सरसों का साग

Submitted by प्राची on 27 November, 2013 - 02:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सरसों - १ जुडी
पालक -१ जुडी
बथुआ - १ जुडी
मुळ्याचा पाला - मूठभर
मुळा - अर्धा
कांदा - १ मध्यम आकाराचा
लसूण - १०-१२ पाकळ्या
आलं - २ इंच तुकडा
हिरवी मिरची - २-३
मक्याचे पीठ - २ टे स्पून
तेल
तूप
जिरे
हळद
गरम मसाला
सुक्या लाल मिरच्या- १,२
लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 

१. सरसों, पालक, बथुआ, मुळ्याचा पाला नीट निवडून चिरून घ्यावे.
२. मुळा बारीक चिरून घ्यावा.
३. मिरची, लसूण, आले बारीक चिरून घ्यावे.
४. कुकरमध्ये थोडे तेल + तूप गरम करून त्यात हि. मि., लसूण, आले परतून घ्यावे.
५. त्यात चिरलेला मुळा + पालेभाज्या घालून नीट परतून घ्यावे.
६. भाज्या हलक्या शिजल्या की थोडेसे पाणी घालून कुकर बंद करावा.
७. दोन शिट्ट्यांत शिजते भाजी. कुकर उघडून भाज्यांतली पाणी आटेपर्यंत कुकरमध्ये शिजवावे. या वेळात भाजी हाताने घोटत राहावी.
८. शिजलेल्या भाज्या गार करून मिक्सरमधून वाटून घ्याव्या.
९. कढईत तेल + तूप गरम करून त्यात जिरे, हळद घालावे. त्यात कांदा घालून परतून घ्यावा.
१०. भाजीचे वाटण त्यावर घालून चांगले परतावे.
११. मक्याचे पीठ पाण्यात मिसळून भाजीत घालावे.
१२. चवीप्रमाणे मीठ, लागल्यास लाल तिखट, थोडासा गूळ घालावे.
१३. भाजी चांगली शिजली आणि गोळा बनू लागला की गरम मसाला घालून एकदा परतावे.
१४. गॅस बंद करून लिंबाचा रस घालावा.
१५. छोट्या कढईत तूप गरम करून त्यात हिंग, जिरे आणि सुक्या मिरच्यांची फोडणी करून भाजीवर घालावी.
१६. भाजी खाताना वरून तूप आणि गूळ घालून खावे.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

१. सरसोंची पाने शिजल्यावर एकदम मऊ होत नाहीत. भाजी मिळून यावी म्हणून त्यात पालक, बथुआ घालतात. उत्तरेत सरसों आणि बथुआ यांची पेंडी एकत्रच बांधलेली मिळते. मक्याचे पीठही याच कारणासाठी लावतात. काहीजण उकडलेला लहानसा बटाटाही किसून घालतात. मी कधी घातला नाही, त्यामुळे, चव बदलते का माहिती नाही.
२. मक्याचे पीठ नसल्यास तांदळाचे किंवा चण्याचे पीठ लावावे.
३. भाजी जराशी उग्र आणि कडसर लागते चवीला.
४. भाजी शिजू लागली की उड्या मारून गॅस शेगडी, शेगडीमागची भिंत, ओटा यावर रांगोळी काढायच्या मूडमध्ये येते. तसे होऊ नये म्हणून भाजी मिक्सरमधून वाटण्याआधीच कुकरमध्येच त्यातले सगळे पाणी आटवून घ्यायचे. कोरडी करून घ्यायची भाजी. याला खूप वेळ लागतो आणि हाताने तेवढा वेळ घोटत राहावी लागते भाजी.
५. कुकरमध्ये न शिजवता कढईतच शिजवता येते भाजी पण वेळ खूप लागतो.

20131127_141210.jpg

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, पंजाबी मैत्रीण, कामवाली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो बथुआ म्हणजे चंदनबटवा.

गुळाची चव नाही जाणवत. सरसोच्या पानांची उग्र चव झाकण्यासाठी गुळ /शक्कर. हे घातल्याचं कळत पण नाही खाताना.

छान रेस्पी! मक्याच्या रोटीबरोबरच छान लागतो पण. आणि घरच्या लोणकढ तूपात केलनं तर आणखिन खमंग लागते भाजी ही Happy

एकदा सरसोंका साग केलेल. ते अतिशय कडुसर झालेलं. Sad बहुदा मी फक्त सरसो घातल्यामुळ असाव अस वाटतय.
प्राची तुझी रेसीपी मस्त वाटती आहे. करुन बघेन.

आमच्याकडे कुक च्या हस्ते नेहेमीच व्हायची ही भाजी. आमच्याकडे कायम कढईतच शिजवली होती भाजी, कुकरला कधीच नाही, तसंच मक्याचं पीठ कधी घातल्याचं पण आठवत नाही. गूळही नाहीच.
पालक आणि बथुआ पाहीजेच या भाजीत.
हा सरसों का साग, दाल-माखनी हे काही प्रकार माझ्या मैत्रिणी मुद्दाम फर्माईश करायच्या आमच्या कुक च्या अस्सल ऑथेंटिक टेस्ट वाल्या असतात म्हणून. Happy
माझी अत्यंत फेवरेट भाजी.

परवा 'देव अंकल्स किचन' मधे खाल्लं सरसो का साग.. आधी खाल्लं होतं तेव्हाही फार आवडलं नव्हतं. परवाही आवडलं नाही.. परवाचं तर तिखट जाळ होतं !!!

पूमनला <<< हिंदी सिनेमात जितकं ग्लॅमर आहे या भाजीला तितकी ती भारी वाटली नाही खाताना>>>> ह्याच्याबद्दल अनुमोदन. Happy

sunidhi, khup aambat nahi karayche. halaki aambat chaw janawali pahije.

>> हिंदी सिनेमात जितकं ग्लॅमर आहे या भाजीला तितकी ती भारी वाटली नाही खाताना

ह्यातलं ग्लॅमर कसं डिफाईन करता तुम्ही? पनीर, मलाई, शाही, कश्मिरी म्हणजे ग्लॅमरस का? मराठी झुणका ग्लॅमरस वाटतो का? Happy

सुनिधी वरचे प्रतिसाद वाचले पण केल्/ब्रॉकोली राब हे बथुआ ला पर्यायी आहेत असं काय दिसलं नाही .. Happy

बथुआ ची चव आंबट असते का/ना (?) .. म्हणून काय आंबट घालता येईल असं विचारतेय ..

मेधाने सरसोंलाच रीप्लेसमेन्ट म्हणून इतर ग्रीन्स् वापरले असं लिहीलंय ..

अच्छा आंबटपणासाठी... हं, इथे बहुतेक कधी काही पाहिल्याचे आठवत नाही, निदान विदेशी दुकानात तरी. तुला काही सापडले तर नक्की लिही. मी आता लिंबाचा रसच थोडा जास्त घालणार. फार वेळ लागतो मात्र ही भाजी बनवायला.

बथुआ आंबट नसतो. अंबाडी नको घालूस. त्यापेक्षा फक्त पालक आणि सरसो वापरून केली तरी चालेल. किंवा स्वतःची फारशी काही चव नसलेली दुसरी एखादी तुमच्याकडे मिळणारी पालेभाजी. बथुआ फक्त सरसोचा उग्रपणा कमी करण्यासाठी घालतात.

.

Pages