अ‍ॅन्ड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर (शतशब्दकथा)

Submitted by कविन on 9 December, 2013 - 03:14

ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
ह्या वाक्यापाशी संपते "त्यांची" कहाणी.

सुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.
घरात लग्नाची बहिण आहे, समाज काय म्हणेल? पासून
"हाच तुझा निर्णय असेल तर आ‌ईबाप मेले समज"
इतपर्यंत विरोध करुन पाहिला दोघांच्याही घरच्यांनी

पण ही दोघे ठाम होती स्वत:च्या निर्णयावर.

तडजोडीशिवाय आयुष्य नाही हे त्यांनाही माहित होतं पण,
आयुष्यभर् मुखवटा चढवून नात्याला फसवत जगण्यासारखं दुसरं दु:खं नाही हे ही पटलं होतं.

इन्डीविज्युअल म्हणून चांगले असलो तरी एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही हे लक्षात आलं,
तेव्हा निभावून् नेण्याचं नाटक करायचं नाकारत ते वेळीच वेगळे झाले

म्हणूनच लिहिलं

ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
ह्या वाक्यापाशी संपते "त्यांची" कहाणी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता, पुन्हा एकदा हात फिरवणार का कथेवरून? तुला काय मांडायचंय हे स्पष्ट होत नाहीये...

कवीन , खूप सुंदर कलाटणी वाचणाऱ्याच्या आकलनशक्तीला घ्यायला लावली आहेस.
''....आणि नंतर ते सुखाने राहू लागले'' हा शेवट इथे विरोध साहून प्रेमात पडून लग्न केलेल्यांच्या कथेचा नाही , तर विरोध साहून स्वत:शी प्रामाणिक राहून विभक्त होणाऱ्या जोडप्याचा आहे.

सुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.>> हे वाक्य वाचल्यावर 'पुढे विरोध मावळला असेल' अशी वाचकांची धारणा होते, नंतर तिला पुष्टीही मिळते. इतका टोकाचा विरोध असल्यामुळे हा प्रेमविवाह असणार हे गृहितक वाचक आपोआप मांडतात. पण <<एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही हे लक्षात आ>> हे वाक्य वाचून असं मनात येतं की, अरे! इतके समजूतदार आहेत दोघे तर आपण एकमेकांना पूरक नाही हे आधीच कसे नाही कळले यांना?

'परस्परसमजुतीने लग्नाआधीच वेगळे होणे' या संकल्पनेवर आधारीत कथा आहे हे पोचतंय, पण मधल्या साखळ्या व्यवस्थित गुंफल्या गेल्या नाहीयेत असं मला वाटतं.
रागवू नकोस कविता Happy

इतके समजूतदार आहेत दोघे तर आपण एकमेकांना पूरक नाही हे आधीच कसे नाही कळले यांना? >> +१

आणि जर त्यांचे एकमेकांवर खरेच प्रेम होते तर ते विभक्त झाल्यावर हॅपिली कसे राहू शकणार? ती जखम तर रहाणारच ना? जखम भरून येईल पण तिचा व्रण तरी उरणारच ना?

माधव +१/
जल्ला अंडरस्टॅण्डिंगमधे घोटाला झाला.

मला रसग्रहण करायचे नाही , पण काही जोडपी वेगळे झाल्यानंतर जे काही सुख्,समाधान ,मोकळेपण अनुभवतात ,ती जी काही to be at peace ची भावना असते ती मात्र खुप खरी असते. लोकांना उगीचच वाटते दु:खी असतील म्हणुन.

मस्तच लिहिलंय कविता!!
भारतीताई >>> + १००
मंजूडी, 'परस्परसमजुतीने लग्नाआधीच वेगळे होणे' ही नाही, तर 'लग्नानंतर "इन्डीविज्युअल म्हणून चांगले असलो तरी एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही" हे उमगून परस्परसमजुतीने घटस्फोट' ही संकल्पना ठेवून वाचून बघ!
"सुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.. " हा प्रेमाला वा लग्नाला नाही, तर घटस्फोटाला.......

परस्परसमजुतीने घटस्फोट>>> ओह..... ओके! हे पटतंय, आणि त्या दृष्टीने कथा वाचल्यावर अडखळायला होत नाहीये. Happy

थँक्यू ओवी Happy

आँ?! सगळ्यांना घरातल्यांच्या विरोधाचे कारण एकच वाटतेय का? घटस्फोटाला पण असू शकतोच नां 'टोकाचा' विरोध.... आणि "घरात लग्नाची बहिण आहे, समाज काय म्हणेल? ..." इ इ कारणे.....

"आयुष्यभर् मुखवटा चढवून नात्याला फसवत जगण्यासारखं दुसरं दु:खं नाही हे ही पटलं होतं."
"तेव्हा निभावून् नेण्याचं नाटक करायचं नाकारत ते वेळीच वेगळे झाले " >>>> ही वाक्ये काही वेगळं सुचवतात नां?

आणि त्या नात्याच्या घुसमटीतून मोकळे झाले घटस्फोट घेऊन, म्हणून तर मग "ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.. " Happy

नंदिनी ने एडिटल्याने ह्या पोस्टची हवाच गेलीये..... पण राहूदेत आता!
परत एकदा, मस्तच कविता!!

धन्यवाद मनापासून Happy

arc, ओवी बरोबर पकडलयत काय म्हणायचय ते.

आता बदल केल्यामुळे थोडी थेट झालेय कदाचित त्यामुळे पंच कमी झालाय पण त्यामुळे काय म्हणायचय ते पोहोचतय जास्त पटकन कदाचित.

मंजे, राग कशाबदल? प्रामाणिक मत नाही दिलत (निदान मी ज्यांना आणि मला ज्या ओळखतात त्यांनी तरी) तर वाईट वाटेल मला.

अरे! इतके समजूतदार आहेत दोघे तर आपण एकमेकांना पूरक नाही हे आधीच कसे नाही कळले यांना?>>>नाही समजत कधी कधी. कधी प्रायॉरिटीज बदलतात. कधी अजून काही गोष्टी मधे येतात. आधी छोट्या वाटणार्‍या गोष्टी नंतर मोठ्या होतात. कधी आपापले आनंद शोधताना कॉमन छेदून जाणारी वर्तुळं कमी होत जातात आणि अंतर वाढत जातं. दोन समजुतदार माणसांनाही ते कॉम्पॅटिबल नाहीत हे चोवीस तास एकत्र रहायला लागल्यावर कळू शकतं, वेगळं व्हावसं वाटू शकतं. आणि घटस्फोट हा तितकाही वाईट नसतोप्रत्येक वेळी

माधव, जखम होणं/ व्रण रहाणं हे तर असणारच. माणूस जातो तेव्हा बाकीचे समजावतात राहिलेल्याला की दैवा ओउढे काय चालतं का कोणाचं? काळ हेच औषध आहे. तसच हे. नातं टिकवण्याने अधीक घुसमट होतेय असं वाटून ती दोघे वेगळी झाली असतील तर ते जखम चिघळण्या आधी केलेले उपाय असू शकतील.

दे लिव्ह्ड हॅपिली ... ह्या वाक्या पाशी संपते "त्यांची" कहाणी >> मधे "त्यांची" कहाणी तिथेच संपतेय. ह्यापुढे जे काही तयार होईल, त्यांच्या पुढील आयुष्यात ती "त्यांची" एकत्रीत कहाणी नसेल. ती तिची आणि त्याची वेगळी कहाणी असेल. आत्ता तरी नात्यांमधली घुसमट थांबवून स्वतःशी प्रामाणिक राहून त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेऊन "दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.." असा स्टॅन्ड घेत "त्यांची" कहाणी संपवलेय.

अरे! इतके समजूतदार आहेत दोघे तर आपण एकमेकांना पूरक नाही हे आधीच कसे नाही कळले यांना?>>> आता दृष्टीकोन बदलल्यामुळे माझं हे निरीक्षण व्हॅलिड नाही Happy
तो पूर्ण प्रतिसादच आता इन्व्हॅलिड आहे Wink

कविता, तू म्हणते आहेस ते पटतय.

पण 'अ‍ॅन्ड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर' याचा अर्थ माझ्या डोक्यात 'आणि पुढे त्यांनी सुखाने संसार केला' असाच आहे. त्यामुळे तुझे म्हणणे पचायला थोडे जड जातय.

नाही नाही, हे असंच छान वाटतंय.. अचुक शेवट नको गोष्ट वाचल्यासारखं होईल. फार उत्तम जमलेय Happy

कवे, त्रयस्थाच्या नजरेतून तू म्हणतेयस ते पटतंय. पण 'त्या' दोघांच्या मनातलं द्वंद्व हे भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर असं दोन विरुद्ध दिशेने चालू असेल. भावना, जीव गुंतल्यामुळे असं सहजासहजी फक्त व्यवहार समोर ठेवून सगळं तोडून टाकणं सोपं जाणार नाही. व्यावहारिक जीवन, लौकिकदृष्ट्या वेगवेगळे संसार यशस्वी होतीलही कारण त्यात डिफरन्सेस नसतील (नव्या संसारातही डिफरन्सेस असणारच पण ते जुगारात फेकलेल्या फाश्यांप्रमाणे जसं दान पडेल तसे स्वीकारलेले असतील) पण कुठेतरी काळजाचा एक छोटासा तुकडा एकमेकांजवळ मागे राहून गेलेला असेल.

"म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं" - कुसुमाग्रज

अजून एक असंही वाटून गेलं, की इतकं प्रेम होतं तर आपली मानलेली व्यक्ती जशी आहे तशी स्विकारता येत नाही का? एकमेकांच्या छोट्या मोठ्या चुका माफ करता येत नाहीत का? परफेक्ट मॅच कुणीच नसतं पण परस्परांतील प्रेम हे सगळ्यात मोठं ठरलं पाहिजे.

"शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं..." - कुसुमाग्रज

पुर्णपणे भिन्न व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीही निव्वळ प्रेमापोटी आपापली इन्डिविज्युआलिटी राखूनही अश्या दूध साखरेसारख्या एकमेकांत मिसळून गेलेल्या दिसतात की त्यांना कुणी वेगळं करु शकत नाही.

"प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं" - कुसुमाग्रज
--------------------
अपवाद........जिथे माणुसकी सातत्याने सोडली जातेय, गुन्हेगारी प्रवृत्ती आढळतेय, इजा केली जातेय, आदरच राहिला नाहिये.

Pages