सरसों का साग

Submitted by प्राची on 27 November, 2013 - 02:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सरसों - १ जुडी
पालक -१ जुडी
बथुआ - १ जुडी
मुळ्याचा पाला - मूठभर
मुळा - अर्धा
कांदा - १ मध्यम आकाराचा
लसूण - १०-१२ पाकळ्या
आलं - २ इंच तुकडा
हिरवी मिरची - २-३
मक्याचे पीठ - २ टे स्पून
तेल
तूप
जिरे
हळद
गरम मसाला
सुक्या लाल मिरच्या- १,२
लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 

१. सरसों, पालक, बथुआ, मुळ्याचा पाला नीट निवडून चिरून घ्यावे.
२. मुळा बारीक चिरून घ्यावा.
३. मिरची, लसूण, आले बारीक चिरून घ्यावे.
४. कुकरमध्ये थोडे तेल + तूप गरम करून त्यात हि. मि., लसूण, आले परतून घ्यावे.
५. त्यात चिरलेला मुळा + पालेभाज्या घालून नीट परतून घ्यावे.
६. भाज्या हलक्या शिजल्या की थोडेसे पाणी घालून कुकर बंद करावा.
७. दोन शिट्ट्यांत शिजते भाजी. कुकर उघडून भाज्यांतली पाणी आटेपर्यंत कुकरमध्ये शिजवावे. या वेळात भाजी हाताने घोटत राहावी.
८. शिजलेल्या भाज्या गार करून मिक्सरमधून वाटून घ्याव्या.
९. कढईत तेल + तूप गरम करून त्यात जिरे, हळद घालावे. त्यात कांदा घालून परतून घ्यावा.
१०. भाजीचे वाटण त्यावर घालून चांगले परतावे.
११. मक्याचे पीठ पाण्यात मिसळून भाजीत घालावे.
१२. चवीप्रमाणे मीठ, लागल्यास लाल तिखट, थोडासा गूळ घालावे.
१३. भाजी चांगली शिजली आणि गोळा बनू लागला की गरम मसाला घालून एकदा परतावे.
१४. गॅस बंद करून लिंबाचा रस घालावा.
१५. छोट्या कढईत तूप गरम करून त्यात हिंग, जिरे आणि सुक्या मिरच्यांची फोडणी करून भाजीवर घालावी.
१६. भाजी खाताना वरून तूप आणि गूळ घालून खावे.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

१. सरसोंची पाने शिजल्यावर एकदम मऊ होत नाहीत. भाजी मिळून यावी म्हणून त्यात पालक, बथुआ घालतात. उत्तरेत सरसों आणि बथुआ यांची पेंडी एकत्रच बांधलेली मिळते. मक्याचे पीठही याच कारणासाठी लावतात. काहीजण उकडलेला लहानसा बटाटाही किसून घालतात. मी कधी घातला नाही, त्यामुळे, चव बदलते का माहिती नाही.
२. मक्याचे पीठ नसल्यास तांदळाचे किंवा चण्याचे पीठ लावावे.
३. भाजी जराशी उग्र आणि कडसर लागते चवीला.
४. भाजी शिजू लागली की उड्या मारून गॅस शेगडी, शेगडीमागची भिंत, ओटा यावर रांगोळी काढायच्या मूडमध्ये येते. तसे होऊ नये म्हणून भाजी मिक्सरमधून वाटण्याआधीच कुकरमध्येच त्यातले सगळे पाणी आटवून घ्यायचे. कोरडी करून घ्यायची भाजी. याला खूप वेळ लागतो आणि हाताने तेवढा वेळ घोटत राहावी लागते भाजी.
५. कुकरमध्ये न शिजवता कढईतच शिजवता येते भाजी पण वेळ खूप लागतो.

20131127_141210.jpg

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, पंजाबी मैत्रीण, कामवाली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची, मस्त पाकृ. Happy
फक्त, इतका सगळा कुटाणा मला या जन्मी शक्य नाही. तेव्हा तू कधी करशील तेव्हा सांग, खायला येते Wink

आमची पद्धत किंचीत वेगळी आहे. मुळ्याचा पाला असेल तर घालतात घरी, पण मुळा नाही घातलेला खाल्ला कधी. भाज्या कुकरमध्ये शिजताना त्यात किंचीतशी शक्कर (खांडसरी साखर /गुळाची पावडर) पण घालतात. बथुआ नसेल तर फक्त पालक + साग पण चालतं.
आणि कुकरमध्ये शिजल्यावर रवीनेच घोटतात भाजी. घोटतानाच त्याला मक्याचं पीठ लावतात. आमच्यात मिक्सरमधून अजिबात काढत नाहीत. त्याने चव बदलते. हातानी घोटलेलंच साग खातात. (मिक्सरमधून घोटल्यास चटणीसारखं मऊ टेक्श्चर येतं सागला ते आवडत नाही)
नंतर टडका लावताना पण लसूण घालतात. सागला लसूण जरा जास्तच लागतो. आणि खाताना मख्खन /घी मस्ट. तसंही साग उष्ण असतं खूप म्हणून तुप /लोण्याशिवाय खावू नये म्हणतात.

शिळं साग जास्त छान लागतं. २-३ दिवस खातात घरी साग. आणि दरवेळी खाताना वरून एक तुडका लावायचा.

फोटो???

वरदा, अगं खूप साहित्य आणि मोठी कृती दिसत असली तरी एकूणात अळूच्या फदफद्यासारखी भाजी वाटते आहे, म्हणजे सोपी असेल. कर तू कधीतरी Wink

३. भाजी जराशी उग्र आणि कडसर लागते चवीला.>>> मग मला सागाची चव आवडेल असं वाटत नाही Sad

अल्पना, मुळा घालायची टीप माझ्या कामवाली ने दिली होती.
गूळ घालायचे लिहायला विसरले. संपादित करते. Happy

आणि कुकरमध्ये शिजल्यावर रवीनेच घोटतात भाजी. घोटतानाच त्याला मक्याचं पीठ लावतात. आमच्यात मिक्सरमधून अजिबात काढत नाहीत. त्याने चव बदलते. हातानी घोटलेलंच साग खातात. (मिक्सरमधून घोटल्यास चटणीसारखं मऊ टेक्श्चर येतं सागला ते आवडत नाही) >> मिक्सरमधून ओबडधोबडच वाटायचे ग.
हाताने घोटताना कळ लागते हाताला, म्हणून हा शॉर्टकट. Happy

हो, आजच खरंतर घरी सरसों का साग आलाय भाजीखरेदीत. पण पालक नाहीये. बघते, उद्या जमलं तर.

मंजूतै, मला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्नेवाद Happy

वरदा, जास्त कुटाणा नाहीये ग.

मंजू, फोटो... पुढच्या वेळी टाकेन नक्की.
एकदा खाऊन बघ ग. मस्त लागते.

मंजू, खूप उग्र नाही लागत भाजी. आणि ती जास्त उग्र लागू नये म्हणून तर गूळ /शक्कर घालतात आणि तुप -लोणी घालून खातात.

किंचीत वेगळी पद्धत म्हणजे घोटणं रवीनेच, गुळ घालणं हे सगळं वर प्रतिसादामध्ये दिलेले बदल फक्त. ते वर लिहिलेत की. परत काय लिहायचं?

मी स्वतः अतः पासून इतिपर्यंत खूप कमी वेळा केलंय साग. बहूदा साबा किंवा अजून कोणी ना कोणी घोटलेलं साग पाठवून देतात. आम्ही फक्त फायनल तडके लावून खातो. Happy आता या सिझनमध्ये करेन एकदा साग-रोटी, त्यावेळी मुळा पण घालेन.

ग्लॅमरस नाहीच्चे सरसो का साग. आपल्याकडे कसं चुलीवरच्या भाकर्‍या, आईच्या -आज्जीच्या हातचं फदफदं यांची आपण आठवण काढतो ना तसं पंजाब्यांमध्ये साग अन रोटीबद्दल असतं. Happy
पण मला आवडतं चुलीवरच्या रोट्या + साग + लस्सी. हिवाळ्यातलं / दिवाळीच्या वेळचं आवडतं खाणं.

आतापर्यंत जेव्हा जेव्हा ही भाजी + मकई की रोटी खाल्ली आहे तेव्हा आवडलीच आहे. मुळा घातलेले साग खाल्ले नाही अजून. थंडीत, धुक्यात, रात्रीच्या वेळी बाहेरच्या चुलाण्यावर शेकलेली रोटी आणि साग खाताना काय मजा येते! सागवर सढळ हस्ताने पांढरे लोणी...! यम्म!

अल्पना Happy

अवांतर- सिनेमातून आता शिवणमशीनवर बसलेल्या पांढर्‍या साडीतला आया, पातेल्याचा तळ खरवडून गावभर उंडारून आलेल्या पोराला वाढणार्‍या आणि स्वतः उपाशी असणार्‍या आया, 'मेरे हाथ का बनाया हुआ सरसो का साग और गाजर का हल्ल्वा', 'ओ जी, आज मैने खीर बनायी है' वगैरे डायलॉग हे सगळं हद्दपारच झालंय! Happy

छान आहे कृति आणि फोटो.
आपल्याकडे मिळतो का ते माहीत नाही पण आमच्याकडे टिनमधे शिजवलेला साग मिळतो ( मेड इन हॉलंड )
पण तो मला उग्र लागतो. मी लोण्यावर कांदा परतून त्यात मक्याचे दाणे व थोडे इव्हॅपोरेटेड मिल्क घालतो. त्याने छान चव येते. ( रंग मात्र वेगळा येतो. )

मस्तच आहे फोटो आणि कृती, अल्पनानेपण छान लिहिलेय.

इथे डोंबिवलीत सरसो मिळतच नाही पण एक डोंबिवलीजवळ 'कुशला' नावाचे हॉटेल आहे तिथे 'सरसों का साग' मिळतो, आम्ही तिथे गेलो कि आवर्जून ही भाजी खातो, आवडते आम्हाला पण मूळ पंजाबी ढाब्यावर खाल्ली नाही त्यामुळे अगदी ओरिजनल चव कशी असते ते माहिती नाही.

यम्मी!! Happy

मला खूप आवडते असे साग.. आई करायची आणि कॉलेजमधे पंजाबी मैत्रिण नेहमी आणायची डब्ब्यात Happy

पण आता घरी बाकी कुणी खाणारे मेंबर नाही त्यामुळे कधी केले जात नाही आणि एकटीसाठी करायचा उत्साह नाही.... Sad

सिंधी साईं भाजी पण खुप आवडते...

भारी फोटो. सरसों का साग मध्ये इतक्या भाज्या विशेषतः मुळा असतो मला माहिती नव्हतं.

वरदाला बोलावशील तेव्हाच मला पण बोलाव. उगीच दोन दोन वेळा एवढा कुटाणा कशाला? Wink

यम्मी भाजी. मी इथे सरसों मिळाली तर सरसों नाहीतर ब्रोकोली राब / रापिनि घालून पण करते.
एशियन दुकानात फ्रोझन स्पाइसी मस्टर्ड ग्रीन्स म्हणुन मिळतं पॅकेट . त्याची पण छान लागते भाजी.
गूळ / साखर कधि घातली नाही, पुढच्या वेळेस घालेन.

छान होते हि भाजी, मी थोद्यफार फरकाने अशीच करते. पालक , साग, ब्रोकोलि आणि शल्गम घालुन करते.. छान होते. मुख्य म्हनजे पालक खपवु शकतो.. भाजी झाल्य्यवर पनीर , मश्रूम ताकुन एक उकळि काध्उन पन छान होते..

फार मस्त झाले होते हे साग. चुकुन रापिनी ऐवजी "kale" घेऊन आलो. तरी तेच घातले सरसों व पालकाबरोबर. मुळापाला नव्हता. मुळ चव कशी असते आठवत नाही पण ही मात्र झकास झाली होती.

थँक्स प्राची, एक छान कृती लिहिल्याबद्दल.
लिंबाची चव जेमतेम जाणवण्याइतपत घालायचे की जरा जास्त आंबटपणा यायला हवा भाजीला? (म्हणजे आंबटढाण नव्हे). त्याचबरोबर गुळ, त्याचीपण गोडसर चव कळायला हवी का?

मस्त रेसिपी. Happy

बथुआ म्हणजे चंदनबटवा का/ना?
(मंजुडीला +१. मलाही अळू परतून घेऊन फदफदं करतात तशीच कृती वाटते आहे.)

Pages