तेंडुलकरची निवृत्ती - "आवरा"

Submitted by बेफ़िकीर on 10 November, 2013 - 12:03

एक धागा आधीच असताना हा आणखी कशाला, असा प्रश्न माझ्याही मनात येत आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो की हा धागा काढायची तीव्र इच्छा होत आहे. तसाही, हा धागा फक्त 'पाठ्यपुस्तकातील धड्याबाबत' नाही.

सचिन तेंडुलकर व त्याची निवृत्ती!

म्हणावेसे वाटते की कृपया आता आवर घातला जावा या सचिनपूजेला! त्याचे अगदी डायपर घालण्याच्या वयापासून बॅट हातात धरलेले फोटो, प्रत्येक यशस्वी अयशस्वी गतकालीन व समकालीनांनी तोंड फाटेस्तोवर त्याची केलेली स्तुती, नाही नाही त्या शाळेपासूनच्या आठवणी, त्याच्या त्याच त्या महान खेळ्या आणि त्यांचे महत्व!

वर्तमानपत्र आपण आपल्या पैशाने विकत घेतो म्हणून त्यात आपल्याला जे हवे ते छापले गेले पाहिजे असा कोणाचा आग्रह असू शकत नाही. पण अगदी अमिताभ बच्चनच्या जगण्याचे एक कारण नष्ट व्हावे वगैरे अती आहे. पानेच्या पाने तेच सगळे?

यात सचिनद्वेष वगैरे नसून लिटरली कंटाळा आलेला आहे. टीव्ही वाहिन्या, वर्तमान पत्रे यांना दुसरा उद्योग राहिलेला नाही. सर्वात मुख्य म्हणजे, चॅनेल बदलणे किंवा पेपरचे पान उलटून दुसरे काही वाचणे हा 'ते; टाळण्याचा सोप्पा उपाय वगैरे मुळीच नसून ते पान / चॅनेल उलटण्यापूर्वी मनात जो कंटाळा निर्माण होतो तो होतोच. चिडचिड होते.

हो बाबा एकदाचा निवृत्त! शांत, निगर्वी, मेहनती, याही वयात शिकायची इच्छा असणारा, अजुनही सराव करणारा, रन मशीन, क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सगळे पाठ आहे. मला तर तू असाही कित्येकवेळा आठवतोस की संघाला अत्यंत आवश्यक असताना चुकीचे शॉट्स मारून बेजबाबदारीने बाद झालास! वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध, दुबळ्या संघांविरुद्ध भन्नाट खेळ्यांच्या मालिका! माझ्या आठवणीप्रमाणे ऑस्ट्रेलिया भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये (२००३ बहुधा) तुझ्यावर महान भिस्त होती आणि तूही भरात होतास. बाकी तुझे पूजक आता ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तुझ्या महत्वाच्या खेळ्या आठवून देतीलच! पण असो!

सर्वात श्रीमंत क्रिकेट खेळणार्‍या महान तेंडुलकर, तुझ्या दैदीप्यमान कारकीर्दीला लवून कुर्निसात, पण म्हणतात तसा साधा, निगर्वी वगैरे असलास तर कृपया स्वतः उठून या माध्यमांना सांग की एक क्रिकेट खेळाडू निवृत्त होत आहे, अती करू नका!

=================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,

मुलांचा होतो खेळ आणि बेडकांचा जातो जीव, ही म्हण ऐकली असेलच. तसाच इथे 'माध्यमांचा होतो पैशाचा खेळ आणि वाचकांना होतो नकोसा जीव' असा प्रकार चालू आहे.

स.तें. हा छाप (ब्रँड) आता लयास चालला आहे. त्याची ही शेवटली हालचाल आहे. ती चालू आहे तोवर मिळेल तितका पैसा हापसूया, असा विचार केला जात असावा. वाचकांना विचारतो कोण!

हे माझं वैयक्तिक मत.

आ.न.,
-गा.पै.

सध्या भारतात नसल्याने आम्हाला इकडे फक्त थोडेफारच काहीतरी चालू असलेले दिसते, त्यामुळे तेथे काय प्रकार चालू आहे याचा फक्त अंदाज लावता येतोय. पण माझा अंदाज आहे की अजून एक आठवडा हे सगळे चालेल. नंतर मार्केटिंग वाले विसरून जातील आणि फक्त चाह्त्यांच्या सिन्सियर आठवणी राहतील.

यातील बटबटीतपणावर सचिनही नाराज आहे अशी बातमी आली होती दोन तीन दिवसांपूर्वी.

कधी नव्हे तो ज्ञानेशजींशी सहमत Proud
(पण हा धागा अत्यावश्यक असाच आहे यावर कुणाचे दुमत असेल असे वाटत नाही )

थोर साहित्यिक, समीक्षक प्रा. श्री. रमेश तेंडुलकरांचा मुलगा सचिन आहे हे नम्रपणे नमुद करू इच्छितो.

त्यांचीच एक कविता:

ध्येय हवें ध्येय हवें
धेयाची ओढ किती
तोडवे न पण जीवा
पाशांची आसक्ती!

ध्येय हवें पाश हवे!
आयु हवें मरण हवें!

नकळे, वेड्या जीवा!
काय तुझी गत पुढतीं!

- रमेश तेंडुलकर (मानस लहरी)

>>सर्वात श्रीमंत क्रिकेट खेळणार्‍या महान तेंडुलकर, तुझ्या दैदीप्यमान कारकीर्दीला लवून कुर्निसात, पण म्हणतात तसा साधा, निगर्वी वगैरे असलास तर कृपया स्वतः उठून या माध्यमांना सांग की एक क्रिकेट खेळाडू निवृत्त होत आहे, अती करू नका! <<
मिडियाची गणितं/समिकरणं वेगळी असतात; टीआरपी वगैरे. दुर्दैवाने सचिनचं त्यावर नियंत्रण नाहि. त्याने विनंती करुन सुद्धा हे लोक थांबणार नाहित कदाचीत... सो सीट बॅक रिलॅक्स अँड एंजॉय द राइड (इफ यु कॅन)... Happy

बेफी, जरा कळ काढा... निवडणुका येत आहेतच, मग कोण तेंडुलकर असा प्रश्न विचारायलाही हे मिडीयावाले कमी करणार नाही. Sad

सहमत. पेपर, टीव्ही, एफ एम रेडिओ काही ही सोडलेले नाही. अतिरेक होतो आहे. किती तो पीळ मारायचा.

सहमत.

आमची पोळीवाली बाई पण झरझर पोळ्या करते. एव्हाना २०००० पोळ्यांचा रेकॉर्ड मोडला असेल तिने. पण रोज जाऊन सगळ्यांना सांगत नाही. सचिन रिटायर झाला की रोज दुपारी त्याच्या दारावरची बेल वाजवून सांगायला हवेत हे रेकॉर्डस.

आमची पोळीवाली बाई पण झरझर पोळ्या करते. एव्हाना २०००० पोळ्यांचा रेकॉर्ड मोडला असेल तिने. पण रोज जाऊन सगळ्यांना सांगत नाही. सचिन रिटायर झाला की रोज दुपारी त्याच्या दारावरची बेल वाजवून सांगायला हवेत हे रेकॉर्डस. >>
सुमेधाव्हीजी ,
सचिनला का ? तो तुम्हाला सांगतोय का ?
अहो हा मिडीयावाल्यांचा दोष आहे . मुंबई हल्ल्याचे थेट प्रक्षेपण करणारे हे लोक , त्याना सचिन काय अन इतर कुणी काय काही फरक पडत नाही .

मला तर तू असाही कित्येकवेळा आठवतोस की संघाला अत्यंत आवश्यक असताना चुकीचे शॉट्स मारून बेजबाबदारीने बाद झालास! वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध, दुबळ्या संघांविरुद्ध भन्नाट खेळ्यांच्या मालिका! माझ्या आठवणीप्रमाणे ऑस्ट्रेलिया भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये (२००३ बहुधा) तुझ्यावर महान भिस्त होती आणि तूही भरात होतास. >>>

यात सचिनद्वेष वगैरे नसून लिटरली कंटाळा आलेला आहे. >>

काहीतरी चुकतय नाही Happy

रोजच्या लाटलेल्या पोळ्या आणि त्याच्या रन्सची (एकंदर रेकॉर्ड्सचीच) झालेली तुलना बघून सचिन अज्ञातवास नक्कीच पत्करेल. त्याला जाऊन सांगायला हवं हे खरंच.

वैयक्तिकरीत्या, सचिन आणि द्रविड इतका डाऊन टू अर्थ, विनम्र आणि समोरच्याचे म्हणणे नीट ऐकून घेणारा "सेलीब्रीटी" आजवर पाहिला नाही.

वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध<< ओह, हा जेम वाचलाच नव्हता मी. सचिनचे वडील वारले तेव्हा वर्ल्ड कप चालू होता. तो भारतात आला आणि परत गेला, यामधे त्याची झिम्बाब्वेची मॅच चुकली. नेक्स्ट मॅच केन्याविरूद्ध होती, त्याला तो काय करणार? त्याने केन्याविरूद्ध शतक केले हा त्याचा मोठेपणा की वडलांच्या मृत्यूनंतर ताबडतोब खेळायला मैदानात उतरणे हा मोठेपणा??

सहमत !

चुकीचे शॉट्स मारून बेजबाबदारीने बाद झालास!>>>>

चुकीचे शॉट्स म्हणजे काय भाउ..????? Uhoh

सचिन ला हा शॉट चुकिचा आहे हे आयुष्यात बॅट न पकडलेल्यांनी सांगणे म्हणजे ..

हिमेश रेशमियाने पंडीत भिमसेन जोशी यांना गायला शिकवणे Biggrin

(सचिन ब्रिगेड जिवंत झाली Wink )

काहीतरी चुकतय नाही <<<

Happy

दोन भिन्न गोष्टी विचारात घेऊन पाहाव्यात अशी विनंती!

१. सचिन तेंडुलकर सर्वार्थाने व निर्विवाद महान क्रिकेट खेळाडू आहे हे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहीत असतानाही सचिन तेंडुलकरला 'लार्जर दॅन क्रिकेट' बनवण्याचा मीडियाचा प्रयत्न हा वर पैलवानांनी म्हंटल्याप्रमाणे 'जमेल तितके कमवून घेऊ'चा भाग वाटत आहे / आहे. ज्याला 'आवरा' असे म्हणावेसे वाटत आहे.

२. मीडियाने हे सगळे इतक्या अतिरेकी पद्धतीने चालवलेले आहे की सचिन तेंडुलकर सर्वार्थाने (वागणूक, क्रिकेटसाठी आवश्यक ती सभ्यता, महान व विक्रमी कारकीर्द) महान क्रिकेटपटू असला तरीही माध्यमांच्या या अतिरेकामुळे आपसूकच त्याच्या कारकीर्दीतील कच्चे दुवे आणि बेभरवश्याने खेळलेल्या खेळ्या सच्च्या क्रिकेटप्रेमीला आठवणे आतिशय नैसर्गीक आहे.

इट इज सिंपलः

(इतर अब्जावधींप्रमाणेच) मलाही माहीत आहे की तो महान आहे पण (तुम्ही ते आम्हाला सांगण्याचा इतका अतिरेक करत आहात की मग) आम्हाला त्याच्या कमकुवत खेळ्यांचीही आठवण होते व करून द्यावीशी वाटते. (आणि) अश्या वेळी तो नुसताच गप्प बसलेला पाहून असे वाटते की त्यालाही सांगावे की तू जर हे कौतुक केले जात असताना स्वतः गप्पच बसणार असशील तर ऐक, की तू ऐन मोक्याच्या क्षणी र्तुझ्या रसिकांना कसे खट्टू केले होतेस त्याच्या आठवणीही ताज्या आहेत.

Happy

सचिनचाच काय, कोणाचाच द्वेष करण्याची प्रातिभ क्षमता तरी येथे कोणामध्ये आहे?

<< एव्हाना २०००० पोळ्यांचा रेकॉर्ड मोडला असेल तिने. >> अद्वितीय अशा एका जागतिक पातळीवर वाखाणल्या गेलेल्या निखळ प्रतिभेला तिच्याच देशात असला घरचा अहेर मिळावा ! Sad

आमची पोळीवाली बाई पण झरझर पोळ्या करते. एव्हाना २०००० पोळ्यांचा रेकॉर्ड मोडला असेल तिने. >>>. अगदी ! आणि आमच्या भांडेवालीबाईने निदान ५०००० स्टीलची भांडी आजपर्यंत घासली असावीत.

लाईव्ह प्रक्षेपण करायला पाहिजे तुमच्या पोळेवालीचे. आणि त्यासोबत मग असे सामनेही ठेवायला हवेत.

१. पोळी रनजी, २. पोळी टि टेव्टी ३. पोळी हॅरीस शिल्ड ४. कोथरुड पोळी विरुद्ध पिंपळे सौदागर पोळी
५. पोळी वल्डकप ६. पोळी कसोटी
७ पोळी ऑस्ट्रेलिया / विंडिज आणि बेफिंचे आवडते केनिया वगैरे पण घेऊन, गेलाबाजर बांग्लादेश तरी. माग पोळी कॉम्प्टिंशन लावून बघूया. ह्यातून पोळीवाली सिद्ध झालीच तर तिचेही कौतुक करायला काही प्रॉब्लेम नाही!

होऊन जाऊ दे!

त्याने केन्याविरूद्ध शतक केले हा त्याचा मोठेपणा की वडलांच्या मृत्यूनंतर ताबडतोब खेळायला मैदानात उतरणे हा मोठेपणा??<<<

वडिलांच्या मृत्यूनंतर ताबडतोब खेळायला मैदानात उतरणे म्हणजे काही वडिल गेले असतानाही सीमेवर शत्रूशी लढणे वगैरे नव्हे. क्रीडाप्रकाराचे महत्व देशभक्तीइतके समजले जाण्यामागे आपण (काही प्रमाणात अविवेकी) रसिकच आहोत असे दिसते.

त्याचे वडिल गेल्यावर तो भारतात आला व पुढच्या मॅचला परत गेला हा काही भारत या देशाच्या सार्वभौमत्वासाठी वगैरे केलेला त्याग नाही. क्रिकेट हा एक क्रीडाप्रकार आहे.

(या तुलनेने युवराजसिंगला तर आत्तापर्यंत परमवीर किताब द्यायला पाहिजे होता) Wink

भारत या देशाच्या सार्वभौमत्वासाठी वगैरे केलेला त्याग नाही. क्रिकेट हा एक क्रीडाप्रकार आहे.>> असं कुणी म्हटले आहे का?

क्रिकेटच काय पण इतर कुठल्याही क्रीडाप्रकारामधे असा वैयक्तिक मामला बाजूला ठेवून कर्तव्य करणार्‍यांबद्दल मला तरी कायमच आदर वाटत आलेला आहे. श्रीदेवीने देखील तिच्या वडलांच्या मृत्यूनंतर लगेचच चांदनीचे स्विसमधले शूटिंग शेडुयुल जॉइन केले होते. निर्मात्याचे नुकसान होऊ नये म्हणून. ती अभिनेत्री वगैरे म्हणून कशी आहे ते बाजूला ठेवू एकवेळ, पण या प्रोफेशनालिझमसाठी माझा तरी तिला सलाम.

युवराजसिंग ही केसच भिन्न आहे या कॉन्टेक्स्टमधे. शिवाय अजून खेळतोय तो.

तुमचा पॉइन्ट काय आहे? त्याने "वडलांना अर्पण केलेलं शतक केन्याविरूध्ह" हा की "वडील गेल्यावर सुद्धा तो खेळायला आला हे काही फार ग्रेट बाब नाही"

पहिला पॉइन्ट असेल तर "केन्याविर्रोद्ध शतक" यामधे नक्की काय अभिप्रेत आहे? केन्या दुबळी टीम आहे हे? तसे असेल तर सशक्त टीमविरूद्ध सचिन कधी खेळलाच नाही असे म्हणायचे आहे का?

दुसरा पॉइन्ट असेल तर त्याने काय करायला हवे होते? वडलांच्या सुतकामधे घरी बसून रहायला हवे होते? कविता लिहायला हव्या होत्या की "माझे बाबा" वगैरे लेख लिहायला हवे होते?

याहून तिसरा काहे पॉइन्ट असेल तर सांगा जरा.

तुमचा पॉइन्ट काय आहे? त्याने "वडलांना अर्पण केलेलं शतक केन्याविरूध्ह" हा की "वडील गेल्यावर सुद्धा तो खेळायला आला हे काही फार ग्रेट बाब नाही" <<<

माझा पॉईंट कोणता आहे हे सूज्ञांना समजले आहे. 'वडील मेल्यावर' हा मुद्दा तुम्ही काढलेला आहेत. माझ्या लेखात तो मुद्दाच नाही आहे की वडील मेले असताना वगैरे तो खेळायला गेला.

दुसरा पॉइन्ट असेल तर त्याने काय करायला हवे होते? वडलांच्या सुतकामधे घरी बसून रहायला हवे होते? कविता लिहायला हव्या होत्या की "माझे बाबा" वगैरे लेख लिहायला हवे होते? <<<

पुन्हा तेच लिहितो, दुसरा मुद्दा तुम्ही काढला आहेत व तो मी फक्त काऊंटर केलेला आहे. तो माझा मुद्दा नाहीच आहे. बाकी तुमची कविता वगैरेची बालिश वक्तव्ये पाहून मला अचंबाही वाटला नाही.

ताशी १५० किमी गतीने येणार्‍या बॉल ला समोर जाउन टोलवणे साधी गोष्ट नव्हे

सचिन च्या कित्येक खेळ्या या प्रचंड दबावा खाली खेळलेल्या गेल्या आहेत. हे विसरुन चालु नये

धोनी सेना येउ पर्यंत सचिन आउट म्हणजे पोटात गोळा येणे हे ठरलेलेच होते.. बाकीचे इतर नुसते हजेरी लाउन जायचे.

आठवा ऑस्ट्रेलिया विरुध्द १७५ रन्स करुन सुध्दा हातातोंडाशी असलेला विजय कोणी घालवला ? सचिन आउट झाल्या नंतर आपल्या अवघे ४०-४५ रन्स हवे होते ६ च्या आत असलेल्या रनरेट ने .. तरी सुध्दा आपण हारलो याचा दोष सचिन ला देणार का ?? वयाच्या ३७ व्या वर्षी १७५ रन्स काढुन दमायचे नाही ..शेवट पर्यंत राहुन खेळायचेच.. बाकीचे नाही खेळले तरी चालेल. पण तु मात्र मैदानावर उभाच असला पाहिजे ?... मॅच हारली ती तुझ्या १७५ केलेल्या रन्स मुळे नाही तर तु शेवट पर्यंत उभा राहिला नाही म्हणुन .. इतरांनी रन्स करायची गरज नाही . .. तुझीच जवाबदारी आहे..

----------------

गांगुली आणि द्रविड यांनी विश्वकप मधे श्रीलंकेविरुध्द ३७५ रन्स केलेले त्यात द्रविड ने १५० आणि गांगुली ने १८३ रन्स केलेले.. सलामीला सदगोपान रमेश आणि गांगुली उतरलेला.. सदगोपान रमेश आउट झाल्यावर द्रविड उतरला.. दोघांनी श्रीलंकेला प्रचंड धुतलेले.. मुरलीधरन ला मैदानभर फिरवलेला गांगुली ने.. १० ओव्हर्स मधे ८५ पेक्षा जास्त रन्स दिलेल्या त्याने... या मॅच मधे सचिन भरात असुन पण उतरलेला नव्हता.
पण मॅच नंतर द्रविड बोललेला .. खाली सचिन बाकी आहे .. या विश्वासावर आम्ही फलंदाजी केली ...

सचिन अजुन यायचा बाकी आहे तो पर्यंत टेंशन नाही .. ही बाब भारतीय लोकांना बरोबर खेळाडुंना सुध्दा आश्वासक होती..

---

आता हे जे विराट, धोनी, शिखर रोहीत खेळत आहे .. ते याच विश्वासाचे प्रतिक आहे...आज च्या संघात एक जण आउट झाला तरी दुसरा खेळुन जातो...
शिखर आउट झाला तर रोहीत खेळतो .. तो गेला तर विराट आहेच... ते ही गेले तर रैना युवी ... असतात... आणि सगळे गेले तरी धोनी नावाचे वादळ शाबुत असते...... हा विश्वास निर्माण झाला आहे खेळांडु मधे...
मी आउट झालो तरी माझ्या मागे आहे...

सचिन च्या वेळेला ही अशी परिस्थिती नव्हतीच.. गांगुली द्रविड तर ९६ नंतर फॉर्मात आले.. द्रविड तर ९८-९९ मधे वनडे मधे फार्मात आला ...

तरी पण सचिन , गांगुली द्रविड हे आउट झाल्यावर भारताची परिस्तिथी वाईटच असायची..

---------------------

आजच्या संघात जर सचिन असता ... तर जे विश्वविक्रम रचले आहेत त्याचे शिखर त्याने अजुन उंच केले असते...

करोडो भारतीयांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली खेळणे सोप्पे नसते........

----------


एका प्रकाशकाच्या अपेक्षेच्या ओझ्या खाली भले भले लेखक दबुन जातात इथे तर करोडो लोक आहेत

( याला म्हणतात "सचिन ब्रिगेड" प्रतिसाद ) Biggrin

उदयन, हे सगळे सगळ्यांनी अनेकदा सगळीकडे लिहिलेले आहे. तरी तुमचे धन्यवाद! त्या स्टॅट्समध्ये पडायची मनात इच्छा नाही कारण त्यावरून नक्की काय काय सिद्ध होते हाच वाद आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर ताबडतोब खेळायला मैदानात उतरणे म्हणजे काही वडिल गेले असतानाही सीमेवर शत्रूशी लढणे वगैरे नव्हे.
>>

Sad

वडिलांच्या मृत्यूनंतर ताबडतोब खेळायला मैदानात उतरणे म्हणजे काही वडिल गेले असतानाही सीमेवर शत्रूशी लढणे वगैरे नव्हे. >>>>>>

नशिब इथे "खेळण्याचे पैसे मिळतात म्हणुन " असे लिहिले नाही

Pages