बदामी हलवा

Submitted by आरती. on 30 October, 2013 - 02:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१.कार्न फ्लोर - 1 कप
२. साखर - 2 कप
३. तूप - 1/2 कप
४. पाणी - १/२ लिटर
५. काजू - पाव कप (छोटे तुकडे करुन)
६. बदाम व पिस्ते - २ टेबल स्पून (छोटे तुकडे करुन)
७. हळद / केशर वेलची सिरप / तुमच्या आवडीचा खायचा रंग, ह्यापेकी एक - १/२ टी स्पून
८. वेलची पावडर - १/२ टी स्पून

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम पाणी आणि साखर एकत्र करून मंद आचेवर विरघळण्यासाठी ठेवा.
२. कॉर्न फ्लोरमध्ये थोड पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा. अजिबार गुठळ्या राहू देऊ नका.
३. साखरेच्या पाण्यात थोड थोड कॉर्न फ्लोरच मिश्रण घालून ढवळा. गॅस मंद आचेवर ठेवा.
४. साखरच पाणी आणि कॉर्न फ्लोरच मिश्रण मिक्स झाल की त्यात अर्धी वाटी तूप घालून ढवळा.
५. लगेच काजू, बदाम व पिस्त्याचे तुकडे आणि खायचा रंग घालून ढवळा.
६. मिश्रण पारर्दशक झाले की गोळा व्हायला सुरुवात होईल.
७. थोडा घट्ट गोळा झाला की गॅस बंद करा आणि वेलची पावडर घालून ढवळून घ्या.
८. अ‍ॅल्युमिनियमच्या ट्रेला तूप लावून हे मिश्रण सेट व्हायला ठेवा.
P01-02-13_17.17.jpg

९. हलवा पूर्ण थंड झाला की प्लेटमध्ये काढून हव्या त्या आकाराचे तुकडे कट करा.
P01-02-13_18.35.jpg
१०. छोटे तुकडे करुन खायला दया.
P01-02-13_18.43.jpg

११. हव तर काजूने सजवा.
P01-02-13_18.44.jpg

वाढणी/प्रमाण: 
तुमच्या आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

मिश्रण पारर्दशक झाले की शिजले अस समजा.
साखरेचा घट्ट पाक झाला तर घाबरून नका त्यात थोड पाणी घालून पातळ करा.
मी पाव कप तूप वापरून करून पाहिला छान झाला. १/२ कप तूपाचा थोडा तूपकट लागतो.
कॉर्न फ्लोर ऐवजी आरारुट पावडर वापरु शकता. माझ्या सखीने आरारुट पावडर वापरुन केला होता.

माहितीचा स्रोत: 
माझी सखी - मेघा
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

साधना, जागू Proud आणि धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्द्ल
म्हणजे तुम्ही दोघी आता स्वतः करून खाणार नाहीत Wink

भयंकर टेम्पंटींग दिसतोय!
लहानपणीचा आवडता पदार्थ... दाताने ओढून खात बसायला आवडायचे.

खावून खावून गोडाचा अतिमार्‍याने आता लांबूनच नमस्कार... Happy

म्हणजे तुम्ही दोघी आता स्वतः करून खाणार नाहीत

दुर्दैवाने नाही.. आता शक्यच नाही. २ कप साखर आणि अर्धा कप तुप.. डायटचं काय होणार मग??

मला याच्यातले बदाम खुप आवडायचे. खुप वेळा बाजारातल्या बदामी हलव्यात बदाम, काजु अख्खेच घातलेले असायचे. ते काढुन खायला मला खुप आवडायचे. Really missing it very much....

पण म्हणुन तुझी रेसिपी चांगली नहीय असे काही नाहीय हा... ज्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद घ्यायचाय किंवा जे अजुनही बदामी हलव्याच्या प्रेमात आहेत असे लोक आजही बनवतील.

मस्त मस्त मस्त Happy

जुन्या आठवणी जाग्या झाल्या फोटो पाहून.
आम्ही कोल्हापूरला असताना माझे वडिल दर गुरुवारी रात्री साईबाबांची विशेष आरती करायचे. धूप दिप नैवेद्य वगैरे. तेव्हा रोजच्या प्रसादाबरोबर अजून वेगळा प्रसादही असायचा. त्यात हा बदामी हलवा असायचा अधून मधून. शिवाय कोल्हापूरच्या खत्री स्वीटस मध्ये यात विविध रंग मिळायचे, वर दाखवलय त्या व्यतिरिक्त गुलाबी आणि हिरवा... Happy
शिवाय हा प्रसाद म्हणजे आमच्याकडे खिरापतीसारखं गुढ असायचं. पूजा होत असताना उघडून नैवेद्य दाखवतानाच कळायचा...

थँक्स खूप आठवणी ताज्या झाल्या. Happy

साधना , दक्षिणा तुमच्या जुन्या आठवणी वाचून खूप बर वाटल. साधना दिवाळीसाठी डायेट बाजूला ठेवायच पण तब्येत सांभाळून.
झंपी, बेफ़िकीर, Chaitrali, अश्विनी के धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्द्ल.
मितान, चिन्नु , प्राजक्ता नक्की करा आणि फोटा डकवा ईकडे. Happy

चिन्नु, गटग तर ठरु देत मग येते घेऊन. डोक्यांच्या नंबरांपेक्षा आपली पदार्थांची लीस्ट वाढत आहेत. Happy
मी नताशा, मलापण खायला आवडत नाही पण माझ्या आईला आवडतो म्हणून शिकली.
धन्स सुलेखाताई, प्रीति.