अमेठीची शेती

Submitted by अभय आर्वीकर on 2 February, 2014 - 13:46

अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी
ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी

हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला
की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी

                                         - गंगाधर मुटे
----------------------------------------------------

Amethi

*   *   *   *
Amethi

*   *   *   *
Amethi

*   *   *   *
Amethi

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुटेशैलीची अजून एक फक्कड गझल खूप दिवसांनी वाचयला मिळाली त्याबद्दल धन्यवाद मुटेसर
मला रदीफ फार आवडली

मतल्यात दुसर्‍या ओळीत >>>वाह्यात कायद्यांच्या गोत्यात कास्तकारी<<< असे करता येइल का
आणि मक्त्यात >>की सोड अभय तू ह्या जन्मात कास्तकारी<<<
सहज सुचले म्हणून म्हणत आहे बदलाची सूचना विनंती आग्रह वगैरे काही नाहीच Happy

असो
खूप दिवसांनी माबोवर गझल पेश केलीत ह्याबद्दल विशेष आभार सर

वैवकु, मी गजलच फार दिवसांनी लिहिलीय. गेल्या चार महिन्यात फक्त दोनच. Happy

गोत्यात हा चांगला पर्याय आहे.:बघतो.