समुद्र समुद्र !!!!

Submitted by तुमचा अभिषेक on 23 November, 2013 - 12:46

बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्‍या मतलई सुरमई वार्‍यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो. कधी मूड बदलायचा झालाच, तर गेटवे ऑफ ईंडियापासून मरीनलाईन्स, तर वरळी सीफेस पासून बॅंडस्टॅंड तर कधी दादर, गिरगाव अन जुहू चौपाट्या, सार्‍या जणू आपल्याच बापाच्या. रोजच्या प्रवासात वाशीच्या खाडीवरील एक पुर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या पूलावरून सकाळ-संध्याकाळ जाणे म्हणजे निसर्गासोबत केलेली एक राइडच असते. जेमतेम दोन ट्रॅकचा ब्रिज आणि त्या भोवताली दोन्ही बाजूने गोलाकार पसरलेला अथांग समुद्र अन थैमान वारा. भरीस भर म्हणून माझ्या वेळी ट्रेनही अशी रिकामी असते की दारात उभे राहून बाह्या फडफडवून त्या निसर्गाच्या रौद्र पण तितकेच आपलेसे वाटणार्‍या रुपात मिसळून जावे आणि त्यालाही आपल्यात सामाऊन घ्यावे, म्हटलं तर स्सालं सुख सुख म्हणजे आणखी काय असते !

पण समुद्र म्हटले की पहिला आठवते ते लहानपणी आईबरोबर दादर चौपाटीला खाल्लेली ओली भेळ. देवाचे हार विसर्जित करायला म्हणून दोनतीन महिन्यातून एकदा जाणे व्हायचे. पुढची भेळ पुन्हा दोनतीन महिन्यांनीच नशिबी आहे हे माहीत असल्याने कागदाला चिकटलेले शेव कुरमुरेही नाही सुटायचे. पुढे भाऊच्या धक्क्यालाच हार विसर्जित करायला सुरुवात केली आणि सुटली ती भेळ. पण विस्मरणात नाही गेली. तीच भेळ पुढे एकदा त्याच चौपाटीवर अन त्याच समुद्राच्या साक्षीने प्रेयसीबरोबर खाउन पाहिली. पण लहानपणीची मजा नाही आली. कदाचित ठरवून केल्याने तसे झाले असावे, वा त्याक्षणी माझ्या मजेची परिमाणे वेगळी असावीत. आता त्या प्रेयसीची बायको झाली आहे, पण त्या भेळेची मजा अजूनही येत नाहीच. आता वाट पाहतोय ती मला मुले झाल्यावर त्यांना कधीतरी घेऊन जावे आणि बापाच्या भुमिकेतून ती मजा अनुभवून बघावी.

समुद्र आला की किनारा आला आणि किनारा आला की वाळू आलीच. पण मला त्या वाळूचे किल्ले करणे कधीच आवडायचे नाही, कदाचित काही बांधणे वगैरे मला जमत नाही, हे देखील कारण असावे. पण मी त्या वाळूत खड्डा करायचो. करताना नखांच्या फटी वाळूने बुजायच्या मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करून अगदी चार वीत खोल आणि दोन पाय जवळ घेऊन उभा राहू शकेन किमान इतक्या क्षेत्रफळाची वाळू उकरून काढायचो. किनार्‍याच्या शक्य तितक्या जवळच. अन मग एका मोठ्या लाटेची वाट बघत बसायचो. ती आपल्या मर्जीने यायची आणि परत जायची. मात्र माझा खड्डा पाण्याने भरून जायची. त्या खड्ड्यावर फेस जमा व्हायचा, जो विरायच्या आधी मी धावत जाऊन त्यात उभा राहायचो. विठ्ठलासारखा कंबरेवर हात ठेऊन, एका छोटेखानी समुद्राचा मालक असल्याच्या थाटात. पुढे आणखी दोनचार लाटा आल्या की त्या आपल्याबरोबर वाळू घेऊन यायच्या आणि खड्डा भरून टाकायच्या. मग पुन्हा ती वाळू उपसण्याचा खेळ सुरू व्हायचा, पुढची लाट यायच्या आधी वाळू जास्तीत जास्त उपसायची असायची. काही काळाने लाटा तिथवर येऊन भिडण्याची वारंवारता वाढायची आणि बघताबघता माझ्या खड्ड्याला समुद्र आपल्या पोटात सामावून घ्यायचा.

अकरावी-बारावीला किर्ती कॉलेजला होतो, दोन वर्षे. खरे तर एक फुकट गेल्याने दोनाची तीन वर्षे झाली. फुकट जाणारे वर्ष शैक्षणिक कारकिर्दीतले असावे, आयुष्यातले गेले असे कधीच वाटले नाही. किर्ती कॉलेज म्हणजे दादर चौपाटीला अगदी लागूनच. दिवसभर समुद्राचा वारा कानात घोंघावत असला तरीही रोज संध्याकाळी तो मला भुरळ घालायाचा. घरी पाय लवकर उचलला जायचा नाही. माझेच नाही तर असे कित्येकांचे व्हायचे. लहर आली की कंपांऊंडवरून मारलेली उडी थेट वाळूत पडायची. पण मला मात्र बाहेरून वळसा घालून जायला आवडायचे. समुद्राला शॉर्टकटने जाऊन भेटण्यापेक्षा दुरहून त्याच्या जवळ जाताना त्याचे हळूहळू वाढणारे विशाल रूप पाहण्यात मजा वाटायची. समुद्राकडे जाणार्‍या रस्त्यावर पसरलेले वाळूचे कण हळूहळू आपली घनता वाढवत रस्ता कसे व्यापत जातात, वार्‍याचा वाढता वेग आणि तो आपल्या सोबतीला घेऊन येणारा खारा गंध कसा दाट होत जातो, हे अनुभवणे म्हणजे समुद्राला जाऊन भेटणे. मग पाण्यात उतरले नाही तरी चालायचे. लाटांशी नजरेनेच खेळून झालेले असायचे. वाळूने माखलेले सुके पाय घरी घेऊन जातानाही मन चिंब भिजल्यासारखे वाटायचे. पण हे नेहमीच व्हायचे असे नाही. कधीतरी तो बोलवायचा, साद घालायचा. तेव्हा कपडे काढण्याची वेळही जीवावर यायची. हे असे व्हायचे जेव्हा आम्ही मित्र सहलीला जायचो..

कधी अलिबाग तर कधी केळवा. मुद्दाम आठवड्याचा असा वार पकडून जायचो जेव्हा गर्दी कमी असेल, त्यातही असाच एखादा किनारा पकडायचो जिथे कोणीच नसेल. सुरुवात क्रिकेट वा फूटबॉलने व्हायची. अगदी शिस्तीत. जोपर्यंत एखादा चेंडू लाटांवर तटवला जात नाही तोपर्यंत. पण एकदा का तसे झाले आणि पाण्याचा स्पर्श पायाला झाला की लागलीच सारे तूफान वेगाने समुद्राच्या ओढीने पळत सुटायचे. गल्ली क्रिकेटमध्ये ज्याची बॅटींग चालू असते त्याची अश्यावेळेस दिसणारी ओरड इथे कधीच नसायची, कारण त्यालाही समुद्राचे वेध लागलेले असायचे. बरेचदा मग पाण्यातच खेळ चालायचे, पण त्यात खेळाचे स्थान दुय्यमच असायचे.

पावसावर कित्येक कविता बनतात, कारण पावसाकडे पाहून त्या सुचतात. पण समुद्र हा बरेचदा तत्वज्ञान शिकवून जातो. एक असेच कायमचे मनावर कोरले गेलेले तत्वज्ञान म्हणजे निसर्ग हा आपला मित्र असतो, पण जोपर्यंत आपण त्याचा मान ठेऊ तोपर्यंतच. पट्टीचे पोहणारेच कित्येकदा बुडतात, कारण ते पोहायला एखादया तलावात शिकतात आणि नाद समुद्राशी करायला जातात. एक जवळचा मित्र असाच गेला. जेवढे मी त्याच्या पोहण्याबद्दल जाणून होतो, माझा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. एका सहलीचेच निमित्त झाले, पण तो समुद्र आमच्या ओळखीचा नव्हता. मागाहून कळले चूक त्याचीच होती, तेव्हा समुद्रावर धरलेला राग सोडला. मी त्यावेळी तिथे नसणे हे चांगले झाले कि वाईट आजवर समजू शकलो नाही. तिथे असूनही त्याला वाचवता आले नसते तर ती खंत मनावर जास्त आघात करून गेली असती. पण आजही खवळलेला समुद्र पाहताना कित्येकदा त्याची आठवण दाटून येते. अश्यावेळी दूर किनार्‍यावरच उभे राहणे पसंद करतो. आपला किनारा काय असावा हे देखील त्या समुद्रालाच ठरवू देतो. यातच जास्त सुरक्षित वाटते. पण म्हणून कायम तिथेच उभा राहत नाही. जेव्हा तो समुद्र शांत होऊन मला साद घालतो तेव्हा मात्र त्याच्याकडे जातो. त्याच्या हाकेला ओ द्यायला.. त्याच्या अस्तित्वाला मान द्यायला.. !

- तुमचा अभिषेक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. समुद्र मलापण खूप आवडतो, त्याची गाज शांतपणे ऐकावीशी वाटते. त्याच्या पाण्यात खोलवर डुंबावं असे वाटते पण जरा पुढे गेले कि भान ठेवायला लागते, बाकीचे जास्त आत जाऊ देत नाहीत. अर्थात ते बरोबरच आहे.

मुंबई(दादरला जास्त), अलिबाग, काशीद, केळवे, गणपतीपुळे इथे गेलेय. नालासोपारा येथे राहत असताना बऱ्याचदा जवळच्या कळंब समुद्रावर जाणे व्हायचे.

मला सर्वात आवडतो तो माझ्या सासरच्या गावाचा समुद्र, फणसे (देवगड तालुका). फक्त गावच्या लोकांचे येणे-जाणे, त्यामुळे शांत, पांढऱ्या पुळणीचा (वाळूचा), निवांत किनारा. धमाल येते गावाला गेल्यावर.

तुमच्या मित्राचे वाईट वाटले, असे बरेच जण मस्ती-मस्तीत जीव गमावतात वाईट वाटते.

समुद्र खोलवर मनात दडलाय. आपले महत्व एका छोट्या थेंबाएवढं.

छान लेख. मी पण समुद्रवेडीच आहे. डोंगर चढायला फारसे आवडत नाही. त्यामुळे मिळेल तो ब्रेक समुद्रा
काठी! तुम्ही लोकल मध्ये मात्र खांबाला नीट धरून उभे राहात जा. काळजी वाट्ते.

अंजू, छान पोस्ट, खरे तर समुद्र हा समुद्राएवढाच मोठा विषय आहे, काल सहज एका संदर्भाने लिहावेसे वाटले तसे लिहिले. बाकी आम्हीही कोकणचेच आणि मित्रांबरोबरदेखील जेव्हा जेव्हा कोकणवारी करायची संधी मिळते ती साधतोच.
आणि खरेय, कुठेही कोणी समुद्रात बुडून गेल्याची बातमी वाचतो तेव्हा हळहळ वाटतेच, खास करून ती सारीच तरुण मुले असल्याने जास्तच.

अश्विनीमामी, लोकलच्या दारात उभे राहणे हा वेगळाच विषय आहे, मुंबईत चाकरमान्या महिलांनाही दारावर लटकावे लागते. मला स्वतालाही ते दृश्य बघायला आवडत नाही, इतरवेळी गर्दीच्या ट्रेनला कोणी महिला उभी दिसली तरी आपण स्त्रीदाक्षिण्य दाखवून बसायला जागा देतो पण इथे त्या दारावर लटकणार्‍या महिलांसाठी काहीच करू शकत नाही.. असो..

धन्यवाद अभिषेक, तुम्ही हा सुंदर लेख लिहिलात म्हणून मला समुद्राबद्दलच्या भावना व्यक्त करता आल्या.

बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्‍या मतलई सुरमई वार्‍यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो. <<<< या वाक्यानंतर मी हा लेख वाचूच शकत नाही. Happy

डॉकयार्डचे दिवस काय होते माझ्या आयुष्यात. आठवड्यातून एकदा तरी भाऊच्या धक्क्यावर जायचंच. त्त्यात परत तिथे वडील काम करत असलेले जहाज उभे असेल तर ती शानच वेगळी असायची.

तो समुद्र वेगळ्याच आणि म्ह्त्वाच्या कारणासाठी स्पेशल आहे.

हाय हाय.. काय आठवण काढलीस रे.. अर्नाळा बीच, घुसून आलेलं पाणी, लोकलचा दरवाजा आणि खारा वास-खासच!

समुद्र, प्रचंड जिव्हाळ्याचा विषय! मी एका समुद्रकिनार्यालगतच्या खेड्यात बालपण घालवले. संध्याकाळी फिरायला समुद्रावरच जायचो. पावसाळ्यात येणारा खवळालेल्या त्या दर्याचा आवाज, तो खारा वास, त्या पाण्याचा स्पर्श, वाळूचे किल्ले , नुकतेच सायकल चालवायला शिकल्यावर खास किनार्यावर जाउन लावलेल्या शर्यती ... सॉलीड नॉस्टॅल्जीक झालीय मी.
एक आठवणं कधीच विसरणार नाही. मी ३ वर्षांची असताना आई नेहमीप्रमाणे एका संध्याकाळी मला समुद्राकिनार्यावर फिरायला घेउन गेली होती. अचानक तिचा पाय मऊ जमीनीत रुतला. एकदम ती गुडघ्यापर्यंत ओल्या वाळूत रुतली. मीही घाबरून तिला बिलगले. आई वर यायचा जेवढा प्रयत्नकरत होती तेवढी अधीकच आत रुतत होती...करता करता कमरेपर्यंत आत गेली. ते दिवस सुट्टीचे नसल्याने तेथे चिट्पाखरूही नव्हते. थोड्या वेळाने आमच्या ओळखीचे एक नवीन् लग्न झालेले जोडपे तिथे फिरायला आलेले दिसल्यावर त्यांच्या मदतीने आमची सुटका झाली.

ऑर्किड, तुमचा अनुभव खरेच... कल्पना करू शकतो ते डोळ्यासमोर आणून. यातून तुम्ही आणि आई सलामत राहिलात हेच चांगले.

नंदिनी, या वाक्यानंतर मी हा लेख वाचूच शकत नाही. >>>>>>> आधी माहीत असते तर लेखाच्या शेवटी टाकले असते ते वाक्य. Happy
बाकी तरीच तुमच्या कथांमध्ये जहाज आणि बंदराचे इतके बारीक तपशील असतात.
मी देखील बरेचदा भोळ्याभाबड्या लोकांना फसवतो आमची मच्छीमारी बोट किंवा प्रवासी लाँच आहे म्हणून..