स्त्रीजन्म (मंदारमाला वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 16 February, 2014 - 21:50

ओठावरी दुःख माझ्या जरीही तरी हासते मी सदा सर्वदा,
स्त्रीजात माझी म्हणोनी जगाने मला टोकले व्यर्थही कैकदा....
संसार माथ्यावरी ठोकलेला उरी व्याप आहे मनाचाच का
गोठ्यात बांधावया आणलेली जशी गाय भोळी तशी मीच का.....

जन्मास यावे कशाला उगा मी इथे सुख नाही कुठेही मला,
बापास आईस ओझे जसे मी उपेक्षा नशीबी मिळावी मला...
झाकायचे अंग मी रक्षणाला तनाच्या लिलावी स्वतः बैसते,
सौंदर्य ठेवून दारात सारे प्रतिक्षा परिक्षा भली मांडते....

कौमार्य माहेरवासात देते विवाहात प्रत्यार्पणी ठाकते,
घासून देहास मातीवरी मी कुशीतील सार्‍या कळा सोसते....
ज्याच्यासवे घेतले सात फ़ेरे मला तो रिपूही कधी वाटतो,
हे काय केले कुणी हाल माझे गळ्याशी पुन्हा हुंदका दाटतो.....

व्यापार व्हावा गहू बाजरीचा तसे मोल माझे तुम्ही मोजता,
कामात यावी घरी राबण्याला स्त्रिया दावणीला तुम्ही बांधता....
बोलायचे ना हसायास बंदी तुरुंगात का या मला डांबता,
आवाज दाबावया पुर्ण माझा मुखी संस्कृतीचा सुरा भोकता.....

अंगावरी लादले प्राक्तनाने असे काय माझ्या वृथा वेगळे,
स्त्रीअंग सोडून सारेच आहे बघा माणसांचे जरा सापळे ...
पोटात मी पोसते गर्भ जेव्हा धराही मला पाहता लाजते,
नाळेतले अन्न शोषून काया तुम्हा माणसांची पुन्हा माजते...

मी ब्रम्ह आकाश पाताळ सारे जगी शून्यता आज माझ्याविना,
मी यज्ञ मी ज्ञान मी कालगंगा भवातील मी भाव मी वेदना....
श्रेष्ठत्व नाही मला भावलेले परी मान व्हावा घरी मंदिरी,
माया जिव्हाळा नसातील माझ्या दुधातून जाते तुझ्या अंतरी.....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण विशिष्ट वृत्तात लिहायचे ठरवून लिहिता का ?
कविता अनघड असावी. किमान तसा प्रयत्न तर दिसायला हवा.

अलीकडे एक शेर लिहिला होता, देत आहे:

अनघड काहीतरी घडावे ह्या हातातुन
वाचत असता कबिराचे दोहे जाणवते

समीर चव्हाण

हो समीरजी । मी ठरवून केलेले काव्य आहे हे । वृत्त गुणगुणत असताना अचानक सुचलेल्या ओळिमुळे हे काव्य बनवले मी। अगदिच सहजतेने कागदावर उतरलेले नाही। विषय तसा होता ना। स्त्रीभूमिका वटवायची होती मला या काव्यात ।

छाने ...

कविता फार उत्तम नेहमीसारखीच !!

कविता अनघड असावी <<<< या मताचा आदर आहेच पण कविता अनघडच असावी /असावीच असेही कुठे म्हटले गेले नाही आहे हेही लक्षात घेण्याजोगे आहे म्हणजे या कवितेत जो घडीवपणा आहे तो ह्या कवितेला अलंकृत करून हिचे लावण्य वाढवत आहे असे मला वाटते..थोडक्यात काय की .....ये स्टाईल का मामला है !! Happy (विरोध नाही मत-प्रदर्शन केले प्लीज गै.न )