इतनीसी बात - ४

Submitted by vaiju.jd on 28 December, 2013 - 14:34

।। श्री ।।

इतनीसी बात - ३ http://www.maayboli.com/node/46806

रात्री सगळेच आपापल्या विचारात होते. कोणीच जेवले नाही. रखमाने पंतांना खोलीत लापशी फक्त नेऊन दिली. रात्री पंतांना झोपही पटकन लागेना. सुमतीबाईंचे बोलणे ऐकून पंत विचारात पडले. ‘सुमती म्हणाली ते खरेच आहे कां? सुमती शांत स्वभावाची, अतिशयसमजूतदार,मेहेनती आहे. सारा प्रपंच तिने समर्थपणे पेलला. आपण फक्त शिक्षण घेण्यास अनुमती दिली परंतु पुढील प्रगती तिची तिनेच घडवली. कितीतरी वेळा अशी पत्नी लाभली याकरीता ईश्वराचे आभारही मानले. ती पायाची दासी कसे बरे असु शकेल?छे, छे आपलेकडून हा अपराधच झाला म्हणायचा. आता आधी प्रभाती उठल्यावर सुमतीस चूक कबूल करावयाची.’ असा विचार केला, मग त्यांना झोप लागली.

खोलीतून वसुंधराबाई निघून गेल्या. तेव्हा जज्जसाहेबांचा रागाचा पारा हाय डिग्रीला होता. पण बराच वेळ झाला तरी त्या खोलीत आल्या नाहीत. त्यांना भूक लागली पण जेवायला सुद्धा वसुंधरा बाई आल्या नाहीत. रखमाने दूध आणून दिलेले त्यांनी पटकन पिऊन टाकले. पण ते मनातून अस्वस्थ झाले. त्यांचा रागही थोडा शांत झाला. बुद्धी सम्यक विचार करू लागली. खरं म्हणजे आपण वसूला असं चरणांची दासी वगैरे म्हणायला सांगायला नको होतं. असं कसं म्हणालो आपण? आपलं चुकलंच. खरं तर आपण आलोकलाच विरोध करायला हवा. आपण वसुची माफी मागायला हवी काय म्हणत असेल ती मनात आपल्याला! सकाळी तिला सांगून टाकायचं की माझं चुकलं. असा निश्चय केल्यावर त्यांना झोप लागली. वसुंधराबाई खोलीत आल्या तेव्हा ते हलके हलके घोरायला लागले होते.

दीपा खोलीतून बाहेर पडली आणि स्टडीत जाऊन बसली. आलोक उशीरापर्यन्त जागा होता. रात्र चढून वातावरणात गारवा आला तसे आलोकचे डोकेही शांत झाले. तो विचार करायला लागला, ‘ खरंच काय ते पांडुरंग रखमाचं भांडण! आपण उगीचच आपल्यात आणलं. दीपा आपल्या बरोबरीनं हॉस्पिटल सांभाळणारी, एवढ्या मोठ्या व्यवसायाचा पसारा सांभाळणारी, मदत करणारी आपली सहचारी आहे. आपलं चुकलंच. सकाळी आधी आपण दीपाला सॉरी म्हणायचं, असं मनाशी ठरवल्यावर आलोकला शांत वाटलं, झोपही लागली.

पण सॉरी म्हणायला दिपाली सकाळी घरी नव्हतीच. तिला रात्री हॉस्पिटलमधून कॉल आल्यामुळे ती भल्या पहाटेच गेली होती. त्यामुळे ती आलोकला भेटलीच नाही. वसुंधराबाई टेबलावर नाश्ता लावत असतानाच दिपाली आली. त्या दीपाकडे पाहून हसल्या. दीपा त्यांना ' गुडमॉर्निंग' म्हणाली.

"काय गं बाळ बाळंतिण सुखरूप?"

"हो आई, आलेच हं मी आवरून!"

"ये ये , आलोकलाही घेऊन ये येताना!"

दिपाली आवरायला निघून गेली.

जराशाने सर्वजण नाश्त्यासाठी टेबलापाशी जमले. गरम गरम आलू परोठे , दही आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर खातानाही सर्वजण गप्प गप्पच होते. रखमा आतून करून देत होती. पांडुरंग बाहेर आणून देत होता. मध्येच वसुंधराबाई म्हणाल्या.

"परोठे सुरेखच झालेत हं रखमा!"

तसा पांडुरंग म्हणाला," रखमीला आता छानच जमायला लागलेत.अगं रखमे! आई बघ काय म्हणतात!"

रखमा बाहेर आली. तिलाही सगळ्यांनी शाबासकी दिली. तिचं कौतुक केलं.

एवढ्यात दिपाली रखमाला म्हणाली,

"काय रखमा , मिटलं का तुमचं भांडण?"

दिपालीने अचानक विचारलेला प्रश्न ऐकून रखमा क्षणभर कावारी बावरी झाली, ‘ ह्यांना कसं माहीत आपलं भांडण झालेलं?’ असा प्रश्न तिच्या चेहेर्‍यावर उमटला.

"भांडण कसलं जी? हा पांडुरंग काय तरी बघून येतो सिनेमात आन् नाटक करतो उगीचच!"

"काय म्हणत होता पांडुरंग? त्याचं म्हणण ऐकलस कां तू?"

"जी तो म्हणत होता ...."

रखमा एवढं म्हणेपर्यंतच पांडुरंग हातातलं पुसण खांदयावर टाकून पुढे झाला आणि म्हणाला,

"ये रखमे थांब जरा समद्यास्नी करूनच दाखवूया!"

आणि पांडुरंग एक पाय पुढे करून हाताची घडी घालून रुबाबात उभा राहिला, तशी रखमा डोक्यावर पदर घेऊन पुढे झाली.

पांडुरंग म्हणाला," मी हिरो आन् ही हिराइन माजी इनवणी करायला येत असती बरं कां! रखमे म्हण, भावना आल्या पायजेत हं.”

पांडुरंगाने अस म्हणताच रखमा पांडुरंगाच्या पायाशी बसली आणि म्हणाली. " मला दूर लोटू नका, असा काय करता प्राणनाथ मी तर आपल्या चरणांची दाशी!"

आणि पांडुरंग तिला उठवत म्हणाला," नव्हे नव्हे तू नव्हेस पायांची दाशी, तुझी जागा माझ्या हृदयापाशी!" आणि त्याने रखमाला जवळ घेतले.

बघणारे सगळे हसले तसे लाजून दोघेजण स्वयंपाकघराकडे पळाले.

इकडे टेबालाशी बसलेल्या प्रत्येकीने आपापल्या 'प्राणनाथाला' नजरेनेच विचारले

"मी आपल्या चरणांची दासी?"

आणि प्रत्येकीच्या प्राणनाथाने नजरेनेच उत्तर दिले,

"तुझी जागा माझ्या हृदयापाशी!"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast Happy