बायको म्हणजे.....

Submitted by डॉ अशोक on 12 November, 2013 - 00:20

बायको म्हणजे.....
(कविवर्य फ.मु. शिंदे यांची माफी मागून)

बायको म्हणजे नुसते नाव नसते
सार्‍या आयुष्याला केलेला घेराव असते

जवळ असते तेंव्हा जाणवत नाही
दूर जाते तर "जा" म्हणवत नाही

पंगत संपते, पानं उठतात
भरल्या पोटी आसवं दाटतात
बायको हातात तशीच ठेवते काही
नवर्‍यालाच कळावं असं काही-बाही

बायको असते एक धागा
संसाराच्या देवळातल्या पणतीची जागा
घर हंसतं तेंव्हा तिही हंसते विसरून भान
घर रडलं की
ती ही सैरभैर, घालून खाली मान

बायको घरात नाही?
तर मग कुणाशी बोलतात जाइ-जुई?
बायको खरंच काय असते?
आपल्या मुलाची आई असते
बहिणीची ताई असते
तर नवर्‍यासाठी
काहीच्या काही असते

बायको असते जन्माची जोडीदार
मैत्रीण आणि प्रेयसी दोन्हीची दावेदार!

-डॉ. अशोक

Group content visibility: 
Public - accessible to all site users