लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग २ - पहिली दाढ

Submitted by वेल on 30 November, 2013 - 00:10

लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग १ - http://www.maayboli.com/node/46367

*********************************************************************

साधारण साडेपाच सहाव्या वर्षी मुलांना पहिली परमनण्ट दाढ येते. खालच्या बाजूला पहिल्या पाच दातांच्या - दुधाच्या दातांच्या मागे.

ही दाढ सर्वात जास्त महत्वाची दाढ आहे. वाचणार्‍या सगळ्यांनी स्वतःची पहिली दाढ म्हणजे सुळ्यापासून मागे असलेली तिसरी दाढ जरा तपासून पाहा. ९५% वेळेला ह्या दाढेकडे दुर्लक्ष होतं आणि मग कीड साफ करून दाढ भरणे, रूट कॅनाल हे तरी करावच लागतं. अनेकदा ही दाढ खूप लवकर काढलेली असते.

ह्या मागचं प्रमुख कारण म्हणजे ह्या दाढेकडे गैरसमजातून झालेलं दुर्लक्ष. पालकांना वाटतं लहान मुलांचे दात पडून नवे येतात त्यातलीच ही दुधाची दाढ. असाच विचार आपण सुद्धा करताय का? थांबा. ही दाढ - सुळ्याच्या मागची तिसरी दाढ - खालच्या बाजूला साधारणपणे वयाच्या ६-७ वर्षामध्ये आणि वरच्या बाजूला वयाच्या साडेसहा ते साडेसात वर्षामध्ये येते. ती दाढ परमनंट दातांच्या सेट्मधली पहिली दाढ असते. ही दाढ कधीही स्वतःहून पडत नाही आणि तिथे नवीन दाढ येत नाही.

ही दाढ यायला सुरुवात होताना बर्‍याच मुलांना वेगवेगळा त्रास होऊ शकतो. ही दाढ खूप मोठी असते - २४-२५ मिमि इतक्या (मुळांसकट) उंचीची, आणि १.३ सेमीx.8mm एवढी मोठी दाढ हिरडीतून बाहेर येताना तिथे प्रज्ज्वलन (inflammation) जास्त असते. या प्रज्ज्वलनामुळे काही मुले खाण्याकडे दुर्लक्ष करतात. त्या बाजूने चावणे सोडून देतात. रोजचे जेवणदेखील सोडून देऊ शकतात. या प्रज्ज्वलनामुळे मुलांना ताप येऊ शकतो. साडेपाच -साडेसात ह्या वयात आपल्याला वाटले की आपले मूल किरकिर करत आहे, उगाच स्वतःची बोटे चावत आहे, व्यवस्थित खात नाही. तोंडात दुखण्याची तक्रार करत आहे तर मुलांना लगेच डेंटिस्टकडे न्यावे. त्यांना दाढ येत असल्याने प्रज्ज्वलन होत असेल. मुलांनी खाणे बंद केले तर मुलांना केवळ पातळ पदार्थ किंवा चावण्याची गरज नसलेले पदार्थ खायला देऊ नये. मुलांना चावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. पोळी भाजी वरण भात हे पदार्थ अगदी व्यवस्थित चावून खायला सांगावेत. त्यामुळे दाढ येताना कमी त्रास होतो. बरेचदा, दाढ येताना दुखते म्हणून मुले घास तोंडातच ठेवून देतात, त्यामुळे दात / दाढा किडण्याची वेगळीच समस्या तयार होऊ शकते. शिवाय पचनाचे त्रास्देखील होऊ शकतात. अशावेळी डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी जावे.

चावण्याचा सर्वात जास्त भार ६०%, ह्या दाढेवर येतो. त्यामुळे ही दाढ सर्वात जास्त महत्वाची आहे. ह्यानंतरची दुसरी परमनंट दाढ ३५%चावण्याचा भार घेते. आणि तिसरी परमनंट दाढ म्हणजेच अक्कल दाढ ही ५% चावण्याचा भार घेते. त्यामुळे पहिली परमनंट दाढ चावण्याच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्वाची असते. ज्यांच्या पहिल्या परमनंट दाढा काढलेल्या असतात किंवा चाव्याच्या योग्य जागेत नसतात (malocclusion. occlusion means the normal spatial relation of the teeth when the jaws are closed) त्यांना जेवायला जास्त वेळ लागतो किंवा त्यांना पचनाच्या तक्रारी असतात.

ही दाढ जबड्याच्या वाढीसाठीदेखील खूप जास्त महत्वाची आहे. लवकर वयात ही दाढ काढली गेली ७ वर्षे - २१ वर्षे तर जबड्याची वाढ खुंटू आणि खुरटू शकते.

(दाताचे आत तीन भाग असतात. सर्वात बाहेरचा भाग म्हणजे इनॅमल - जो सर्वात जास्त कठीण भाग असतो. ह्या भागाला सेन्सिटिव्हिटि नसते. त्यातील आतला भाग डेंटिन - हा इनॅमल पेक्षा मऊ असतो. ह्या भागामध्ये नर्व्ह एन्डींग्ज असतात त्यामुळे तो सेन्सिटिव्ह असतो. ह्याच्या आतला भाग, जिव्हाळे म्हणजेच पल्प - ह्यात रक्तवाहिन्या आणि नसा (नर्व्हज) असतात.)

मुलांना दाढ येते तेव्हा दाताच्या पल्पची टोके (pulphorn) दाढेच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे ७-९ ह्या वयात दाढेत झालेला छोटासा खड्डा देखील खूप वेदना देऊ शकतो. ह्याशिवाय दाढेच्या नैसर्गिक खाचा खूप खोल किंवा पल्पच्या अगदी जवळ असू शकतात आणि दाढेचे सुळके त्यामानाने जास्त उंच असतात. ह्यामुळे ह्या खाचांमध्ये अन्नकण अडकून राहाण्याची शक्यता खूप वाढते. ह्याशिवाय उंच सुळक्यामुळे, खाचांमधून ब्रश करूनही खाचांमध्ये अडकलेले अन्नकण व्यवस्थित निघत नाहीत. याशिवाय नैसर्गिकरित्या खाचांमधले इनॅमल (इतर जागांच्या मानाने) पातळ असल्याने जास्त लवकर किडते आणि दाढेत खड्डा होतो. (कोणताही दात / दाढ ही तोंडात दिसायला लागल्यापासून लगेचच किडण्याला संवेदनाशील असते - prone/ susceptible to carries/decaying). त्यातल्या त्यात ही दाढ उंच सुळके, खोल खाचा आणि उंच पल्पटोके ह्यामुळे तोंडात दिसायला लागल्यापासून सहा महिन्यात सडणे ह्या अवस्थेला जाऊ शकते. (किडणे म्हणजे इनॅमल किंवा डेंटिन पर्यंत मर्यादित असलेली किड / खड्डा. ह्याचे निवारण दात भरणे हे असते. सडणे म्हणजे पल्पपर्यंत पोहोचलेली किड जिचे निवारण रूट कॅनाल किंवा दात काढणे हे असते. रूट कॅनाल मध्येदातातील पल्प काढून टाकावा लागतो आणि दात निर्जीव होतो.) त्यामुळे पालकांनी ह्या दाढेवर खास लक्ष ठेवून असायला हवे. दाढेच्या वरच्या बाजूला किंवा बाजू च्या भिंतीवर अगदी छोटासा काळा / चॉकलेटी डाग दिसल्यास (जो ब्रशने जात नसेल असा) तर लगेच डेंटिस्टला दाखवले पाहिजे. ह्या दाढा आल्या आल्या दाढांना सीलण्ट करून घेतल्यास दाढ किडण्याची शक्यता खूप कमी होते. याशिवाय दर चार - सहा महिन्यांनी मुलांचे दात तपासून घेतलेले चांगले. ह्यामुळे डोळ्याला न दिसलेला खड्डादेखील लक्षात येऊन दाताचे किडणे तिथेच थांबवता येते.

पहिली दाढ येते तेंव्हा तिची मुळे पूर्णपणे बंद झालेली नसतात (roots are not fused). मुळे पूर्णपणे बंद होण्यास तीन वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे त्याकाळात जर दाढेची किड पल्प पर्यंत पोहोचली तर त्या वयात त्यांचे रूट कॅनाल करता येत नाही. शिवाय लहान वयात एवढी मोठी दाढ काढताही येत नाही. तेव्हा त्या काळात ह्या दाढेची पल्पोटॉमी ही ट्रीटमेण्ट करावी लागते. (पल्पोटॉमी ह्या ट्रीट्मेंटमध्ये दाढांची मुळे नैसर्गिक पद्धतीने वाढू शकतात. ही तात्पुरती ट्रीट्मेण्ट असते.)

पहिली दाढ कमी वयात काढली गेल्यास अनेक दुष्परिणाम होतात.
१. जी पहिली दाढ काढली गेली असेल त्याच्या बाजूची दुसरी दाढ किंवा दुसरी उपदाढ (second premolar - tooth no 5) पहिल्या दाढेच्या जागी झुकू लागते आणि नैसर्गिक चावण्याच्या पद्धतीचे (Occlusion) नुकसान होते. ज्यामुळे चावण्याची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे पचनाचे त्रास उद्भवू शकतात.
२. जी दाढ काढली असेल त्याच्या विरूद्ध बाजूची दाढ त्या दाढेच्या दिशेने, स्वतःची नैसर्गिक जागा सोडून सरकू लागते. यामुळेदेखील नैसर्गिक चावा पद्धतीला अडथळा निर्माण होतो. सरकणार्‍या दाढेखालच्या हाडाची झीज होते. पुढे जाऊन ही दाढ हलून पडण्याची शक्यता वाढते. सरकणार्‍या दाढेच्या बाजूच्या दाढादेखील किडू लागतात.
३. ज्या बाजूची दाढ काढली गेली आहे, त्या बाजूने न चावता आपण दुसर्‍या बाजूने चावू लागतो अशाने जिथे चावले जात नाही त्या बाजूच्या दाढा किडतात आणि त्या भागात हिरड्यांचे आजार होतात.
४. ही दाढ काढल्यामुळे इतर दाढांवर आणि जबड्यांच्या स्नायुंवर जास्त ताण येतो आणि त्यामुळे डोकेदुखीचे प्रमाण वाढू शकते.
५. दाढा सरकायला सुरुवात झाल्याने दातांमधल्या फटीदेखील मोठ्या होतात. वाढलेल्या फटींमध्ये अन्नकण अडकण्याची शक्यता वाढते आणि ते दात किडण्याची शक्यता वाढते.

सारांश - सहाव्या वर्षी येणारी दाढ दुधाचा दात नसतो. त्यामुळे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेजस्विनी१९ - तुम्ही लिहिलय त्यावरून तुमचे दात हायपर सेन्सिटिव्हिटि मध्ये मोडतात असे वाटते. ह्यावर उपाय आहे पण मी तुमचे दात प्रत्यक्ष पाहिलेले नसताना त्यावर उपाय सांगणे योग्य होणार नाही. जास्त योग्य उपाय तुम्हाला दात तपासून घेतल्यावरच मिळेल. तुम्ही एकदा डेंटिस्ट कडे जाऊन या, डेंटिस्ट काय म्हणतो ते ऐका मग आपण तुमच्या दाताच्या प्रॉब्लेम बद्दल अधिक चांगले डिस्कशन करू शकू.

Pages