उदीत नारायण

Submitted by ऋयाम on 28 October, 2013 - 11:07

'सवय' हा जो काही प्रकार असतो, त्याच्यापुढे काहीही बोलता येत नाही. सवयीचा लाम असणं चांगलं समजलं जात नाहीच, पण ती सोडणं किती अवघड असतं हे ज्याचं जळतं त्यालाच...

'तो' खरं सांगायचं तर शास्त्रीय कळपात वगैरे जाऊ पहात नाही. "त्यानं जाऊही नये!" असं आमचे मा. भाऊसाहेब (कानाला हात) म्हणतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, "अरेऽ! त्याला आणि सोनू निगमला शेजारी शेजारी उभं करून गाणं म्हणायला सांगा! सोनू निगमचं कसं आहे, की त्याला कसलंही गाणं द्या, जमतं. आता, अगदी शंकर महादेवनपुढं उभं केलं तर मग अवघड होईल कदाचित. पण आहे. तयारी आहे!" भाऊसाहेब विषय सोडून सोनू निगमवर जातात.

'त्याला' क्रिटीसाईज करण्याच्या अशा शेकडो वेळा आठवतात. पण रूमवर टाईमपास करत बसलं असताना समजा कधी भाऊसाहेबांना "गाणं लाव रे" म्हणावं तर भाऊसाहेब त्याचंच (आणि तेच!) गाणं लावणार, "चाहे तुम कुछ ना कहोऽ!" मग प्रेक्षकांकडं बघणार. प्रेक्षकांमधले मी आणि बज्याशेठ एकमेकांकडं बघून हसतोय, तोवर बरमुडा आणि बनियनमधले भाऊसाहेब आपणच हसून, उभे राहतात. आम्ही "भाऊसाहेब स्टॅच्यूऽ!" केल्यासारखं आपणहून भाऊसाहेब स्टॅच्यू! डोळे मिटून 'जतिन ललितच्या' संगीताला दाद देत गिरकी घेतात आणि योग्य वेळी स्वतःच गाणं सुरू करतात, "पहला नशाऽ पहला खुमाऽऽऽऽऽर!" "व्वा!" म्हणत परत गादीवर...

काही काही गोष्टी आपण इतक्यांदा करतो, की मग त्या मोजायचं सोडून द्यावंसं वाटतं. उदाहरणार्थ सकाळी लवकर उठून पळायला जाणे, नॉनव्हेज कमी खाणे, विशिष्ट साईटवर अ‍ॅडिक्ट झाल्यासारखा टीपी न करणे वगैरे. मोजायच्या सोडून दिलेल्या अशा हजारो गोष्टी आहेत, पण 'उदीत नारायणाची' आम्ही इतकी चेष्टा केलीये, की ती मोजणं केव्हाच सोडून दिलं आहे. मी काही 'मनोरंजनाचे व्रत' वगैरे घेतले नसल्याने ह्या नारायणाचे वय, उंची, लहानपणी त्याला काय म्हणत, मोठेपणी त्याने गुपचुप द्वितीय लग्न केले की नाही वगैरे त्याच्या बाललीला मला ठाऊक नाहीत. आपल्या मनिषाचा तो गाववाला आहे, साधा माणूस आहे, आणि गळा गातेला आहे एवढंच ऐकून माहिती आहे.

पण बाकी कसाही असो, त्याच्या आवाजाबद्दल बोलायचं, तर "पापा कहते थे बडा नाम करेगा" पासून लेकाचा जो गातोय, त्याला तोड नाही. झालीस बहु, होशील सासू पण ह्यासम हाच. 'बदल ही एकमेव कायम असलेली गोष्ट आहे' वगैरे गटार गोष्टी ज्यांना नकोशा होतात, त्यांना ह्यामागचा दर्द समजेल. लहानपणापासून आमच्या कानांवर जी गाणी आदळली, ती ह्याचीच! माझंही आवडतेष्ट गाणं कोणतं असेल, तर ते म्हणजे स्लो मोशनमधलं 'पहला नशा'! कितीही वेळा ऐकलं तरी बोर न होणारं हे गाणं विशिष्ट ठिकाणी इतक्या उंचीवर पोहोचतं ...

माणूस जल्माला येतो. लहानाचा मोठा होऊ लागतो. क्रिकेट/भांडीकुंडी खेळू लागतो. दूरदर्शन पाहू लागतो. चित्रपट पाहू लागतो आणि नारायणगाणी ऐकू लागतो. ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या माणसांसाठी काही प्रमाणात असंच झालं असावं. पंजाबी जेवणाची आपल्याकडे सुरुवात झाली, तशी हॉटेलात १००-१०० प्रकारच्या पंजाबी भाज्या मिळू लागल्या. पण साधारण हॉटेलात तरी, नीट बघितलं तर ग्रेव्ही तीच, भाज्या जरा इकडच्या तिकडे. नारायणाच्या गळ्याचं तरी त्या ग्रेव्ह्यांपेक्षा काय वेगळं आहे? सोबतीला भाज्यांच्या जागी शब्द. भाज्या कच्च्याबिच्च्या असतील, नाहीतर शिळ्याबिळ्या असतील. ग्रेव्ही बरी असेल तर कसलीही भाजी गुमान रोटी किंवा नानबरोबर खाऊन टाकावी! मग हॉटेल देशात असो, स्वित्झर्लंडला असो किंवा आणखी कुणीकडे. वाढपी शाहरूख, सलमान असो वा आमिर, नारायण ग्रेव्ही असली की गाणं हिट्ट!

"चुडी बजी है कहीं दूर छन छन छन छन ...
कंगना बजा है कहीं दूर खन खन खन खन...
ये तेरा कजरा, ये तेरा गजरा...
लूटादू आज इसपे तन मन धन... "

'गुंडा'बद्दल म्हटलं जातं, "तो इतका वाईट आहे, की तो लय भारी आहे!" उदीत नारायणचं मात्र असं नाही. आपल्या मर्यादा त्याला माहित आहेत का नाहीत हे त्यालाच माहित. त्यातून इंटरनेटच्या जमान्यात काहीही लपून राहत नाही. त्यामुळं साहेबांच्या "सर सर सर सर सर!" बद्दल सोनू निगमने सांगितलेले किस्से आणि त्यानं केलेल्या मिमिक्र्या पहाणीय! पण बाकी काहीही असो, दिलेलं गाणं हसतमुखाने आणि गोड गळ्याने (नाकाने नव्हे!) म्हणून टाकायचं एवढंच काम वीसेक वर्षं ह्यानं केलं.. वाढपी आणि स्वैंपाकिणबाईही चांगल्या मिळाल्या तेव्हा तर गाण्याची लज्जत फारच वाढली. पिक्चर भले पडला असेल, गाणी चालायचीच.

परवा सावन.कॉम वर ऑनलाईन गाणी ऐकत होतो. हल्ली पदार्थ ओळखूच येईना झालेत त्यामुळे रॅण्डम गाणी चालू होती. अचानक 'राधा राधा' वाजू लागलं. भट्ट पोरगी आणि तिचे भाऊ नाचत-गात होते. गायक विशेष ओळखू येत नव्हते त्यामुळं दुर्लक्ष सुरु होतं. मधेच ऐकू आलं, "डफलीवाले, डफली बजा... मै नाचू तू नचाऽ!" हे काय म्हणून ऐकू लागलो, आणि पुढचे शब्द ऐकू येताच नकळत चेहेर्‍यावर हसू उमटलं! "राधा तेरी चुनरी, ओ राधा तेरा छल्लाऽ " जोहरांच्या भंगार हॉटेलातली रिमीक्स डीश फालतूच होती बहुतेक, पण एक इन्ग्रीडीयण्ट ओळखीचा वाटला. मी गाणं रिव्हाईंड केलं आणि परत साहेबांची वाट बघत घराकडे चालू लागलो. "डफलीवाले, डफली बजा... मै नाचू तू नचाऽ!" चार वर्षांपूर्वीचा भाऊसाहेब, बज्याशेठ भेटले. गळ्यात गळे टाकून आम्ही रूमकडे चालू लागलो. उदीत नारायण गाऊ लागला, "राधा तेरी चुनरी, ओ राधा तेरा छल्ला, ओ राधा तेरी नटखट नजरीयाऽऽऽ"

थर्डक्लास लिरीक्स असूदेत. येडा बावळट असूदेत. शास्त्रीय वगैरे न येऊदेत. पण गोडच गळ्याने गाणारा उदीत अजून गायलाच हवा. बदल नको वाटतात. मलाही विश्वास बसत नाहीये की हे मी म्हणतोय. पण काय करायचं? सवयच झालीये...

@ साभार विकिपीडिया
बापरे! सहज विकिपीडियावर बघितलं तर... पद्मश्री! http://en.wikipedia.org/wiki/Udit_Narayan

|| नारायण नारायण ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवड्लं .. पहला नशा नेहमीच फ्रेश वाटत केव्हाही ऐकलं तरी.. Happy
झालीस बहु, होशील सासू पण ह्यासम हाच >> Lol

आहा, खासच लिहिलंय Happy खरंच की, उदीत नारायणबद्दल कधी इतका विचारच केला नव्हता! ग्रेव्ही वगैरे एकदम चपखल. इतक्या मर्यादा आहेत पण तो रेहमानच्या कळपातलाही फेवरीट गडी आहे. 'निंदिया रे', 'ये तारा वो तारा हर तारा', 'गुंजीसी है सारी फिजा जैसे बजती है शहनाईयां', 'क्या करें क्या ना करें ये कैसी मुश्कील हाए' ही त्याच्या खुपच आवडलेल्या गाण्यांपैकी काही. पार 'बिन तेरे सनम' पासून त्यानं आजपर्यंत आवाजाचा दर्जा मात्र तसाच टिकवून ठेवलाय हे कौतुकास्पद आहे. जे समोर येईल ते मनापासून गातो याबद्दल अगदी सहमत. छान लिहिलंय ऋयाम Happy

जबरी जमलाय लेख. उडित नारायण.. उडत उडतच ऐकलाय. पण काही काही गाणी खास आहेत आणि खरच एकाच उडित संपवण्याइतकाही "हा" नाही हा...
नारायण नारायण.

लेख छान.
उदित नारायणचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आवाज हा फक्त त्याच्यासारखाच आहे. कोणाही आधीच्या गायकांची छाप नाही. आताशा फारसा ऐकायला मिळत नाही तो.
आवडती काही गाणी..
भोली सी सूरत,
चांद ने कुछ कहा,
हो गया है तुझको तो प्यार सजना..

मस्त माझा सुध्दा फेवरेट... उदीत चा आवाज आणि खान मंडळींचा चेहरा...... मुख्यत: शाहरुख आणि आमिर वर परफेक्ट ......

"आजा रे आजा रे
आजा रे आज्जा रे
भले कितने लम्बे हो रस्ते हो
थके ना तेरा ये तन हो
आजा रे आजा रे सुन रे पुकार डगरीया
रहे ना ये रस्त तरस्ते हो तु आजा रे
इस धरती का है राजा तु
ये बात जान ले तु
कठनायी से टकरा जा तु नही हार मानले तु
ओ मितवा सुन मितवा तुझ को क्या डर है रे ये धरती अपनी है अपना अंबर है रे . तु आजा रे "

लगान मधे त्याचा आवाज इतका परफेक्ट अमिर खान वर बसला त्यात ते मगध शब्दांच्या उच्चारा सकट मस्त गाणे गायला आहे...

"ओ री छोरी" मधे तर त्याच्या आवाजा शिवाय दुसर्याची कल्पनाच होत नाही

-------------

अवांतर :

आता त्याचा मुलगा आदित्य नारायन देखील प्लेबॅक सिंगर बनला आहे.. त्याचा सुध्दा आवाज जवळपास उदित सारखाच आहे... पण मध कमी आहे त्यात Happy

आवडला लेख. काही गाण्यात आवाज इतका श्रवणीय की कधी कंटाळाच येत नाही त्या गाण्यांचा. मग ती गाणी ऐकताना मनातल्या मनात तुच्छ कटाक्ष टाकून 'काय सुमार शब्द आहेत! नुसते फ ला ट जोडलेत...' असे तीनदा का पुटपुटले जाईना! यात संगीतकाराचा वाटा किती आणि याचा किती नारायणास ठाऊक? किंवा असे गणित नकोच मांडायला.

मेरी सांसोमे बसा है तेरा ही एक नाम
तेरी याद हमसफर सुबहो श्याम........तेरी याद हमसफर.....

ह्या गाण्यात अजून किमान १० तरी कडवी असायला हवी होती असं मला कायम वाटतं.

फक्त एक सहजच म्हणून 'ऐ अजनबी' सोनू निगमच्या आवाजात आणि 'सतरंगी रे' ऊदित नारायणच्या आवाजात एकदा तरी ऐकावं असंही सारखं वाटतं. तुलना म्हणून नाही पण सहजच आपली एक ईच्छा.

ऋयाम तुमचा लेख खूप आवडला. उदित माझाही फ़ेवरीट.
<<उदित नारायणचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आवाज हा फक्त त्याच्यासारखाच आहे>> +१
उदित चं ऐ अजनबी हे माझं ऑल टाईम फ़ेवरीट.
अरे रे अरे चा छोटा पीस (सामने है रास्ते हम गुजर जाये) लता सोबत मस्त म्हटला आहे त्याने.
कॉलेज च्या दिवसांत उदित चे आम्ही सगळेच पंखे.
बीन तेरे सनम मर मिटेंगे हम यारा दिल दारा हा निहायत टूकार सिनेमा निव्वळ या गाण्यासाठी बघितला होता.

<<<<'गुंजीसी है सारी फिजा जैसे बजती है शहनाईयां'>>>> रेहमान नाही. शंकर एहसान लॉय आहे.

लेख उदितच्या आवाजासारखाच गोड आहे.

अरे इतके दिवस मला अस वाटायचं की आपल्यालाच फक्त उदित नारायण ची गाणी आवडतात. आहेत आहेत माझ्या सारखे पण लोक आहेत.
बीन तेरे सनम मर मिटेंगे - & पहेला नशा - केवळ अप्रतिम

मेरी सांसोमे बसा है तेरा ही एक नाम
तेरी याद हमसफर सुबहो श्याम........तेरी याद हमसफर.....

ह्या गाण्यात अजून किमान १० तरी कडवी असायला हवी होती असं मला कायम वाटतं.>>>> +१००

बीन तेरे सनम मर मिटेंगे - & पहेला नशा - केवळ अप्रतिम >>> खासचं, कधीही ऐका.

आवडता गायक
त्याची पहला नशा, ऐ अजनबी, चांद छुपा बादल में, मै यहाँ हु, मेरी साँसोंमे बसा है, घर से निकलते ही, जाने क्यु लोग प्यार करते है, चुपके से सुन इस पल की धुन आणि बरीचशी गाणी प्रचंड आवडतात.

असाच अभिजीतचा आवाज पण आवडतो. पण तो ही गात नाही हल्ली बहुधा. << आरएमडी अभिजीतने नुकत्याच येऊन गेलेल्या बेशरमसाठी "दिल का जो हाल है" हे गाणं गायलेलं आहे.

मस्त लिहिला आहेस लेख Happy
पहला नशा हे गा॑णं ज म लं च आहे. पर्फेक्ट मेलडी, आवाज आणि चित्रिकरण. द बेस्ट.
'ए अजनबी' हे गाणं हॉन्टिन्ग आहे. सर्वात आवडती ही दोन गाणी.
उदित नारायण इन्डस्ट्रीतला एकदम 'जन्टलमन' गायक वाटतो (आणि असावा अशी अपेक्षाही आहे, उगाचच.)

उदीत माझा आवडता गायक वगैरे आहे असं मनापासून कधी वाटलं नव्हतं (कदाचित जाणवलं नव्हतं) पण ऋयाम, तुझं हे ललित वाचून अन गाण्यांची ही लिस्ट वाचून (AMIT लिस्ट साठी सेम पिंच!) जाणवलं अर्रे आपली बरीचशी आवडती अगदी ऑल टाईम फेव गाणी तर उदीतनेच गायलेत Happy

उदित नारयणने गायलेली गाणी त्याच्याशिवाय इतर कोणाच्या आवाजात ऐकवतील असे वाटत नाही ह्यातच त्याचे श्रेय आहे. का कोण जाणे तो पूनम म्हणते तसा तो नेहमीच एक जंटलमन गायक वाटत आलाय खरं. त्याची परत परत ऐकवतील अशी गाणी पण बरीच आहेत.

Pages