मराठी भाषेतील ई-पुस्तके आणि तदनुषंगाने स्वामित्वहक्कांबद्दल चिंतन

Submitted by व्यत्यय on 1 March, 2014 - 04:03

जगभरातील मराठी भाषिक लोकांमध्ये स्मार्ट फोन आणि टेबलेट वापरायचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. या फोन किंवा टेबलेटवर इंग्रजी ई-पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या पण लक्षणीय आहे. तरीही मराठी भाषेतली ई-पुस्तके कुठेही बघायला मिळत नाहीत. बुकगंगा यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, पण तरीही त्यांचे स्वत:चे वेगळे app वापरावे लागते. आणि माझा या app चा अनुभव काही चांगला नाही. मी Flipkart किंवा तत्सम साईटवरून अजूनही मराठी ई-पुस्तके विकत नाही घेऊ शकत.
हल्ली पुस्तके छापण्याआधी त्याची संगणकीय प्रत तयारच असते. ई-पुस्तके एकदा बनवली कि त्याच्या अधिक प्रती बनवण्यास काहीच खर्च येत नाही. चिकटलेली किंवा अनुक्रमानुसार न बांधली गेलेली पाने अशा चुका होत नाहीत. वाहतूक किंवा साठवणूक खर्च होत नाही. दीर्घकाळ पडून राहून उंदीर, कसर, वाळवी किंवा पावसाने नुकसान होत नाही. दोन छापील आवृत्यांमधल्या कालावधीमध्ये वाचक पुस्तकं विकत घेऊ शकत नाही किंवा आपल्या गावी हव्या त्या पुस्तकाची प्रत उपलब्ध नसण्यामुळे धंदा बुडण्याचे नुकसान ई-पुस्तके टाळू शकतात. असे अनेक फायदे असूनही मराठी ई-पुस्तके सर्रास उपलब्ध नाहीत. सध्या कित्येक चांगली पुस्तके एक आवृत्ती संपल्यावर मागणी अभावी पुन्हा छापलीच जात नाहीत. त्यामुळे ज्या तुरळक लोकांना हि पुस्तके हवीशी वाटतात त्यांची कोंडी होते. ही परिस्थिती ई-पुस्तकांच्या बाबतीत कधीच येणार नाही.
(माझं पुढचं सगळं विवेचन “मराठी ई-पुस्तके सर्रास उपलब्ध नाहीत” या गृहितकावर आधारित आहे. हे गृहीतकच चूक असल्यास कृपया मला योग्य ते मार्गदर्शन करावे.)
याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात
1. मराठी लेखक / प्रकाशकांमध्ये अजून ई-पुस्तकांबद्दल पुरेशी जागरुकता निर्माण झाली नाहीये.
1.a. अच्युत गोडबोले यांच्यासारख्या तंत्रज्ञानावर उत्तम पकड असणाऱ्या लोकप्रिय लेखकाची प्रचंड खपाची पुस्तकेही ई-माध्यमामध्ये उपलब्ध नाहीत. यामागे माध्यमाबद्दलचे अज्ञान हा मुद्दा असेल असं मला वाटत नाही.
1.b. महाराष्ट्राबाहेरचा एक मोठा ग्राहकवर्ग ई-पुस्तकांमुळे विक्रीमध्ये मोलाची भर घालू शकतो. त्यामुळे धंद्याबद्दल जागरूक असणाऱ्या प्रकाशकांना ई-पुस्तकांबद्दल माहिती नाही हे पटत नाही.

2. मराठी प्रकाशक जाणूनबुजून ई-पुस्तके प्रकाशित करणे टाळताहेत कारण...
2.a. ई-पुस्तके हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे.
2.a.i. जर इतर भाषांमधली ई-पुस्तके आतबट्ट्याचा व्यवहार ठरत नाहीत तर फक्त मराठी पुस्तकांबाबतीत असं का होईल?
2.b. ई-पुस्तकांमुळे छापील पुस्तकांचा खप कमी होईल.
2.b.i. ही भिती अनाठायी वाटते कारण जोपर्यंत विक्री आणि पर्यायाने उत्पन्न वाढते आहे तोपर्यंत हे उत्पन्न छापील पुस्तकांमधून येतंय कि ई-पुस्तकांमधून याने काहीच फरक पडत नाही.
2.b.ii. ज्या लोकांना छापील पुस्तक वाचायला आवडते त्या लोकांनी जरी कुतूहल म्हणून ई-पुस्तक वाचायला सुरुवात केली, तरी ते त्यांना आवडलेल्या पुस्तकाची छापील प्रत विकत घेणारच.
2.b.iii. Paulo Coelho सारखा जगप्रसिद्ध लेखक आपली ई-पुस्तके फुकट दिल्यामुळे छापील पुस्तकांचा खप वाढला यावर विश्वास ठेवतो (http://paulocoelhoblog.com/2008/02/03/pirate-coelho/). त्यामुळे विकतच्या ई-पुस्तकांमुळे छापील पुस्तकांचा खप कमी होईल ही भिती अनाठायी वाटते.

2.c. ई-पुस्तकांची चाचेगिरी (पायरसी)
2.c.i. तार्किक दृष्ट्या हा एकमेव मुद्दा मला योग्य वाटतो आहे. ई-पुस्तके अगदी सहज आपल्या मित्र/आप्त परिवारामध्ये वाटली जाऊ शकतात (sharing). त्यामुळे मूळ पुस्तकाचा खप कमी होणे संयुक्तिक वाटते.

आता आपण स्वामित्वहक्क (Copyrights) आणि चाचेगिरी (पायरसी) चा थोडा विचार करू.
सध्याच्या नियमांनुसार कुठल्याही लिखाणावर मूळ लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्ष त्याच्या वारसांचे स्वामित्वहक्क असतात. या कालावधीमध्ये हे लिखाण इतरांना वाटणे हा गुन्हा आहे. त्यानंतर ते लिखाण सार्वजनिक होते (Public Domain). स्वामित्वहक्काची ही संकल्पना समाजामध्ये “कलात्मक सर्जनशीलतेला” उत्तेजना देण्यासाठी राबवली जाते. पण हा उद्देश बरोबर आहे का? जर स्वामित्वहक्क बंद केले गेले तर लेखक लिहायचे थांबतील का? उद्या समजा एक कायदा झाला की जो गिर्यारोहक नवीन वाट शोधून काढेल त्याला आयुष्यभर आणि त्याच्या मृत्युनंतर ६० वर्षे त्याच्या वारसांना ती वाट वापरणाऱ्या लोकांकडून रोयल्टी मिळेल. तर असा कायदा समर्थनीय असेल का?

माझ्या मते “कलात्मक सर्जनशीलता” ही कलाकाराची खाज असते. ती लेखकाच्या स्वत:च्याच समाधानासाठी खाजवली जाते. या इथे मायबोलीवर देखील आर्थिक मोबदल्याची काहीही अपेक्षा न करता बरेच सकस लेखन केले जाते. आपल्या लेखनातून मिळणारी लोकप्रियता आणि नावलौकिक हे लेखकाला अधिकाधिक लिहायला उद्दयुक्त करतात. जर त्यातून पैसे मिळाले तर सोन्याहून पिवळे. किंबहुना लोकप्रियता आणि नावलौकिक हेच लेखकाला पैसे कमवायचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध करून देते. जसे की नियतकालिकांमध्ये लेख लिहिणे, व्याख्याने देणे, कथाकथनादी रंगमंचीय प्रयोग करणे, निरनिराळ्या कार्यक्रमांचे संचालन करणे. इत्यादि. पण लोकप्रिय होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची कलाकृती पोचायला हवी. आणि वर दिलेल्या Paulo Coelho च्या Blog अनुसार (http://paulocoelhoblog.com/2008/02/03/pirate-coelho/) तुमची कलाकृती लोकांमध्ये आपापसात वाटली जाणे ही तुमची लोकप्रियता वाढवण्याची एक उपयुक्त संधी आहे. मुळात यातील बहुतेक जणांनी ते छापील पुस्तक विकत घेऊन कधी वाचलेच नसते त्यामुळे ई-पुस्तकाच्या जितक्या अनधिकृत प्रति आपापसात वाटल्या गेल्या तेवढ्या छापील पुस्तकांच्या प्रति कमी विकल्या जाणार हे समीकरण चुकीचे ठरते.

सध्याच्या कालबाह्य स्वामित्वहक्क कायद्यांऐवजी Creative Commons (https://creativecommons.org/) ही चळवळ मला अधिक संयुक्तिक वाटते. Cory Doctorov (http://en.wikipedia.org/wiki/Cory_Doctorov) सारखे नामांकित लेखक या चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. तुम्ही विकिपीडिया (http://en.wikipedia.org/wiki/Creative_commons) वर देखील याबद्दल अजून वाचू शकता. http://en.wikipedia.org/wiki/Anti-copyright येथे तुम्ही स्वामित्वहक्क विरोधी भूमिका जाणून घेऊ शकाल.

निव्वळ चाचेगिरीच्या भीतीमुळे मराठी ई-पुस्तके उपलब्ध होत नाहीत हे स्वत:ला सांस्कृतिक दृष्ट्या आधुनिक समजणाऱ्या मराठी समाजाला लाजिरवाणे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
इथल्या तज्ञ लोकांची या विषयावरची मते जाणून घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ई बुक्स आमच्या पिढीला तसेच जुन्या पिढीतले जे लोक टेक्नो सव्ही आहेत त्यांना होईल
माझ्या घरात आधीच माझ्या प्रोफेशनल तसच लॉ आणि स्पर्धा पुस्तकानि दोन कपाटे व्यापली आहे
त्यात ही पुस्तके ठेवायची जागा निर्माण करायची म्हणजे मातोश्री कड़े मस्काबाजी करावी लागेल
त्यामुळे मला तरी इ बुक्स हां पर्याय मला सोयीचा वाटतो
ई बुक्स असल्याने किमंत कमी हा ही एक फायदा होतो
शेवटी वाचन संस्कृती टिकण्याशी मतलब
कोण्याच्याहि कोंबड्याने सूर्य ऊगवला हवा

धिकाधिक तरुण पिढी इंग्रजी माध्यमातून शिकत आहे. ही तरुण पिढी सध्या कायम त्यांच्या मोबाईल स्क्रीनला चिकटलेली असते. त्यांना वाचते करायचे असेल तर पुस्तकांना त्यांच्या स्क्रीनवर यावेच लागेल.>> सहमत.

मी स्वतः दिवसाचे बहुतेक तास हे स्क्रीनसमोर असतो. ७/८ तास ऑफिसचे वर घरी पीसी, आयपॅड, फोन आहेतच. त्यावर जर पुस्तकं मिळालीत तर खूपच छान होईल.

आयबुक्सात युएस स्टोर नाहीच अ‍ॅक्सेस करता येत Sad अन भारतीय स्टोरला सगळेच बुक्स नाहियेत.बहुदा काही महिन्यात व्हायला हवं सुरु...

<दशकानुदशके तिसऱ्याच कोणाला तरी आर्थिक फायदा मिळालाच पाहिजे हा "च" चा अट्टाहास मात्र मी अजिबात समजू शकत नाही.>

तिसरे कोण? त्यांचेच वारसदार किंवा त्यांच्याकडून व्यवस्थित पैसे मोजून हक्क विकत घेतलेले. त्यांना मोबदला का नको?

<परदेशी / महाराष्ट्राबाहेर राहणारे मराठी लोकं हे प्रकाशकांचे टारगेट नाही का? >
नक्की आहेत. दुर्दैवानं विक्रीची आकडेवारी उत्साहवर्धक नाही. मी उदाहरण दिलं तो दिवाळी अंक परदेशस्थ मराठीभाषकांना उपलब्ध होताच. मग फक्त पन्नासेक वाचकांनीच तो का विकत घेतला? या दिवाळी अंकाचा दर्जा भिकार होता, असं आपण समजू. पण इतर दिवाळी अंकांचं काय?
मागे, म्हणजे चारपाच वर्षांपूर्वी दोन प्रकाशकांनी मला त्यांनी अमेरिकेत कशी ट्रंकांमधून पुस्तकं पाठवली, ती त्यांच्याकडे कशी तशीच परत आली, लोक वाचायला पुस्तक न्यायचे, पण विकत घ्यायचा कंटाळा करायचे, या कथा सांगितल्या. हे दोन्ही प्रकाशक मराठीत मोठे आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांच्या दर्जाबाबत मला शंका नाही. हा जर त्यांना आलेला अनुभव असेल, तर पुन्हा असं काही करताना ते दोनदा विचार करतीलच.

<असे म्हणावेसे वाटते, की कॉपीराईट आमच्याच कडे आहे, मग आम्हीच फक्त पुस्तके छापू शकतो, व वरतून (पुरेशी) मागणीच नाही तर छापणार नाहीच, असा एकंदर कॅच२२ आहे. असे केले, तर मनापासून कुसुमाग्रज, मर्ढेकर, बोरकर आवडलेला एकादा साहित्यप्रेमी पुस्तक शोधत फिरेल अन त्याला ते मिळणार नाही अशी पररिस्थिती उत्पन्न होते आहे.>

माझ्या समजुतीप्रमाणे या तिघांचेही काव्यसंग्रह उपलब्ध आहेत.

*
टग्या,
तुम्हांला नक्की कोणत्या लेखकांची किंवा कशा प्रकारची पुस्तकं ईबूक म्हणून वाचायला आवडतील? अतिशय प्रामाणिकपणे हा प्रश्न विचारतो आहे.

>> तुम्हांला नक्की कोणत्या लेखकांची किंवा कशा प्रकारची पुस्तकं ईबूक म्हणून वाचायला आवडतील?

तुमच्या प्रश्नाचा रोख कळला नाही. मला माझ्या आवडीच्या लेखकांची पुस्तके वाचायला आवडतील. (नेमाडे, अवचट, दांडेकर, जयवंत दळवी, विजय तेंडूलकर, रत्नाकर मतकरी, व्यंकटेश माडगुळकर, नारायण सुर्वे, अरुण साधू, मिरासदार, अच्युत गोडबोले, पु ल देशपांडे, आणि अनेक इतर.) बाकी कोणाला पूर्णपणे वेगळी ई-पुस्तकं हवीशी वाटतील. प्रत्येक छापिल पुस्तकाचे एक ई-पुस्तक असायला काय हरकत आहे?

रच्याकने मी खूप वर्षांपासून "गोपाल कृष्ण भोबे" या लेखकाचे "मासे आणि मी" या नावाचे छोटेसे पुस्तक शोधत आहे. साधारण १० वर्षांपूर्वी मी कौतुकाने एकाला वाचायला दिलेले पुस्तक परत आलेच नाही. आता इतके नकार ऐकून मला शंका वाटते कि मला लेखकाचे आणि पुस्तकाचे नाव बरोबर आठवतेय का?

>> 'कुसुमाग्रज, मर्ढेकर, बोरकर यांच्या सगळ्या कविता ऑनलाइन आहेत..त्यांचे काव्यसंग्रह हल्ली अगदीच कमी जातात'
आणि
>>
वाचकवर्ग सीमित असल्याने व्यवसायाचा आवाका लहान आहे. मागणी असली की पुरवठा वाढतो. पण मागणीच नाही. आजही महाराष्ट्रातल्या निम्म्याअधिक जिल्ह्यांमध्ये पुस्तकांची दुकानंच नाहीत. म्हणजे ललित वाङ्मयाची. शाळाकॉलेजाच्या पुस्तकांची नव्हेत. पुस्तकांची दुकानंच नसल्याने पुस्तकविक्रीसाठी फार कमी पर्याय उपलब्ध होतात.
....
एवढं असूनही प्रकाशकांनी ईबूक निघावेत म्हणून प्रयत्नच केले नाहीत का? माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक सर्व बड्या प्रकाशकांनी केले. पण गुंतवणूक, उत्पन्न यांचं गणित न जमणारं आहे.
<<

या मुद्द्यांचा काही ताळमेळ लागत नाही.
टार्गेट ग्राहक नक्की कोण आहे? ज्या जिल्ह्यांत कधीच पुस्तकांची दुकानं नव्हतीच आणि नजिकच्या भविष्यात ती उघडण्याची शक्यता नाही तो महाराष्ट्र, की मराठी वाचता येणारे/वाचू इच्छिणारे/विकत घेऊन वाचायची ऐपत असणारे (जगात कुठेही स्थायिक असलेले) लोक?
जर दुसर्‍या प्रकारचे लोक 'टार्गेट' असतील तर उलट छापील प्रतींसाठी येणारा खर्च हाच आतबट्ट्याचा वाटतो.

या दुसर्‍या प्रकारचा ग्राहक आज सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर 'इन्कव्हीनियन्स'ला. आणि 'कन्व्हीनियन्स'ची व्याख्या अधिकाधिक व्यापक होत चालली आहे. पूर्वी सायकलवर टांग टाकून कोपर्‍यावरच्या दुकानात जाणं हा इनकन्व्हीनियन्स नव्हता, आता बसल्या जागी अ‍ॅमेझॉनसारख्या संस्थळावर टिचकी मारून माल घरपोच येत असेल तर ती सायकलवरची टांग मारली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. वर आयट्यून्सचं उदाहरण आलं आहेच.

म्हणजे एकतर आता मर्ढेकर (हे एक बिचारे सारखे वेठीला धरले जात असतात. Happy ) कोणीच वाचत नाही हे तरी अ‍ॅक्सेप्ट करायला हवं, किंवा ते पुस्तक स्वरूपात वाचणार्‍यांपेक्षा ई-पुस्तक स्वरूपात वाचलं जाण्याची शक्यता जास्त आहे हे अ‍ॅक्सेप्ट करायला हवं.
मायबोलीसारखं संस्थळ वर्षानुवर्षं चालतं, जाहिरातदारांना आकृष्ट करू शकतं हे एक उदाहरणदेखील ई-वाचनाच्या महतीचं द्योतक आहे.

दिवाळी अंक आणि पुस्तकांची, त्यातही 'क्लासिक्स'ची तुलना मुळातच चुकीची आहे.

अवांतर :

तो साठ वर्षांचा नियम कधी अस्तित्त्वात आला होता हे शोधायला हवं. माझ्या अंदाजानुसार तेव्हा पुस्तकं फक्त छापील स्वरूपातच उपलब्ध होती आणि पिढी बदलायला किमान वीस वर्षं लागत होती. आज हे गणित किती पटींत बदललं आहे त्याचा विचार व्हायला नको का?

पुस्तकाच्या किमतीच्या १०% वगैरे रक्कम लेखकाला मिळते म्हणे. म्हणजे ५०० रुपयांचं पुस्तक असेल तर ५० फक्त.

मग पीडीएफ तयार करून पाठवायला कितीक मोठा खर्च येणारे असा? लोक नक्कीच विकत घेतील की अशी पुस्तकं. मला तर वाटतंय माबोवरच्याच लेखांची पुस्तकं करून उपलब्ध करून द्यावीत मायबोलीने. दर्जेदार लिहिणार्‍या लेखकांना मानधनही द्यावे अन उरलेले पैसे वैतागवाण्या जाहिराती फुटवण्यावर खर्च करावेत.

खरंतर अनेक ठिकाणच्या अशा चर्चांतून इबुक्सना पर्याय नाही. या प्रकारची प्रकाशने हवीत, असेच प्रतिपादन वाचायला मिळत असताना, प्रकाशकांच्या बाजूने मात्र, 'आम्ही पूर्वी असे प्रयत्न केले. फेल गेले. सबब हे काय मराठी लोकांचे काम नव्हे..' असा सूर ऐकायला मिळतो, हे गमतीचे वाटते. पूर्वी प्रयत्न केले, पण आता परिस्थिती बदललेली नसावी का?

अन प्रताधिकार कायदा जर विचित्र आहे, तर त्यात सुधारणा होण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवेत? लेखक प्रकाशकांनी, की मंत्रालयातले बाबू वा आपल्या 'उच्चशिक्षित' लोकप्रतिनिधींनी?

बड्या प्रकाशकांनी इबुक्स साठी काय प्रयत्न केलेत ते मला ठाऊक नाही, तो माझा प्रांत नव्हे. पण हॉस्पिटलचे काँप्युटरायझेशन करावे म्हणून २०-२५ वर्षांपासून लाखो रुपये खर्चून नेटवर्क्स अन हार्डवेअर - सॉफ्टवेअर्स खरीदणारे लोक तथाकथित काँप्युटरतज्ञांकडून कसे नाडले गेलेत त्याचा अनुभव मला चांगलाच आहे.

तरीही आज काँम्प्युटरायझेशनन चांगलेच मूळ धरले आहे. दवाखाने सोडा, मेडिकल स्टोअर अगदी तालुका प्लेसलाही कॉ़म्प्युटराईज्ड असतात. त्यामुळे हार्डवेअर + सॉफ्ट्वेअरमधे होणारा खर्चही ३०-४० हजाराच्या आत आलाय. एका सॉफ्टवेअरवाल्याने अडवून पाहिलं तर दुसरा तितकंच एफिशियंट मोड्यूल कमी खर्चात देतोय.

मला तरी वाटतंय की, अ‍ॅक्च्युअली बड्यांना कुणी गंडविले असावे, जेणेकरून इबुक्स पब्लिकेशन हा आतबट्ट्याचा व्यवहार वाटावा.

इब्लिस,
तुम्हांला खरंच वाटतं का अशी ईबुकं तयार झाली नाहीत म्हणून? मराठीत ईबुकं नाहीतच, हा गैरसमज आहे. ईबुकं तयार झाली आहेत, होत आहेत. पण लेखकांना अधिक उत्पन्न छापील प्रतींतूनच मिळतं. प्रयोग किती काळ करत राहायचे, याला मर्यादा आहेत. प्रकाशकांनी प्रयोग केले, अजूनही करत आहेत. आजच पुण्यात एकाच लेखिकेची पाच ई-बुकं एका प्रकाशनानं प्रकाशित केली. या प्रकाशनाची छापील आणि ईबुकांच्या खपाची आकडेवारी दिवाळीच्या सुमारास मी विचारली होती. त्या आकडेवारीनुसार मलातरी चित्र फार आश्वासक वाटलं नव्हतं.

स्वाती_आंबोळे,
जिल्ह्यांमध्ये पुस्तकांची दुकानं नसली तरी ग्रंथालयं आहेत. त्यामुळे वाचक आहेत. पण ते पुस्तक विकत घेत नाहीत. पुस्तकं ग्रंथालयं विकत घेतात. त्यामुळे प्रतींची संख्या मर्यादित राहते. परदेशातल्या वाचकांसाठी जी काही थोडीबहुत ईबुकं आली आहेत, त्यांचाही खप कमीच आहे. परदेशातल्या वाचकांना ईबुकं हवी आहेत, हे त्यांनी अस्तित्वात असलेली ईबुकं विकत घेतली तरच कळेल. परदेशातल्या वाचकांनी ही ईबुकं विकत घेतली तर अजूनही पुस्तकं ई-स्वरूपात येतील.

मुद्दा ई-वाचनाचा नाही. विकत घेऊन वाचण्याचा आहे.

<तो साठ वर्षांचा नियम कधी अस्तित्त्वात आला होता हे शोधायला हवं. माझ्या अंदाजानुसार तेव्हा पुस्तकं फक्त छापील स्वरूपातच उपलब्ध होती आणि पिढी बदलायला किमान वीस वर्षं लागत होती. आज हे गणित किती पटींत बदललं आहे त्याचा विचार व्हायला नको का?>

नियम अस्तित्वात आला बर्न कन्व्हेन्शनात. ईबुकांच्या कॉपीराईटबद्दल भारतात, अमेरिकेत बर्‍यापैकी चर्चा झाल्या आहेत. पिपा, सोपाच्या वेळीही ईबुकांचा मुद्दा चर्चिला गेला आहे.

***

कॉपीराईट नकोच, आणि सगळं साहित्य ई-स्वरूपात मोफत वितरित करता यायला हवं, असं म्हणणार्‍यांनी भारतात आज गैरफिल्मी संगीताच्या खपाची झालेली अवस्था बघावी. शास्त्रीय संगीत आता नव्यानं प्रकाशित होणं फार्फार कमी झालं आहे. चित्रपट संगीतच्या सीड्या काढायला कंपन्या तयार नसतात. त्यामुळे त्यातून येणारं उत्पन्न बुडलं.
मराठी पुस्तकांची पीडीएफ फुकट ऑनलाईन झाली, आणि अगदी शंभर प्रती जरी कमी खपल्या, तरी प्रकाशकाचं नुकसान होतं. लेखकाला तेवढी रॉयल्टी कमी मिळते. दोघांनाही हे परवडण्यासारखं नाही.

शिवाय ईबुकांच्या पायरसीमुळे होणार्‍या नुकसानाची आकडेवारी ऑनलाइन उपलब्ध आहे. २०१० साली केवळ अमेरिकेतल्या प्रकाशकांना पायरसीमुळे ३ मिलियन डॉलरांचं नुकसान झालं. स्पेन, हॉलंड, ब्रिटन, रशिया अशा अनेक देशांमधल्या आकडेवार्‍या उपलब्ध आहेत. आता मराठीत पाचशे प्रती विकल्या गेल्या नाहीत, तर पुढल्या पुस्तकाची जुळवाजुळव करताना प्रकाशक थकतो. त्याला ही पायरसी परवडणार आहे का?

>> मला तर वाटतंय माबोवरच्याच लेखांची पुस्तकं करून उपलब्ध करून द्यावीत मायबोलीने.

अगदी चपखल विचार. मला वाईट वाटतंय कि ही साधी सोपी कल्पना मला का नाही सुचली.
इथले जे लेखक/कवी तयार आहेत त्यांच्यासाठी ई-पुस्तक तयार करायला मी विनामूल्य मदत करेन.

>> पूर्वी प्रयत्न केले, पण आता परिस्थिती बदललेली नसावी का?
अगदी अगदी. दीड वर्षापूर्वी माझ्याकडे Android २.३ चा महाग Samsung चा मोबाईल होता. त्यात मराठी दिसायचे नाही. पण सहा महिन्यापूर्वी घेतलेला स्वस्त Micromax (Android ४.२) सुंदर मराठी दाखवतो. गुगल चे Transliteration मस्त मराठी टाईप करायला देते. गेल्या वर्ष - सहा महिन्यात अमुलाग्र बदल घडलेत. स्मार्ट फोन खूपच स्वस्त आणि मध्यमवर्गीयांच्या सहज आवाक्यात आले आहेत.

>>
जी काही थोडीबहुत ईबुकं आली आहेत, त्यांचाही खप कमीच आहे. परदेशातल्या वाचकांना ईबुकं हवी आहेत, हे त्यांनी अस्तित्वात असलेली ईबुकं विकत घेतली तरच कळेल.
<<

अशी ई-पुस्तकं उपलब्ध आहेत हे प्रकाशकांनी योग्य ठिकाणी/पद्धतीने जाहिरात केली तरच वाचकांना कळेल.
माझ्यासारखे वाचक (जे भारतवारीहून परत येताना प्रसंगी जादा सामानाचे पैसे भरूनही किंवा इन्टरनॅशनल शिपिंग भरूनही छापील पुस्तकं विकत घेतात, ते) ई-पुस्तकं 'विकत' घेतीलच.

'अरे! हे मस्त पुस्तक आहे बरं का! मी वाचलं. तू नक्की वाचून पहा.'
असं सांगितलं गेलेलं एकही पुस्तक मी सहसा सोडत नाही. अशा पुस्तकांत 'अन हो, त्याची ई-प्रत उपलब्ध आहे बरं का!' असं सांगितलं गेलेलं एकही मराठी पुस्तक मला तरी सापडलं नाहिये.

ओरिजिनल मराठी लिखाण मिळणे कमी होऊन इंग्रजी लेखकांच्या पुस्तकांच्या कमअस्सल अनुवादित पुस्तकांचा सुकाळ होऊ लागला तेव्हा मी फिक्शन बुक्सपुरता तरी मराठी वाचणे कमी करून ओरिजिनल इंग्रजीकडे वळलो. तेव्हा, मुद्दा विकत घेऊन वाचण्याचा असला, तरी मी पैसे देऊन विकत घेताना किमान माझ्या पैशाच्या मोबदल्यात काही बरे मिळावे अशी अपेक्षा करूच शकतो ना?

वर कुणीतरी म्हटले आहे, 'दर्जा असेल तर नक्कीच विकला जाईल'

विकत घेऊन वाचा ही संस्कृती मराठी लोकांत नाही असा एक प्रवाद ऐकायला मिळतो. पण मग जेआजवरचे प्रथितयश लेखक होते , ते विकले गेलेच नाहीत काय? अगदी गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकर सारखे पॉप लेखकही दणकून विकले जात होतेच की!

मग प्रॉब्लेम विकत घेणार्‍यांत आहे की विकायला ठेवलेल्या मटेरिअल मधे? गेल्या १०-२० वर्षांतही - ज्या काळात आपण म्हणतो की वाचनसंस्कृती लयाला चालली- चांगले पुस्तक आले, अन पडले असे झाले नसावे. पण हा माझा एक सामान्य वाचक म्हणून दृष्टीकोण आहे. वर या फिल्डशी जवळून संपर्क असलेले चिनुक्स यांनी म्हटले आहेच, की लोक सेल्फ हेल्प, पाकृ आदि लेखन प्राधान्याने विकत घेतात.

मायबोलीवरच्या कुणा लेखकाला हा प्रयोग म्हणून करून पहायचा असेल तर मी सर्व मदत करायला तयार आहे. हवे तर या प्रयोगासाठी एक नवीन कार्यशाळेसारखा ग्रूपही करता येईल.

तुमच्या मायबोलीवरच्याच काही लेखनाच्या दोन पीडीएफ तयार करा. तुमचेच लेखन असल्याने स्वामित्वहक्काची चिंता नाही. तुम्हीच पीडीएफ करणार असल्याने तयार करण्याचा खर्च नाही. तुम्हाला हवे असल्यास कुणाकडून तरी चित्रे काढून घ्या. दोन्ही पुस्तकांवर तुमचा प्रताधिकार आहे ही नोटीस आणि तुमचा संपर्क लिहायला विसरू नका.

त्यातले कुठले एक पीडीएफ जास्त लोकप्रिय होईल असे वाटते ते ठरवा. त्याला अ) असे नाव देऊ. दुसर्‍याचे नाव ब)
अ) पुस्तकात शेवटच्या पानावर वाचकाला धन्यवाद द्या. आणि तुमचा ईमेल पत्ता देऊन असे लिहा की या ईमेल पत्त्यावर मला ईमेल पाठवली तर मी तुम्हाला दुसरे ब) हे ईमेल पुस्तक फुकट पाठवीन. यात काहीतरी कालमर्यादा ठेवा म्हणजे अमुक तारखेपर्यंतच हे ब) पुस्तक फुकट असेल जेणेकरून ते मिळवण्यासाठी लगेच ईमेल पाठवावी लागेल.

मायबोलीवर एक धागा करून तुमचे अ) पुस्तक इथे चिकटवा. ब) तुमच्याकडेच ठेवा. कुणि अ) वाचल्यावर ब) मागितले तर आवर्जून पाठवायला विसरू नका.

तुमच्या मित्रमंडळींना तुमचे अ) हे ईबु़क इथून फुकट डाऊनलोड करता येईल ते कळवा. पण ब) बद्दल कुणालाच कुठेही सांगू नका जेणे करून तुम्हाला कोण अ) शेवटच्या पानापर्यंत वाचतेय तेही कळेल.

यातून किंमत पूर्ण बाद असल्याने तुम्हाला यातून काही गोष्टी कळतील
१) किती लोक तुमचे अ) पुस्तक डाऊनलोड करतात.
२) त्यातले किती लोक ते वाचतात
३) त्यातले किती लोक ते वाचून ब) पुस्तकाची मागणी करतात.

किती किंमतीला कोण विकत घेईल ही पुढची पायरी झाली. आधी तुम्हाला अगदी फुकट दिले तरी मागणी आहे का ते कळेल.

(ही माझी कल्पना नाही, काही नावाजलेल्या इंग्रजी ईबुक लेखकांनी मागणीचा अंदाज घेण्याकरता हा प्रयोग अनेकदा केला आहे.)

मराठीत फिक्शन हल्ली कमी प्रकाशित होतं, हे सत्य आहे. उत्तम कथाकादंबर्‍या आल्या तरी त्या छापायच्या नाहीत, असं धोरण नाही. पण असं लेखन प्रकाशकाकडे कमीच येतं. पण दुसरी बाजू अशी, की सर्वसामान्य वाचकही बहुतकरून पटकन वाचून होईल, फार विचार करावा लागणार नाही, किंवा उपयुक्त असेल अशा साहित्याकडे वळला आहे. दीडशे-दोनशे पानांहून अधिक वाचलं जात नाही, ही सत्य परिस्थिती आहे. अनुवाद, आत्मचरित्र (त्यातही मजा म्हणजे हिंदी अभिनेत्यांची / संगीतकारांची / गायकांची आत्मचरित्रं फारशी विकली गेली नाहीत..), प्रवासवर्णन असंच साहित्य विकलं जातं. अशी पुस्तकं अधिक विकली गेल्यावर आणि इतर पुस्तकांना कमी प्रतिसाद मिळाल्यावर जे जास्त खपतं त्याचं उत्पादन अधिक होणार.

अजय, ही 'अ‍ॅपल्स अ‍ॅन्ड ऑरेन्जेस' तुलना होईल ना?
मायबोलीवर आधीच असलेले (आणि सतत सलणारे) 'मर्ढेकर' विक्रीस ठेवून पाहू. चिनूक्स यांना नेमकी कुठली कविता कुठल्या प्रकाशकाची आहे हे माहीत असेलच, त्या त्या कवितेचा मोबदला त्या त्या प्रकाशकाला देऊ. एकदाचे क्लासिक्सही निकालात निघतील.

अजयजी,
तुमचा प्रयोग अत्यंत स्वागतार्ह आहे,
मी जर काही असे लिखाण करणारा असतो, तर नक्कीच तुमच्या प्रयोगात सहभाग दिला असता. आतापर्यंतच्या चर्चेत माबोवरील कोणत्याही कवी-लेखकाने सहभाग नोंदवलेला नाहिये.

मला वाटते, मायबोलीवरील पाककृती देणारे सुगरण-बल्लवाचार्य, रमणीय प्रवासवर्णने देणारे भटके, ट्रेकिंगबद्दल लिहिणारे दुर्गप्रेमी, गझलाकार, ललितलेखक, कवी, हास्यस्फोट घडविणारे विनोदी लेखक, यांनी आपापले लेखन्/लेखमालांचे संकलन पब्लिश करण्यास परवानगी दिली, तर मी माझ्याकडे असेल तितका वेळ काढून पीडीएफ कंपाईल करण्यात मदत करू शकेन. काही नॉन-कमर्शिअल नियत-अनियतकालिकांचे संपादन/प्रकाशन करण्याचा तोकडा अनुभव गाठीशी आहे, तेव्हा थोडे बरे प्रेझेंटेशन तयार करीन असा विश्वास आहे.

बघू तरी लोक ऑफलाईन रीडींगसाठी किती डालो करून ठेवतात! Happy

स्वाती
मी यातून किंमत ठरवणे हा अवघड प्रश्न बाद करतो आहे. एकदा का किंमत आली की इतर व्यावसायिक गणितं बघावीच लागतात. आणि सध्यातरी ते गणित जुळवून हा प्रयोग यशस्वी करणं मायबोलीच्या आवाक्याबाहेरचं आहे.

सगळ्यांनाच शिवाजी शेजारच्या घरात जन्मायला हवा असतो. Happy

कुणी प्रत्यक्ष करून पाहणार असेल तर माझ्यासकट सगळेच "मदत" करायला तयार आहेत. पाहुया फु़कट दिल्यावर तरी डाऊनलोड करून वाचायची मदत किती जण करतील.

जुन्या लेखकांच्या, त्यांच्या वारसांच्या प्रताधिकारांवर आपण भरपूर चर्चा केली. स्वतःचे प्रताधिकार असताना हा प्रयोग करणं तर आणखी सोपं व्हावं. पीडीएफ करणं अगदीच सोपंय असे सगळेच इथे म्हणतायत. त्यामुळे तोही प्रश्न नसावा. फुकट देत असल्यामुळे DRM वगैरे साठी सॉफ्टवेअर लायसन्स चा खर्च नाही.

चांगलं लेखन असतील तर विकत घेऊ असे बरेच जण वर लिहतायत. त्यामुळे फु़कट असेल तर ते नक्कीच घेतील असे वाटते. हवे असल्यास हे लेखन आवडले तरच मला १०रु पाठवा असेही करता येईल. म्हणजे वर सुचवलेल्या सगळ्या कल्पना कुठलाही "खर्च न करता" अंमलात आणण्यासारख्या दिसतायत. Happy

लोक नक्की वाचत आहेत, मागणी आहे हे कळालं तर पुढच्या पुस्तकांसाठी किंमतीचा विचार करता येईल. कुणि फुकट देऊनही वाचत नसेल तर किंमत लावायचा प्रश्नच येत नाही.

अजय, प्रयोगाबद्दल अजून सगळे मुद्दे मला क्लिअर होत नाहीयेत. हा माझा टेक्निकल बाबतीतला बर्‍याच प्रमाणातला अडाणीपणा समजा. तर चित्र थोडं अधिक स्पष्ट झाल्यावर प्रयोगात सहभागी होण्यास माझी ना नाही.

मोठाच महत्वाचा विषय. प्रतिसादही अभ्यासपूर्ण !

इ-बुक प्रकाशन व्यवहारात पायरसीचाच मुद्दा प्रकाशकांना महत्वाचा वाटणे क्रमप्राप्त आहे, त्यावर पकड आल्यावरच ते यात उतरतील. लेखनावर जगणे ही कल्पनासुद्धा करू न शकण्याच्या वास्तवात राहणाऱ्या अनेक लेखकांसाठी मानधन ( हो १०% असतं ते ) हे केवळ प्रतीकात्म महत्वाचं असतं असं मला वाटतं.

नीधप
तुम्हाला कुठचे मुद्दे स्पष्ट होत नाहीयेत? या प्रयोगात मायबोलीला कुठलाही वाटा नको आहे.
मायबोलीबाहेरही तुमच्या स्वत:च्या ब्लॉगवर हा प्रयोग करता येईल. फक्त मायबोलीबाहेर करणार असाल तर मायबोलीवर त्याची फुकट जाहिरात करता येणार नाही इतकेच.

>कोणती मराठी ई-पुस्तके कुठे आहेत त्याची लिंक देणार का?

माफ करा. ते या धाग्याच्या आणि मायबोलीच्या धोरणाबाहेर असेल.

या प्रयोगात मायबोलीला कुठलाही वाटा नको आहे. <<
त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाहीये. माबोने वाटा घेतल्यासही मला काहीच त्रास नाहीये.
प्रयोगातून नक्की साध्य काय होणारे याबद्दलची स्पष्टता मला या क्षणाला नाहीये इतकेच.
थोडासा विचार करून तर बघूद्या.

जवळ जवळ वर्षभरापूर्वी अजब प्रकाशनाने(चूभूद्याघ्या) फक्त पन्नास रुपयांत गाजलेली मराठी पुस्तके विकली तेव्हा लोकांनी ती पुस्तकं विकत घ्यायला रांगा लावल्याचं मला आठवतं. माझ्या माहितीप्रमाणे जुन्या लेखकांप्रमाणेच सद्यकालीन लेखकांचीदेखील (उदा. वामन होवाळ)पुस्तकं त्यात होती.
मला वाटतं ईपुस्तकंसुद्धा स्वस्तात उपलब्ध झाली तर लोक जरूर विकत घेतील

गेली काही वर्षे ईबुक्/पीडीएफ च्या स्वरूपात काही दिवाळीअंक सातत्याने प्रकाशीत होत आहे. मायबोलीचा दिवाळी अंक ही आपण काही वर्षे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून द्यायचो. आपल्यातलेच काही मायबोलीकर असे अंक आंतरजालावर प्रकाशित करतात आणि काही त्यात लिहितात सुद्धा. ते अंक कितीवेळा डाऊनलोड झाले (विनामूल्य असूनही) हे कळाले तर खरोखर किती मागणी आहे याचा अंदाज घेता येईल. अर्थात डाऊनलोडकरून ठेवले तर वाचले जाते का हा पुढचा मुद्दा.

मी वर लिहिलेला प्रयोग हा अशा दिवाळी अंकांपेक्षा वेगळा नाही. यात फक्त एक बदल असा सुचवला आहे (एक पुस्तक वाचल्यावर फुकट ईबुक) ज्या मुळे खरोखर किती जण डाऊनलोड केल्यावर वाचतात हे कळावे आणि त्यांना त्यासाठी काही गाजर असावे.

अजय, मी घेईन या प्रयोगात भाग.

तरीही मला या प्रयोगामुळे मी शिवाजी कशी होणार हे समजत नाहीये. Proud
विनोदाचा भाग वगळून - याचा चालू चर्चेला कसा उपयोग होणार हे समजत नाहीये.

म्हणजे माझी पीडीएफ किती जण उतरवून घेऊन वाचतात त्यावरून प्रकाशकांना ईपुस्तकांच्या मार्केटचा अंदाज येणार आहे का? की प्रकाशकांना सल्ले द्यायच्या भानगडीत पडणार्‍यांना कायमचा धडा मिळावा असा हेतू आहे? Happy

लेखकाला फारसं आर्थिक उत्पन्न मिळतच नसेल तर लेखकतरी पुस्तकं छापायच्या फंदात का पडतात असा आता मला नवीन प्रश्न पडला आहे. विशेषतः नवोदित लेखक - ज्यांना ब्लॉगिंगसारखे पर्याय उपलब्ध आहेत? सातत्याने चांगलं लिहिणार्‍यांचे ब्लॉग्ज फॉलो केले जातात आणि त्यांना जाहिरातदारही मिळतात. मग प्रकाशक हवेत कशाला?

Pages