भारतीय रेल्वे जिव्हाळ्याचा विषय

Submitted by हर्ट on 19 February, 2014 - 20:44

नमस्कार, तुम्ही आम्ही आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेमधून प्रवास केलेले असतील. इथे तुम्ही तुमच्या आवडती रेल्वे , अधेमधे येणारी गावे, तालुके, जिल्हे, निसर्ग, झाडीझुडी, खा-प्यायचे पदार्थ, भेटलेले व्यक्ति आणि वल्ली, अलिकडे झालेले बदल, रेल्वेची नावे - नदीवरुन, इतिहासावरुन - ह्या सर्वांची रसभरीत चर्चा इथे करा.

पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा

इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'

टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी

दिल्लीची 'राजधानी' मी
मी नेताजींची 'आझाद हींद'
कोल्हापुरची 'महालक्ष्मी' मी
मी गांधीजींची 'अहिंसा'

कोकणची 'कोकणकन्या' मी
सोलापुरी 'सिद्धेश्वर'
उज्जैनची 'अवंतिका' मी
एंम्.पी .यु .पी. 'फ्राँटीयर'

बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'कर हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेल्वे आवडतेच अगदी लहानपणापासून. आवड निर्माण झाली ती बाबांमूळेच. फावल्या वेळात ते मला कोल्हापूरच्या स्टेशनवर एखादी धडधडती रेल्वे जाताना दाखवण्यासाठी घेऊन जात. ते टाईमटेबल ते कुठून मिळवत माहित नाही. कधी कधी घरी जाऊ असा धोशा लावला की ५ मिनिटं थांब येईलच रेल्वे असं म्हणलं की खरंच यायची.
मग नृसिंहवाडीला जाताना कधी कधी आम्ही थोडं अंतर रेल्वेने जात असू. तेव्हा रेल्वे रिकामी रिकामी असायची, आणि डब्यात बागडायला फार आवडायचं. एकदा मी फारच लहान असताना आई बाबांबरोबर रेल्वेने कुठेतरी निघाले होते तेव्हा एका स्टेशनवर बाबा पाणी घ्यायला खाली उतरले आणि गाडी बहुतेक इंजिन लावण्यासाठी थोडी हलली. मी रडून धुमाकूळ घातला, मला वाटलं बाबा राहिले खालिच. त्याच प्रवासात एकदा आम्ही रात्री कोणत्या तरी स्टेशनवरून रेल्वे पकडली (मी अत्यंत लहान असल्याने आम्ही कुठे निघालो होतो, कोणती रेल्वे होती काहीही आठवत नाहिये) बहुतेक तो जनरल डबा होता. जिथे पाहू तिथे लोक झोपलेले, खाली, वर, बाजूला... एकही जागा नव्ह्ता.... मी विचारलं "बाबा हे सगळे लोकं मेलेत का? Uhoh बाबा म्हणाले नाही, झोपलेत. असो....
नंतर जशी जशी मोठी झले तसं रेल्वे अधिक अधिक आवडू लागली पण प्रवासाचे प्रसंग कमी झाले, कोल्हापूर पूणे सुद्धा मोस्टली एस टीने केलं. क्वचित रेल्वे. ती पण सह्याद्री एक्स्प्रेस. पण ती दोन्हीकडून रात्रीच सुटत असल्याने फार तर मिरज, जेजुरी, नीरा, घोरपडी हीच स्टेशनं माहिती, कारण तोवर झोपेनं घेरलेलं तरी असायचं किंवा पुणं आलं म्हणून जागं होताना जेमतेम घोरपडी दिसायचं.

दिवसाचा रेल्वेचा प्रवास करायचा तर सिंहगड/ डेक्कन क्विन किंवा प्रगती ने.... तो ही पावसाळ्यात. खवय्ये असाल तर डेक्कन क्विननेच. लवकर उठून गाडी पकडली की आपोआप ८ - ८.१५ च्या सुमाराला पोटात कावळे ओरडायला लागतात. मग फेरीवाले चहा, कॉफी, पॅटिस सामोसे घेऊन आजूबाजूला इतके भटकतात की वासानेच भूक अधिक तीव्र होते. मग एखाद्या पदार्थावर बोट ठेवून मागवावे., खरं तर सगळंच टिपिकल प्रवासात खाण्याचं असल्याने काय निवडावं आणि काय टाळावं हाच मोठा प्रश्न असतो. मग गरम गरम पॅटिस किंवा टोस्ट बिन्स चा स्वाद घेत, घाटाचं सौंदर्य निरखावं. थकवा जाणवतच नाही. Happy

मला कधीच माहित नव्ह्तं की रेल्वेचं काही पुस्तक वगैरे असतं (रेक्नर/टाईम्टेबल) एकदा माझ्या हातात पडलं आणी मी चक्क वेडीच झाले. असंख्य रेल्वे आणि त्यांची सुरेख नावं. स्वर्ण जयंती, ऑगस्ट क्रांती. आणि कित्येक. ठिकाणं आणि तिथले सिग्निफिकन्स... अतिशय डोकी लढवून समर्पक नावं ठेवली आहेत.
आता रेल्वे स्वतः इतकी दिमाखदार असते तर नावं ही शोभणारीच असायला हवीत नाही का? Happy

काही वर्षापुर्वी पुणे मुंबई मार्गावर एक शताब्दी नावाची एक्प्रेसही होती. पुर्ण एसी आणि सुपरफास्ट. पण त्याच वेळेच्या आसपास अणखिन ऑप्शन्स अ‍ॅव्हेलेबल असल्यानं आणि त्या गाडीचं भाडं जरा जास्तच असल्याने बहुतेक रिस्पॉन्स कमी होता. नंतर ही गाडी बदलून इंटरसिटी सुरू झाली. सिमिलर टू डेक्कन क्विन अ‍ॅन्ड प्रगती.

एकदा कामानिमित्त मुंबईला जाताना कर्जत ला वडा खायला थांबले असता... अनाउन्स्मेंट झाली की शताब्दी येत आहे... कर्जत स्टेशनवर न थांबता ती अशी काही धडधडत गेली की माझा वडा खायचाच राहून गेला. एकदा तरी या गाडीने मुंबईला जायचंच असा निश्चय मी केलाच त्यादिवशी.. पण ती गाडी बंद झाल्याने मी माझी ती इच्छा अपूरीच राहिली.

बी, सिंगापूरची चकाचक रेल्वे एम आर टी बद्दल लिही कि. अर्थात तरी आपल्या भारतीय रेल चे महत्व कमी होत नाही म्हणा... आणि तू आमची मुंबईची लोकल पण त्यात धरलीस तर रोज एक नवा अनुभव देत असते ती आम्हाला.. मी आताही भारतात गेलो तर एकदा तरी रेल्वेने प्रवास करतोच.

दक्षे... छान लिहिले आहेस.
अगदी पुर्वी आम्हाला मालवणला जायला देखील महालक्ष्मी ने कोल्हापूर आणि मग एस्टीने मालवणला जावे लागे.
गोवा हायवे नीट नव्हता. रातराण्या नव्हत्या, वाशी पूल नव्हता, मलकापूरला थेट एस्टी नव्हती, बोटींना गर्दी असायची ( मालवणच्या ).. म्हणून महालक्ष्मीला पर्याय नव्हता. आता ती फार उशीरा पोहोचते कारण तिला मिरज, सांगलीला पण थांबावे लागते. त्यामानाने बसेस पटकन जातात. तरी एकदा जाणतेपणी मी महालक्ष्मीने गेलोच होतो. पुण्याच्या पुढे बहुतेक मार्ग एकेरी होता. मस्त शेतातून वगैरे जाते गाडी.

दक्षिणा, खरच खूप छान लिहिल आहेस. शताब्दीमध्ये बसायच असेल तर तुला हैद्राबादला याव लागेल. Wink पुणे - हैद्राबाद शताब्दी एक्सप्रेस आहे आणि खाण्यापिण्याची भरपूर रेलचेल आहे. एकदा तिकिट काढल की खाणपिण व्हेज / नॉन व्हेज फुकट.

भारतीय रेल्वे माझापण जिव्हाळ्याचा विषय.

मी सुद्दा प्रत्येक महिन्याला २-३ वेळा रेल्वेने प्रवास करते. कधी कधी ५-६ वेळा होतो एकाच महिन्यामध्ये.
माझ्या नेहमीच्या ट्रेन्सपैकी हुसेनसागर एक्सप्रेस पण ह्या ट्रेनला पॅन्ट्री नसल्याने खाण्यापिण्याची काही खास सोय नसते. त्यामूळॅ पुण्याच्या शताब्दीचा मला खूप राग येतो. Happy हैद्राबादवरुन जाताना सोलापूर कधी येत ह्याची वाट पहायची स्टेशन आल की तेथील पा.भा. घ्यायची रात्रीच जेवण म्हणून. खूप खास नसते पण पोटभरीला ठीक आहे.

मांडवी एक्सप्रेसमधील व्हेज बिर्याणी गेल्यावर्षीपर्यंन्त खूप टेस्टी होती हल्ली पहिल्यासारखी नाही मिळत. Sad बाकी पदार्थ - गु.जा., मटका दही, चीज सँडविच. जनशताब्दी मध्ये व्हेज कटलेट ठीक आहे. नेत्रावती, कोचीवली, मस्त्यगंधा मध्ये काहीच खास मिळत नाही. Sad ह्या ट्रेन्सने खूप कमी वेळा जाण होत.
ह्यावेळेस नेत्रावतीमध्ये पुरणपोळी होती. अगोदर मला समजलच नाही काय आहे ते कारण विक्रेत्याचे उच्चार समजत नव्हते आणि पुपो रोल करून प्लॅस्टीक कव्हर होत. दोन तीन वेळा जेव्हा गेला तेव्हा समजल पु.पो. आहे ते.

बंगळूरला जाताना धर्मावरमचा दाल वडा ची वाट पहावी लागते. मंत्रालय स्टेशनवर मिळणारी गरमा गरम इडली - वडा तो.पा.सु.

रेल्वे म्हटले कि लहानपणी बडोद्याला आजोळी जातांना केलेला प्रवास आठवतो, मध्य-प्रदेशमध्ये मावशीकडेपण दोनदा गेले. नंतर खूप वर्षांनी दिल्लीला राजधानीने गेले. एकदा शेगावला. पण जास्त प्रवास बडोद्यापर्यंतच केला.

हल्ली बरीच वर्षे नाही गेले, फक्त लोकल-प्रवास केला. बाकी कोकणात बसनेच केलाय आणि बहुतेकदा travellsच्या गाडीने जातो. एकदा कोकण-रेल्वे अनुभवायची आहे.

खाण्याचे रेल्वे प्रवासात पुण्याला जातांना कर्जतचा वडा नेहेमीच एन्जॉय केला. खंत अशीकी आई बडोद्याला जातांना नेहेमी पुरी-भाजी, मेथीचे ठेपले वगैरे घरचेच घ्यायची म्हणून तेच खायला लागायचे, पण बडोद्याला गेल्यावर खमण एन्जॉय करायचो पण ते रेल्वेप्रवासात नाही. एकच आठवण आहे एकदा मावशीकडे म.प्र. मध्ये जातांना बडोद्याला खास आजोबा आमच्यासाठी खमण आणि बडोद्याचे पेढे घेऊन आले होते.

लहानपणा पासून च भुसावळ ते इन्दौर (खंडवा मार्गे) असा प्रवास अनेक वेळा केला आहे. वडील रेल्वे कर्मचारी अस्ल्याचा पुरेपुर उपयोग झाला. खंडवा ते अजमेर ३ पैसेन्जर होत्या मीटरगेज . पुष्कळ श्या डब्यांना खिड्क्यांचे ग़ज नव्ह्ते असा डबा खुप आवडायच मला. काळे कोळ्श्याचे ईंजीन असायचे, २ दा आमच्याच गावाचा ड्रायवर बघुन मलाही ईंजीन मधे काही वेळ प्रवास करण्यास मिळाला.
खाऊ तर भरपूर मिळायचा जवळ-जवळ प्रत्येक स्टेशन वर, खंडव्याची कचोरी, शेव, नमकीन,
अत्तर्/अजन्तीच्या काकड्या(चैत्री), निमाड्खेडी चा चहा(स्पेशल), बडवाह चा चिवडा, दही, लस्सी
चोरल, कालाकुंड चा कलाकंद, पातालपानी चा रानमेवा(जांभुळ, खजुर), महू चे पोहे, समोसे, कचोरी

सगळ्यांना धन्यवाद.
एक सांगायचं राहूनच गेलं. तलाश सिनेमात एक गाणं आहे 'ना मै जानू, ना तू जाने.... इस घडी में होना है क्या? या गाण्याच्या चित्रिकरणात सगळं रेल्वे स्टेशन, त्या सिद्दिकी ला पकडण्याची धडपड वगैरे पाहता लोक गाण्याकडे बर्‍यापैकी दुर्लक्ष करतात. दोन तीन लोकाना मी म्हणलं सुद्धा की ते गाणं किती छान आहे. तर त्यांनी मला व्यवस्थित शून्यात काढलं.
नंतर मला जाणवलं की मला ते गाणं आवडलं निव्वळ ते रेल्वेच्या धडधडीचा र्‍हिदम म्हणून फार चांगला उपयोग केलाय. Happy

आरती तू कित्ती प्रवास केलायस आण पदार्थांची नावं आणि कोणत्या गाडीत काय मिळतं खास याची माहिती पण मस्तच दिलियेस.

बीराव , आपले दोन चार जिव्हाळ्याचे अनुभव लिहा की .

बाकी दक्षिणाने छान सुरुवात करून दिली आहे .
फक्त गाडीच्या एंजिनचा स्टिरिओ साउंडसाठी मी शोले पाहिला होता .
सर्वात जलद जाणारी गाडी
हे नाव बरेच वर्ष मिरवणारी डेक्कन क्वीन
आता प्रथम क्रमांकावर नाही .तिचा चमकदार निळा रंग ८०च्या आसपास
काढून "गंज लागू नये म्हणून दिलेला निळा फराटा "करण्यात आला.

डेक्कनचे प्रवासी यावर भुस्कुटे यांनी त्यांच्या एका पुस्तकात छान लेख लिहिला आहे .आम्ही डेक्कनने जातो हे एक वाक्यच त्यांची समाजातली
प्रतिष्ठा सिध्द करायला पुरेसं असतं असं त्यांचं प्रांजळ मत असतं .पुणे मुंबई विमान प्रवासही त्यापुढे फिका वाटतो .

अठराशे त्रेपन्नला पहिली मुंबई ते ठाणे रेल्वे धावली आणि पंचावन्न पर्यँत बरेच मार्ग सुरू झाले .
लगेचच "लोखंडी रस्त्यांवरचे रथ " हे मराठी पुस्तक आले .त्यातले रेल्वेचे वर्णन आणि प्रवाशांच्या धावपळीचे चित्र अजूनही तसेच आहे .

जर्मनी जपानमध्ये चारशे किमी वेगाने धावणाऱ्या गाड्या आल्या तरी आमच्या
वीस किमीने जाणाऱ्या सवारी गाडीची वाट पाहात यात्री बोरे गाठोडे घेऊन फलाटावर तितक्याच उत्सुकतेने ताटकळत आहेत .

कोकण रेल्वेने भर पावसाळ्यामध्ये प्रवास करायचा, भन्नाट वातावरण असतं. त्यातही ट्रेनने खेड सोडलं की आम्हाला घर आल्यासारखं वाटायचं, आणी चिपळूण सोडलं की आलंच घर!!!!

आमच्या घरापासून स्टेशन तसं जवळ आहे, ट्रेन आरटीओच्या पुलापाशी आली की गच्चीमधून मस्त दिसायची. नवीन घर घेतलं तेव्हा आम्ही येणारी प्रत्येक ट्रेन बघायला गच्च्चीत धावत जायचो,

एकदा मी मुंबईला निघाले होते. एकटंच जायचं असल्याने रीझर्वेशन वगैरे भानगडी नव्हत्या. घरातून बाहेर पडले तर एक एक्स्प्रेस ट्रेन पुलावरून जाताना दिसली. (ती मिळणार नाही हे माहित होतं. मला नंतरची पॅसेंजर पकडायची होती.) तरी मी घरातून बाहेर पडून रिक्षा पकडून स्टेशनवर जाऊन तिकीट काढलं तरी ती एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवरच. निवांत चालत जाऊन ही ट्रेन पकडली. मी ट्रेनमध्ये निवांत स्थानापन्न वगैरे झाल्यावर ट्रेन निघाली. Happy

दक्षिणा, तुम्ही खूप छान लिहिलं आहे.
लहानपणी केलेला राजधानी एक्सप्रेसमधून केलेला प्रवासाचा वेग एवढा आठवतो की मटक्यातून मिळालेल्या चहाशिवाय बाकी आठवत नाही.
अंजू,
खाण्याचे रेल्वे प्रवासात पुण्याला जातांना कर्जतचा वडा नेहेमीच एन्जॉय केला>>> +१.

बी, धन्यवाद या धाग्याबद्दल.

दक्षिणा - छान लिहीले आहेस. मी सह्याद्रीने कोळशाचे इंजिन असताना गेलेलो आहे. रात्री पूर्ण जागा होतो. माझे आजोबा त्याभागात खूप फिरलेले होते त्यामुळे प्रत्येक मोठ्या स्टेशनला भरपूर माहिती देत होते ते ही जागून. नीरा, किर्लोस्करवाडी, मिरज प्रत्येक ठिकाणाबद्दल काहीतरी सांगितल्याचे आठवते. तेव्हा मिरज ला मीटर गेज गाडी बहुधा बघितली होती, वास्को ला जाणारी.

ही आमची रेल्वेवरची जुनी रिक्षा Happy
http://www.maayboli.com/node/743
http://www.maayboli.com/node/744
http://www.maayboli.com/node/745
http://www.maayboli.com/node/746
http://www.maayboli.com/node/747

एकेकाळी पु-मु ट्रेनचा पास असायचा. पार्ल्याहून दादरला लोकलीने यायचं आणि मिळेल ती गाडी धावत पळत लोंबकाळत पकडायची वगैरे सवय होती. मु-पु प्रवास गाडीच्या दारात बसून करणे विशेषतः खंडाळा घाटाचा भाग आणि तोही सिंहगडचा (सिंहगड दादरला २:५० चे टायमिंग आहे. खं. घाटापर्यंत ४ वाजतात) हे सवयीचं आणि आवडीचं होतं.
पु-मु डे क्वी मधे लेडिज पासहोल्डरच्या डब्यात कधीमधी माझीही जागा धरली जायची. माझे पहाटे उठून केलेले (डे क्वी पुण्याहून ७:१० ला सुटायची/सुटते) डब्यातले दडपे पोहे, अजून कुणाचे काही तर कुणाचे काही अशी अंगतपंगत सुरू असायची साधारण मळवली क्रॉस केल्यापासून.
एकदा आगाऊपणा करून फर्स्टक्लासचा पास काढला होता. डे क्वी ला फर्स्टक्लासमधे पासहोल्डर्सचा सेक्शन असतो. तिथे बसले. ८ वाजता एक कामाचा फोन आला. १० मिनिटे बोलत होते. फोन झाल्यावर शेजारी बसलेल्या काकूंनी मला झापले. पास होल्डर भागात लोणावळ्यापर्यंत सगळे झोप काढतात. कोणीच फोनवर बोलत नाहीत. अर्जंट असेल तर बाहेर जाऊन घेतात. लोणावळ्यानंतर फोनाफोनी सुरू होते म्हणे.
तसं बघायला गेलं तर त्यांचंही चूक नव्हतं पण मला फोन घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तो महिना संपल्यावर मी आपली परत सामान्य माणसांचा सेकंड क्लासचा पास काढला होता. Happy
एकदा एक नुसत्या तिकिटवाल्या आजी डे क्वी मधे लेडिज पासहोल्डर्सच्या डब्यात शिरल्या. त्यांच्या वयाकडे बघून कोणी काही बोललं नाही. मग त्यांनी ज्या गप्पा सुरू केल्या त्या उतरेपर्यंत थांबल्याच नाहीत.
सगळ्यांना गाणी म्हणायला लावली, चालत्या गाडीत मधल्या जागेत सूर्यनमस्कार घालून दाखवला, त्यांच्या कुठल्या तरी ग्रुपच्या डान्सच्या स्टेप्स करून दाखवल्या.
सगळा डबा हसून हसून दणाणत होता त्या दिवशी.

हे वर्णन वाचून मला माझ्या लहानपणीची आठवण आली. मला रेल्वे आवडते हे माहीत असल्यामुळे माझी आजी मला रोज संध्याकाळी कोल्हापूरच्या स्टेशनवर घेऊन जायची. संध्याकाळी साडेसहा वाजता सांगली पॅसेंजर गेली की, आम्ही घरी परतायचो. आजही रेल्वेची आवड तेव्हापेक्षा कित्येकपटींनी वाढलेली आहे. प्रवास करायचा तर तो रेल्वेनेच आणि न झोपता, हा माझा नियमच. पुणे-कोल्हापूर असो की, पुणे-मुंबई रेल्वेला पर्याय नाही.

अरे वा! मस्त बीबी ..

मीही खूप प्रवास केला रेल्वे ने आणि अमेरिकेत येऊन शिंगं फुटेपर्यंत इन्डियन रेल्वे बेस्ट वाटायची (विमान प्रवासाबद्दल नेहेमीच आकर्षण होतं पण रेल्वे ती रेल्वे .. Happy

परत कधी मूड लागला तर आठवणी लिहून काढेन .. सध्या फारेण्डची रिक्षा वाचून काढते ..

अरे व्वा! सगळ्याचे अनुभव मस्त आहेत ..
मी फक्त मिरज-हुबळी-म्हैसुर आणि मुंबई-दिल्ली राजधानी इतकाच प्रवास रेल्वेने केलाय ..
म्हैसुरला ट्रेनिंगला जाताना धाकधुक की आता मी एकटी असणार (बाबा येणार होते सोडायला तरीही) .. पण मिरजेला गेल्यावर कळलं की आख्खी ट्रेनच इन्फी ट्रेनिंगवाल्यांची आहे .. बरं माझा घरापासुन दुर जायचा पहिलाच प्रसंग त्यामुळे रडु काही थांबत नव्हतच .. त्यात माझ्या डब्यात सगळी मुलंच कराड कॉलेजची .. ते बिचारे दिलासा देत होते .. पहिल्यांदा चाललीय का वगैरे .. नंतर मस्त मैत्री झाली सगळ्यांची .. Happy

दसर्याला मात्र भरपुर परदेशी पर्यटक होते या रेल्वेला ..

नंतर दिल्लीला व्हिसा स्टँपिंग साठी जावं लागल .. खाण्यापिण्याची चंगळ होती .. नुस्ता खा, प्या नि गप्पा मारा Happy

मला एकदा तरी मस्त लक्झुरीअस सर्व्हिस देणार्या रेल्वेने प्रवास करायचाय .. अशी रेल्वे मी एकदा म्हैसुरहुन परत येताना बघितली होती .. पॅलेस ऑन व्हीलस नि Golden Chariot Happy

माझी फेव डेक्कन क्विन.

लहानपणी मुंबईला जायचे असल्यास मी ह्या एका गोष्टीवर तयार. डेक्कन मध्ये खायला मस्त मिळायचे.
मुंबईच्या रेल्वे नाही आवडत. कायम गर्दी, धक्काबुक्की...

रेल्वेमुळे मुंबै-पुणेकरांनंतर कुणाच भलं झालं असेल तर सोलापुरकरांच. इंटरसिटीमुळे सोलापुर- पुणे प्रवास अत्यंत सुखकर बनलाय ४-४.३० तासांत सोलापुरातुन पुण्यात पोहोचता येत नाहीतर पुर्वी लालड्ब्याने आदळत आपटत प्रवास करायला जीवावर यायचं.

तिकडे माझ्या एका लेखावर सशलने "रेल्वेतले हिन्दी" चा उल्लेख केलेला आहे. अजूनही बरीच हिन्दी वाक्ये लक्षात आहेत Happy

विद्युत इंजन/डीजल इंजन शेड (कोळशाच्या इंजिनाच्या शेडला काय म्हणत लक्षात नाही)
कृपया लूज शंटिंग ना करे
समुद्र सतहसे उंची
शयनयान ३ टियर/बैठने के लिये
मध्य रेल्वे खान पान सेवा
सारे समय केवल महिलाओंके लिये

रेल फॅन्स करिता ही साईट खूप मस्त आहे. तेथील पिक्चर गॅलरी जरूर पाहा.
http://www.irfca.org/

तसेच यूट्यूब वरही रेल्वेगाड्यांचे खूप क्लिप्स आहेत. ही १९९५ ची जुन्या इंजिनाची डेक्कन क्वीन. टोटली नॉस्टॅल्जिक वाटेल Happy
http://www.youtube.com/watch?v=-e4PRpcdRwk

नॅशनल जिओग्राफिक ची भारतीय रेल्वेवर एक खूप छान व मोठी फिल्म आहे. बहुधा नेटवर असेल.

कोकण रेल्वेचा माझा पहिला अनुभव
९५ सालचा . प्रथम ती दीवा ते वीर पर्यँत आणि लगेच चिपळूण ला जाऊ लागली .
आमच्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन ९५ मध्ये
कोकण रेल्वेने रायगडला गेलो होतो .महाड स्टेशन
नसल्याने त्याऐवजी वीर ला
उतरलो .येथे (आणि माणगावला )गोवा रस्ता
स्टेशनबाहेरच आहे .
एका जीपवाल्याने रायगडफाट्याला (१०किमी)
सोडले .तिथून बसने(३६) आणि नंतर रोपवेने रायगड गाठला .
त्यावेळी गाडीला साधे बसण्याचे डबे टॉइलट नसलेले होते .
दीव्याहून सवा सहाला
गाडी सुटली की दहा वाजता वीर यायचे .इथे
टॉइलेटसाठी गाडी अर्धा तास थांबवत .

रोह्यापर्यँत मध्य रेल्वेची
हद्द संपली की आपल्याला
माणगाव पासून खास
कोकणरेल्वे छाप स्वच्छ
राखलेली स्टेशने दिसू लागतात .

कोकण रेल्वेने प्रवास करतांना
आपल्याला माडा पोफळींच्या बनांतून कोकण
पाहायला मिळेल हा समज खोटा ठरतो
कारण गाडी चांगलीच चाळीस किमी किनाऱ्यापासून दुरून जाते .
हे दृष्य कारवारपुढे पाहायला मिळते आणि
आपण म्हटतो आलो
परशुरामाच्या भूमित .

या रेल्वेने मात्र डेक्कन क्वीनचा पहिला नंबर काढून घेतला .या मार्गावरच्या पैसेंजर गाड्या
देखील एकशेवीस किमीच्या
वेगाने जातात .

उदय - थॅन्क्स.

लोकहो बद्दल एक माहिती/खुलासा: डेक्कन क्वीन भारतातील सर्वात वेगवान गाडी बहुधा कधीच नव्हती. आधी बहुधा पंजाब मेल, नंतर राजधानी एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या तेव्हा त्यातील बर्‍याचश्या व नंतर शताब्दी या जास्त वेगवान असतील. डेक्कन ची लोकप्रियता मुळात इंग्रजांनी तिचे महत्त्व वाढवल्याने निर्माण झाली व नंतर पुण्यात राहून मुंबईत नोकरीला जाणारे लोक त्यातून जात असल्याने तिचे महत्त्व तसेच राहिले. अजूनही पुणे-मुंबई रूट वर तिलाच सर्वात प्राधान्य असते. ती गाडी लेट करण्यापेक्षा बर्‍याच वेळा तिच्या पुढे असलेल्या गाड्या स्टेशनमधे थांबवून ही पुढे काढतात. अर्थात आता त्याचे कारण पुण्याचे नोकरदार लोक त्यात असल्याने असेल, पण रेल्वेतील लोकांकडून डेक्कन क्वीनला महत्त्व देण्याबद्दल खूप ऐकले आहे. कदाचित इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली प्रथा असेल.

एक ऐतिहासिक गाडी म्हणून तिचे महत्त्व राहील असे काही गेल्या १०-२० वर्षात रेल्वे मंत्रालयाने केलेले नाही. तसे करायला हवे. डेक्कन क्वीन प्रवासी संघच बरेच कार्यक्रम करत असतो. दरवर्षी बहुधा १ जूनला या गाडीचा वाढदिवस साजरा होतो. पूर्वी ती इतर गाड्यांपेक्षा वेगळी सहज ओळखू येत असे. आता तसे होत नाही.

डेक्कन चा एक मजेदार अनुभव 'वीक डे' मधे व्हीटीपर्यंत जाणार्‍या अनेकांनी घेतला असेल. दादर सोडले की मागच्या डब्यापासून इंजिनाच्या बाजूला असंख्य लोक आतल्या आत चालत जातात. आता जवळजवळ सर्व ट्रेन्स 'व्हेस्टिब्यूल' (डबे आतून जोडलेले) आहेत, पण पूर्वी फक्त डेक्कनच होती. कदाचित त्याचे कारण हेच असावे की काय कोणास ठाउक. साडेदहाच्या सुमारास व्हीटीला पोहोचल्या पोहोचल्या पुढे ऑफिसात जायचे असल्याने बरेच लोक आपल्या डब्यापासून इंजिनाच्या जास्तीत जास्त जवळ जातात. व्हीटी हे "टर्मिनस" असल्याने तेथील प्लॅटफॉर्म एका बाजूला संपतो. त्यामुळे बाहेर पडायला इंजिनाच्या बाजूला जावे लागते. बरेचसे रोज जाणारे लोक असल्याने सामानही नसते.

हे कदाचित सिंहगड मधेही होत असेल.

अरे वा, मस्त विषय. जिव्हाळ्याचा अगदी. सध्या 'अराउंड इंडिया इन एटी ट्रेन्स' हेच पुस्तक वाचते आहे त्यामुळे जास्त मजा आली. 'चाय चाय' हे पुस्तकही मस्त आहे सध्याचे या विषयावरचे. मला फार आवडतात या विषयाशी संबंधीत पुस्तके वाचायला.

लांब पल्ल्याचे दीर्घ रेल्वे प्रवास मला आजही करायला आवडतात. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची, अपरिचित लहानशी स्टेशन्स, त्यांच्या आसपासचा परिसर न्याहाळणे फार आवडते.

बाकी सिनेमांमधून दिसणारी 'रेल्वे' हाही आवडीचा विषय. त्यावर मी एक 'रेल अफेअर' लिहिले होते. (लिंक शोधायचा अर्थातच कंटाळा आहे.) रेल्वे संस्कृती भारतीयांच्या बाबतीत खास जोपासली गेलेली अशी अशी, त्यांच्या रक्तात भिनलेली. प्रत्येकाच्या वैयक्तिक आठवणीत रेल्वे असतेच असते. अपवाद एकही नसावा.

हायला, मस्त धागा काढलायस, बी! त्याबद्दल धन्यवाद.

लहानपणी बाहेरगावचा प्रवास म्हटलं की आम्ही रेल्वेनेच!

मी साधारण ११-१२ वर्षांची असताना एका ग्रुपबरोबर संपूर्ण राजस्थान रेल्वेने पाहिले होते. आमची ती बोगी फिक्स होती. ती बोगी विविध स्टेशन्सवर बाजूला काढून ठेवायचे. मग आम्ही तिथे उतरून त्या शहरातली प्रेक्षणीय स्थळे बघून येत असू. बरोबर आचारी होते ते स्वैपाक करून ठेवत. एक-दोन दिवस राहून मग आम्ही दुसर्‍या ठिकाणी जायला निघत असू. मग ती बोगी योग्य अशा ट्रेनला अडकवून आमची यात्रा नव्या ठिकाणी जाऊन पडत असे. आता विचार केला तर असला अचाट प्रकार कसा काय ऑरगानाईज केला असेल देव जाणे असंच वाटतं.

एकदा नवर्‍याच्या माहेरी जाताना मी रेल्वेने जाण्याचा बूट काढला. खरंतर राजधानीनं जायचं होतं. पण हव्या त्या तारखेची तिकीटं मिळत नव्हती म्हणून ऑगस्ट क्रांतीने ( बहुतेक. नक्की आठवत नाही आता) गेलो होतो. मस्त कुपेचं रिझर्वेशन करून. आणि त्यातला चौथा पॅसेंजर आलाच नाही त्यामुळे तो कुपे आमचाच होता. लेकीनं जाम एंजॉय केला तो प्रवास.

काही वर्षांपूर्वी आम्ही बहिणी बहिणी आणि मुलं कोकण रेल्वेने दापोलीला गेलो होतो. मुलांनी गाडीत जाम धमाल केली. चादरीचे झोपाळे करून देखिल लटकले. बहिणीचा नवरा आम्हाला सोडायला दादर स्टेशनला आला होता. गाडी सुरू झाली ना? व्यवस्थित बसलात ना? असं विचारायला त्यानं फोन केला त्यावेळी गाडी दादरवरून फक्त कुर्ल्यापर्यंत आली होती. पण गाडी सुरू झाल्याबरोब्बर पिकनिक सुरू या हिशेबानं मुलांना लगेच भूक लागल्याने त्यांनी बरोबर आणलेली उकडलेली अंडी यशस्वीपणे खाऊन घेतली होती. हे बहिणीच्या नवर्‍याला सांगितल्यावर तो खाली पडायचाच बाकी होता. Proud

मागच्या दिवाळीत दार्जिलिंगला भेट दिली त्यावेळी अनेक सिनेमांतील गाण्यांमधून दिसणारा बतासिया लूप बघितला.

batasia
(आंतरजालावरून साभार)

अ‍ॅक्च्युअली सिनेमात त्याच्या शॉट घेताना बराच वरून - वरच्या डोंगरावरून - घेतात. आम्ही त्या लूपवर उभे होतो. तिथे आता एक युद्ध स्मारक आहे आणि बाग आहे. आम्ही उभे असतानाच ती दार्जिलिंगची ती सुप्रसिध्द टॉय ट्रेन लूपमध्ये आली. भारीच रोमांचित झाले मी!

घरी आल्यावर ढुंढाळले असता त्या दार्जिलिंग ट्रेन (आणि दार्जिलिंगमध्ये शुटींग झालेले सिनेमे) यांवर हे दोन सुरेख लेख मिळाले :

http://www.railnews.co.in/on-a-train-with-loud-horns/
http://www.meabhi.com/blog/darjeeling-bollywood/

Pages