कुक्कुटपालना मधले “कॉर्पोरेट” धडे!!

Submitted by व्यत्यय on 20 February, 2014 - 09:47

धडा पहिला:
एकदा एक कुक्कुटपालन केंद्र असतं. तिथे दोन कोंबड्या एकमेकींशी बोलत असतात.
पहिली कोंबडी: काय ग तुझं हल्ली कामात लक्ष नसतं हं. किती छोटी अंडी देतेस. कोणी चार रुपयाला पण विकत नाही घेणार. माझी अंडी बघ. साडेचार रुपयाला सहज विकली जातात.
दुसरी कोंबडी: (एखाद्या बाईसारखा मानेला हलकेच झटका देऊन) जाउदे ग. आठ आण्यांसाठी एवढा जास्त बोचा ताणायला कोणी सांगितलंय.
तात्पर्य: मालकाच्या फायद्यासाठी काम करताना किती बोचा ताणायचा हे तुम्ही स्वत: ठरवायचे असते. छोटी अंडी देणाऱ्या कोंबडीला कमी खाणे देणे असा प्रकार सहसा होत नाही. अर्थात जर तुम्ही अंडी द्यायचे पूर्णपणे बंद केले तर मात्र तुमची चिकन तंदुरी व्हायला वेळ लागणार नाही.

धडा दुसरा:
एकदा एक कुक्कुटपालन केंद्र असतं. तिथला नवीनच रुजू झालेला म्यानेजर खुराडी साफ करणाऱ्या एका कर्मचाऱ्या बरोबर साप्ताहिक आकडे तपासत असतो.
म्यानेजर: पाहिलंस, मी सांगत होतो ना कि व्यवस्थापकीय संकल्पना कुठेही लागू होतात म्हणून. काय झालं मी आयुष्यात पहिल्यांदाच कुक्कुटपालन केंद्रावर आलो तर. बघ आपली अंड्यांची संख्या किती वाढली ते.
कर्मचारी: पण साहेब अति ताणाने कोंबड्या लवकर मरतील.
म्यानेजर: मरू दे, आपण दुसऱ्या कोंबड्या आणू, तसही मरण कोणाला चुकलंय. असो. अरे त्या ३२७ नंबरच्या खुराड्यामधली लांब शेपटीवाली कोंबडी आठवड्याला तिनच अंडी देतेय. आणि बाकीच्या कोंबड्या मात्र आठवड्याला सात ते दहा अंडी देताहेत.
कर्मचारी: साहेब तो कोंबडा आहे.
म्यानेजर: मग काय झालं, नियम हे सर्वांसाठी सारखेच.
तात्पर्य १: एक उत्तम म्यानेजर कोंबड्याला देखील अंडी घालायला लावू शकतो.
तात्पर्य २: तुम्ही कोंबडा असून अंडी घातलीत तरी तुमचा म्यानेजर खुश होईलच याची खात्री नाही.

धडा तिसरा:
एकदा एक कुक्कुटपालन केंद्र असतं. तिथला कोंबडा म्हातारा झाला म्हणून मालक नवीन कोंबडा घेऊन येतो. हा नवीन कोंबडा आपला लालचुटुक तुरा आणि गिर्रेदार शेपटी घेऊन ऐटीत मानेवरची पिसं फुलवत आपलं नवीन साम्राज्य पाहत असतो. तेवढ्यात त्याला आधीचा म्हातारा कोंबडा दिसतो. नवीन कोंबडा एक जोरदार बांग देऊन जुन्या कोंबड्या कडे तुच्छतेने बघतो.
म्हातारा कोंबडा: जर स्वतःला एव्हडा डॉन समजत असशील तर माझ्याबरोबर धावायची शर्यत लाव.
तरुण कोंबडा: अरे म्हाताऱ्या, मी एका पायावर धावत पण तुला हरवू शकतो.
म्हातारा कोंबडा: साहजिकच आहे. तरुण आहेस त्याचा गैरफायदा मिळणार तुला. मी तुझ्या वयाचा असतो तर तुझ्या नंतर ५ सेकंद धावायला सुरुवात करून सुद्धा तुला हरवलं असतं.
तरुण कोंबडा: ठीक आहे मग. मी तुझ्या नंतर १० सेकंद धावायला सुरुवात करतो मग तर चालेल?
म्हातारा कोंबडा: ठीक आहे. मी इथून धावायला सुरवात करेन आणि १० सेकंदा नंतर तू धावायला लाग. तिथे लांब मालक बसलाय ना, मी तिथे पोचायच्या आधी जर तू माझ्या तुऱ्याला चोचीने स्पर्श केलास तर तू जिंकलास. मग इथल्या सर्व कोंबड्यांवर तुझा हक्क.
तरुण कोंबडा: ठीक आहे.
ठरल्याप्रमाणे शर्यत सुरु होते. तरुण कोंबडा १० सेकंद उशिरा सुरुवात करून पण झपाट्याने अंतर कापून म्हाताऱ्या कोंबड्या जवळ पोचतो. अचानक म्हातारा कोंबडा कलकलाट करत अधिकच जोरात पाळायला लागतो. तरुण कोंबडा तिथे लक्ष न देता म्हाताऱ्याच्या तुऱ्याला चोच लावायला धडपडत असतो. तो तुऱ्याला स्पर्श करणार तेव्हढ्यात “ठो” आवाज होतो.
मालकाने गोळी मारून नवीन कोंबड्याला ठार मारलेले असते. मालक मनात विचार करत असतो. “नक्कीच कलियुग आलय. दोन आठवड्यामध्ये हा पाचवा “गे” कोंबडा”
तात्पर्य: जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन कामाला लागाल तेव्हा तिथल्या जुन्या खोडांचा आदर करा. त्यांच्यापासून खूप काही शिकण्या सारखे असते. पण जर त्यांच्याशी पंगा घेतला तर तुम्हाला कळणारही नाही तुम्हाला कोणी आणि का मारलं ते.

धडा चौथा:
एकदा एक शेतकरी असतो. त्याच्या घरी वेगवेगळे प्राणी वेगवेगळी कामं करत असतात. एके रात्री चोर घरात घुसायचा प्रयत्न करत असतात. कुत्रा मात्र न भुंकता झोपून राहिलेला असतो. कोंबड्याला ते बघवत नाही. तो जोरजोरात बांग द्यायला सुरवात करतो. त्या आवाजाने शेतकरी जागा होतो आणि चोर पळून जातात. अजून एक दोन वेळा असा प्रकार झाल्यावर शेतकरी झोपमोड होण्याच्या वैतागाने कोंबड्याला मारून टाकतो.
तात्पर्य: आपले काम सोडून दुसऱ्याच्या कामात नाक खुपसणाऱ्याला मरण पत्करावे लागते

धडा पाचवा:
एकदा एक शेतकरी असतो. त्याच्या घरी वेगवेगळे प्राणी वेगवेगळी कामं करत असतात. एके रात्री चोर घरात घुसायचा प्रयत्न करत असतात. कुत्रा मात्र न भुंकता झोपून राहिलेला असतो. कोंबड्याला ते बघवत नाही. तो जोरजोरात बांग द्यायला सुरवात करतो. त्या आवाजाने शेतकरी जागा होतो आणि चोर पळून जातात. अजून एक दोन वेळा असा प्रकार झाल्यावर शेतकरी पाळत ठेवून खरा प्रकार शोधून काढतो. मग खुश होऊन तो कोंबड्याला घराची राखण करायचे काम पण सोपवतो. आता बाहेर गरज नसल्याने कुत्रा मात्र घाराच्या आतमध्ये झोपायला सुरवात करतो. लवकरच दिवस रात्र काम केल्यामुळे पुरेशी झोप न मिळून कोंबडा मरून जातो.
तात्पर्य: आपले काम सोडून दुसऱ्याच्या कामात नाक खुपसणाऱ्याला नेहमीच या ना त्या कारणाने मरण पत्करावे लागते

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गूड ट्रान्सलेशन ऑफ व्हॉट्सॅप मेसेज, व्हिच वॉज अ‍ॅक्चुअली अ चेन ई मेल, टेकन फ्रॉम ऑर्कुट, बिफोर इट वॉज पोस्टेड ऑन फेसबुक Wink बट बेसिकली इट वॉज कन्सिव्हड बाय व्यासा, द उच्छिष्टर ऑफ द वर्ल्ड! 25.gif

खरंय इब्लिस, मी तो भारवाही हमाल. चार इकडे तिकडे ऐकलेल्या गोष्टी मला आठवतील तशा लिहिल्या.
पण खरं सांगा सगळ्या गोष्टी एकत्र तात्पर्या सकट वाचायला मजा आली कि नाही Wink

छान

छान आहे
पहिल्या मधला "तो" शब्द काढुन दुसरं काहीतरी टाकता येईल का बघा ना म्हणजे ओडीसीमध्ये वाचुन दाखवते.

@रिया: तुम्ही फक्त "ताणायला नको" असो म्हणा. काय ते ऐकणारे समजून जातील. Happy
नाही तरी इंग्रजी मध्ये प्रमाणाबाहेर काम करण्याला "stretching yourself" असा सभ्य वाक्प्रचार आहेच.

मान्य कि "तो" ग्राम्य शब्द चारचौघांत बोलण्यासारखा नाहीये. पण त्याच्याच मुळे तर त्या किश्श्याला खुमारी आहे.

जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन कामाला लागाल तेव्हा तिथल्या जुन्या खोडांचा आदर करा. त्यांच्यापासून खूप काही शिकण्या सारखे असते. पण जर त्यांच्याशी पंगा घेतला तर तुम्हाला कळणारही नाही तुम्हाला कोणी आणि का मारलं ते.
>> शेरास सव्वाशेर असतो ही जूनी म्हण आहे.‌ जशास तसे अजून एक म्हण आहे. आणि पेराल तसे उगवते ही म्हण जून्या खोडांना माहित असली पाहिजे, नाहीतर कधी चितपट होऊन निकाल लागेल हे कळणार नाही. गर्वाचे घर खाली कशाला म्हटलंय.

Lol