भोगीची भाजी (इम्प्रॉव्ह व्हर्जन)

Submitted by अल्पना on 19 December, 2013 - 02:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२-३ पातीचे कांदे, एक गाजर, एक बटाटा, २-३ वांगी, अर्धी-पाऊण वाटी सोलाणे, थोडेसे मटाराचे दाणे, वालपापडीच्या (ऊसावरच्या) शेंगा, शेपु, लसणीची पात,कांद्याची पात, एखादा मुळ्याचा तुकडा, २-४ फ्लॉवरचे तुरे, तीळाचं जाडसर कुट, मोहरी, धण्याची पुड, हळद, तिखट, गोडा मसाला किंवा काळा मसाला, मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, गुऴ (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

पातीचा कांदा उभा चिरून घ्यावा. . सगळ्या भाज्या चिरून-निवडून घ्याव्यात. कढईत हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात कांदा परतून घ्यायचा. चिरलेल्या भाज्या -पात फोडणीत घालून त्यात मीठ मसाला आणि तिळाचं कुट घालून वाफ आणायची. आवडत असल्यास थोडा गुळ घालायचा.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जण
अधिक टिपा: 

संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकर खातात. आईच्या हातची भोगीची भाजी खाऊन १०+ वर्ष झालीत आता. आई कोणकोणत्या भाज्या घालायची हे पण नीट आठवत नाहीये. पण साधारण हिवाळी भाज्या असतात, (वांगी, ऊसावरच्या शेंगा, गाजर्,सोलाणे असतात हे १००% आठवतंय. बहूतेक बोरं पण घालायची आई या भाजीत.)
मला इथे यावर्षी बाजारात ऊसावरच्या शेंगा मिळाल्या. त्यावरून ही भाजी आठवली. मग इथे मिळणार्‍या हिवाळ्यातल्या भाज्या घालून मी याप्रकारे बनवली. आईच्या भाजीशी जवळपास जाणारी चव आली होती भाजीला.

आई गुळ घालून आणि न घालता अश्या दोन्ही व्हर्जन्स करायची आणि आम्हाला दोन्ही आवडायच्या.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लागते ही भाजी. आमच्याकडे पण असते पण कांदा नसतो. ही भाजी, तीळ लावलेली भाकरी, भरीत आणि खिचडी असा बेत असतो.

आई घालायची कधी कधी ऊसाचे तुकडे पण. पण ते फक्त भोगीच्या दिवशी. एरवी करताना मात्र गुळ किंवा काहीही गोड न घालताच.

आमच्याकडे नैवेद्य दाखवणं नसायचं कधी म्हणून बहूतेक कांदा-लसूण घालत असतिल. Happy

सही. यावेळी साबांना भाज्यांची लिस्ट विचारून लिहून ठेवते Happy
आमच्याकडेपण अशीच करतात, पण त्यात काही काही भाज्या मस्ट आहेत.

मस्तच. आमच्याकडेपण सगळ्याच जेवणात त्या दिवशी तीळ घालतात आणि आंघोळीच्या पाण्यातपण थोडे तीळ घालून आंघोळ करतात. बेत- खिचडी, भरीत, भाकरी असा असतो.

आता अशी करून बघायला हवी. ते उसावरच्या शेंगा प्रकार कधी बघितला नाही, इथे मिळेल असे वाटत नाही. श्रीरामपूर येथे असताना ह्याच्यापेक्षा थोडी वेगळी भाजी खाल्लेली आहे, त्यात मुळ्याच्या शेंगा घातलेल्या होत्या (आम्ही ज्यांच्या घरात भाड्याने राहायचो, त्यांनी पाठवली होती.)

वालपापडीच्या शेंगा माहित आहेत पण उसावरच्या म्हणजे काय?

प्राची फोटो मस्त.

एक प्रकारच्या घेवड्याचा वेल उसावर चढवतात. त्याला असे नाव आहे.
मालाडला आम्ही ही भाजी मातीच्या मडक्यात करत असू. ती पण शेकोटीमधे.

धन्यवाद दिनेशदा, मातीच्या मडक्यात आणि शेकोटीत, चविष्ट होत असेलना भाजी. पोपटीच्या जवळ जाणारी होत असेलना? घेवडयाचा वेळ उसावर चढवला तर चवीत काही फरक पडतो का?

घेवड्याच्या चवीत काही नाही फरक पडत, असाच एक बाजीराव घेवडा पण असतो.
मातीच्या घड्यात खुप छान चव येते, हे मात्र खरंय.