काश्मिरी लाल मिरची ची चटणी

Submitted by सुलेखा on 28 January, 2014 - 23:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काश्मिरी लाल मिरच्यां मसाल्याने भरुन त्याचे लोणचे करतात..पण ते थोडे मुरेपर्यंत वाट पहावी लागते.माझ्या पंजाबी [शिख/सरदार ]मैत्रिणीकडे , साधारण तेच साहित्य वापरुन ही चटणी करायचे..लाल मिरचीच्या बिया न काढता केलेला लाल ठेचाच जणू ! त्यावर सरसू च्या तेलाचा तवंग अन लसणीचा घमघमाट.नुसते पाहूनच मी तिखटपणा अनुभवत होते.चवीसाठी दिलेली चटणी "सुधारीत आवृत्ती" करुन महिनाभर पूरत असे.ते शहर आणि मैत्रीणीचा साथ सुटल्यावर ही सुधारीत आवृती सीझन मध्ये एकदातरी करते.
१०० ग्रॅम काश्मिरी लाल मिरच्या ,
४ नग पातीसकट ओला लसूण,
२ टेबलस्पून धणे,
२ टेबलस्पून तीळ,
१ टी स्पून प्रत्येकी जिरे व मोहोरी,
८-१० मेथी दाणे,
१/२ टी स्पून हिंग पूड,
१ टेबलस्पून बडीशोप,
चवीप्रमाणे मीठ,
१ लिंबू,
३टेबलस्पून तेल.

क्रमवार पाककृती: 

मिरचीला उभी चिर देवुन त्यातील सर्व बिया व मधले देठ काढुन टाकावे व मिरच्या चिरुन घ्याव्या.तसेच पातीसकट लसूण चिरुन घ्यावा.
१ टे स्पून तेल गरम करुन त्यात हिंग,जिरे,मोहोरी व मेथीदाणा घालावा.
धणे व तीळ वेगवेगळे मायक्रोवेव्ह मधे ३० सेकंद किंवा हाताला गरम लागेल इतपत भाजुन घ्यावे.
मिक्सरच्या भांडयात चिरलेली मिरची,लसूण,धणे, तीळ.फोडणी,बडीशोप ,लिंबाचा रस चवीपुरते मीठ घालुन जाडसर वाटावे.
उरलेले २ टे स्पून तेल गरम करुन या चटणीवर ओतावे.
ही चटणी फ्रीज मध्ये ठेवल्यास टिकते.
lal mirachi chatani.JPG

अधिक टिपा: 

लोणच्यातील मसाल्यात लसूण वापरत नाही आणि आंबटपणासाठी आमचुर वापरतात
.पण या चटणीत पातीचा लसूण व लिंबाचा रस वापरतात.
पंजाबी लोकांमधे पुदिना चटणी करताना १ जुडी पुदिना पाने,चिरलेला मोठा कांदा,हिरवी मिरची,जिरे ,मीठ व लिंबाचा रस किंवा कैरी किंवा कमरख या चवीला आंबट असलेल्या फळाच्या फोडी असे मिक्सर मधे वाटुन घेतात.तयार चटणीला काळपट हिरवा रंग न येता छान हिरवा रंग येतो.भरपुर कांदा घातल्याने पातळसरचटणी तयार होते.उन्हाळ्यात सकाळी नाश्त्याच्या वेळी पराठा किंवा ब्रेड बरोबर ही चटणी असतेच..

माहितीचा स्रोत: 
पंजाबी मैत्रीण.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users