सदस्य प्रवेश |
गाडी बुला रही है... १पुलंच्या शंकर्याला जसा पाण्यात आख्खा बुचकळून काढला तरी समोर हॉटेल दिसल्यावर त्याला तहान लागते तसे रेल्वेगाड्यांच्या बाबतीत माझे होते. पूर्वीच्या चित्रपटांत सुद्धा आगगाडी असली की मला जरा जास्त आकर्षण वाटायचे. शोले, शक्ती वगैरे मधे सुरुवातीला आणि शेवटी गाडीचे दृश्य आहे. किशोरचे 'गाडी बुला रही है' हे माझे एकदम आवडते. कूली जेव्हा लागला तेव्हा अमिताभ चा चित्रपट याबरोबरच रेल्वेचे वातावरण हे ही त्यात विशेष होते. तसेच 'द बर्निंग ट्रेन' चे. माझे एक नातेवाईक शिवाजीनगर स्टेशन जवळ राहतात, लहानपणी त्यांच्याकडे जाऊन मी संध्याकाळी प्लॅटफ़ॉर्म वर जाऊन बसत असे. मुम्बईहून पुण्याकडे संध्याकाळी बर्याच गाड्या येतात, केवळ त्या बघण्यासाठी. तिथे बसून मुंबईच्या दिशेने M अक्षराच्या मधल्या भागासारखा आकार दिसू लागला की गाडी आली हे कळायचे, कारण तेव्हा ती इन्जिने त्या एकाच प्रकारची होती. त्यांचे ४-५ वेगवेगळे प्रकार होते हे पुढे कळले. मग एक हैदराबाद का मद्रास ला जाणारी गाडी, त्यानंतर जनता एक्सप्रेस जी पुढे डबल डेकर सिंहगड झाली ती आणि आणखी एक कोणतीतरी लांबची गाडी जायची. पण सगळ्यात उत्सुकता मात्र दख्खन च्या राणीची. तेव्हा फक्त तिच्या डब्यांतच ट्यूब लाईट असल्याने आणि त्या ठराविक निळ्यापिवळ्या रंगामुळे लगेच ओळखता येत असे. पण तिचा खरा दिमाख ती शिवाजीनगरला सकाळी न थांबता मधल्या रूळावरून वेगात धडधडत जाताना बघायचा. संध्याकाळी ती तिथे थांबते व जवळजवळ अर्धी रिकामी होते. माझा काका पूर्वी कर्जत ला आणि तेही स्टेशन च्या अगदी जवळ राहात असल्याने पुण्याकडे जाणार्या गाड्यांना मागे १ किंवा २ इन्जिने लावतात ते अगदी जवळून बघायला मिळायचे. त्यासाठी पुण्याकडे व पुढे जाणार्या सर्व गाड्यांना कर्जत ला थांबावेच लागते. मधे शताब्दी वगैरे असताना तिला बहुधा खोटा स्टॉप होता: म्हणजे गाडी थांबायची पण मधल्या रूळावर. म्हणजे वेळ जाणारच पण लोकांना प्लट्फ़ॉर्म वर उतरता येणार नाही अशी रेल्वे ची अफलातून पद्धत. मी शताब्दीने कधी गेलो नाही आणि आता तिची इंटर सिटी झालेली आहे, तिनेही. पण पुणेकरांना 'मुंबईत' आल्याची पहिली खूण म्हणजे कर्जत ला दिसणारी लोकल. आता तर ती खोपोली पर्यंत झाल्याने कधीकधी घाटातूनच दिसते. पुणे स्टेशनला ही सर्वच गाड्या थांबतात. एकतर मोठे शहर आहे म्हणून, दक्षिणेकडे दोन मार्ग फुटणारे (एक मिरज कोल्हापूर कडे व दुसरा दौंड सोलापूर कडे) जंक्शन म्हणून, पण बहुधा त्याहीपेक्षा तिथे विजेची इन्जिने बदलून डिझेल व पूर्वी कोळशाची इन्जिने लावत यासाठी. आता कोळशाची दिसत नाहीत पण पूर्वी नुसते त्या फलाटांवर उभे राहिले तरी उगाचच मुंम्बईचा भाग जास्त शहरी व विरुद्ध बाजूचा भाग जरा वेगळा वाटायचा. मुंम्बईच्या बाजूला 'विद्युत इन्जन शेड' आहे व 'डेक्कन' व नंतर आलेली पण तितकीच लाडकी बनलेली 'इंद्रायणी' सारख्या निळ्यापांढर्या गाड्या तिकडे दिसायच्या. नंतर मुंबई सारखी लोकल आल्यावर तीही दिसे. याउलट दौंड च्या बाजूला डिझेल शेड व डिझेल आणि कोळशाची इन्जिने दिसायची. आणि गाड्याही सर्व एकाच तपकिरी रंगाच्या असत. अपूर्ण... |
|