वर्णना च्या अगदी उलट सिनियर लेडी पाहिल्या आहेत. त्यामुळे भांबावलेल्या नव्या नवर्‍या. तू भाग्यवान आहेस. Happy

इन्ना Happy
मलाही अश्या सिनिअर लेडीज भेटल्या आहेत नंतरच्या काळात, पण त्यांच्याकडून मी सिनिअर लेडी कशी 'नसावी' हे शिकले. Happy आणि जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे पाहायचे तेव्हा तेव्हा सौ. गौरबद्दलचा माझ्या मनात असलेला आदर आणखीनच दुणावायचा. Happy

सर्वांना धन्यवाद. Happy

बी, खूप सुन्दर !! शिक्षण सोन्यापेक्षा ही जास्त चमकते हे आपल्या आईने जाणले होते. माझे वडील नेहमी म्हणत आपली शेती वाडी काही नाही शिक्षण हेच आपले भांडवल. त्यानी आम्हाला अगदी मुलगे मुली असा भेदभाव न करता खूप शिक्ष ण दिले.
प्राची, अशी कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणे हे आपले भाग्य असते.

बी, सुंदर.

प्राची, व्यक्ती चांगलीच असावी हे लिखाणांतून जाणवतय. बाकी आर्मी आयुष्याची काहीच माहिती नाही त्यामुळे व्यक्ती कशी आणि का चांगली ते काही मला पोचलं नाही.

बी खुप सुंदर लिहिलं आहेस.
प्राची तुही छान लिहिलं आहेस.

सर्व महिलांना महिलादिनाच्या शुभेच्छा !

बी, फार सुंदर लिहिले आहेस.

प्राची, माझ्या आईच्या अनेक मैत्रिणी आर्मी वाईव्ह्ज आहेत आणि आता माझ्याही काही मैत्रिणींचे पती आर्मीत आहेत. कोणत्याही नव्या ठिकाणी बदली झाल्यावर तिथे रुळणे, तेथील जीवनशैली आत्मसात करणे हे सोपे नसतेच हे आता त्यांच्या अनुभवांवरून कळते. तुझ्याकडे या विषयावर लिहायला भरपूर काही असणार आहे हे माहित आहे. नक्की लिही!

बी, छानच लिहीलं आहेस. . केवढा दूरदर्शीपणा. प्रत्येक आई पिल्लांसाठी चारा गोळा करत असते नाही?

बी , खूप छान लिहिले आहे .

आमच्याकडे पण लहानपणा पासून मी माझी सतत दिवसभर दासबोध व इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करत बसलेली पणजी आजी पहिली आहे . बहुतेक आता सूना , नातासुना आल्यावर त्यांच्या संसारात न अडकता काहीशी बाजूला राहून पण आमच्यावर सतत प्रेम करणारी पणजी आजी मी पहिली. माझी आई नोकरी करते म्हणून अगदी तिला सगळ्या कामात मदत करणारी तिच्या पाठीशी खंबीर उभी असणारी आणि आपल्या सुनेवर मुली इतकच प्रेम करणारी माझी आजी आणि नोकरी करून ' महिलांनी आत्मनिर्भर असायला हवे ' असा कृतीतून संदेश देणारी आई मिळणे माझे मी भाग्याच समजते .'इतकी वर्षे मी माझ्या सासूच्या support मुळे नोकरी आणि संसार दोन्ही समर्थपणे करू शकले' हे आई अभिमानाने सांगते . चांगल्या सासूच्या व्यक्तिरेखा फक्त T .V सिरियल मधेच नसतात हे माझ्या घरातील उदाहरणावरून सांगते.
मला मात्र नवरा खूप लहान असतानाच माझ्या सासूबाई गेल्यामुळे सासूबाईंच्या रूपात अजून एक आई मिळण्याचे भाग्य काही मिळाले नाही .

Pages