जपानमधील ओयामा व टोगो यांची माहिती आम्हांला हवी आहे

Submitted by वेदवाणी on 17 December, 2013 - 05:59

मायबोलीकर
स. न.
श्रीदासगणुलिखित ‘श्रीगजाननविजय’ या ग्रंथावरील एक निरुपणात्मक ग्रंथ आम्ही साहित्यसंमेलन 2014 पूर्वी प्रकाशित करत आहोत. त्यासंदर्भात आम्हांला लवकरात लवकर एक माहिती हवी आहे. ती अशी -
श्रीगजाननविजय या ग्रंथातील पंधराव्या अध्यायात पुढील ओव्या आलेल्या आहेत.
‘‘असो, करवीर कोल्हापुराचा। द्विज चित्पावन जातीचा। श्रीधर गोविंद नावाचा। काळे उपनांव जयाचें॥१०९॥ तो गरिबीच्या स्थितींत। गेला इंग्रजी शाळेंत। आंग्लविद्या शिकण्याप्रत। मॅट्रिक परीक्षा पास झाला॥११०॥ पुढें कॉलेजांत गेला। परी इन्टर नापास झाला। म्हणून फिरत राहिला। वर्तमानपत्रें वाचीत॥१११॥ तों, ‘केसरी’ पत्रांत। वाचलें ओयामा, टोगो चरित्र। तेणें त्याच्या मनांत। वृत्ति एक उठली अशी॥११२॥ आपण जावें विलायतेला। यंत्रविद्या ही शिकण्याला। उगें भार भूमीला। होण्यामाजीं अर्थ काय ?॥११३॥ टोगो, यामा दोघेजण। प्रथमतः ज्ञान संपादून। अभ्युदयाकारण। जपान आणिते जाहले॥११४॥ तैसें आपण करावें। मायभूमीस उद्धरावें। ऐसा विचार त्याच्या जीवें। घेतला परी इलाज ना॥११५॥’’
उपरोक्त ओव्यांमधील ओयामा आणि टोगो यांची माहिती आम्हांला हवी आहे. या दोघांनी जपानचा अभ्युदय केला असा त्यावेळच्या (साधारणपणे 1935 च्या अगोदर) केसरीत उल्लेख आलेला आहे. ओयामा का यामा हाही एक प्रश्‍न आहे. ओयामा आणि टोगो या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत का? इंटरनेटवर काहीच माहिती मिळत नाही. जे उपलब्ध आहे त्यांचे संदर्भ लागत नाहीत. जपानी भाषा केंद्रातर्फे माहिती मिळवण्याच्या प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. आता शेवटचा हा प्रयत्न करून पाहत आहे.
जाणकारांनी विशेषकरून जपानमधील मायबोलीकरांनी कृपा करून मदत करावी ही कळकळीची विनंती.
धन्यवाद
अविनाश देशपांडे
कोल्हापूर
vedwani@hotmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोगो नामक एक जपानी नेव्हीचा अ‍ॅडमिरल होता बहुदा. त्याला 'प्रति नेल्सन' म्हणत. आणि ओयामा इवाओ (??) नावाचा पण एक सैन्यप्रमुख होता. यांचा कार्यकाल एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला आहे
या दोघांनी पाश्चात्य देशात प्रशिक्षण घेतले होते.

काही माहिती मिळाली तर अवश्य सांगेन. टोगो की टोजो ? कारण एक जनरल टोजो म्हणुन सैन्याचा प्रमुख होता. तसेच पंतप्रधान पण होता. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात.
अर्थात जर गजाननविजय ग्रंथ त्यानंतर लिहिला गेला असेल तर.

अविनाश,

तुम्ही केसरीचे जुने अंक पाहिलेत का? तिथे काही तड लागू शकेल. आपल्या यत्नांस शुभेच्छा!

आ.न.,
-गा.पै.

अविनाश,

वर अश्विनीमामींनी दिलेला तोगो हैहाचिरोचा दुवा समर्पक वाटतो. या नौदलाधिकार्‍याने १९०५ सालच्या रुसो-जपानी युद्धात रशियन नौदलाचा सणसणीत पराभव केला होता. तोपर्यंत युरोपिय सैन्ये आशियाईंसाठी अपराजेय आहेत अशी ठाम समजूत होती. ती निकालात काढण्याचे श्रेय तोगोचे आहे. तोगोने इंग्लंडमध्ये ७ वर्षे नाविक शिक्षण/प्रशिक्षण घेतले होते. त्याला यामामोतो गोनोह्योईने १९०५ साली नौदलप्रमुख नेमले. म्हणून विकिवर यामामोतोची माहीती पहिली.

त्यानुसार यामामोतोने युरोप आणि दक्षिण अमेरिकेची प्रशिक्षण सफर केली होती. या अनुभवांवरून त्याने नाविक तोफखान्याचे माहितीपुस्तक (naval gunnery manual) लिहिले. हे पुस्तक लगेच जपानी नौदलाने मानक (standard) म्हणून स्वीकारले. पुढे तो जपानचा पंतप्रधान झाला. एकंदरीत यामा किंवा ओयामा म्हणजे यामामोतो असू शकतो.

तोगो इ.स. १९३४ साली वारला तर यामामोतो इ.स. १९३३ साली. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या आसपास त्यांची चरित्रे केसरीत प्रसिद्ध झाली असावीत (१९३५ च्या आधी). तर १९३५ हे साल कुठून मिळवले याचाही तपास करावा असे सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

_सचिन_,

तुमच्या दुव्याबद्दल धन्यवाद! Happy त्यात Oyama चा उल्लेख आहे. हा वरदा यांनी सांगितलेला ओयामा इवाओ आहे. नामसाधर्म्यामुळे हा उमेदवार यामामोतोपेक्षा अधिक प्रबळ दावेदार आहे. याचा मृत्यू इ.स. १९१६ साली झालेला असल्याने (अनेक वर्षांनंतर) केसरीत लेख दुसर्‍या काही कारणास्तव आला असावा.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगजाननविजय हा ग्रंथ १९३९ मध्ये लिहिला गेला.

टोगो की टोजो ? पोथीमध्ये ‘टोगो’ असा उल्लेख आलेला आहे.

पोथीमधील उल्लेखानुसार ओयामा आणि टोगो या दोघांनी परदेशात यंत्रविद्या शिकून जपानची प्रगती केली असा उल्लेख आलेला आहे. पोथीमधील उपरोक्‍त श्रीधर काळेच्या प्रसंगापूर्वी लो. टिळकांच्या भाषणाला महाराजांची उपस्थिती व पुढे लोकमान्यांचा मंडाले येथील कारावास ही घटना आलेली आहे. लो. टिळकांसंदर्भातील उपरोक्‍त घटना ४ मे १९०८ रोजी घडलेली आहे. त्यानंतर श्रीधर काळेची घटना आहे असे गृहित धरले तर १९०८ नंतर व महाराजांच्या समाधीपूर्वी म्हणजेच भाद्रपद शु ५ (ऋषीपंचमी) शके १८३२ (इ. स. १९१०) च्या दरम्यान ही श्रीधर काळेची घटना घडलेली असावी. म्हणजेच त्या दरम्यानच्या केसरी मध्ये ओयामा-टोगोची बातमी आलेली असावी. ती बातमी वाचून श्रीधर काळेलाही आपण परदेशी जाउन यंत्रविद्येचे शिक्षण घ्यावे अशी इच्छा झाली. तेव्हा महाराज म्हणाले होते की, ‘‘हिंदुस्थान सोडून उगीच कोठे जाऊ नकोस. अगणित पुण्य करावे तेव्हाच येथे जनन(जन्म) होते. भौतिक शास्त्राहून योगशास्त्र प्रबळ आहे. योगशास्त्र ज्याला येते तो या भौतिकाला मानत नाही. योगशास्त्राहून अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. तो जमल्यास करून पाहा. यास्तव आता कोठेही जाऊ येऊ नको. येथेच तुझा अभ्युदय होईल.’’ असा उपदेश केला होता. त्यानुसार श्रीधर काळे बी. ए., एम्‌. ए. होउन शिंद राजवटीमधील शिवपूरी येथे प्रिन्सिपॉल म्हणून रुजू झाले.
विकिवर http://en.wikipedia.org/wiki/TOGO ही लिंक मिळाली होती. येथे‘ In 1935 Mr. Teiichi Yamada founded the Toyo Gorakuki Company and built his first attraction, a five-foot mechanical walking elephant that was a popular attraction at one of Tokyo's neighborhood parks.[1] Yamada reorganized his company in 1949 and changed the name to TOGO. असा उल्लेख आलेला असून तेथे टोगो नावाची कंपनी आहे व्यक्‍ती नाही. ही पण माहिती लागू होत नाही.

गामा-पैलवानजी केसरीचे जुने अंक कोठे पाहावयास मिळतील ?

कोडे सुटले !!!
वरदा, अश्विनीमामी, महेश, गामा-पैलवान आणि -सचिन- जी मनःपूर्वक धन्यवाद !!
गामा-पैलवानजी टोगो-ओयामा जोडीचा फोटो टाकून आपण ‘हा सूर्य हा जयद्रथ’ केलेत.
एवढ्या लवकर प्रतिसाद प्राप्त होऊन उत्तर मिळेल असे मला वाटले नव्हते. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पास झालेला असला तरी थोडेसे अंधश्रद्ध होऊन ‘ही महाराजांची योजना, त्यांनीच आपणां सर्वांना प्रेरणा दिली!’ असे म्हणण्याचा मोह आवरत नाही. कारण गेले कित्येक दिवस आम्ही ज्या प्रश्‍नाभोवती घुटमळत होतो ते कोडे चुटकीसरशी सुटले. येत्या दोनतीन दिवसात पुस्तक प्रिंटिंगला जाणार होते. त्या अगोदर ही माहिती मिळणे आवश्यक होते. अगदी शेवटच्या क्षणाला ही माहिती प्राप्त झालेली आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर सदर माहितीच्या पृष्ठाची इमेज मी येथे देईनच. तथापि तुम्हा सर्वांना सदर ग्रंथाची एक-एक प्रत भेट द्यावयाची इच्छा आहे. त्यामुळे शक्य असेल तर साहित्यसंमेलन नंतर मला आपला पत्ता मेल करावा किंवा ओळख अबाधित ठेवावयाची असेल साहित्य संमेलन नंतर मी आपणास पुण्यातील ग्रंथ उपलब्धीचा पत्ता कळवतो. आपला कोणीही प्रतिनिधी पाठवून तेथून ग्रंथभेट घेऊन जावी अशी माझी नम्र विनंती. पुनश्च आपणा सर्वांचे तसेच मायबोलीचे धन्यवाद.
आपला नम्र
अविनाश देशपांडे, कोल्हापूर

तुम्ही जरा नेटाने इंटरनेट धुंडाळलं असतं तर हा प्रश्न आधीच सुटला असता Happy
ही दोन्ही नावं बर्‍यापैकी प्रसिद्ध आहेत. हिस्टरी ऑफ जपान आणि या दोघांची नावं गूगलून बघितली असती तरी उत्तरं मिळाली असती असं वाटतं.
तुमच्या सद्भावना पोचल्या. धन्यवाद. पण यात कुठलीही दैवी योजना वगैरे काहीही नाही - कधीतरी कॉलेजमधे अवांतर म्हणून वाचलेला आधुनिक जपानचा इतिहास आठवला एवढंच.

गामाजी,
प्रारंभी इनपूट देण्यात माझी थोडी गडबड झाली होती. सन 1935 चा माझा संदर्भ चुकीचा होता. मी वर लिहिल्याप्रमाणे सन 1910 संदर्भाने शोध घ्यायला हवा होता. तसेच मी यंत्रविद्या (मेकॅनिकल)/ भौतिकशास्त्र या संदर्भाने शोध घेत होतो. तथापि सैन्यात देखील मेकॅनिकल शाखा असते. त्या अनुषंगाने पाहिले नव्हते.
त्यामुळे आपणाला अपेक्षित असणारे ते दोघे म्हणजे अ‍ॅडमिरल टोगो आणि अ‍ॅडमिरल ओयामा असावेत अशी दाट शक्यता आहे. तथापि यंत्रविद्या/भौतिकशास्त्र/मेकॅनिकल एन्जिनिअरिंग च्या अनुषंगाने सन १९१० च्या दरम्यान ओयामा-टोगो अशी जोडगोळी आढळली अजूनही उद्या किंवाअगदी परवापर्यंत तर येथे जरूर लिहावे.
धन्यवाद

अविनाश,

कोडे सुटल्याचं वाचून आनंद झाला. Happy याचे बहुतांश श्रेय वरदा यांचे आहे. त्यांनी पहिल्या संदेशातच दोन्ही नावे अचूकपणे ओळखली.

आ.न.,
-गा.पै.

सप्रेम नमस्कार
आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे पुस्तक प्रसिद्ध झाले. सदर ग्रंथातील उक्तपृष्ठ व मृखपृष्ठ पुढे दिलेले आहे. तथापि येथे ते देण्यासाठी थोडा वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व. वरदा, अश्विनीमामी, महेश, गामा-पैलवान आणि -सचिन- जी; तुम्हा सर्वांचे पुनश्च धन्यवाद. जर तुम्हाला ग्रंथ हवा असल्यास मला जरूर मेल करावा. मी तो पाठवून देण्याची व्यवस्था करीन.
आपला नम्र
अविनाश देशपांडे
GAJANAN.jpgUntitled-2.jpg

पुण्यात आप्पा बळवंत चौकातील उज्ज्वल ग्रंथ भांडार यांचेकडे. अन्य ठिकाणी हवे असेल तर मी उपलब्ध करून देऊ शकेन. सदर 1/8 डेमीसाईज ग्रंथाची पृष्ठसंख्या (16 रंगीत पृष्ठांसह) 400 असून मूल्य 150/- आहे.