“जामनलोट्या”
एका गावात एक माणूस होता, तो काहीच काम करत नव्हता, सकाळी झोपेतून उठला की चहा घ्यायचा आणि गावभर गप्पा मारत फिरायचं.... भूक लागली की परत घरी फिरायचं... जेवलं की निघाले परत गप्पा झोडायला, जर गप्पा मारायला कोणी भेटलं नाही तर तो चांगली जागा पाहून ताणून देत असे, असा त्याच्या दिनक्रम आखलेला होता.
उन्हाळ्याचे दिवस होते... दुपारची वेळ होती... त्याचं भरपेट जेवणं झालं होतं... सकाळपासून गावातल्या गप्पा मारून तोंडाला फेस आला होता... जास्त जेवणानं अंगात सुस्ती चढली होती, तेव्हा तो एका दाट सावलीच्या झाडाखाली झोपला, ते झाड जमानीचं होतं. अचानक आलेल्या हवेच्या झोक्याने त्या झाडाचे पिकलेली बरीच जमानं खाली पडली, नशिबाने एक त्याच्या तोडांत पडले, कारण याला तोंड उघडे ठेऊन झोपायची सवय होती.
त्याला जाग आली तेव्हा तोंडात पडलेल्या जामनाची जाणीव झाली, पण हे तोंडातलं जामून नरड्यात लोटून खाणं त्याच्या जीवावर आलं...ते लोटून देणारा कोणी येतो का? याची वाट पाहत तो संध्याकाळ पर्यत त्या झाडाखालीच पडून होता... शेवटी गावातल्या लोकांच्या लोकांच्या लक्षात आलं की हा झाडाखाली का पडलेला आहे, अचानक... मेला तर नाही... ते तिकडे धावले, तेव्हा त्याच्या तोंडात त्यांना काहीतरी दिसले... लोक ते काढायला गेले पण ते जामून आत ढकलल्या गेलं तेव्हा ताडकन उभे राहिला.
तो लोकांना म्हणाला “तोडांत पडलेलं जामून आत लोटनं माझ्या जीवावर आलं होतं, ते लोटायला कोणीतरी येईल म्हणूनच मी इथे पडून होतो”.
त्या दिवसापासुन पासून गावातले लोक त्याला “जामनलोट्या” म्हणायला लागले.