प्रवास

Submitted by prachi kulkarni on 2 January, 2014 - 13:18

लहानपणापासून इंग्रजी माझं पाहिलं प्रेम कि मराठी, ह्या मी कधीच सुरु न केलेल्या वादात मी नेहमीच अडकते! मी इंग्रजी माध्यमातून शिकल्याचा काही मंडळींना राग येतो तर अनेक अति इंग्रजाळलेले प्राणी माझ्या इंग्रजी संभाषणातील येणाऱ्या मराठी संदर्भांबद्दल माझ्यावर डूख धरतात. खुप त्रिशंकू अवस्था होतो हो माझी! डोक्यात एक तर मराठीत विचार येतात नाहीतर इंग्रजीत( हिंदीचं तर सोडूनच द्या,ती अजून 'परडी में करडू वरड्या' वरचं अडकलेली आहे.) आणि ते विचार जसे ज्या भाषेत येतात तसे मी व्यक्त करते. इंग्रजी कि मराठी हा विचार कधीच येत नाही माझ्या डोक्यात! हि पोस्ट लिहिताना डोक्यात भराभर मराठी शब्द वाहत होते. एक सेकंद मीच अचंबित झाले, आपल्याला इतके मराठी शब्द येतात? तर असो, गाडी रुळाशिवाय दुसरीकडेच चालली आहे. तर मी हे मराठीत लिहिते आहे, ते मला वाटलं म्हणून. त्यापाठीमाग कोणतीही अतिरेकी स्वाभिमानी भावना नाही कि हा कोणत्या राजकीय पक्षाच्या प्रचार सभेचा परिणाम नाही!
..........

लहानपणी मोठ्यांना प्रश्न विचारला कि खुपदा उत्तर मिळायचं, 'मोठी झालीस कि कळेल'. मला वाटायचं की झाले की इतकी मोठी, अजून किती होऊ? 'म्हशीचं वासरू तिच्या पोटातून बाहेर कसं येतं?' ते 'विरह भावना म्हणजे नक्की काय?' ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींकडून हेच मिळायचं. खूप चिडचिड व्हायची. सगळे मोठे मिळून आपल्याविरुद्ध कट करत आहेत असा ठाम समज करून मी देवाच्या फोटो समोर ' महाराज, मला सगळे छळताहेत....' असं भोकाड पसरायचे.
हा पोरकटपणा संपला आणि जरा मोठी झाले .थोड्या फार वाचनाच्या जोरावर आम्हाला शिंगं फुटली. आपल्याला किती कळत आणि दुसऱ्यांचा बोलणं किती चुकीचं आहे ह्याबद्दल फालतू अभिमान वगैरे वाटू लागला. काही गोष्ट जर कळाली नाही तर, ' ह्या! हे भंगार आहे!' असा म्हणून गोष्टी बाजूला सारण्याची सवय लागली. मग उगाचंच तावातावात वादविवाद करू लागले, स्वतःची (श्रेष्ठ :P) मतं मांडण्याचा अट्टाहास सुरु झाला. काही महिन्यांपूर्वीपर्यंत हे सगळं करताना आपण ' मेरी झाशी नाही दुंगी' सारखा लढतोय असं वाटायचं!
ह्या लढ्यामध्ये(?) कित्येकदा ' शहाणी झाली आहेस फार' सारखी बोलणी ते एखादी दणकन बसलेली लाथ, असे सगळे सत्कार झाले. काहीही झालं तरी आपल्याबरोबर किती अन्याय होतोय हे वाटायचं राहिलं नाही.
थोड्या वर्षांनी हा फेज संपला आणि जरा जगात आले. मारक्या म्हशीची शिंगं जर गुळगुळीत झाली आणि बाकीच्यांना इजा कमी होऊ लागली.
काही दिवसांपूर्वी कोणतं तरी (त्या अगोदर खूप वर्षांपूर्वी वाचलेलं) पुस्तक वाचत होते. पुस्तक वाचताना गोष्टींचे नवे नवे अर्थ कळत होते. ' आपण हे पुस्तक ह्या आधी नक्की वाचलंय ना? आधी का कळलं नाही हे?' असं वाटता वाटता जोरात हसत सुटले! आईचं वाक्य आठवलं, 'मोठी झालीस की कळेल.'
हा विचार डोक्यात आल्यानंतरच्या दिवसात जाणवायला लागलं कि अरे हे कित्येक गोष्टींच्या बाबतीत घडतंय! जुनी गाणी, पुस्तकांमधले ( कथेच्या नादात न वाचलेले) विचार, डोक्यावरून उडून गेलेल्या philosophies, बाबांचे त्या त्या वेळी निर्थक वाटलेले सल्ले, असंख्य वेळा खाल्लेली बोलणी, अभ्यासाचा खरा अर्थ, देव अश्या किती तरी गोष्टीबद्दल नवीन नवीन शोध लागत गेले. न्यूटनच्या युरेका मोमेंटसारखी काहीशी अवस्था झाली माझी!
आनंद ओसरला आणि शांतपणे विचार करू लागले. 'माझंच खरं' च्या नादात इथून पुढं काहीही बाजूला सारण्याचा बावळटपणा करायचा नाही असं ठरवलं.
रोज ठरवून डायरीमध्ये ह्याबद्दल लिहायला सुरवात केली. शांतपणे डोळे, कान, मन उघडं ठेवून आजूबाजूला पाहायला सुरवात केली. सगळी जुनी मतं खोडून टाकली आणि सध्या 'आपली कशाबद्दल ही मतं व्यक्त करण्याची लायकी नाही' असं ठरवलं. वाचन आणि लिखाण भरपूर सुरु केलं. एक वेगळ्याच प्रकारचा प्रवास सुरु झाला हा! अवघड आहे, पण दररोज रात्री झोपताना कोणतातरी मोठा डोंगर सर करताना वाटतं तसं समाधान वाटतं!
आजकाल हेच सुरु आहे माझं. रोज नव्या गोष्टी पाहते, नव्या गोष्टी वाचते आणि स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करून बघते. हे करताना आपल्याला काही जमलं कि होतो युरेका डान्स सुरु! ह्यानंतरही कशाबद्दल मतं व्यक्त करण्याची घाई नाही करणार आहे, कारण मला पूर्ण खात्री आहे कि आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणांवर मला ह्या सगळ्यांचे अजून नवीन अर्थ उमगत जातील!
मज्जा येते आहे खूप मित्रांनो, लई भारी आहे हे !
माझ्या डायरीमधली मी स्वतःसाठी लिहिलेली काही वाक्य तुमच्याबरोबर share करते आणि माझी टकळी बंद करते. आणि हो, तुम्ही ह्या प्रांतात काही पराक्रम केले असतील तर मी आहे ऐकायला!
तर मी केलेल्या नोंदी:
'Be open and listen to everyone, irrespective of that person's origin, his earning and his intellectual capacity! You unexpectedly might find something priceless.'
' Do not ridicule anything if you don't understand it. If you don't understand it right now, after some time you will. If you never understand it, maybe it is beyond your understanding.'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users