निमंत्रण - विद्युल्लता २०१४ - फोटोस्टोरी प्रदर्शन

Submitted by सावली on 3 March, 2014 - 13:19

नमस्कार,

'विद्युल्लता' - जागतिक महिला दिनानिमित्त एक फोटोस्टोरी प्रदर्शन! फोटो सर्कल सोसायटीच्या महिला प्रकाशचित्रकार ( सुमारे ५५) दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना भेटुन त्यांचे कार्य चित्रीत करतात. जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन भरवुन अशा यशस्वी महिलांना प्रकाशचित्रकारांकडुन एक प्रकारची मानवंदनाच दिली जाते.

२०१४ हे विद्युल्लता प्रदर्शनाचे तिसरे वर्ष. यावर्षी महाराष्ट्राबरोबरच पूर्वांचलातील चार राज्ये, असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या ठिकाणच्या सामाजिक, शैक्षणिक, कला आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्‍या ३१ जणींना आमची यावर्षी कार्यरत असणारी सतरा जणींची टिम भेटली आणि त्यांचे प्रकाशचित्रण केले.

त्यातीलच आमची सहाजणांची छोटी टिम पूर्वांचलातला पंधरा दिवसात अडीचहजार किमी पेक्षा जास्त प्रवास करुन तिथल्या स्त्रियांना भेटुन, त्यांच्या घरी राहुन आली. अतिशय दुर्गम भागात रहात असुनही हिरिरीने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या या चौदा स्त्रीयांना भेटुन आम्ही सगळेच भारावुन गेलो होतो.

त्या पूर्वांचलातल्या चौदाजणी आणि महाराष्ट्रातल्या सतरा जणींचे कार्य प्रकाशचित्रांच्या रुपाने विद्युल्लता या प्रदर्शनात पहाता येईल. प्रदर्शनाचे उद्घाटन ७ मार्च रोजी संध्याकाळी ५:३० वाजता कलाभवन, ठाणे येथे अरुणाचल प्रदेशच्या पद्मश्री बिन्नी यांगा यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी मायबोलीकरांनी उपस्थित रहावे असे आवर्जुन वाटते.
हे प्रदर्शन ७ मार्च ते ९ मार्च या कालावधीत सकाळी १०:०० पासुन रात्री ७:०० वाजपर्यंत सर्वांनाच खुले आहे.

त्याचबरोबर या महिलांशी बोलताना, त्यांच्याबद्दल जाणुन घेताना आम्हाला ते अनुभव शब्दबद्ध करावेसे वाटले. या सगळ्यांच्या कार्याची माहिती, आमच्या पूर्वांचलातल्या प्रवासातले अनुभव हे पुस्तिका रुपाने या प्रदर्शनाच्या वेळेस प्रकाशित करणार आहोत. पूर्वांचलातल्या महिलांना महाराष्ट्रात चाललेले काम आणि इथल्यांना पूर्वांचलातल्या कार्याबद्दल माहिती असा दुहेरी उद्देश असल्याने ही पुस्तिका इंग्रजीमधुन तयार करण्यात आलेली आहे. ही पुस्तिका देणगीमूल्य रु.१०० फक्त या किमतीत प्रदर्शनाच्या ठिकाणी उपलब्ध होईल.

हे प्रदर्शन आणि पुस्तिका हे महाराष्ट्र आणि पूर्वांचलाला जोडणार्‍या सेतुमधला एक छोटासा दगड ठरेल अशी अपेक्षा आहे.

प्रदर्शनाला नक्की या!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला गेले होते. सुटसुटीत, छोटेखानी छान कार्यक्रम झाला. वेळेवर सुरू झाला, वेळेवर संपला.

फोटो ऑस्सम आहेत. विशेषत: पूर्वांचलात जाऊन काढलेले. (त्या दालनातील अभिप्राय-वहीत सर्वात पहिला अभिप्राय मी लिहिला. Happy )
माहितीपुस्तिका पण सुरेख आहे. (मी विकत घेतली.) त्यात सुरूवातीलाच पूर्वांचलात गेलेल्या फोटो-सर्कल सोसायटीच्या पाच सदस्यांचा अप्रतिम फोटो आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अरुणाचल प्रदेशच्या पद्मश्री बिनी यांगा फार गोड होत्या; मावशी/काकू म्हणावंसं वाटत होतं त्यांना. अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व. इतका लांबचा प्रवास करून खास या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. (त्या कॅन्सरवर उपचार घेत आहेत. काल सकाळीच त्यांचं एक केमोथेरपीचं सिटिंग होतं असं त्यांनी सांगितलं.) पारंपारिक अरुणाचली वेषभूषेत होत्या. (सावली आणि पूर्वांचलला गेलेल्या तिच्या अन्य दोन सख्याही अरुणाचली वेषभूषेत एकदम उठून दिसत होत्या.)
बिनीदिदींसाठी म्हणून कार्यक्रम हिंदी-इंग्रजी भाषेत झाला. त्यांचं नेटकं भाषणही खूप छान झालं.

मराठी विद्युल्लता बहुतेक सर्व हजर होत्या. बिनीदिदींबरोबर आलेली एक तरुणी होती, त्यांची नातेवाईक/केअरटेकर असावी. तिनं खासकरून फुलवा खामकरबरोबर आपला फोटो काढून घेतला. ते पाहून मला मजा वाटली. Lol

पहिल्या मजल्यावरच्या दालनाबाहेर एका मोठ्या टी.व्ही.स्क्रीनवर 'विद्युल्लता'चा आजवरचा प्रवास दाखवणारी शॉर्ट फिल्म सुरू होती. ती संपूर्ण पाहिली. आत जाऊन फोटो पहायला सुरूवात केल्यावर जाणवलं, की त्यातले काही फोटो त्या फिल्ममध्ये होते आणि असं वाटलं, की यंदाच्या प्रदर्शनातले फोटो त्यात नसते तर बरं झालं असतं. त्यामुळे सर्प्राईज एलिमेण्ट जरा कमी झालं.
हे वाचून प्रदर्शनाला गेलात, तर एक सुचवते, की आधी प्रदर्शन बघा आणि मग ती फिल्म बघा. Wink

सकाळी भेट देऊन आलो प्रदर्शनाला.
गेल्यावर्षीप्रमाणेच याहीवर्षी मस्तच. Happy
पहिला मजला पूर्वांचलमधल्या तर दुसर्‍या मजल्यावर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या विद्युल्लतांचा चित्रपरीचय आहे.
यात इलेक्शन कमिशनर नील सत्यनारायण, पर्यटक गाईड राधिका टिपरे, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, राही सरनोबत, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करणार्‍या सुनिता पाटिल या आणि अशा विविध क्षेत्रातील यशस्वी विद्युल्लतांना मानवंदना दिली आहे.

या सगळ्यांच्या कार्याची माहिती, आमच्या पूर्वांचलातल्या प्रवासातले अनुभव हे पुस्तिका रुपाने या प्रदर्शनाच्या वेळेस प्रकाशित करणार आहोत. पूर्वांचलातल्या महिलांना महाराष्ट्रात चाललेले काम आणि इथल्यांना पूर्वांचलातल्या कार्याबद्दल माहिती असा दुहेरी उद्देश असल्याने ही पुस्तिका इंग्रजीमधुन तयार करण्यात आलेली आहे>>>>पुस्तक छानच आहे. अभिनंदन सावली. Happy

की आधी प्रदर्शन बघा आणि मग ती फिल्म बघा>>>>+१ Happy

आज सकाळी 'विद्युल्लता' प्रदर्शनाला जाऊन आले.

पहिल्या मजल्यावर गेले तिथे समोर फिल्म चालू होती पण मी सरळ फोटोंच्या दालनातच एन्ट्री मारुन फोटो बघायला सुरुवात केली. पहिल्या मजल्यावर पूवांचलच्या काही स्त्रियांच्या कार्याबद्दल फोटो स्टोरी होत्या. सोबत त्या त्या स्त्रीच्या कार्याची संक्षिप्त ओळख मराठी मधून लिहिलेली होती. फोटो आणि ही ओळख मिळून त्या त्या स्त्रीच्या कर्तृत्वाला, प्रतिकूल वातावरण्/भौगोलिक स्थान इत्यादी गोष्टींमधूनही विद्युल्लतेसारख्या चमकलेल्या त्या स्त्रियांना जशी काही मानवंदनाच होती.

वरच्या दालनात जिप्सीने लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्रातील स्त्रियांच्या कारकिर्दीबद्दल फोटो स्टोरी होत्या.

ह्या सगळ्या स्त्रिया त्यांचं कर्तृत्व दाखवायला उच्चशिक्षितच असायला हव्यात असं नाही. वेगवेगळ्या थरांतून आलेल्या असल्या तरी त्यांच्यातील साम्य एक होतंच, ते म्हणजे त्यांनी निवडलेल्या क्षेत्रातील त्यांचं डेडिकेशन आणि असामान्यत्व.

ह्या प्रदर्शनातून फक्त छायाचित्रण हे एक कला म्हणून सादर न होता, व्यक्तिचित्रण म्हणूनही सादर झाल्यामुळे हे प्रदर्शन खरंच एका वेगळ्याच पातळीवर गेलं.

पुस्तिका सद्ध्या वरवरच चाळून झाली आहे, पण छान वाटते आहे.

सावली, पुन्हा एकदा अभिनंदन Happy

शनिवारी संध्याकाळी प्रदर्शनाला भेट दिली.
दोन्ही मजल्यावरचे विद्युल्लतांचे फोटो छानच आहेत. ईशान्य भारताबद्दल तशीही माहिती तुटकच त्यात भौगोलिकदॄष्ट्या दुर्गम अशा या भागात काम करणार्‍या या विद्युल्लतांचा फोटोंसह संक्षिप्त परिचय आवडला.

दुसर्‍या मजल्यावरच्या दालनात महाराष्ट्रातील काही कर्तॄत्ववान स्त्रियांचा परिचय होता. त्यापैकी नाशिकच्या सुनीता पाटील यांचे कार्यक्षेत्र मात्र अतिशय वेगळेच, त्यामुळे पुस्तिकेत म्हटल्याप्रमाणे, Walking on a different path,अगदी सार्थ.

सावली, अभिनंदन Happy

ललिता, अश्विनी, जिप्सी, आशुतोष प्रदर्शनाला आल्याबद्दल आणि इथे आवर्जुन लिहील्याबद्दल थँक्यु. बाकी कोणी मायबोलीकर आले की नाही ते कळले नाही.
शनि / रवीवारी प्रचंड गर्दी होती. बसायलाही वेळ मिळाला नाही. रविवारीतर कलाभवनाचे पार्किंग मिळत नाही अशी अवस्था होती.
लोकांचा रिस्पाँस खुपच छान मिळाला. मायबोलीकरांसाठी मी काढलेले काही फोटो दोन / तीन दिवसात टाकते. नॉर्थईस्ट मधुन फोनाफोनी करुन तिथल्या लोकांनी त्यांच्या इथल्या ओळखीच्या मित्रपरिवारालाही प्रदर्शनाबद्दल कळवले,आणि काही लोक येऊन गेले.

सावली, माझ्या शाळेतल्या मैत्रिणीला मी प्रदर्शनाबद्दल सांगितलं होतं. ती आणि तिची मुलगी काल दुपारी जाऊन आल्या.

तुमच्या फोटोग्राफर सख्यांपैकी एक सखी, रेखा भिवंडीकर, ही तिची पूर्वीची क्लासमधली मैत्रिण निघाली. मग तिनंच मैत्रिणीला सगळीकडे फिरवून प्रदर्शनाबद्दल, तुमच्या पूर्वांचल मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली. Happy

Pages