होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुक्रवार दि. २४ जानेवारी २०१४ : अपडेट

~ सर्व स्त्रिया [अर्थात आजी आणि जान्हवी वगळता] मुख्य हॉलमध्ये बसून श्री च्या गैरहजेरीविषयीची चर्चा करीत आहेत. नर्मदाआई आणि इंदूआई विरोधात बोलतात पण शरयू मात्र श्री विषयी नित्याप्रमाणे चांगलेच बोलत आहे. तर बेबीआत्या काहीशा चिडीने "असे वाटते की जावे तो जिथे आहे तिथे आणि त्याला सक्तीने ओढून घेऊन घरी यावे. आईची तब्येत कशी झाली आहे हे त्याला दाखविले पाहिजे. आणि आईला जर काही झाले तर ?" यावर अन्य स्त्रिया तिला शांत करतात. शेवटी बेबीआत्याच जाहीर करते की याला उपाय एकच म्हणजे जान्हवी. तीच यातून काहीतरी मार्ग काढेल. इतक्या दिवसानंतर जान्हवीचे महत्व समजले याचा आनंद अर्थातच नर्मदाबाईना होतो. जान्हवी घरी आल्यानंतर तिला सांगायचे ठरते.

जान्हवी इकडे फ्लॅटवर श्री सोबत आहे....श्रीरंगराव कॉटवर पहुडले आहेत शेषनारायणासारखे आणि ही लक्ष्मी वाटणारी बायको त्याच्या डोक्याला मालिश करीत शांत बसली आहे. श्री म्हणतो, "जान्हवी काही गोष्टी आपण फार मनाला लावून घेतो, नाही का ? म्हणजे मॅटर ऑफ फॅक्ट असा कधी विचारच आपल्याकडून कधी केला जात नाही. प्रत्येक गोष्टीला आपण भावना चिकटवितो, त्याची काही गरज नाही." गोंधळलेली जान्हवी त्याला थेट विचारते, "तू हे कशाबद्दल बोलत आहेस श्री ?" यावर काय खुलासा करावा यावर विचारात पडलेला श्री तिला उदाहरण देतो, "समज मला सर्दीखोकला झाला आहे....त्याचवेळी तूदेखील दोन दिवस तापाने आजारी आहेस. पण मला खोकला झालेला पाहून तुला तुझ्या अंगातील तापाचा विसर पडला आहे आणि माझा खोकलाच तुझ्या दृष्टीने महत्वाचा ठरला आहे. मग तू माझ्या सेवेसाठी माझ्या शेजारी बसणार, माझा जंतूसंसर्ग तुला लागून तू आणखीन तापाने फणफणणार हे जरी सत्य असले तरी त्याची तुला पर्वा नाही...कारण तुला स्वतःची तब्येत सांभाळण्यापेक्षा माझ्याबद्दल असलेली भावना सांभाळणे महत्वाचे वाटते." जान्हवी त्याला म्हणते, "मी असे करते का श्री..." श्री उत्तरतो, "तू नाही, मी फक्त उदाहरण अशासाठी दिले की लोक प्रॅक्टिकली का विचार करीत नाहीत ? सतात भावनांचा गुंता करायचा आणि मग तो सोडवत बसायचा." यापुढे श्री जान्हवीला आपल्या कॉलेजमधील एका प्रोफेसरांचे उदाहरणही सांगतो. त्यामध्ये एका सामान्य माणसाने मला कृष्ण म्हणा असे म्हणत गेला आणि असे सांगत जवळपास त्याच्या अंगात कृष्ण शिरला....तो माणूस पुढे छान जगला....पण एका सामान्य माणसाच्या अंगात कृष्ण ही कल्पना वर्गात पसंत न पडल्याने सरांवर विद्यार्थी खूप चिडले, इतके की त्यांच्यावर चप्पलही फेकण्याइतपत प्रसंग गेला. कृष्णाने त्याला काय सांगितले यापेक्षा त्या माणसाने कृष्णाचे नाव सांगून काय काम केले हे कुणी पाहिलेच नाही." इथे जान्हवी श्री ला थांबविते, म्हणते, "श्री, आज तू खूप अतर्क्य बोलत आहेस....तू झोप आता...मी जाते घरी" असे सांगून तिथून निघते....श्री ती जाईपर्यंत एका बाजूला मुकाट पडून आहे, मात्र ती जाताच तिच्या जाण्याकडे पाहात राहतो.

आता पुढील प्रसंग म्हणजे प्रेक्षकांच्या सहनशक्तीचा अंत पाहाणारा....अर्थात अनिल आपटेची बकबक आणि पिंट्याने त्याच्यासमोर अगदी शेळीसारखा अवतार करून तो देत असलेला वडापावाचा नाष्टा खात बसणे. हॉटेलमध्ये बसले आहेत दोघे....आणि आपटे मोठ्या शिताफीने श्री व जान्हवी वेगळे राहात आहेत ही बातमी खुबीने पिंट्याकडून काढून घेतो. एरव्ही हुशारीने वर्तन करणारा तो भाऊ इथे मात्र श्री कुठल्या बिल्डिंगमध्ये राहतो, त्या अपार्टमेन्टचे नाव काय, घर नंबर काय, कुठून कुठे जायचे याची सारी माहिती आपटेला पुरवितो. आपटे अगदी न चुकता ही सारी माहिती आपल्या डायरीत टिपून घेतो. इतके सांगून ज्यावेळी पिंट्या धंद्यासाठी पैशाची बात करतो त्यावेळी त्याला व्यवस्थित बगलही आपटे देतो.

जान्हवी घरी आलेली आहे. सार्‍या आया किचनमध्ये टेबलभोवती आहेत. जान्हवी आल्यावर चिडीचूप होते त्यामुळे जान्हवी विचारते, "बोला ना, काही विचारायचे आहे का ?" शरयू काही बोलणार तोच बेबीआत्या येते, म्हणते, "जान्हवी, श्री बद्दल तुला विचारायचे आहे. श्री ने काय गोंधळ घालून ठेवला आहे हे तुला माहीत आहे ना ? पैसे ट्रान्स्फर करण्याबद्दल..." बॅन्केत असल्याने जान्हवीला ते माहीत आहेच. ती होकार देते. नर्मदाआई, इंदूआई आणि बेबीआत्या श्री च्या भूमिकेने नाराज आहेत. आजीला त्रास होत असूनही श्री हट्टाने आपली गोष्ट ऐकत नाही. त्याला सर्वांनी सुनावले पाहिजे; पण शरयू म्हणते, "आपण त्याचेही म्हणणे ऐकले पाहिजे." यावर जान्हवी म्हणते, "तुम्ही काहीही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी प्रथम माझे ऐका. असले काही प्रकार करून तो परत येणार नाही." यावर नर्मदाआई रडू लागताच जान्हवी त्यांच्याजवळ जाऊन म्हणते, "आई, मलाही तो घरी परत यायला हवाच, पण आपण म्हणतो म्हणून तो येईल असे नाही...मी आईआजींशी बोलते आणि ठरविते. माझ्यावर विश्वास ठेवा." यावर बेबीआत्या म्हणते, "मग काय करायचे ?" यावर जान्हवी म्हणते, "आपण प्रॅक्टिकल राह्यचे.....मॅटर ऑफ फॅक्ट...".

सकाळी जान्हवी चहा घेऊन आजींच्या रूममध्ये आली आहे. चहा घेताघेता आजी विचारतात, "काल रात्री खूप उशीरा आलीस का घरी ?" याला कसलाही आडपडदा न ठेवता जान्हवी उत्तरते, "हो, मी काल रात्री श्री कडे गेले होते." आजींना हे प्रामाणिक उत्तर खूप आवडते. आता त्या मोकळ्या मनाने नातसुनेशी बोलत राहातात. श्री च्या आठवणी निघतात....त्यानंतर एका क्षणी म्हणूनही जातात "पण आता हे नक्की झाले आहे की श्री परत या घरी येणार नाही." इथे प्रथमच कणखर झालेली जान्हवी म्हणत, "म्हणूनच, आपण त्याला बोलवायचेच नाही." या उत्तराने काहीशा अस्वस्थ झालेल्या आजी विचारतात, "म्हणजे ?" जान्हवी उत्तरते, "म्हणजे आईआजी आपण अशी परिस्थिती इथे निर्माण करायची की ज्यामुळे त्याला स्वतःला वाटेल की आपण आता इथे आले पाहिजे...." आजी गोंधळून म्हणतात, "तू काय म्हणत आहेस हे मला कळले नाही...." यावर अगदी गूढपणे हसत जान्हवी उत्तरते, "पण मला आता कळले आहे....कृष्णनीती."....दोघी हसत आहेत.

आता जान्हवी एक प्लॅन आजीना सांगते. पण आजी म्हणतात, "नाही नाही, मी असला खोटेपणा करणार नाही." जान्हवी त्याना "हा खोटेपणा नाही आजी. कंपनीच्या हितासाठी तुम्ही कधीतरी स्वतःच्या मताला मुरड घातली असेलच ना....त्यातीलच हा एक प्रकार. आजी या जगात प्रेमापेक्षा दुसरे काही मोठे नसते असे मानले जाते. प्रेम जिव्हाळा माया यातील आपल्याजवळ काही नसेल तर सारे काही व्यर्थ असे मानतात. हे पटत ना तुम्हाला...?" या प्रश्नाला आजी "हो.." असे उत्तर देतात...त्यावर चलाखीने हसत जान्हवी म्हणते, "मग काही वेळा प्रेमात आणि युद्धात यासाठी थोडेफार मागेपुढे चालते आजी." आजी विचारतात, "तू म्हणतेस तसे मी केले तर ?" "तर कदाचित श्री कंपनी सोडून जाणार नाही..." असे आनंदाने जान्हवी सांगते. इथे महाभारतात धर्मराजावर आलेल्या "नरो वा कुंजरो" हा वादही चर्चेला आला...त्यालाही जान्हवी चलाखीने उत्तर देते....एकूण जान्हवीने आजीला जिंकले आहे आणि दोघी काहीतरी मार्ग निघाला म्हणून आनंदाने एकमेकीला टाळ्या देतात....ते बेबीआत्या पाहाते.

मंडळी....

आजचा वृत्तांत काहीसा दीर्घ झाला आहे. त्याला कारण म्हणजे प्रथमच आईआजी आणि जान्हवी यांच्यात मनोमिलन होऊन श्री ला घरी आणलेच पाहिजे का ? किंवा त्याला बाहेर ठेवून आपण असे काही वातावरण इथे निर्माण करायचे की जेणेकरून त्यालाच वाटायला हवे की आपण बाहेर राहू शकत नाही....हे संवाद तसे मोठे असल्याने वृत्तांतही काहीसा सुदृढ झाला आहे. कृपया समजून घ्यावे.

मी_चिऊ....सॉरी, थोडा वेळ लागला...पण वाचल्यानंतर समजेल की का वेळ लागला.

मामा छान अपडेट्स. मला जान्हवीची कृष्णनीतीची कल्पना आवडली, आता निदान मालिकेत थोडे वेगळे काहीतरी चांगले दाखवतील ही आशा.

पिंट्याचे मला खूप वाईट वाटतेय आणि राग येतोय त्या आपटेच्या नादाला लागून हा मुलगा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार, जान्हवीच्या कृष्णनीतीची इथेही गरज आहे.

ओ...सॉरी बेफिकीर....खरं सांगायचं म्हणजे खुद्द मलाही आजचा वृत्तांत काहीसा मोठा झाला आहे हे पटले होते; पण श्री, जान्हवी आणि आजी यानी कृष्णनीतीचा मुद्दा चर्चेत आणल्यामुळे आज दृष्यांपेक्षा चर्चेचे मुद्दे जास्त होते. त्यामुळे अपडेटची लांबी काहीशी लांबली आहे. त्याबद्दल मी खुलासाही केला आहे.

उद्यापासून असे होणार नाही याची काळजी घेतो.

येस अन्जू.... कृष्णनीतीची बाब जान्हवीने गंभीरतेने घेतली आहे आणि विशेष म्हणजे तिने कौशल्याने आजींच्या मनी ठसविले आहे....ती विस्ताराने उद्यापरवा आपल्याला समजेलच....पण यामुळे जान्हवीचे गोखल्यांच्या घरातील स्थान बळकट झाले आहे.

आणि होय....पिंट्या परिस्थितीने गांजलेला आहे हे मान्य....पण त्या आपट्याला मुंबईत दुसरे काहीच काम नाही का ? त्या पात्राला पाहिले की त्याच्याविषयी अपडेटमध्ये काहीच लिहू नये असे वाटते; पण तसेही करून चालत नाही.

रोजचे एपिसोड इतका अभ्यास करून योग्य तसे लिहायला लागले तर त्यांना सिरियल बंद करायला लागणार नाही का? << का? त्यांच कामच आहे ना ते?? पैसे घेतात ना त्यासाठी?

बेफि, तुम्हाला काका म्हटल तर चालेल का? Proud

मामा नेहमी प्रमाणे मस्त अपडेट्स! धन्यवाद!!

रोजचे एपिसोड इतका अभ्यास करून योग्य तसे लिहायला लागले तर त्यांना सिरियल बंद करायला लागणार नाही का? <<< हे कुठे आहे?? रोजची सीरीयल असली तरी तीन चार एपिसोडे आधी शूट करून ठेवलेले असतात. शिवय महिन्याभराचे शेड्युल (कथा-महत्त्वाच्या घटना इत्यादि) आधीच तयार करून ठेवलेले असते.

कालचा भाग आवडला. गोकुळात टाळ्या देऊन हसणं सुरु झालं.
मूग डोश्यांनंतर आता आपटे जान्हवीला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणार असं वाटतय.

चला जान्हवी जरातरी इतर मालिकांमधल्या सुनांपेक्षा वेगळी वागली, म्हणजे आपल्याकडे डोक आहे आणि त्याचा वापर त्यावर असलेले केस विंचरणे सोडुन सुद्धा करता येतो हे लक्षात येउन कृष्णनीतीने श्रीला घरी घेउन येण्याच्या योजना आखते आहे... शाब्बास...

त्या पिंट्याला आपटे बाबाच्या नादी लावु नये दिग्दर्शकाने... बिचारा आधीच स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडतोय, आई-बाबांची बोलणी खातोय त्यात हा उपटलाय Angry

आज पर्यंत कधिही मी हि सिरीयल पाहिली नाही त्यामुळे बाकी कलाकार कोण -काय काहिही माहिती नाही ,पण या बाफ मुळे रोजची सगळी डिटेल्स कळतात.हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू!!

मामा अपडेट्स लहान वगैरे करायच्या भानगडीत पडु नका हं ,वाचायला छान वाटतं.खरं तर या न बघितलेल्या सिरीयल मध्ये मी तुमचीच फॅन झाले आहे.:)

सुखदा.... किमान कलाकारांची तोंडओळख व्हावी या उद्देशाने का होईना पण निदान तीनचार भाग तू जरूर बघ या मालिकेचे. श्री जान्हवी यानी तर सार्‍या महाराष्ट्राची मने जिंकली आहेतच, शिवाय अन्य पात्रांनीही आपापल्या वकुबाप्रमाणे मालिकेच्या लोकप्रियतेत भर घातली आहे, घालत आहेत.

बाकी....रोजचे हे अपडेट तुझ्यासारख्या भाचीला आवडतात हे पाहून कोणत्या मामाला आनंद होणार नाही ? मलाही झालाच. धन्यवाद.

अशोकमामा मी सुद्धा ह्या धाग्यावर येते ते तुमचे अपडेट वाचण्यासाठी. मी सुद्धा हा कार्यक्रम आता बघणे बंद केले आहे.
पण तुम्ही आणि बेफ़िकीर ह्यांचे अपडेट वाचावयास इथे येते.

अशोकमामा मी सुद्धा ह्या धाग्यावर येते ते तुमचे अपडेट वाचण्यासाठी. मी सुद्धा हा कार्यक्रम आता बघणे बंद केले आहे.
पण तुम्ही आणि बेफ़िकीर ह्यांचे अपडेट वाचावयास इथे येते. >>> १०० टक्के खरं... मृणाल तुम्ही तर 'मेरे मूँह की बात छिन ली हो....!' Happy

मृणाल....आणि जान्हवी....

धन्यवाद मी म्हणतोच तुम्हाला....पण तुम्हीच उद्या म्हणाल, "मामा कधी भाच्यांना धन्यवाद देतो का ?" त्यामुळे दिले असे वाटले तरी ते दिलेले नाहीतच असे समजून स्वीकारा.

बाकी "मृणाल" हे नाव मला खूप आवडते...विशेषतः या नावाचे बंगाली रुपडे "मृण्मयी"....फार शांत लोभस नाव आहे.

विशेषतः या नावाचे बंगाली रुपडे "मृण्मयी"....फार शांत लोभस नाव आहे.<<<

हे मृदेवींनी वाचले तर त्यांना अभूतपूर्व धक्का बसेल. Light 1

<बाकी "मृणाल" हे नाव मला खूप आवडते...विशेषतः या नावाचे बंगाली रुपडे "मृण्मयी"....फार शांत लोभस नाव आहे.>
मृणाल आणि मृण्मयी हे दोन्ही स्वतंत्र शब्द आहेत.

.....मृणाल आणि मृण्मयी हे दोन्ही स्वतंत्र शब्द आहेत....

~ हरकत नाही. पण मग दोन्हीही सुंदरच म्हटली पाहिजेत. बंगाली उच्चार "मृण्मोयी...Mrinmoyee" असाही करतात असे दिसले [कपालकुंडला या देवीचे आणखीन एक नाव आहे हे].

अपर्णा सेन अभिनित "तीन कन्या" चित्रपटात तिचे नाव "मृण्मोयी" असे होते. "मृणाल" हे नाव आपण इथे महाराष्ट्रात स्त्री चे म्हणून वापरतो पण बंगालात ते पुरुषाचे {उदा. मृणाल सेन} नाव आहे.

आज चक्क जानूच्या "विजया बँकेत" आणखीन दोन बायका ( स्टाफ म्हणून ) दिसल्या. अय्या यांच्या बँकेत अजून पण स्टाफ आहे. मला वाटल या दोघीच. तो बँक मनेजर ( अतुल परचुरे )असा डोक्यावर पडल्यासारखा सारखाच काय वागतो Happy कधीही काम करताना दिसत नाही. सारख आपल स्मितू स्मितू आणि स्मितू Happy

अशोकमामा, माझी या बाफवरची पहिली पोस्ट, खास तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी.
पहिल्या एपिसोडपासुन मी हा बाफ नियमित वाचते, अगदी रोज, न चुकता. इथे बहुतेक सगळे (काही अपवाद वगळता) मालिका बघण्याचे जराही कष्ट न घेता केवळ तुमच्या अपडेट वाचतात. (मी ही त्यातलीच एक आळशी मुलगी आहे) कुणीही काहिही सांगितले तरी तुम्ही बिनधास्त दिर्घ वृत्तांत द्या.
सुरुवातीचे काही एपिसोड मी पाहिले होते पण ते आईआजी, मोठी आई, धाकटी आई, लहान आई हे सगळे न पटल्यामुळे मी हि मालिका बघणे बंद केले.
आजी, आई, आत्या, काकु, मावशी, मामी हि नाती मंदे यांना माहित नसावीत हे मला अजिबात पटले नाही.
पण तुमच्या अपडेट वाचल्याशिवाय मला करमत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद.

शनिवार दि. २५ जानेवारी २०१४ : अपडेट

~ धमाल होती आज जान्हवीची आणि तिच्या मैत्रीची...आईआजीशी झालेल्या. ही नातसून तंग वातावरणातून आता मुक्त झाली आहे आणि गोखले कुटुंबाची प्रमुख भागीरथीबाई गोखले यांच्या गळ्यातील ताईत बनत आहे त्यामुळे झालेल्या आनंदात ती अगदी डुंबून गेली आहे....तिची आणि आजीची अगदी लहान मुलांसारखी मैत्री पाहून बेबीआत्यालाही समाधान वाटते व तिने नर्मदाआई आणि सरसूमावशीला तसे सांगितल्यावर त्या दोघींचा प्रथम अविश्वास आणि नंतर त्यानाही "हे जान्हवीच करू जाणे..." असे म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव. हे सारे मालिकेतील वातावरण हलकेफुलके होण्यास मदत करीत आहेत हे नक्की.

पण त्या आधी श्री ज्या फ्लॅटमध्ये राहतो आहे, तिथून भागाची सुरुवात झाली. तो कार्यालयात फोन करून मीटिंगच्या तयारीच्या सूचना संबंधितांना देत असतानाच दरवाजावर पडलेली थाप त्याला ऐकू येते. तो दरवाजा उघडतो, पाहतो ते नंदन श्री साठी जेवणाचा डबा घेऊन आलेला आहे. श्री त्याला पाहून आनंदीत होतो. नंदन "इथून पुढे मी तुम्हाला सकाळ संध्याकाळ डबा घेऊन येतो..." पण श्री त्याला थांबवितो, म्हणतो "नको, जान्हवी त्या निमित्ताने इथे येत असते. ती जेवण करते आणि मग मी जेवतो. तू बस इथे आणि आपण बोलू या...." नंदन बसत नाही कारण तो म्हणतो माझा तो दर्जा नाही. श्री त्याला म्हणतो, "अरे मी काही आता मालक राहिलेलो नाही. तुझ्यासारखाच एक नोकर झालो आहे. तेव्हा तू माझ काही काळजी करू नकोस. बरे थांब, मला आता डबा नको म्हणून जान्हवीला फोनवरून सांगतो...." असे म्हणत तो जान्हवीला फोन करतो, तेव्हा ती नेमकी आईआजीच्या रूममध्ये असते आणि फोनवर नवर्‍याचे नाव पाहताच काहीशी चपापते. आजी विचारतात, "कुणाचा ?" तर आता जान्हवी काहीही लपवाछपवी करायची नाही उलट सर्व काही उघडपणे सांगायचे असे म्हणत "श्री चा आहे". यावर त्याच्याशी बोल असे आजी म्हणतात. पण जान्हवी त्याला सांगते, "मला कळाले नंदन डबा घेऊन आला आहे...पण मी तुझ्याशी नंतर बोलते...." पण तो "बोल ना आताच....का बोलत नाहीस ?" असे विचारल्यावर ती "परत करते ना" असे दबक्या आवाजात म्हटल्यावर त्याला योग्य ती शंका येते आणि तो फोन ठेवतो. आजी जान्हवीला विचारतात "काय चालले होते ?" तर ही सांगते "श्री ला डबा नंदन घेऊन गेला असल्यामुळे बरं झालं म्हणजे आता मला डबा घेऊन जायला नको..." असे सहजी भोळेपणाने म्हणते आणि आपण हे काय सांगितले हे समजल्यावर ओठ मिटून चूप बसते...हसतेही. आजी खोचकपणे विचारतात, "म्हणजे तू त्याला डबा करून नेत होतीस ?" याला उत्तर देताना जान्हवी आजीकडे पाठ करून परत हसत हसत तिला म्हणते, "आईआजी, आता तुम्ही मला धर्मसंकटात टाकताय !!..." क्षणभर आजी नातसुनेच्या अवस्थेकडे पाहतात आणि खो-खो हसायला सुरुवात करतात अगदी मनमुराद....हसत हसत त्या जान्हवीच्या हातावर हात देऊन टाळीही देतात....जान्हवी त्या आनंदात सहभागी होते....दोघीनी आत्ता एकमेकांना ओळखले आहे खर्‍या अर्थाने....हे मनोमीलन बाहेरून बेबीआत्या पाहते...तिलाही ते दृश्य पाहून आनंदच होतो कारण काहीच तासापूर्वी अगदी कोलमडून गेलेली आई तिने पाहिलेली असते.

बेबीआत्या खाली येऊन हा आनंदी वृत्तांत नर्मदा आणि सरसूमावशी याना सांगते. त्या दोघीना सुरुवातीला ते खरे वाटत नाही; पण बेबीआत्या तर गळ्याची शपथ घेऊन "मी माझ्या डोळ्यांनी हा टाळी देऊन हसतानाचा प्रसंग पाहिला" असे सांगितल्यावर मग विश्वास ठेवला जातो. नर्मदा म्हणतात "मी लग्न झाल्यापासून या घरात आहे पण आईआजीना एकदाही असे हसत टाळी देत बोलताना पाहिलेले नाही..." तर त्यावर बेबीआत्या म्हणते "अगं मी तर तिच्या पोटी जन्म घेतला असूनही तिला अशा आनंदी अवस्थेत पाहिले नाही....बाकी काही का असेना....या सर्वाचे सारे श्रेय आपण जान्हवीला दिले पाहिजे..." सूनेचे कौतुक खुद्द बेबीआत्याने केलेले पाहून नर्मदाबाईनाही आनंद होतो.

इकडे आजी आणि जान्हवीचा आता इथून पुढची कृष्णनीती काय असणार ? यावर मैत्रीपूर्ण खल चालू आहे. जान्हवी म्हणते, "आता तुम्ही गोखले गृहउद्योग इथे बॉससारखेच वर्तन करा. त्याला आत बोलावताना अन्य नोकरांप्रमाणेच वर्तणूक द्या आणि तुमच्या चेहर्‍यावर आपण नातवाशी बोलत आहोत असे अजिबात भासवून देऊ नका..." "मी तशीच वागते गं....ऑफिसमध्ये काम करताना मी सदैव अधिकारानेच वागत असते." याला उत्तर म्हणून जान्हवी म्हणते, "पण आईआजी त्याला नक्की हे माहीत असणार की तुमचे वर्तन अगदी वरवरचे आहे....म्हणजे तुम्ही कितीही आवाज कोरडा करून त्याच्याशी बोलला तरी तुमच्या डोळ्यात त्याला प्रेम दिसत असेलच ना ?" यावर "मग मी आता काय करू ?" असा प्रश्न आजी विचारतात. "तर आजपासून त्याच्याशी वागताना बोलताना एक ठराविक अंतर ठेवा तुमच्यात आणि त्याच्यात. अगदी बॉससारख्या वागा आणि त्याच्याकडून अगदी हवं ते करवून घ्या....आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऑफिसमध्ये तुमच्या वागण्यात आईआजीपणा डोकावू देवू नका..." आजी चिंताग्रस्त दिसतात म्हणतात "हे जमेल का मला?" आत्मविश्वास कमावलेली नातसून म्हणते, "आईआजी तुम्हाला नक्की जमेल...प्रयत्न तरी करून बघा." आजी तिच्याकडे पाहात म्हणतात, "तुझी इतरांना विश्वास देण्याची रीत मला आवडली. पण समज मी असे वागत आहे म्हणून तो आणखीनच बिथरला तर ?" यावर हसून जान्हवी म्हणते, "मग मी आहे ना....मी त्याला बरोबर सांभाळून घेईन. कारण त्याला कुठे माहीत आहे की आपण दोघींनी मिळून हा प्लॅन केला आहे..." आजी परत दिलखुलास हसतात. आजी म्हणतात, "हे सारे करण्यापूर्वी मीच माझा हट्ट काहीसा बाजूला ठेवला असता तर किती बरे झाले असते...." आजीच्या डोळ्यातील पाणी पाहून जान्हवी स्वतःहून त्यांचा तळवा आपल्या हातात घेते आणि शांतपणे म्हणते, "आईआजी, एक लक्षात घ्या. माझे श्रीवर खूप प्रेम आहे. तरीही मी हे सारे तुमच्यासाठी करीत आहे. कारण मलाही तो परत यायला हवा आहे, स्वखुशीने आणि मानाने." आजी समजूतदारपणे नातसुनेकडे पाहतात.

बॅन्केतील दृष्य...नेहमीप्रमाणे जान्हवी कामात आहे. एका कस्टमरला काही कागदपत्रांसंदर्भात सूचना करीत आहे. त्याचवेळी मोबाईल वाजतो. गीताला वाटते तिच्या जिज्जूचा आहे पण जान्हवीला अपेक्षा आहे ती आजीच्या फोनची. मॅनेजर बोरकर त्या दोघींकडे येतात, नित्याप्रमाणे आपल्या बायको आणि सासूसंदर्भातील विनोद करतात आणि निघून जातात. गीता चिडते पण जान्हवी हसून ते प्रकरण सोडते.

गोखले ऑफिस.....एक्सेल शीटवर आजी काही काम करीत आहेत. त्याना त्यातील जास्त माहीत नाही. म्हणून त्या चहा घेऊन आलेल्या नंदनला विचारतात पण तो म्हणतो मी श्री सरांना आत पाठवितो. पण आजी नको त्याला असे सांगतात. शिवदे मॅडम चेक्स सहीसाठी घेऊन येतात. त्याचवेळी आजी लव्हाटेमॅडम ड्युटीवर आल्या का असे विचारतात. पण त्या अजून आलेल्या नसतात. त्यामुळे आजी चिडतात. कर्मचार्‍याने आठवड्यात चारचार दिवस लेट येणे हे त्याना अजिबात पसंत नाही. त्या आल्या की आत पाठवा असे सांगतात. काही वेळाने त्या लव्हाटेमॅडम येतात. लेट आल्यामुळे आजींच्या समोर उभे राहताना त्याना कापरे भरलेले असते. भागीरथीमॅडम त्यांची कोणतीही सबब न ऐकता..."ही शेवटची सूचना आहे तुम्हाला. उद्यापासून ड्युटी वेळेवर सुरू झाली नाही तर तुम्हाला कायदेशीर नोटीस दिली जाईल हे लक्षात ठेवा." त्या बाई थरथरत बाहेर निघून जातात.

आजी जान्हवीला फोन करतात. "मी पैसे ट्रान्स्फर केले त्याच्या अकांउंटवर..." यावर जान्हवी अभावितपणे "बाप रे !" असा उदगार काढते. आजी म्हणतात "तू असे बोललीस तर मग मी काय करायचे ? तुझ्या सांगण्यावरून मी युद्धाला सुरुवात केली आहे ना...मग तू आता पळ काढू नकोस." जान्हवी हसते म्हणते, "नाही आजी....काळजी नको, मी तुमच्याबरोबरच आहे...".

मामा मस्त अपडेट्स. मामा, तुम्ही आता खूप खुश असाल तुमच्या जान्हवीची वट वाढत चालली, अर्थात ती तिने स्व-गुणाने मिळवली.

हो अन्जू....अगदी माझ्या मनातील बोललीस....मी कित्येक दिवस याच प्रसंगाची वाट पाहात होतो की आईआजीने तिला अगदी ममत्वाने जवळ घ्यावे आणि केवळ तिच्याशीच आपल्या मनातील गोष्टी बोलाव्यात. जान्हवी किती तल्लख आहे हे तिला आणि बेबीआत्याला पटले हे ठीक झाल्यामुळे ती खर्‍या अर्थाने आता जान्हवी गोखले झाली, हे मला आवडले.

या सर्वाचे सारे श्रेय आपण जान्हवीला दिले पाहिजे..." सूनेचे कौतुक खुद्द बेबीआत्याने केलेले पाहून नर्मदाबाईनाही आनंद होतो.>>>> नाही मामा, या प्रसंगात सुनेच कौतुक बेबी आत्या नाही करत.. नर्मदाबाईच करतात... सकाळपासुन उदास असलेल्या भागिरथीबाई खूष होण्याच श्रेय मावशीबाई अत्यानंद महाराजांना देउ करतात, तेव्हा नर्मदाबाई म्हणतात की याच श्रेय अत्यानंद महाराजांना नाही तर जान्हवीला आहे, तेव्हा बेबी आत्या थोडी Insecure वाटली... हे मा वै म

म्हणजे नताशा अस की आईला आनंदी पाहुन बेबी आत्याला बर वाटलय पण त्याचबरोबर जान्हवीच वाढत महत्त्व तिला खटकतय अस दिसल

Pages