चंद्रमुखी - लेखक - विश्वास पाटील

Submitted by दिनेश. on 13 November, 2013 - 07:51

विश्वास पाटील हे माझे अत्यंत आवडते लेखक. त्यांच्या बाकीच्या कादंबर्‍या वाचून झाल्या होत्या तरी चंद्रमुखी मात्र वाचायची राहिली होती.
या कादंबरीची जाहीरात बरीच झाली होती पण त्या मानाने ती वाचकप्रिय झाली नाही. पाटलांची म्हणून वाचायला जाल तर तितकिशी आवडणार नाही, पण तशी वाचनीय आहे.

तमाशा कलावंत चंद्रमुखी व महाराष्ट्रातील खासदार दौलत यांची हि कथा. प्रेमकथा म्हणवत नाही, कारण
खरे प्रेम दोघांकडून आहे असे वाटत नाही. शेवटही अपेक्षेपेक्षा थोडा वेगळा आहे.

पाटलांना नेमका कुणावर फोकस ठेवायचा होता ते कळत नाही. महाराष्ट्रातील सद्य राजकारण आणि तमाशाचे विश्व, हे तर खरे त्यांच्या कार्यक्षेत्राशी निगडीत विषय. तरी दोन्ही क्षेत्रांचे चित्रण तितकेसे प्रत्ययकारी वाटत नाही.

त्यांच्या इतर कादंबर्‍यात शृंगारीक वर्णने बहुतेक नाहीतच. इथेही ते थोडे अवघडल्यासारखेच वाटतात.
एका प्रसंगात दौलत तिला लिपस्टीक लावलेले ओठ धुवून यायला सांगतो. माझ्या मते धुवून लिपस्टीक जात नाही, ती पुसावी लागते Happy

त्यांच्या इतर कादंबर्‍यातला बांधीवपणाही इथे नाही. खुपदा तपशीलात काही तफावत वाटते. ( उदा. मॅक फर्नांडीस आधी चैन्नई चा असतो मग एकदम बँगलोरचा होतो. डॉली, ( दौलतची बायको ) त्याच्या निर्व्यसनीपणाची ग्वाही देते आणि त्यानंतरच्याच पानावर त्याच्याच तिला लिहिलेल्या पत्रातल्या मजकूरात, तो केंब्रिजला असताना दारूच्या नशेत, मोनालिसा नामक इतालियन सुंदरीकडे गेल्याचा उल्लेख येतो. )

या कादंबरीच्या जाहीरातीत तमाशा कलावंताच्या तोंडच्या अलंकारीक भाषेचे अमिष दाखवले होते, पण
कादंबरीत, म्हाळसा / बाणाई यांचेच दोनचार उल्लेख आहेत. खरे तर ते कलाकार अशिक्षित असले तरी
वगांच्या निमित्ताने पुराणातील संदर्भांचे जाणकार असतात. तसे इथे जाणवत नाही.

स्वतः लेखकाच्या भाषेतही तसे काही खास नाही. एकवेळ नासलेल्या दूधाचे पनीर करता येईल पण बिघडलेल्या राजकारण्याला सुधारता येणार नाही, असा कैच्या काय अलंकार वापरलाय.

त्यांनी चंद्रमुखीच्या तोंडी ज्या पठ्ठे बापूरावांपासून गदीमांपर्यंत कविंच्या ज्या लावण्या वापरल्यात त्या
अर्थातच सुंदर आहेत पण त्यांनी स्वतः रचलेल्या लावण्या ( उदा. पार्लमेंटाची लावणी ) अगदीच सुमार आहेत.

लालनची पुनर्भेट किंवा राघवचे आणि दौलतचे नाते, असे काही फिल्मी योगायोगही आहेत.

पण एक मात्र खरं, यातली पात्रे मात्र डोळ्यासमोर उभी राहतात. त्यामूळे या कादंबरीवर एखादी मालिका~
मात्र जरूर होऊ शकेल. त्या निमित्ताने का होईना, अस्सल तमाशा प्रेक्षकांना बघायला मिळेल. कादंबरीत
वर्णन केल्याप्रमाणे कलाकार मात्र मिळायला हवेत.

कंगनाला घेऊन पाटील एक चित्रपट करताहेत असे वाचले, त्यामूळे त्यांनी मनावर घेतले तर ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही विश्वास पाटिल आवडतात...चंद्रमुखी वाचायला घेतली होती...पण ५-६ पानं वाचली....डोक्यावरुन गेली....म्हणुन सोडुन दिली वाचायची.....पानीपत आणि संभाजी वाचली आहेत मी....फार फार वाईट वाटलं , रडु आलं.....इतक जिवंत चित्र त्यांनी उभ केलय....अजुन पुस्तके वाचायची आहेत त्यांची..

अगदीच फसलेली वाटली ही कादंबरी. पूर्ण वाचलीच नाही. सुरुवात केली आणि बाजूला ठेवून दिली. मूड नसताना लिहिल्यासारखी वाटली.
मला तर त्यांचं 'नॉट गॉन विथ द विंड'देखील कंटाळवाणं झालं. त्यातही ब-याचशा वाक्यरचना, शब्दप्रयोग त्यांच्या शैलीला अनुसरून नाहीत. त्याने रसभंग होतोच, शिवाय जमवलेल्या सा-या माहितीची भरताड केल्यासारखं वाटलं. ते चित्रपटच क्लासिक्स होते म्हणून नेटाने पूर्ण केलं कसंतरी.

मी पानीपत, झाडाझडती वाचली आहेत. दोन्ही अतिशय करूण पुस्तके आहेत. वाचाविशी वाटतातही, पण त्यातल्या कारुण्यामुळे, संपल्यावर सुटल्यासारखे झाले. हे आता वाचून बघेन.

आधी त्यांनी हि इंग्रजीमधे लिहिली होती, आणि वडीलांच्या आग्रहामूळे घाईघाईत मराठीत भाषांतरीत केली, असा उल्लेख आहे.

खडकसिंग, त्या कादंबरीवरूनच नाटक आले होते. तेही छान जमले होते. नाटकाची सिडी उपलब्ध आहे.

चंद्रमुखी ही अत्यंत फसलेली कृत्रिम आणि मेलोड्रामॅटिक कादम्बरी आहे. पाटलांनी पाटीच टाकलेली आहे . अगदीच अतर्क्य आणि खोट्या बटबटीत प्रसंगांन्नी भरलेली कादम्बरी.

पाटलांची स्वतःची आवडती ' पांगिरा ' हीच त्यांची सर्वोत्कृष्ट कादम्बरी आहे. झाडाझडती दुसरी आणि इतर खालीच...

मलाही विश्वास पाटील यांचे लेखन आवडते. 'झाडाझडती' हि मला सर्वात आवडली पण 'चंद्रमुखी' बहुतेक नाही आवडणार.

वरच्या सर्व पोस्टना अनुमोदन !!मी स्वत: ही कादम्बरी ४-५ पानापलिकडे वाचू शकले नाही, खुप खुप प्रयत्न करुन पण Sad Sad

रॉबीनहूड +++++++++++++++++१

इकडे बरेच सुटलेले धागे वेचायला आलेली .. चंद्रमुखी बरेचदा समोर आलं (पुस्तक) अक्षरधारा मधे गेली तेव्हा पण का कोण जाणे हरएक वेळी घ्यायच राहून गेल .. इथल वाचल्यावर वाटतयं कि बरच झालं .. Happy

विश्वास पाटलांची आहे म्हणुन फार अपेक्षेनी वाचायला घेतली होती पण अजिबातच नाही आवडली. कशीतरी पुर्ण केली. शेवटी तर वाचलीच जात नव्हती.
तसचं सेम झाडाझडतीबद्दल....