भारतीय रेल्वे जिव्हाळ्याचा विषय

Submitted by हर्ट on 19 February, 2014 - 20:44

नमस्कार, तुम्ही आम्ही आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेमधून प्रवास केलेले असतील. इथे तुम्ही तुमच्या आवडती रेल्वे , अधेमधे येणारी गावे, तालुके, जिल्हे, निसर्ग, झाडीझुडी, खा-प्यायचे पदार्थ, भेटलेले व्यक्ति आणि वल्ली, अलिकडे झालेले बदल, रेल्वेची नावे - नदीवरुन, इतिहासावरुन - ह्या सर्वांची रसभरीत चर्चा इथे करा.

पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा

इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'

टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी

दिल्लीची 'राजधानी' मी
मी नेताजींची 'आझाद हींद'
कोल्हापुरची 'महालक्ष्मी' मी
मी गांधीजींची 'अहिंसा'

कोकणची 'कोकणकन्या' मी
सोलापुरी 'सिद्धेश्वर'
उज्जैनची 'अवंतिका' मी
एंम्.पी .यु .पी. 'फ्राँटीयर'

बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'कर हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा आम्ही हरिद्वारला जात होतो तेव्हा माझ्या ९०+ वर्षांच्या आजेसासूबाई ट्रेनमधे हरवल्या होत्या. पाय मोकळे करुन येते म्हणत त्या एकमेकांना जोडलेल्या बोग्यांमधून जात राहील्या. तासभर होऊनही परतल्याच नाहीत. आमचं धाबं दणाणलं. गेल्या की काय मधल्याच स्टेशनात उतरुन असंही वाटलं. मग शोधाशोध. सगळे खानपान कर्मचारीही शोधताहेत. अख्खी ट्रेन 'आजी को देखा क्या?' 'आजी मिली क्या' असं आम्हालाच येऊन विचारत राहिली. सगळी टॉयलेट्स शोधली. हा गोंधळ उडाला. आणि आजी दमून एका बाकावर दोघा-तिघांच्या मधे अंगाचं मुटकूळं करुन गाढ झोपी गेलेल्या. अंगावर शाल ओढून.

कोकण रेल्वे प्रवासातलं 'दिवाण खवटी' या नितांत सुंदर स्टेशनावर पाय-उतार व्हायची माझी इच्छा आहे. अजून एक आवडतं स्टेशन म्हणजे सवाई माधोपूर. त्या स्टेशनाबाहेर पुरानकालीन हवेलीसदृश बांधकाम असलेलं एक जुनं सिनेमागृह आहे. भोवती पिंपळाची झाडं. अद्भूत दृश्य दिसतं.

दुसरा अनुभव म्हणजे, कोकण रेल्वे
तेही पावसाळ्याच्या दिवसात. मी प्रवास केला तेव्हा कोकन रेल्वे नुकतीच का काय ती सुरु झालेली.

त्यावेळी आम्ही मुंबईहून पकडलेली(सर्वात प्रथम प्रवास केला मी कोकण रेल्वेने). मस्यगंधा. मस्त वाटलेले.

मग इतर कोकण रेल्वेने फिरलो मुद्दम्हून पार मॅगलोर पर्यम्त. मजा येते.

डेक्कन क्वीनचे "महत्व" हे त्याच्या प्रवाशांनीच वाढवले होते आणि आहे .

ती गाडी विशेष
वगैरे अजिबात नाही .
फक्त इतकेच की या गाडीची साखळी ओढली तरी ते
दुसरे दिवशीच्या पेपरांत पहिल्या पानावर छापून
आणण्याची ताकद असणारे यातून प्रवास करायचे अथवा
अजूनही करतात !

जनसामान्यांच्या लेखी लालू प्रसाद लालटेनवाले यांनी सुरू
केलेल्या गरीबरथ गाड्या खऱ्या
विशेष आणि पैसा वसूल गाड्या
आहेत .
राजधानी मुंबई दिल्ली सोळा
तासांत नेते पण गरीबरथ
सतरा तासांत निम्या तिकीटांत
एसीने सकाळी दहाला कामाच्या वेळांत नेते .
एक सामान्य डोकेबाज
माणूस मंत्री झाल्यावर काय
करू शकतो याचे उदाहरण .
त्यानंतर दीदींनी श्रीमंतांसाठी
दुरांतो आणली पण ती खरी तोट्यात चालते .
आता श्री मललीकार्जुन यांनी
अतिश्रीमंत
विमान प्रवाश्यांना रेल्वेकडे
खेचण्यासाठी प्रिमियम
तिकीटांच्या खास गाड्या
डिसेंबरात आणल्या .

डेक्कन क्वीनचे "महत्व" हे त्याच्या प्रवाशांनीच वाढवले होते आणि आहे .>>> +१ एकदम करेक्ट. सकाळी अकरा वाजता कामाला जाउन साडेचारलाच परत जाणारी मंडळी कुठे काम करतात देव जाणे (बहुदा सचिवालयातच. कुठलीही खाजगी कंपनी असल्या लोकांना घेइल असे वाटत नाही). धंद्यासाठी जाणे समजु शकतो. आणि आव असा आणतात की ट्रेन ह्यांच्या बापाचीच आहे.

दख्खनची राणी सुरू झाली तेव्हा तिचं खूपच अप्रुप होतं. पुण्याला राहून रोज मुंबईत कामाला येणार्‍या तमाम नोकरदारांकरता ती किती मोठी सोय होती - ते ही त्याकाळी. हे लक्षात घेतलं म्हणजे तिचं महत्त्व कळेल.

वसंत बापटांची किती सुरेख कविता आहे 'दख्खन राणीच्या बसुन पोटात' म्हणून. आम्ही लहान असताना आई ही कविता नेहमी म्हणायची. आमचीही पाठ झाली होती. अजून एक गाणं आहे 'दख्खनच्या गं राणी मला मुंबईला जायचंय' असं.

मागे काही वर्षांपूर्वी एका (बहुधा) दिवाळी अंकात रोज पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या जोडप्याने ते वेळेचं काटेकोर संयोजन कसं करतात याबद्दल फार छान लेख लिहिला होता असं अंधूक आठवतंय. इतर कोणाची स्मरणशक्ती चांगली असेल तर पुष्टी द्या आणि लिंकही द्या.

साधारण १९७७ की कायशा साली मुंबई-पुणे डबलडेकर ट्रेन सुरू झाली होती. ती बघण्यासाठी आम्ही मुद्दाम स्टेशनवर जात असू. Happy

मुंबई-पुणे डबलडेकर ट्रेन <<
ती सिंहगड एक्स्प्रेस.

प्रगती, सह्याद्री वगैरे सुरू व्हायच्या आधी डे क्वी च होती फक्त आणि म्हणूनच तिचे महत्व.
बादवे डे क्वी ही सीएसटीवरून ५:१० ला सुटते संध्याकाळी. २० मिनिटांनी दादरला पोचते.
शेअर मार्केटवाले, बिझनेसवाले वगैरेही बरेच लोक डे क्वी चे पासधारक आहेत.
डे क्वी मधेच फक्त पासहोल्डर्सचा लेडिज डबाही वेगळा आहे आणि फर्स्ट क्लासमधेही पासहोल्डर सेक्शन आहे.
अनेक जणी अल्टरनेट डे घरी जाणार्‍याही असतात या पासहोल्डर्सपैकी.
उदा. सायन हॉस्पिटलात काम करणारी एक नर्स जी पोचते त्या दिवशी दुपारपासून रात्रीपर्यंतची शिफ्ट करते. रात्री इस्पितळातच पाठ टेकते ३-४ तास आणि दुसर्‍या दिवशी पहाटे लवकर पासून दुपारपर्यंतची शिफ्ट करून परतीची डेक्वी पकडते.
बीकेसीमधल्या एका बँकेच्या ब्रांचमधे मोठ्या पदावर बदली झालेल्या एक बाई. त्या पोचतात त्या दिवशी उशीरापर्यंत काम करतात. तिथल्याच गेस्ट हाऊसमधे थोडे तास विश्रांती घेतात आणि दुसर्‍या दिवशी लवकर काम सुरू करून लवकर संपवून डे क्वी पकडतात. कधी कामाचे प्रेशर वाढलेले असेल तर मग अजून एखादा दिवस थांबतात.

डे क्वी चे महत्व कळायचे तर एखादा महिना तरी पु-मु पासहोल्डर बनून प्रवास करावा लागेल. डेक्वी आणि इतर सर्व गाड्यांमधूनही.

लहानपणीच्या जास्त आठवणी नाहीयेत रेल्वेच्या. आमच्या अंबाजोगाईला रेल्वे नसल्याने त्यावेळी जास्तित जास्त प्रवास बसनेच व्हायचा. नंतर औरंगाबादला आल्यावर मात्र औरंगाबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेस नेहेमीची झाली. त्यावेळी तपोवन पण खूप आवडायची. दुपारी औरंगाबादहून निघालं की रात्री मुंबईला पोचणार. पुर्ण रस्ताभर चरत रहायचं काही ना काही. त्यावेळी तपोवनची चेअरकार मस्त होती.

अहमदाबादला असताना तिथून घरी येण्यासाठी जळगावपर्यंत रेल्वेनी जायचे. एकदा सकाळची ट्रेन असताना मी त्यादिवशी संध्याकाळी स्टेशनवर पोचले होते. बरोबर फक्त २००-२५० रुपये. मग ऐनवेळी दुसर्‍या ट्रेनचं साधं तिकिट काढून जनरल डब्ब्यात चढले. दिवाळीचे दिवस असल्याने जनरल डब्बा पण ओसांडून वहात होता. सबमिशनच्या गडबडीत दिवसभर उपाशीच होते. ट्रेनमध्ये काहीतरी खाता येईल असा विचार केलेला. सामान सोडून प्लॅटफॉर्मवर खाली उतरायची पण हिम्मत झाली नाही. तसंही खिशात फक्त १०० रुपये उरले होते. जळगाव- औरंगाबाद गाडीचं भाडं किती असेल याचाही अंदाज नव्हता. अगदी डोळ्यातलं पाणी आवरून (हो रडू फुटणार होतं त्यावेळी... दिवसभराची भुक, पैसे पुरतिल की नाही याची काळजी, आदल्या दोन रात्रीचं जागरणं आणि अशी कशी चुक केली मी, आई-बाबांना ट्रेनचं नाव माहित होतं त्यामूळे ते मी रात्री घरी पोचले नाही तर काळजीत पडतिल. मोबाइल नव्हता माझ्याकडे. सकाळी जळगावला उतरेपर्यंत घरी फोन करुन मी आत्ता गाडीत बसलेय हे सांगता येणार नव्हतं..)
पण पुरले पैसे घरी जाईपर्यंत.. ..त्यानंतर मात्र तिकिटावरची तारिख आणि वेळ १० वेळा तपासून पहाते मी.

आमच्या लग्नाच्या वेळी सगळं वर्‍हाड पंजाबहून सचखंडनी औरंगाबादला आलं होतं. जाताना पण तसंच. आमची पन्नासएक तिकिटं होती सेकंड एसीमध्ये त्यावेळी. गोंधळ घातला होता नुसता त्या ३०-३२ तासात. गाणी, गप्पा, खाणं-पिणं.. सोबतची २-३ पुतणेकंपनी फळांच्या /मिठाईच्या टोपल्या डोक्यावर घेत बोगीत सगळीकडे वाटप करत होती. नंतर तर त्यांनी बहूतेक शेजारच्या बोगीत जावून फळं पण विकली. Biggrin
अजूनही सगळेजण त्या लग्नाची आठवण काढतात. Happy

सचखंड एक्सप्रेसचे अगदी दरवर्षी नवनविन अनुभव येत असतात. शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट कन्फर्म की नाही हा सस्पेंस तर आता पुपुला पण माहित झालाय. Lol
तिकिट कन्फरम न झाल्याने एकाच सीटवर प्रवास करणे, रात्री एसी डब्ब्यात पण खाली चादर टाकून झोपणे (हे तर आम्ही फर्स्ट क्लासच्या कुपेमध्ये पण केलंय. Happy ) एसी डब्ब्यात जिथे पांघरूणं ठेवली जातात त्या कपाटात रात्री झोपणे असे सगळे अनुभव घेतले जातात.
मुंबई-दिल्ली राजधानी, औगस्ट क्रांती, अमृतसर शताब्दी, झेलम, गोवा, कर्नाटका या गाड्या आवडीच्या आहेत माझ्या. हो आणि आमची सचखंड पण. त्या ट्रेनमध्ये नेहेमी तिकिटाचा त्रास होतो पण तरी ती आवडती ट्रेन आहे. (माहेरी नेते ना म्हणून. :डोमा:) सचखंडमधला सगळा पँट्री आणि एसीचा स्टाफ छान ओळखतो आता. पँट्रीतला चहावाला बघितल्यावर आठवणीने कॉफी बाजूला ठेवतो माझ्यासाठी. Happy

मामी, ती डबलडेकर ट्रेन माझी लय आवडती होती. मला लहानपणी तीच हवी असायची मामाकडे येताना. पण डे क्वी मिळाली नाही तरच तिची तिकीटे काढली जायची. सिंहगड जिथे तिथे थांबते डे क्वी सुपरफास्ट आहे हे तेव्हा कळायचं नाही. Happy

वा! मस्त लिहिले आहे सगळ्यांनी. वाचता वाचताच नॉस्टॅलजिक झाले Happy मी एक वर्ष मुंबई-पुणे ट्रेनने प्रवास केलाय दर वीकान्ताला. खूप आठवणी आहेत. लिहिन नक्की.

रेल्वेमुळे मुंबै-पुणेकरांनंतर कुणाच भलं झालं असेल तर सोलापुरकरांच. इंटरसिटीमुळे सोलापुर- पुणे प्रवास अत्यंत सुखकर बनलाय ४-४.३० तासांत सोलापुरातुन पुण्यात पोहोचता येत नाहीतर पुर्वी लालड्ब्याने आदळत आपटत प्रवास करायला जीवावर यायचं.<<< भले झाले पण आता इंद्रायणी गाडीची अवस्था पहावत नाही. त्यापेक्षा इंटरसिटी ने मु-पु. प्रवास जास्तच चांगला वाटतो.

मुंबई ला जायचे असल्यास शिवनेरी पेक्षा सिंहगड किंवा डेक्कन ला पहिली पसंती.

हे कदाचित सिंहगड मधेही होत असेल.<<< सिंहगड मधे एसी डब्यामधून पुढे जाता येत नाही तो मधेच बंद केलेला अढळला

लोकलने प्रवास करण्यापेक्षा ह्या लांब पल्ल्याच्या गाड्यांअधुन जायला जास्त मजा येते. ऑफिसला हाफ डे जायचे असल्यास पुणे - भुसावळ एक्स्प्रेस मला २० मी मधे चिंचवड ला सोडते तर संध्याकाळी चिंचवड वरून लेट झालेली सिंहगड पकडण्याचा माझा प्रयत्न असतो.

http://enquiry.indianrail.gov.in/ntes/ ऑफिस मधून निघण्यापुर्वी ही वेबसाईट चेक करतो. इथे प्रत्तेक गाडीचा लाईव्ह डाटा मिळतो त्यामुळे ट्रेन ची वेळ गाठणे शक्य होते.

हा फार छान धागा आहे एकदम nostalgic करणारा! खूप प्रवास केलाय रेल्वेनी आणि रेल्वे आवडते देखिल..बऱ्याच आठवणी झरझर डोळ्यासमोर येऊन गेल्या पण लिहून काढायला आत्ता वेळ नाही Sad
सर्वांचे अनुभव वाचायला मजा येते आहे!
फक्त दरवेळी प्रवास करताना रेल्वेमधल्या स्वच्छतागृहांमध्ये काय काय सुधारणा करता येतील जेणेकरून सध्या असणाऱ्या समस्या दूर होतील हा विचार parallel track वर सुरु असतो. ह्यावर काही कल्पना, उपाय सुचतात का कोणाला?

रेल्वेने प्रवास तर फार केला. पण खास ईंजिनमधे बसुन करण्यात आगळीच मजा, तसा अनुभव माझ्या वाट्याला आला. बँकेची परिक्षा होती जळगांव सेंटर होते. गाडी खचाखच भरली होती. धांडे नावाचा ड्रायव्हर गाडीतुन डोकावर होता. म्हटले चला याला विचारु बसु का म्हणुन तो हो म्हणाला आम्ही दोघेही मित्र बसलो. आणि असाकाही घाबरायला लागायचे कारण की गाडी सुळ बदलताना अगदी समोरुन कुठुन कोठे जाईल हेच समजत नाही त्यात फास्ट, असे वाटायचे की गाडी रुळावरुन घसरतेच.. नंतर गाडी ड्रायव्हणे सगळे सांगितले, स्पिड कसा वाढवायचा, ब्रेक, हॉर्न. . मज्जाच मजा वाटली.

मस्त विषय! रेल्वेचा प्रवास लहानपणापासूनच खूप आवडतो. आणि रेल्वेने खूप प्रवासही केलाय.

लहानपणी नियमित घडणारा प्रवास होता तो जळगावहून पुण्याला आत्याकडे यायचे महाराष्ट्र एक्सप्रेसने. जर सगळ्या बायका आणि लहान मुले असतील तर तो एक लेडीज स्पेशल सेक्शन डब्यात असायचा तिथली तिकिटे बुक करत असू. मिल्टनची कूल केज नावाची एक भलीमोठी वॉटरबॅग, बटाटाभाजी-दशमी-लसूण चटणीचा डबा, चाचा चौधरी व साबू यांची कॉमिक्स या प्रवासासाठी महत्त्वाच्या गोष्टी असत. मी फार लहानपणीच सगळ्यांत वरच्या तिसर्‍या बर्थवर चढणे आणि तिथे न पडता झोपणे हे कौशल्य आत्मसात केलं होतं. त्यामुळे माझ्यासाठी तो ठरलेला बर्थ! तिथे केव्हाही लोळत पुस्तक वाचायला जाता यायचं हा त्याचा मोठा फायदा होता. पहाटे कधीतरी तीनसाडेतीनला दौंड स्टेशन येई आणि मला तिथे हटकून जाग येई. तिथे त्यावेळीही खिडकी उघडून बाहेर काय चाललंय ते पाहण्याचा मोह अनावर झाल्याने मी बरेचदा ओरडा खाल्ला आहे. विशेषत: हिवाळ्यात!

बंगळुरात असताना उद्यान लै फेव्हरिट गाडी होती. वीसेक तासांचा प्रवास असला तरी मला आवडायचा. थर्ड एसी आणि कुठलाही साईड लोअर बर्थ, हे ठरलेलं रिझर्वेशन. एकदा ऑफिसातून निघताना उशीर होत गेला आणि ट्रेन सुटायला जेमतेम दहाएक मिन्टं असताना मी स्टेशनावर पोचले. हमालाला सामान दिलं. उद्यान कायम प्लॅटफॉर्म नंबर एकला असायची म्हणून तिकडे धावत सुटले. गाडीपाशी पोचल्यावर थर्ड एसीच्या शोधात! सुदैवाने तो चटकन सापडला. इतर डब्यांत चढण्याचाही पर्याय होता म्हणा! आतमध्ये मी आणि सामान पोचल्यावर अक्षरशः काही सेकंदात गाडी हलली. मी तिथे बसलेल्या एका माणसाला 'काहो ही उद्यानच आहे ना?' हे तेवढ्यात विचारून घेतलं. Proud या गाडीला पॅन्ट्री कार नव्हती. जेवणाच्या ऑर्डरनुसार डबे यायचे. जेवण लै बोरिंग असायचे पण प्रवासाच्या आनंदात त्या बोरिंग जेवणाचं एवढं काही वाटत नसे. सकाळ झाली की प्रवासाची खरी मजा! साईड लोअरच्या दोन्ही खिडक्यांवर आपलंच राज्य! तिथून बाहेर बघत बसा, पुस्तकं वाचा, सहप्रवाशांशी गप्पा मारा, मध्येच बाहेर जाऊन दरवाजापासून सुरक्षित अंतर ठेवून उभं राहून बाहेर बघा. सकाळी आलेल्या स्टेशनांवर इडली-वडे विकत घेऊन खा... (नाश्त्याची काही ऑर्डर दिली तर बहुधा ८ला वाडी स्टेशन यायचं तेव्हा पॅकबंद नाश्ता गाडीत चढवला जायचा.) फोनला रेंज नसायचीच बरेचदा आणि गाडी महाराष्ट्रात शिरली की रोमिंग न घेतल्यामुळे फोन साफ बंद! निवांतपणा!!! बाकी पुण्याहून परतताना ऑफिस डोळ्यांसमोर दिसू लागलेलं असायचं आणि उद्यान रखडतरखडत साडेनऊला बंगलोर स्टेशन गाठायची तेव्हा जाम कंटाळा यायचा आणि प्रवास कधी संपतो असं व्हायचं.

बाकी अजून काही गाड्यांबद्दल नंतर...

जोरात जाणार्‍या थ्रू ट्रेनचे नाव वाचण्याची एक ट्रिक आहे. ट्रेनच्या नावाची पट्टी जिथे असते तिथे डोळे स्थिर ठेऊन ती पट्टी आली की डोके गर्रकन गाडीच्या वेगाने हलवायचे. ९०% वेळा वाचता येतं. Proud

माझा रेल्वेचा दुरचा प्रवास गेल्या वर्षा पर्यंत फक्त मुंबई ते सुरत आणि मुंबै ते पुणे दोन्ही शताब्दीने येव्हढाच . त्यात येकदा पुण्याला जातना शताब्दीने जाताना कुणा बिल्डरने अगदी प्रत्यकाच्या सिटवर परनलाईज्ड (पॅसेंजर च्या नावानी) त्याच्या प्रकल्पाला भेट द्यायचे इनवाईट ठेवले होते.
त्यानंतर गेल्यावर्षी सिक्कीम, दार्जीलिंगला जाताना मुद्दाम ट्रेन ने गेलो, २nd AC चा प्रवास तसा बरा पण खुप वेळ लागला , त्यातल्या त्यात दुरान्तो कमी वेळ घेते म्हणे. एक गोष्ट लक्षात आली ती की रेल्वेच्या दुरच्या प्रवासात बोलणं व्यवस्थीत होत. इतक्या वर्षात खुप कमी वेळा बायकोशी येव्हढे निवांत बोललो असेन.
त्यानंतर अलिकडे ( सप्टेंबर /ऑक्टोबर ) गोव्याला कोकण रेल्वे ने गेलो. पाऊस अधे मधे पडुन गेलेला. रात्रीच्या प्रवासात चंद्रप्रकाशात ओली झाडं निळाशार सुंदर दिसतात.

श्र, साइड लोअर माझीपण आवडती सीट आहे. नवर्‍याला उंचीला पुरत नाही ती सीट तरी बहूतेक वेळा आमचा प्रवास साइड अप्पर आणि साइड लोअर सीटांवरच होत असतो.
आता आयामचं पण तिकिट लागायला लागल्यापासून आतल्या सीट घेतल्या जातात.

मला विमानाच्या प्रवासापेक्षा २४ तासांचा रेल्वेचा जास्त प्रवास आवडतो. दिल्लीहून निघताना पुर्वी आम्ही कमसमची चिकन बिर्याणि घ्यायचो सोबत. आणि सिंधीकडच्या लस्सीचे ४-५ कुल्हड (पव लीटरपेक्षा जास्त मोठ्या साइझचा मटका असतो सिंधीकडचा).
रात्रीचं जेवण कधी ट्रेनमधलं /कधी कमसमचं. सचखंड एक्सप्रेसमध्ये खरंतर काहीच विकत घ्यायची गरज पडत नाही. दिल्ली, खांडवा, मनमाड, नांदेड आणि औरंगाबाद या सगळ्या स्टेशनात लंगर मिळतो. बाबाजीका प्रशादा ले लो प्रशादा ले लो म्हणत लंगरवाले लोक सगळ्या डब्ब्यांमध्ये चढतात. रोटी + लंगरवाली दाल. जेवण बरोबर घेतलेलं असलं तरी थोडीशी लंगरवाली दाल घेतलीच जाते.

किमान एक पुस्तक तरी वाचून होतं ट्रेनमध्ये. भरपुर गप्पा मारल्या जातात. मजा येते. विमानात ट्रेनची मजा नाही. २-३ तासात प्रवास संपूनही जातो.

साइड सीटस कधीही नशिबात न येवो अशी माझी नेहमी देवाकडे प्रार्थना असते.
एकटी किंवा दोघच प्रवास करत असतो तेव्हा आपण आतल्या बाजूला असू तर अनेकदा फ्यामिलीवाले, ग्रुपवाले अ‍ॅडजस्ट करायची विनंती करतात आणि आपण साइडला जायला नकार दिला तर भडकतात.
दोन उंच माणसे आहेत ज्यांचे पाय त्या सायडीच्या बर्थांवर मावू शकणार नाहीत हे बघायला नकार असतो त्यांचा.

साइड सीटस कधीही नशिबात न येवो अशी माझी नेहमी देवाकडे प्रार्थना असते. >> अन सिंगल मेल असं बुकिच्या वेळी असलं तर हमखास ती सीट मला मिळते. वईताग. ना झोपता येत व्यवस्थित ना बसता येत... Sad

बाकी ट्रेन चा प्रवास आवडतोच.
त्या हिमसागर नी एकदा जायला पाहिजे... कन्याकुमारी ते डायरेक्ट जम्मूतावी. सगळी खुमखुमी भागवता येईल ट्रेन प्रवासाची. मस्त ४ दिवस ट्रेनमध्येच! किती बदल अनुभवायला मिळेल दर किमी वर!!!

हो साइडसीट खूप छोटं पडतं , उंचीला अजिबात पुरत नाही. पण पुर्वी एकटीने प्रवास करताना किंवा आयाम आणि मी असे दोघांनीच प्रवास करताना मला बर्‍याचदा छोटी सिट परवडली पण आतल्या बाजूच्या लोकांचा जास्तीचा भोचकपणा नको असं वाटायचं. स्पेशली सचखंडमध्ये. सरदार लोक खूप भोचकपणा करतात. बरेचसे पहिल्यांदाच दर्शनाला नांदेडला जाणारे लोक असतात. १०-१५ जणांचा ग्रूप, त्यात २-३ रडकी लहान मुलं, २-३ म्हातार्‍या बायका.. ढीगभर सामान, सतत खाणं आणि सांडणं -लवंडणं... आता सवय झाली आणि आता बर्‍याचदा आमची पण तिन सीट्स असतात त्यामूळे मायनॉरिटी नसते म्हणून चालतात मधली सीट्स. पण आमच्या पोराला मात्र साइड सीट आवडते.

प्रवासाचा सर्वात वाईट सत्यानाश म्हणजे तीन-चार वर्षांची किरकिरी किंवा हायपर अ‍ॅक्टीव पोरं आणि त्यांच्या सतत त्यांना काही ना काही भरवायच्या प्रयत्नातल्या सुपर हायपर आया बाजूच्या सीटांवर असणे Proud

हा विषय जरी भारतीय रेल्वेबद्दल असला तरी मला माझा इंडोनेशियाचा अनुभव इथे रेखाटावासा वाटतो. २०१० मधे मी बांडूगपासून योग्यकर्त्यापर्यंत रेल्वे घेतली. सकाळचे ६ वाजले होते. गाडी हलली. पुढे जी वळली ती हिरव्याकंच रानातून. चहुकडे रस्त्याच्या दोन्हीबाजूला हर तर्‍हेची दाट झाडी. दुर दुर पसलले गवतांचे कुरण, मधेच माडाच्या रांगा, कौलारु घरे आणि सुर्यनारायण उगवायला हजर झालेले. आकाशात पाखरांचे थवेच्या थवे चिव चिव करत बाहेर पडलेले. गाडीने हलकाच वेग धरला. आपण कुठला तरी स्वर्गीय अनुभव घेतो आहे असे मला वाटले.

आता काही वेळातच हा हिरवा नजारा संपेल असे वाटत होते पण तब्बल सहा तास हाच देखावा नजरेसमोर होता. अधेमधे लागणारी खेडी इतकी संपन्न होती की तिथला हरेक शेतकरी हिरव्या हिरव्या गवताच्या पाताप्रमाणे आतून ओला हसता खेळता वाटत होता. लुंगी घालून बाहेर पडलेले शेतकरी, त्यांच्या हातात कोयते आणि विणलेले मोठे मोठे टोपले, कमरेत वाकून ही लोक भाताची लागवड करत आहेत. आणि भाताच्या खळ्यातले पाणी नितळ सुंदर दिसते आहे. ती छोटी छोटी भाताची रोपे आणि त्यांचा तो हिरवा पोपटी रंग मनात इतका भरतो की कितीही वेळा बघून डोळे निवत नाहीत.

रेल्वे मधे कुठेच कचरा नाही. उत्तम कॉफी मिळते. खा प्यायची रेलचेल आपल्या इतकी नाही पण डोक्यावर चुंबळ ठेवून टोपलीत काहीतरी विकायला आलेल्या बायका दिसल्यात. खूपच गरीब होत्या. मी शाकाहारी असल्यामुळे आणि त्यांना इंग्रजी येत असल्यामुळे मला त्यांच्या टोपलीतले जिन्नस चाखता येत नव्हते.

मी नंतर रेल्वेमधून टिपलेले छायाचित्र इथे डकवेन.

एक कटु अनुभव सांगतो. दरवेळी मुंबई अकोला करताना मी माझे तिकिट रिझर्व करत नसे. कारण तितका वेळही जवळ नसे. जाणे येणे अगदी अवचित ठरलेले असायचे. एकदा मी तिकिट रिझर्व केले आणि ते नेमके वेटिंग वर होते. रात्री एक वाजता उभे राहून राहून माझे हात पाय साकळले अकडले. मी कुठे पाठ टेकायला कोपरा मिळतो का म्हणून एका बोगीत शिरलो. हळून माझी बेड्शीट खाली अंथरली. मधे ऐसपैस जागा होती. पण तिथे वर निजलेली बाई एकदम ओरडली आणि तिने चैन खाली ओढली. मला कळले नाही काय झाले. पोलिस आले आणि ही बाई म्हणाली मी तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. मला हा अनुभव अगदी नवीन तर होताच पण काही स्त्रिया पुरुषांना किती अवघड प्रसंगात अडकवतात. मी गयावया घातली त्या पोलिसांना. त्यांनी मला जाऊ दिले. आजही तो प्रसंग मला आठवायला नकोसा होतो. माझ्या करीअरचे अगदी वाटोळे होऊ शकले असते त्या एका प्रसंगामधून. पण मी वाचलो. आपण स्त्रिदाक्षिण्य वगैरेचा खूप विचार करतो पण हा प्रसंग आठवला की अगदी आतून सल उठते.

करेक्ट शर्मिला. गेल्यावेळी एका पोरानी आयामच्या क्रॉक्समध्ये चहा सांडून ठेवला होता अन एकानी डाळिबाचे दाणे माझ्या कापडी बॅगेवर ओतले होते. त्या प्रवासात पुर्णवेळ एका हातात टिश्यु आणि वाइप्स ठेवावे लागले होते. कधी मी सीट साफ करत होते तर कधी फ्लोअर. Sad

आमचं पोरगं किरंकिरं नसलं तरी हायपर अ‍ॅक्टीव्ह आहे. पण जर एकटाच असेल तर कंट्रोलमध्ये असतो. पण नेमकं जर ट्रेनमध्ये अजून एखादं त्या कॅटागीरीतलं मुल सापडलं की मग पुस्तक-बिस्तक सगळं बाजूला ठेवावं लागतं.

योकु,

मी हिमसागर एक्स्प्रेसने एकदा कन्याकुमारी - नागपूर आणि एकदा कन्याकुमारी - दिल्ली असा प्रवास केला आहे. आता कन्याकुमारी - जम्मू आणि विवेक एक्सप्रेसने कन्याकुमारी - दिब्रुगढ असा प्रवास करायचा आहे.

धन्यवाद चिनूक्स! हिमसागर वरून आठवलं की पंजाबातून माळव्यात जाणारी लोकं दिल्लीला उतरून आगऱ्यापर्यंत बसने जातात आणि ताजदर्शन आटपून परत तीच गाडी पकडतात. दिल्लीस आगमन ते आगऱ्याहून प्रस्थान यांत तब्बल ५ तासांचं अंतर आहे!

http://indiarailinfo.com/train/himsagar-express-16318-jat-to-cape/630/81...

आ.न.,
-गा.पै.

ती एक गोंडवना एक्सप्रेस आहे, ती पण खूप फिरते ना? एकदा आम्ही तिचं तिकिट काढलं होतं पण नेमका ऐनवेळी बेत बदलला.

बी मस्त बाफ काढलास. नासिकहून मुम्बईला जाताना मजा यायची. इगतपुरीला मुगौडे, चहा/ कॉफी घेतली की समाधान व्हायचे. बाकी नासिकहुन जळगाव, इकडे पुणे ते कोल्हापूर प्रवासात मजा यायची. बटाटेवडे हे स्टेशनवरचेच खायचे. सकाळी जाग यायची ती चाय गरम, काफी गरम या ओरड्याने आणी लगबगीने.

बाकी तुझ्यावर बेतलेला प्रसन्ग वाचुन वाईट वाटले. खरच वाचलास तू.

रेल्वेमध्ये लोकल, मेट्रो, मोनोरेल हेही लिहायचे का?

पाय मोडल्यानंतर आता गर्दीत इम्यालन्स होतो. त्यामुळे नाइलाज म्हणून आता ह्यांडिक्याप डब्यातून फिरतो. त्याला मी विंचवाचा डब्बा असे नाव दिले आहे. मजा असते, सगळ्या व्याधी, व्यंगे पहायला मिळतात, जी पाच वर्षे मेडिकल कॉलेजातही नव्हती दिसली... मूकबधीर लोक हातवारे करत 'बोलत' असतात.

'चेन्नई एक्स्प्रेस पाहिलास का रे? हे बघ माझ्या मोबाइलात आहे... '' एकजण दुसर्याला दाखवत होता. .. मी पाहिलं, तर दोघेही ठार आंधळे होते... !

गेल्या महिन्यात ऊस आंदोलन झाले तेंव्हा सांगली मुंबई ट्रेनने आलो.. आंदोलन असल्याने इतर लोकही अपंग डब्यात शिरले . कुठेतरी एक मनुष्य आला आणि टी सी आहे असे सांगून दोन चार लोकांकडून पैसे मागू लागला.

पण कुणीतरी त्याला ओळखले, तो भामटा होता. पुढच्या स्टेशनवर पळून गेला.

ट्रेनचा प्रवास - अगदी जिव्हाळ्याचा विषय.

मुंबईतल्या नोकरीनिमित्ताने रोजच लोकलट्रेनचा प्रवास घडतो, रोज नवे अनुभव गाठीशी जमा होतात.
ऑडीटनिमित्ताने भारतभर फिरणे झाले. त्यातला बहुतांशी प्रवास ट्रेननेच केला. ऑडीट टूर प्लॅन करायची असली की आम्ही कामंधंदे सोडून 'ट्रेन्स अ‍ॅट ग्लान्स' नावाचं पुस्तक घेऊन बसायचो आणि त्यातच हरवून जायचो. अख्खा दिवस त्यात जायचा. मस्त मज्जेचे दिवस होते ते.. विविध ट्रेननी फिरण्याचा योग आला, पण सगळ्यात आवडलेली ट्रेन म्हणजे दिल्ली-चंडीगढ प्रवासातली सुवर्णशताब्दी ट्रेन. अगदी राजेशाही प्रवास!! आता ती ट्रेन आहे की नाही ठाऊक नाही.

Pages