माझी आई

Submitted by संतोष वाटपाडे on 17 January, 2014 - 21:30

बांधावरचा हिरवा चारा,
गवत दुधाळी टवटवलेले,
पाजळलेल्या जुन्या विळ्याने,
कापून भार्‍यामध्ये मोठ्या,
आणायाची जेव्हा आई,
खुंट्याभोवती पिंगा घालत
धावायाच्या सार्‍या गायी....

परसामध्ये सदाफ़ुलीला,
प्राजक्ताला कोरफ़डीला,
विहिरीवरच्या थारोळ्यातुन,
वरती येता दिसता आई....
ढळती सांज असूनही त्यांची,
आंघोळीला सदाच घाई...

मावळतीचा सुर्य तांबडा ,
गोंदण झाकून विसावलेला,
तसेच कुंकू रुंद कपाळी,
घामासोबत वाहत येई...
कष्ट करुन थकल्यावरही
सुंदर वाटायाची आई...

कोपर्‍यातली फ़ुरफ़ुरणारी,
विस्तवातली चूल हासरी,
सुखदुःखे गार्‍हाणी मांडत,
आईजवळी व्याकुळ काही...
भाकर भाजून गहिवरलेली ,
अजून थोडी खरपूस होई....

दिवसा सगळे मळ्यात असता
चार खणांचे घर बिचारे,
एकलकोंडी उघडी दारे,
अगदी हळवे असते तेही...
त्यालाही मग घरपण येते,
घरात फ़िरते जेव्हा आई....

गाणे नव्हते ओठावरती
सारवलेल्या ओट्यावरती
"लिंबोणीच्या झाडामागे,
चंद्र झोपला माझा बाई"....
तरी आईच्या कुशीत मजला,
झोप क्षणातंच निवांत येई....

--- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users