बालस्नेहसंमेलन ( संमेलनाचे धमाल किस्से )

Submitted by मितान on 20 December, 2013 - 04:10

दिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुकल्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या ! शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच ! अशाच काही संमेलनातील निरीक्षणे.

एका शाळेच्या क्रीडास्पर्धा. बेडुक उड्या. भल्या सकाळी ७:३० वाजता आपापल्या चिमुकल्यांना मैदानावर घेऊन आलेले पालक. मुलांना समजत नाहिये की आजच माझ्या बेडूक उड्या बघण्यासाठी सगळे आईबाबा एवढे का उत्सुक आहेत. बाईंना अजून उत्साह. गणवेषातल्या मुलांना मैदानावर आखलेल्या पांढर्‍या रेषेवर उभं केलं जातं. मुलं निर्विकार चेहर्‍यानं गर्दीकडे बघतायत. काहींच्या माता 'फास्ट जा हं' च्या खुणा करतायत. काहींच्या माता तक्रारीच्या सुरात लहानग्यांचे कौतुक करतायत. " काय दिवे लावते काय माहीत ! घरात तर साधी चालतच नाही. बेडूक, घोडा, गाढव, ससा अशांच्याच उड्या चाललेल्या असतात ". हे सांगताना डोळ्यातून कौतुक ओसंडून चाललेलं. मुलं आता आपसात गप्पा मारतायत. ही 'स्पर्धा' त्यांच्या गावीही नाही. पहिली शिट्टी होते. एखादा झोपाळू ऐसपैस जांभई देतो. बाकी मुलं निवांत. बाईंच्या सूचना. 'आता शिट्टी वाजली की बेडूकउड्या मारत त्या रेषेपर्यंत जायचं हं सगळ्यांनी ! ' मुलं शिकवल्याप्रमाणे सुरात 'हो...' म्हणतात. " जो तिथे आधी पोहोचेल त्याचा नंबर पहिला " मुलं काही न समजताही सवयीनं 'हो....' भरतात. शिट्टी होते.बेडूकपोजिशन मधून पुढे जाताना एकमेकांचा धक्का लागून मुलं पडतात. काही खरोखर टुणटुणत मज्जेत पुढे जातात. पडलेल्यांपैकी काहींचे भोंगे...काहींचं खिदळणं...काहींचं काहीच न सुचून जागेवर उभं राहाणं... यातलाच एखादा 'गिफ्टेड' या सगळ्यांशी देणं घेणं नसल्यासारखा अंगठा चोखत निवांत मांडी घालून पांढर्‍या लाईनवर बसून राहिलेला असतो. त्याची माता तिकडे कपाळाला हात लावून ! क्रीडा शिक्षिकांनी मात्र सगळ्यांना बेडकवायचा चंग बांधलेला असतो. त्या मुलांजवळ जाऊन काहीतरी खुसपुसतात. आता रडणारे,हसणारे,निवांत असणारे डोळे बाईंचे बोलणे प्राण कानात आणून ऐकत असतात. अचानक काय होतं माहीत नाही. "सुरु" असं म्हटल्याबरोबर आतापर्यंत डिंभक असणारे आता डराव डराव करत टणाटणा उड्या मारत स्पर्धा पूर्ण करतात. माता पिता टाळ्या वाजवत सुटकेचे निश्वास सोडतात... !!!

आज बडबडगीतांची स्पर्धा असते. जास्त संख्येनं माता नि कमी संख्येनं पिता मंडळी रांगेत बसलेली असतात. ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला ती मुलं पुढच्या रांगेन नि ज्यांनी भाग घेतला नाही ती पालकांच्या जवळ. भाग घेतलेल्या मुलांमध्ये अजिबात शांतता नाही. कारण ताणच नाही !

स्पर्धा सुरू होते, बाई पहिले नाव घेतात. अनिका येते. परीक्षकांकडे तोंड करून उभी राहाते. नाव सांगते गाणं सुरू.. कोणास ठाउक कसा, पण शाळेत गेला ससा.... सश्याने उडी मारल्यावर अनिकाचे लक्ष प्रत्येक स्पर्धकाला देण्यासाठी समोर ठेवलेल्या बक्षिसांकडे जाते. गाणं थांबवते. बाई जवळ येतात. प्रेमाने सांगतात, अनिका, पुढचं गाणं म्हणणार ना ? अनिका तो प्रश्न सपशेल दुर्लक्षून बाईंनाच विचारते, ' टेडीची पेन्सिल कधी देणार ? ' ! अनिकाची माता असहाय नजरेने बाई नि परीक्षकांकडे बघत कसनुसं हसते. बाई अनिकाला पेन्सिल देतात. अनिका उड्या मारत जागेवर ! मज्जेत !

आता गोष्ट सांगण्याची स्पर्धा. वातावरण तेच. वेद गोष्ट सांगायला उभा राहातो. "ससा नि कासव पळायला लागतात. सशाला भूक लागते. मग तो मेथीचा पराठा खातो. कासवाला आई म्हणते आंघोळ झाल्याशिवाय लाडू नाही म्हणजे नाही !" त्याची माता चक्कर येऊन पडायचीच बाकी. परीक्षक जे कौतुकाने ऐकतायत ती गोष्ट सांगायची ठरलेलीच नसते. सकाळपर्यंत टोपीवाला नि माकडाची गोष्ट पोपटासारखा सांगणारं आपलं कार्टं आई नि त्याच्यातले प्रेमळ संवाद गोष्टीत का घुसडतंय ते तिला कळतंच नाही.

आज फॅन्सी ड्रेस ! सगळ्या मॉडर्न आयाआणि सोबत जनाबाई, तानाजी, शिवाजी महाराज, संत तुकाराम, भाजीवाल्या, दहीवाल्या, कृष्ण, झाशीच्या राण्या आणि विठोबा रुक्मिणी, झालंच तर भारत माता, बैलजोड्या, वाघोबा, ससे, मोर........... एकच जत्रा. कुरकुरे खाणारा भटजी, दाढीमिशांमध्येच सर्दीने हैराण शिवाजी महाराज, 'मला नाही जायचं ..' म्हणत आईच्या गळ्यात पडणारा तुकाराम, भारदस्त पगडी घातलेला पण कोकिळस्वरात " मी शेंगा खाल्ल्या नाहीत..." म्हणणारा टिळक, आतून घातलेली स्लॅक्स दिसणारा वल्कलधारी राम, मोरपिसार्‍याचे बंद गच्च बांधल्याने तिथे खाजवणारा मोर, मधेच 'मी मोबाईल आहे..' म्हणत नाचत धुमाकुळ घालणारा 'मोबाइल'.... डोळ्यांचे पारणे फिटते अक्षरशः !!!!!

आता मुख्य दिवस. मोठ्या सभागृहात पालक आपापल्या इष्टमित्रांसह आपल्या पिल्लांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायला आलेत. स्टेजच्या मागे मुलं सोडलियेत. १० शिक्षिका मिळून सुमारे ८० पोरांना तयार करतायत. मदतीसाठी आलेले निवडक पालक भराभरा पोरींना नऊवारीत गुंडाळतायत. गालांवर 'लाली' नि ओठांवर लिपस्टिक, स्केच पेन ने गोंदण नि डोळ्यात बचकभर काजळ, बॉब केलेल्या केसांना हजारो पिना लावून बांधलेले अंबाडे, त्यातही केस पुढे येऊ नयेत म्हणून डिंकाने ते चिप्प बसवलेले.एकेक जण मोठ्या कापडात गुंडाळलेला गोंडस कोबीचा गड्डा ! कोणाचे तरी कानातले सापडत नाहीत. म्हणून सोनेरी कागद कानाच्या पाळीला चिकटव, कोणाचं गळ्यातलं पदराला शिवून टाक, कोणाला बांगड्या घालून दे...चाललंय.. एकीला पूर्ण नऊवारी नेसवल्यावर, दोर्‍यांनी आवळून बांधल्यावर शू येते. तिचे ऐकून बाकीच्यांनाही. कावलेल्या बाई वरात घेऊन सगळ्यांची लुगडी सोडवत एकेकीला नेऊन आणतात. पुन्हा बांधाबांध. लुगड्यांची. कागदी गजरे नि बांगड्या घालून अखेर ग्रुप तयार. नाचाला जातो नि ठसक्यात धमाल नाचतो.मधेच आपापल्या आई-आजीला हेरून त्यांच्याकडे बघत शायनिंग मारत नसलेल्या स्टेप्सही नाचल्या जातात. ज्या स्टेपला फुगड्या आहेत. तिथे जोडीदारीणच हरवते. ती कोपर्‍यातच ठुमकत असते. तिला ओढत आणून फुगडी उशीराने साजरी होते. तोवर बाकीच्यांची पुढची स्टेप नाचणं सुरू. पण काही फरक पडत नाही. मन लावून क्रमाने नाचणं महत्त्वाचं !

मुलांचा नाच असतो विदुषकांचा. ३० विदुषक रंगीबेरंगी कपड्यात सजलेत. नाकावर फुगे, डोक्यावर टोप्या.. एकाला अचानक आईची आठवण येते. भोंगा निघतो. "आई पाहिजे..... " एका विदुषकासोबत मग बाकीचेही विदूषक रडवेले. याचा "आई पाहिजे.." चा सूर एवढ्या गर्दीत बाहेर बसलेल्या माऊलीला ऐकू जातो. ती लगबगीने विंगेत येते. तिला पाहिलं की बाळाला अजून मोठ्ठ्याने रडू येतं. बाकीचे रडण्याच्या काठावर. बाई महा अनुभवी असतात. आलेल्या मातेला बाहेर पाठवतात. आणि ठेवणीतल्या आवाजात , " सगळे विदूषक जर आता हसले नाहीत तर एकेकाला फटके देईन" असे सुनावतात. मुख्य रड्या विदूषक गप्प. बाकी गप्प. तेवढ्यात गाण्याचा नंबर. विंगेतून स्टेजवर जाताना एकेकाच्या चेहर्‍यावर हसू. गाणं सुरू होतं. रंगीत तालीम दोन वेळा झाली असूनही ३० पैकी १०-१२ विदूषकच नाचत असतात. बाकीचे पाय हलवत समोर प्रेक्षकांमध्ये आई बाबांना शोधत असतात. विशेष म्हणजे ते एकमेकांना सापडतात. मग गाण्याला उधाण येतं नि उरलेला नाच झोकात होतो !

नंतरची भाषणं, सत्कार, बक्षिसं यात कोणालाच रस नसतो. आई बाप आपल्या चिमुकल्यांनी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केल्याच्या कौतुकात नि मुलं एवढ्या गर्दीत सापडले बाबा आईबाबा ! या विचारात बडबडत सुटलेले !!!

अशा रितीने हे पहिलेवहिले स्नेहसंमेलन पार पडते.

तुम्हाला आठवतायत अशा गमतीजमती ? सांगा तर मग...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages