दारूबन्दी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तात्यांचा अनुभव खोटा किंवा चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. पण कडवट अनुभवातूनही जेव्हा माणसे आनन्द शोधून म्हणा किंवा ते बाजूला ठेऊन म्हणा जेव्हा जगू पाहतात त्यांचेविषयी मला नेहमी कुतुहल, कौतुक वाटते आणि जगण्याला उभारीही येते. बर्‍याच वेळा मला त्यांच्यासारखे वागायलाही जमत नाही पण त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
बर्‍याचदा दोन नातेवाईक इतके भांडतात इतके भांडतात की असे वाटते की ते आयुष्यात पुन्हा एकमेकाचे तोंड पाहणार नाहीत. आठ दिवसानी त्याना हसत खेळत गप्पा मारताना पाहिले की आपल्यालाच एक सुखद भावना निर्माण होते. साने गुरुजींची टिंगल करण्याचे दिवस आहेत पण त्यांची ओळ आठवते
'असावे सौख्य जगतात" तात्यानी फोरास रोडचा विषय काढलाय म्हणून आठवले तिथे जे प्रवीण पाटकरांचे काम आहे आणि अहमदनगरचे आमचे डॉ. गिरिश कुलकर्णी जे स्नेहालय नावाची संस्था वेश्यावस्तीत चालवतात ते पाहिल्यावर मन थक्क होते. ही उर्जा कोठून आणतात म्हनण्यापेक्षा यातून काय होणार आहे हे मानसिक मळभ ही मंडळी कसे दूर करतात हा खरा अभ्यासाचा विषय आहे.

एक दारूबन्दी अधिकारी होते. हल्ली दारूबन्दी हा चेष्टेचाच विषय आहे. त्यातही शासनात दारूबन्दी खाते आहे हाही एक विनोदच म्हणायचा. मी त्याना विचारले दारू पिण्याला एवढी प्रतिष्ठा प्राप्त झालेली असताना तुम्ही कसे काय काम करता हो. हे म्हणजे पु लंच्या भाषेत ताम्बट आळीत सतार वाजविण्यासारखे आहे. त्यानी सांगितले मला या कामाची आवड आहे. आणि अगदीच परिणाम होत नाही असे समजू नका, एखाद्या कार्यक्रमाने कधी कधी सम्पूर्ण गाव बदलून जाते ते समाधान काही औरच असते.
नन्दुरबार जिल्ह्यात माझा ग्रामीण भागाशी माझा जवळून संबंध येतो. तिथल्या आदिवासींच्या धर्मात आणि विधींमध्ये दारूचे महत्व असाधारण आहे. त्यातील काही ट्राईब्जमध्ये पाचविच्या दिवशी पल्स पोलिओसारखे दारूचे थेम्ब अर्भकाला पाजतात. असा हा बालपणीच बाप्तिस्मा झालेला माणूस आयुष्यभर काय करीत असेल हे सांगायलाच नको. दारू हे व्यसन नसून संस्कृतीचा व जीवनशैलीचा भाग झालेला असल्याने त्यात guilty वाटन्याचे अथवा चुकीचे काही करतोय हे वाटण्याचे कारणच नाही. पण त्यामुळे विशेश्त: उपाशी पोटी पीत राहिल्याने पार वाट लागते. बायकाही त्याला अपवाद नाहीत. (मागे V&C वर स्टेट्समधल्या हळदीकुंकवात बायकानी दारू प्यावी का यावर चर्चा झालेली आठवते का?)
अशा या प्रदेशात म्हणजे नन्दुरबार जिल्यात पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रभावामुळे काही गावात दारूबन्दी झाली हे पाहून थक्क व्हायची पाळी माझी होती.
आता हे करताना स्वाध्यायीना काहीच अडचणी आल्या नसतील का? पूर्वीच्या मिशनर्‍याच्या चिवटपणाने त्यानी हे केलेच...
(दारू पिण्यात वाईट ते काय आहे असे हितगुजवरील बहुतांश मंडळी मानतात, पण तात्यांसारखे संवेदनाशील लोक दारू पिऊन मारझोड करणार्‍या नवर्‍यांचा राग राग करतात म्हणजे ते नक्कीच वाईट असले पाहिजे. ही मारझोड नन्दुरबारात, सदाशिव पेठेत,मलबार हिलवर आणि न्यू जर्सीतही होते असा अनुभव आहे..)
तर मला एक शेरही आठवला,

शेख करता है मस्जिदमे खुदा को सजदे,
उसके हर सजदेमे असर हो ये जरूरी तो नही....

तेव्हा काहीतरी करीत राहिले पाहिजे प्रत्येक वेळी त्याच्यातून काही निष्पन्न होईलच याची आशा कशी करता येईल म्हणून औपचारि तर औपचारिक पण हे दिन, सप्ताह या गोष्टी साजर्‍या झाल्या पाहिजेत असे मला वाटते...

तुमचं काय मत्त हाये ह्येच्यावर म्या इच्यारतू....

प्रकार: 

रॉबीन, मस्तच हो.. आमचं मत अस हाय की आम्ही उघड्या डोळ्यांनी ह्या दारूपायी घर .. संसार.. मुलाबाळांची आयुष्य उद्धस्त होताना पायीले हाये, तेंव्हा असा दिवस साजरा करणे म्हणजे अशा गोष्टींना प्रेरणा देऊन समाजघातक कृत्य करणे होय.

दारुचं काय पण कुठलीही गोष्ट जिच्यामुळे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नुकसान होणार असेल , आपण राहतो त्या समाजाला त्रास होणार असेल तर ती गोष्ट करु नये.

रॉबीन, दारूला प्रतिष्ठा कधी मिळत गेली हे कळलेच नाही. मी दारू पित नाही, असे मी ज्यावेळी ठासून सांगतो, फोटोपुरता किवा उपचारापुरताही शँपेन चा ग्लास हातात धरत नाही, त्यावेळी मी हास्यास्पद ठरतो.

माझ्या यूरोपियन मित्रांशी मी चर्चा केली होती, त्या वरुन मला कळले ते असे, कि तिथे दारू पिण्याची पद्धतच वेगळी आहे. तिथे माणुस घरी येतो, जेवतो आणि मग पब मधे दारु प्यायला जातो. परत घरी येऊन जेवतो. आणि आवर्जून ब्लॅक कॉफी पितो. त्याने दारुच्या बहुतेक दुष्परिणामाना आळा बसतो.

आपल्याकडे उपाशी पोटी दारु प्यायली जाते (हे मी आदिवासी वा वनवासींचे म्हणत नाही, ते तर बिचारे भूक मारण्यासाठी पितात.) बरोबर जे खाल्ले जाते (चकणा म्हणतात ना त्याला ? ) ते असते तळलेले, तेलकट आणि कोरडे. त्याने आणखी तहान लागते, म्हणून आणखी दारु प्यायली जाते. मग जेवणाचे भान राहतेच असे नाही.
खुपदा बियर म्हणजे काहि दारु नाही, असा युक्तीवाद केला जातो. पण ज्या प्रमाणात ती पितात, त्याने अल्कोहोलचे प्रमाण तेच होते.
सोमरसाचा पण उल्लेख केला जातो. मी वाचले आहे त्याप्रमाणे सोमवल्ली हि पांढरे ठिपके असलेली गुलाबी मश्रुमची जात होती (आता ती बहुतेक उपलब्ध नाही) तिच्यापासुन केलेले पेय, हे उन्मादक (लास पाडणारे) असे पण त्यात अल्कोहोल असे का, हे माहित नाही.
आपल्या मेंदूचे संरक्षण आवरण, दोनच गोष्टी भेदू शकतात, एक अल्कोहोल आणि दुसरे निकोटीन.

प्रत्येकाला कसली तरी नशा असते... कामाची, स्वच्छतेची, समाज सेवेची, चहा, पैसा, दारु...

दारु... मी लहान असतांना दारु पिऊन नाल्यात (नाल्या कडेच पाय का वळतात) लोळणारेच जास्त बघितले. महिन्याच्या पाच तारखेला ही माणसे त्यांचा तुटपुंजा पगार झाल्याबरोवर आधी दारुच्या गुत्त्यावरच जाणार. झोकांड्या खातच बाहेर येणार आणि नाल्यातील थंड पाण्यात पहुडणार... मग घरचे लोकं (बायको, चिल्ले पिल्ले.. :अरेरे:) यांना गावभर शोधत फिरणार, सायंकाळी घराकडे नेणार... उरलेल्या पगारात मग राहिलेला महिना कुटुंब कसातरी काढणार. सबंध कुटुंब साधारण २२-२४ तारखेनंतर ५ तारिख यायची वाट बघणार. त्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी दारुबंदी वरदान ठरेल. पण दुदैवाने तसे होणे नाही.

दारु भक्तांनो - तुम्ही चैन करा पण त्याची झळ (आर्थिक, शारिरीक, मानसिक) कुणालाही विशेषत: तुमचे कुटुंब आप्त यांना पोहोचणार नाही याची काळजी घ्या.

आजच सकाळ सप्तरंगमध्ये गडचिरोलीतील आदिवासी जमातींमधील रुढी, प्रथा, जीवनपध्दती व मोहाच्या दारूविषयीच्या प्रघातांविषयी लेख वाचनात आला : http://72.78.249.124/esakal/20100516/4922482927339341631.htm

त्यात म्हटले गेले आहे

<< विशेष म्हणजे बाळ जन्मल्यानंतर ज्याप्रमाणे त्याला मोहाच्या दारूची चव दिली जाते, तसे एखादी व्यक्‍ती मेल्यानंतरही सोबत दारू ठेवूनच मृतदेह पुरण्याची प्रथा माडियांमध्ये दिसून येते. याशिवाय मृताची आवडती वस्तूसुद्धा तिथे ठेवण्यात येते. असा जन्मापासून मृत्यूपर्यंत दारूचा सहवास लाभत असला, तरी त्याचा स्वीकार संस्कृतीचा एक भाग म्हणूनच होतो. त्यामुळेच या जमातीत दारूचे व्यसनाधीन फारसे आढळत नाहीत. एकूणच माडिया जमातीत बाळ जन्माला येण्यापूर्वीपासून जन्मल्यानंतरही विविध प्रथा, परंपरांचे पालन करीत त्याच्यावर संस्कार करण्यात येतात. >>

दारू पिण्याचे असेही समर्थन? Light 1

>>ग्लास हातात धरत नाही, त्यावेळी मी हास्यास्पद ठरतो>>
अगदी अगदी दिनेशदा...
आता तर बर्‍याच लोकांचे असे म्हणणे असते की त्यामुळे मी सोशल होतो, लोकांच्या ओळखी वाढतात, बिझनेस वाढतो इ.इ.

हे पान अचानक दोन अडीच वर्षानी कसं वहायला लागलं? >>>>> दारु जितकी जुनी, तितकी चांगली असे 'लोक' म्हणतात! Happy

तेव्हा काहीतरी करीत राहिले पाहिजे प्रत्येक वेळी त्याच्यातून काही निष्पन्न होईलच याची आशा कशी करता येईल म्हणून औपचारि तर औपचारिक पण हे दिन, सप्ताह या गोष्टी साजर्‍या झाल्या पाहिजेत असे मला वाटते... >>>> अनुमोदन!