उदीत नारायण

Submitted by ऋयाम on 28 October, 2013 - 11:07

'सवय' हा जो काही प्रकार असतो, त्याच्यापुढे काहीही बोलता येत नाही. सवयीचा लाम असणं चांगलं समजलं जात नाहीच, पण ती सोडणं किती अवघड असतं हे ज्याचं जळतं त्यालाच...

'तो' खरं सांगायचं तर शास्त्रीय कळपात वगैरे जाऊ पहात नाही. "त्यानं जाऊही नये!" असं आमचे मा. भाऊसाहेब (कानाला हात) म्हणतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, "अरेऽ! त्याला आणि सोनू निगमला शेजारी शेजारी उभं करून गाणं म्हणायला सांगा! सोनू निगमचं कसं आहे, की त्याला कसलंही गाणं द्या, जमतं. आता, अगदी शंकर महादेवनपुढं उभं केलं तर मग अवघड होईल कदाचित. पण आहे. तयारी आहे!" भाऊसाहेब विषय सोडून सोनू निगमवर जातात.

'त्याला' क्रिटीसाईज करण्याच्या अशा शेकडो वेळा आठवतात. पण रूमवर टाईमपास करत बसलं असताना समजा कधी भाऊसाहेबांना "गाणं लाव रे" म्हणावं तर भाऊसाहेब त्याचंच (आणि तेच!) गाणं लावणार, "चाहे तुम कुछ ना कहोऽ!" मग प्रेक्षकांकडं बघणार. प्रेक्षकांमधले मी आणि बज्याशेठ एकमेकांकडं बघून हसतोय, तोवर बरमुडा आणि बनियनमधले भाऊसाहेब आपणच हसून, उभे राहतात. आम्ही "भाऊसाहेब स्टॅच्यूऽ!" केल्यासारखं आपणहून भाऊसाहेब स्टॅच्यू! डोळे मिटून 'जतिन ललितच्या' संगीताला दाद देत गिरकी घेतात आणि योग्य वेळी स्वतःच गाणं सुरू करतात, "पहला नशाऽ पहला खुमाऽऽऽऽऽर!" "व्वा!" म्हणत परत गादीवर...

काही काही गोष्टी आपण इतक्यांदा करतो, की मग त्या मोजायचं सोडून द्यावंसं वाटतं. उदाहरणार्थ सकाळी लवकर उठून पळायला जाणे, नॉनव्हेज कमी खाणे, विशिष्ट साईटवर अ‍ॅडिक्ट झाल्यासारखा टीपी न करणे वगैरे. मोजायच्या सोडून दिलेल्या अशा हजारो गोष्टी आहेत, पण 'उदीत नारायणाची' आम्ही इतकी चेष्टा केलीये, की ती मोजणं केव्हाच सोडून दिलं आहे. मी काही 'मनोरंजनाचे व्रत' वगैरे घेतले नसल्याने ह्या नारायणाचे वय, उंची, लहानपणी त्याला काय म्हणत, मोठेपणी त्याने गुपचुप द्वितीय लग्न केले की नाही वगैरे त्याच्या बाललीला मला ठाऊक नाहीत. आपल्या मनिषाचा तो गाववाला आहे, साधा माणूस आहे, आणि गळा गातेला आहे एवढंच ऐकून माहिती आहे.

पण बाकी कसाही असो, त्याच्या आवाजाबद्दल बोलायचं, तर "पापा कहते थे बडा नाम करेगा" पासून लेकाचा जो गातोय, त्याला तोड नाही. झालीस बहु, होशील सासू पण ह्यासम हाच. 'बदल ही एकमेव कायम असलेली गोष्ट आहे' वगैरे गटार गोष्टी ज्यांना नकोशा होतात, त्यांना ह्यामागचा दर्द समजेल. लहानपणापासून आमच्या कानांवर जी गाणी आदळली, ती ह्याचीच! माझंही आवडतेष्ट गाणं कोणतं असेल, तर ते म्हणजे स्लो मोशनमधलं 'पहला नशा'! कितीही वेळा ऐकलं तरी बोर न होणारं हे गाणं विशिष्ट ठिकाणी इतक्या उंचीवर पोहोचतं ...

माणूस जल्माला येतो. लहानाचा मोठा होऊ लागतो. क्रिकेट/भांडीकुंडी खेळू लागतो. दूरदर्शन पाहू लागतो. चित्रपट पाहू लागतो आणि नारायणगाणी ऐकू लागतो. ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या माणसांसाठी काही प्रमाणात असंच झालं असावं. पंजाबी जेवणाची आपल्याकडे सुरुवात झाली, तशी हॉटेलात १००-१०० प्रकारच्या पंजाबी भाज्या मिळू लागल्या. पण साधारण हॉटेलात तरी, नीट बघितलं तर ग्रेव्ही तीच, भाज्या जरा इकडच्या तिकडे. नारायणाच्या गळ्याचं तरी त्या ग्रेव्ह्यांपेक्षा काय वेगळं आहे? सोबतीला भाज्यांच्या जागी शब्द. भाज्या कच्च्याबिच्च्या असतील, नाहीतर शिळ्याबिळ्या असतील. ग्रेव्ही बरी असेल तर कसलीही भाजी गुमान रोटी किंवा नानबरोबर खाऊन टाकावी! मग हॉटेल देशात असो, स्वित्झर्लंडला असो किंवा आणखी कुणीकडे. वाढपी शाहरूख, सलमान असो वा आमिर, नारायण ग्रेव्ही असली की गाणं हिट्ट!

"चुडी बजी है कहीं दूर छन छन छन छन ...
कंगना बजा है कहीं दूर खन खन खन खन...
ये तेरा कजरा, ये तेरा गजरा...
लूटादू आज इसपे तन मन धन... "

'गुंडा'बद्दल म्हटलं जातं, "तो इतका वाईट आहे, की तो लय भारी आहे!" उदीत नारायणचं मात्र असं नाही. आपल्या मर्यादा त्याला माहित आहेत का नाहीत हे त्यालाच माहित. त्यातून इंटरनेटच्या जमान्यात काहीही लपून राहत नाही. त्यामुळं साहेबांच्या "सर सर सर सर सर!" बद्दल सोनू निगमने सांगितलेले किस्से आणि त्यानं केलेल्या मिमिक्र्या पहाणीय! पण बाकी काहीही असो, दिलेलं गाणं हसतमुखाने आणि गोड गळ्याने (नाकाने नव्हे!) म्हणून टाकायचं एवढंच काम वीसेक वर्षं ह्यानं केलं.. वाढपी आणि स्वैंपाकिणबाईही चांगल्या मिळाल्या तेव्हा तर गाण्याची लज्जत फारच वाढली. पिक्चर भले पडला असेल, गाणी चालायचीच.

परवा सावन.कॉम वर ऑनलाईन गाणी ऐकत होतो. हल्ली पदार्थ ओळखूच येईना झालेत त्यामुळे रॅण्डम गाणी चालू होती. अचानक 'राधा राधा' वाजू लागलं. भट्ट पोरगी आणि तिचे भाऊ नाचत-गात होते. गायक विशेष ओळखू येत नव्हते त्यामुळं दुर्लक्ष सुरु होतं. मधेच ऐकू आलं, "डफलीवाले, डफली बजा... मै नाचू तू नचाऽ!" हे काय म्हणून ऐकू लागलो, आणि पुढचे शब्द ऐकू येताच नकळत चेहेर्‍यावर हसू उमटलं! "राधा तेरी चुनरी, ओ राधा तेरा छल्लाऽ " जोहरांच्या भंगार हॉटेलातली रिमीक्स डीश फालतूच होती बहुतेक, पण एक इन्ग्रीडीयण्ट ओळखीचा वाटला. मी गाणं रिव्हाईंड केलं आणि परत साहेबांची वाट बघत घराकडे चालू लागलो. "डफलीवाले, डफली बजा... मै नाचू तू नचाऽ!" चार वर्षांपूर्वीचा भाऊसाहेब, बज्याशेठ भेटले. गळ्यात गळे टाकून आम्ही रूमकडे चालू लागलो. उदीत नारायण गाऊ लागला, "राधा तेरी चुनरी, ओ राधा तेरा छल्ला, ओ राधा तेरी नटखट नजरीयाऽऽऽ"

थर्डक्लास लिरीक्स असूदेत. येडा बावळट असूदेत. शास्त्रीय वगैरे न येऊदेत. पण गोडच गळ्याने गाणारा उदीत अजून गायलाच हवा. बदल नको वाटतात. मलाही विश्वास बसत नाहीये की हे मी म्हणतोय. पण काय करायचं? सवयच झालीये...

@ साभार विकिपीडिया
बापरे! सहज विकिपीडियावर बघितलं तर... पद्मश्री! http://en.wikipedia.org/wiki/Udit_Narayan

|| नारायण नारायण ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच लेख. ऐ अजनबी जबरदस्त गायलाय उदित. छैय्या छैय्या , सतरंगी रे आणि खुद्द लताचं जिया जले असा हाय व्होल्टेज शेजार असतानाही दिल से मधलं हेच गाणं अजूनही ऐकावंसं वाटतं. प्रत्येक गाणं तन्मयतेनं गातो.

लेख छान आहे. Happy
उदीत नारायण पहिल्यांदाच सिरियसली लक्षात आला ते वीर झारा मधील जानम देख लो आणि ते रे लिये मध्ये.
मग अचानकच मला साक्षात्कार झाला की अरेच्च्या ह्यानी तर खुप गाणी म्हणली आहेत जी मला आवडतात. Happy

अरे मस्त लेख आहे की, मला आपले देवादिकाचा असावासा वाटून उघडलाच नव्हता आजपर्यंत Happy

उदित नारायण समई / लामणदिवा प्रकारातला गायक आहे, संथ, शांत संयमीत, पण भरपूर वेळ टिकणारा. अगदी नजरंदाज दुर्लक्ष करण्याजोगाही नाही आणि फार दिलखेचक चित्ताकर्षक वगैरेही नाही. त्याच्याही कारकिर्दीला पंचवीसेक वर्षे होऊन गेली असतील नाही. इतके वर्षे आवाज टिकवून गात रहायचे म्हणजे भारीच की!

अरे मस्त लेख आहे की, मला आपले देवादिकाचा असावासा वाटून उघडलाच नव्हता आजपर्यंत >>>>>>>

हे म्हणजे झीनतचा "सत्यम शिवम सुंदरम" चित्रपट देवाचा म्हणुन बघायला गेलेल्या बायकांची कसली अवस्था झाली होती, ते आठवलं.

मस्त
मेलोडियस आवाज
माझ्याही आवडीचा गायक
"मै निकला गड्डी लेकर" सारखे ट्रकड्रायव्हरछाप गाण्यात सुद्धा त्याच्या गोड आवाजाने बहार आणली होती हे विशेष

पैला नंबर मात्र सोनूचाच (हे आपल उगाचचं)

लेख मात्र छानच

खूप सुंदर लेख.. पहला नशा, मेरी सासों में बसा है, ए अजनबी, गुंजीसी है सारी दिशा आणि मैं यहा हूँ ही ऑलटाइम फेव्हरिट गाणी.. कितीवेळाही ऐका यार कधीच जुनी होत नाहीत.. मेरी सासों में बसा है ऐकल्यावर तर असलं फ्रेश वाटतं मला ( आधी वाटायचं उगाच आहे, पण आता कळतयं काय ही जादू आहे त्यांच्या आवाजाची)
सोनू निगम आणि त्यांची तुलना होऊच शकत नाही.. सोनू ग्रेट आहेच, पण उदितजींकडे एक क्लास आहे..! तोड नाही त्यांच्या आवाजालापण..

Pages