निमंत्रण - विद्युल्लता २०१४ - फोटोस्टोरी प्रदर्शन

Submitted by सावली on 3 March, 2014 - 13:19

नमस्कार,

'विद्युल्लता' - जागतिक महिला दिनानिमित्त एक फोटोस्टोरी प्रदर्शन! फोटो सर्कल सोसायटीच्या महिला प्रकाशचित्रकार ( सुमारे ५५) दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना भेटुन त्यांचे कार्य चित्रीत करतात. जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन भरवुन अशा यशस्वी महिलांना प्रकाशचित्रकारांकडुन एक प्रकारची मानवंदनाच दिली जाते.

२०१४ हे विद्युल्लता प्रदर्शनाचे तिसरे वर्ष. यावर्षी महाराष्ट्राबरोबरच पूर्वांचलातील चार राज्ये, असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या ठिकाणच्या सामाजिक, शैक्षणिक, कला आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या ३१ जणींना आमची यावर्षी कार्यरत असणारी सतरा जणींची टिम भेटली आणि त्यांचे प्रकाशचित्रण केले.

त्यातीलच आमची सहाजणांची छोटी टिम पूर्वांचलातला पंधरा दिवसात अडीचहजार किमी पेक्षा जास्त प्रवास करुन तिथल्या स्त्रियांना भेटुन, त्यांच्या घरी राहुन आली. अतिशय दुर्गम भागात रहात असुनही हिरिरीने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या या चौदा स्त्रीयांना भेटुन आम्ही सगळेच भारावुन गेलो होतो.

त्या पूर्वांचलातल्या चौदाजणी आणि महाराष्ट्रातल्या सतरा जणींचे कार्य प्रकाशचित्रांच्या रुपाने विद्युल्लता या प्रदर्शनात पहाता येईल. प्रदर्शनाचे उद्घाटन ७ मार्च रोजी संध्याकाळी ५:३० वाजता कलाभवन, ठाणे येथे अरुणाचल प्रदेशच्या पद्मश्री बिन्नी यांगा यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी मायबोलीकरांनी उपस्थित रहावे असे आवर्जुन वाटते.
हे प्रदर्शन ७ मार्च ते ९ मार्च या कालावधीत सकाळी १०:०० पासुन रात्री ७:०० वाजपर्यंत सर्वांनाच खुले आहे.

त्याचबरोबर या महिलांशी बोलताना, त्यांच्याबद्दल जाणुन घेताना आम्हाला ते अनुभव शब्दबद्ध करावेसे वाटले. या सगळ्यांच्या कार्याची माहिती, आमच्या पूर्वांचलातल्या प्रवासातले अनुभव हे पुस्तिका रुपाने या प्रदर्शनाच्या वेळेस प्रकाशित करणार आहोत. पूर्वांचलातल्या महिलांना महाराष्ट्रात चाललेले काम आणि इथल्यांना पूर्वांचलातल्या कार्याबद्दल माहिती असा दुहेरी उद्देश असल्याने ही पुस्तिका इंग्रजीमधुन तयार करण्यात आलेली आहे. ही पुस्तिका देणगीमूल्य रु.१०० फक्त या किमतीत प्रदर्शनाच्या ठिकाणी उपलब्ध होईल.

हे प्रदर्शन आणि पुस्तिका हे महाराष्ट्र आणि पूर्वांचलाला जोडणार्‍या सेतुमधला एक छोटासा दगड ठरेल अशी अपेक्षा आहे.

प्रदर्शनाला नक्की या!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, उद्घाटन अन प्रदर्शनासाठी शुभेच्छा. जे कोणी मायबोलीकर जातील त्यांनी सविस्तर, सचित्र वृत्तांत लिहा प्लीज .

दिनेशदा, सुनिधी,केपी, शोभनाताई थँक्यु.
ललिता, उद्घाटनाच्या दिवशीच ये. खुप जणींची भेट होईल.

पूर्वाचलातल्या मुलींना >> पूर्वांचलात आम्ही ज्यांना भेटलो त्या सगळ्या जेष्ठ समाजसेविका आहेत. आणि गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत.

आजच्या महाराष्ट्र टाईम्स, ठाणे नवी मुंबई पानावर या प्रदर्शनाची बातमी आली आहे.

प्रदर्शनाला नक्की येणार Happy

उद्घाटनाला यायला आवडलं असतं पण तेव्हा नाही जमणार मला. मी शनिवारी/ रविवारी येईन

सावली, अभिनंदन आणि शुभेच्छा! Happy

पुस्तिका मागवायची असेल तर कोणाशी संपर्क साधायचा? (ऑनलाइन घेता येईल का?)

थँक्यु लोकहो Happy

वृत्तांत >>प्रदर्शनाला भेट देणार्‍या मायबोलीकरांनी त्यांचे अनुभव लिहीलेत तर मलाही वाचायला आवडेल.
ठाण्या व्यतिरिक्त इतर शहरातही प्रदर्शनाच >> ४/५/६ एप्रिलला नाशिक येथे हे प्रदर्शन असणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर शहरातले अजुन नीटसे ठरले नाहीये. फक्त पूर्वांचलातले फोटो मात्र देशात इतर शहरात प्रदर्शित करण्यात दुसर्‍या एका संस्थेला इंटरेस्ट आहे असे बोलणे झाले आहे.
पुस्तिका मागवायची असेल तर कोणाशी संपर्क साधायचा? >> मला सांगितलेत तर मी काढुन ठेवेन, आणि कुणी तुमच्या इथे जाणारे असेल त्यांच्यामार्फत पाठवायची व्यवस्था करु शकेन.

थँक्यु माधुरी.
आज लोकसत्ता पुरवणी ( सर्व जिल्हे), पुढारी आणि सकाळ या वृत्तपत्रातही याविषयी बातमी आली आहे.

सात तारखेला ५:३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन आहे याची आठवण करुन देण्यासाठी ही पोस्ट Happy

Pages