हिमालय

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

हिमालय. त्याचं वेड लागतं.

नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं.

हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं. जणू काही एखादा भव्य दिव्य ध्यानस्थ पुराण पुरुष. एकदा हिमालयाच्या वाटा चालल्या की तिथून मन काढून घेणं महाकठीण.

कधी खळाळत वाहणारे झरे, कधी घनगंभीर नाद करत वाहणारे जलप्रपात, ऐसपैस पसरलेली हिरवीगार पठारं, त्यांचं सौंदर्य वाढवणारी रानफुलं, एकाच वेळी मनात धडकी भरवणारे आणि त्याचबरोबर रौद्र रुपाची भुरळ घालणारे करकरीत कडे आणि पहाड. घनदाट जंगलं. खोल दर्‍या. कधी मैलोगणती केवळ मोठमोठ्या पत्थरांचे मार्ग. झुळझुळणार्‍या झुळूका, सोसाटणारा बोचरा वारा, हिमवादळं. सणाणणारा पाऊस! सोनेरी पहाटवेळा, अंगार ओकणार्‍या दुपारवेळा. हळूहळू सभोवताल शांतवत येणार्‍या आणि आसमंतावर आपल्या स्निग्ध, चंदेरी प्रकाशाची चादर ओढणार्‍या रात्री. आकाशगंगेचं दर्शन. तुटणारे तारे. पहाडाच्या टोकावर जाऊन जरासा हात उंचावला, तर हाताला लागेल असा भला मोठा चंद्र. आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा.. इतकं पुरेसं नाही म्हणून ह्या सार्‍याला व्यापून उरणारी आणि तरीही अजूनही थोडी उरणारी प्रगाढ शांतता.

अनेकविध रुपं दाखवत हिमालय चकित करुन सोडत राहतो. घेत असलेला अनुभव अजब वाटावा, तोवर पुढचा अनुभव अर्तक्य वाटत राहतो. हिमालयाची वाट चालता, चालता हळूहळू पण सातत्याने अंतर्मन हे सारं सारं टिपत जातं आणि सभोवतालच्या भव्यतेच्या जाणीवेने विनम्र बनत जातं. थोडसं दबतं, क्वचित घाबरतंही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव होते. हिमालयाला शरण जाण्याखेरीज पर्याय नसतो. एका कोणत्या तरी क्षणी हिमालयाशी आपली नाळ जुळते. खूण पटते. हिमालय त्याच्या भव्य दिव्य, क्वचित विक्राळ रुपासकटही आश्वासक भासू लागतो. आपलासा वाटतो. ह्याचसाठी तर सगळा अट्टाहास केलेला असतो! अजून काय हवं?

त्याच्या सान्निध्यात काही दिवस फार फार सुखात जातात. कसल्याही चिंता आठवत नाहीत, भेडसावत नाहीत. आनंदडोह भरुन वाहतो. तुम्हीं हो बंधू, सखा तुम्हीं हो... शब्द सरतात. सगळं नुसतं पहायचं आणि अनुभवायचं. बस्स!

आणि कधीतरी हे आनंदपर्वही संपुष्टात येतं. नेहमीच्या चाकोरीत परतायचा दिवस समोर येऊन वाकुल्या दाखवतो. नको, नको वाटतं. इलाज नसतो. डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. सुरु असलेल्या आनंदपर्वातून एकदम धाडकन फेकून दिल्यासारखं वाटतं! भिरभिरलेली अवस्था असताना कधीतरी लक्षात येतं की हिमालय कधीचाच मनात वस्तीला आलेला असतो. हिमालयापासून दूर जाण्याची भीती आता इतकी भेडसावत नाही. नेहमीच्या रुक्ष जगात परतण्याचा त्रास जरासा कमी होतो. कळतं, हे परतणं तात्पुरतं आहे, पुढल्या भेटीचा योग येईतोवरच. हिमालय नक्कीच पुन्हा साद देणार असतो. साद ऐकू आली की पुन्हा एकदा नगाधिराजाच्या दर्शनाची तीच बेचैनी उरी घेऊन ह्या पंढरीची वाट चालू लागायची.. अजून काय....

“There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains. Lifted high above the level of human sounds and habitations, among the wild expanses and colossal features of Nature, we are thrilled in our loneliness with a strange fear and elation – an ascent above the reach of life's expectations or companionship, and the tremblings of a wild and undefined misgivings.."

*****

सप्टेंबर २०१३ मध्ये मी काश्मीरमध्ये सोनमर्गच्या पुढे हिमालयामध्ये एक ट्रेक केला, त्या दरम्यान काढलेल्या प्रकाचित्रांपैकी काही.

१. गगनगीर, सोनमर्ग. सिंड नाला.

४. गडसर पासपाशी शिखरावरुन घेतलेले दृश्य.

५. निचनाई पास ओलांडल्यावर गडसर पासवरुन दिसणारे दृश्य.

६. सोनमर्ग, निचनाई पासच्या पायथ्यापासून पहलगाम, अमरनाथकडे जाणारी, पहाडांत शिरणारी वाट

९. गगनगीर जंगल.

११. सिंड नदी.

१२. निचनाई पास चढतानाचे दृश्य.

१३. श्रीनगरकडून सोनमर्गच्या वाटेवर.

१४. विशनसर आणि किशनसर. (सर = ताल, तलाव)

शब्दखुणा: 

सर्वांचे मनापासून आभार! Happy
आडो, नक्की कर हा ट्रेक.
अल्पना, तुझे खास आभार, दरवर्षी हिमालयात जायला मिळो म्हणालीस म्हणून Wink

सुंदर फोटो आणि मनोगत!
मलाही जावसं वाटतय! या भारत भेटीत एक क्षण असा आला होता की कसलाही विचार न करता एक चक्कर हिमालयात मारून यावी असे प्रकर्षाने वाटले. एका मैत्रीणीचे आई-वडील ऊनाला रहातात. पण...........

भारावलेय मी! फार सुरेख मनोगत.. फोटोज अवर्णनीय आहेत!!
तुला अगदी दर वर्षी नेमाने हिमालयाची वारी करायला मिळो>> मम Happy

एकदा हिमालयाची सफर केली की नुसतं हिमालय हे नाव समोर आलं की मनात जरास गलबलतंच.त्याची मनाला एक आस लागुन राहते, हिमालय पाहिला की स्वता:ला विसरायला होते हे खरे. एकदा kashmir व दुसर्यावेळी सिमला कुलु मनाली ला जाऊन आले. तीसरी ट्रिप कोठे करु असे नवरा ज्यावेळी विचारतो त्या प्रत्येकवेळी माझे उत्तर north लाच जाऊ असे अस्ते. माझे एक स्वप्न आहे की आयुष्यातील २-४ years तरी हिमालयात जाऊन रहावे.त्याला अनुभवावे.

सुंदर लिखाण, अप्रतीम फोटो...

हिमालयाचे वेडच लागते, हिमालय म्हणजे ज्याची व्यसनमुक्ती नाही झाली तरी चालेल असे एक व्यसनच आहे Happy

Pages