एक कविता

Submitted by -शाम on 10 February, 2014 - 23:15

एक गोष्ट .. शेवट विस्कटलेली
एक गाठ .. करकचून सुटलेली

एक पत्र .. सुगंध विटलेलं
एक काळीज .. गलबलून दाटलेलं

एक पुस्तक .. मोरपीस जपलेलं
एक वही .. पान अन पान ओलं

एक नदी .. वळसा घालून गेलेली
एक वाट .. गाव टाळून निघालेली

एक चंद्र .. कुंकू माळणारा
एक किनारा .. लाटा ढाळणारा

एक पाऊस .. डोळ्यातून निसटलेला
एक मोर .. पिसारा मिटलेला

एक झरा .. बेफिकीर कोसळणारा
एक कातळ .. आत आत ढासळणारा

एक पक्षी .. आभाळ जपणारा
एक पारधी .. पिसे विकणारा

एक दोर .. मध्येच तुटलेला
एक पतंग .. काट्यात रुतलेला

एक दिवा .. रात्र पेटवणारा
एक पारा .. काळ गोठवणारा

एक जखम .. भरूच नये अशी
एक आठवण .. स्मरुच नये अशी

एक भास .. आंबट गोड खारट
एक सत्य .. कडू तिखट तुरट

एक कविता .. रद्दीत गेलेली
एक सीता .. माती झालेली

अजूनही बरच लिहता येईल

आपल्या दोघांबद्दल!
______________________________शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे काय नविनच? आपणंच आपल्या कवितेवर द्यायचे का असे प्रतिसाद? का??

म्हटलं की चांगली आहे म्हणून!! Happy

Pages