नशिबाचा वारा उडवे, तो स्वच्छंदी कचरा मी

Submitted by बेफ़िकीर on 23 October, 2013 - 12:38

नशिबाचा वारा उडवे, तो स्वच्छंदी कचरा मी
केव्हाचा घालत आहे, या विश्वाला चकरा मी

ज्यांच्या रंगावर सारे जग मरते त्यांचा नाही
झालेत पांढरे नुकते त्या केसांचा गजरा मी

हे आठवण्यापुरता तर वृत्तीत मीपणा राहो
मीपणा विसरण्यासाठी सर्वात प्रथम विसरा 'मी'

मी लांब राहणार्‍यांशी जवळीक साधली इतकी
की त्यांच्यासाठीसुद्धा बनलो आहे उपरा मी

कल्पनेतल्या प्रतिभेने व्यक्तित्व मढवले आहे
वास्तवास जो सोसेना तो दुर्दैवी नखरा मी

अप्राप्य राहतो आधी, अप्राप्य वाटतो नंतर
घालेल तो सुखी व्हावा इतका साधा सदरा मी

ते सारे या हृदयाच्या ओलांडुन सीमा गेले
मी माझी वेस स्वतःची अन् दुनियेचा दसरा मी

आधीच्या शब्दप्रभूंना कोणीही विसरत नाही
दारिद्र्य सोसतो आहे गझलेत युगे अठरा मी

ज्याचा ना सानी आहे ना उला कुणीही ज्याचा
जो एकटा नशा देतो, तो 'बेफिकीर' मिसरा मी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,
तुम्ही ज्यादृष्टीने माझ्या प्रतिसादाकडे पाहिले असेल त्याचा अंदाज घेण्याचे मला कारण नाही. मी लय हे केवळ तंत्रासाठी म्हटलेले नाही. माझा उद्देश यति सांगण्याचा आहे. मतल्यातच तुम्ही स्वल्पविराम वापरून यतीची जागा दाखवून दिलीत. मात्र काही ओळी यती न वापरताही सलग म्हणता येत आहेत, तर काही ओळी म्हणण्यासाठी यतीची विशेष आवश्यकता वाटते आहे.... अशा दृष्टीने मी लय हा शब्दप्रयोग केला.

ज्यांच्या रंगावर सारे जग मरते त्यांचा नाही
झालेत पांढरे नुकते त्या केसांचा गजरा मी
*** तुम्ही पूर्वी एकदा सांगितल्याप्रमाणे एका गा साठी सलग 2 लल असतील तर प्रवाहीपणा येण्यास मदत होते. इथे पहिल्या ओळीत वर, जग, मर असे वापरून जी सहजता येते आहे ती दुसऱ्या ओळीत मात्र त आणि ढ हे वेगवेगळ्या शब्दांत आल्याने कमी होते आहे.
आणखी एक म्हणजे या दोनही ओळी म्हणण्यासाठी यतीची आवश्यकता भासत नाही. कोठेही न थांबताही सलग म्हणता येतात.

हे आठवण्यापुरता तर वृत्तीत मीपणा राहो
मीपणा विसरण्यासाठी सर्वात प्रथम विसरा 'मी'
या शेरांत पहिली ओळ म्हणण्यासाठी यतीची आवश्यकता नाही, मात्र दुसरी ओळ म्हणताना -सर्वात- या शब्दाआधी थांबावे लागत आहे, (जे तुम्ही मतल्यात दाखवले आहे.) कारण, लघु अक्षरे खंडाखंडाने येत आहेत.

मी लांब राहणार्‍यांशी जवळीक साधली इतकी
की त्यांच्यासाठीसुद्धा बनलो आहे उपरा मी
इथे पहिल्या ओळीत यतीची आवश्यकता वाटते, तर दुसरी ओळ बन आणि उप यांच्या सलगतेमुळे यतीविनाही म्हणता येते आहे.

कल्पनेतल्या प्रतिभेने व्यक्तित्व मढवले आहे
वास्तवास जो सोसेना तो दुर्दैवी नखरा मी
या दोनही ओळी लघुत सलगता नसतानाही यतीविनाही म्हणता येत आहेत. उलट पहिल्या ओळीत -प्रतिभेने- नंतर यती घेतला तर अडचणच येत आहे. (माझ्या या म्हणण्याचा नीट विचार करावा.)

अप्राप्य राहतो आधी, अप्राप्य वाटतो नंतर
घालेल तो सुखी व्हावा इतका साधा सदरा मी
यात पहिल्या ओळीत यतीची अत्यंत आवश्यकता वाटते, तर दुसऱ्या ओळीत आवश्यकता नाही. पहिल्या ओळीत दुसऱ्या अप्राप्य या शब्दामुळे यतीची आवश्यकता आहेच.

तुमच्या लयीच्या अभ्यासाबद्दल मी भाष्य केले नव्हते. मात्र, मात्रावृत्त आणि यती वापरल्याने यतीच्या आवश्यकतेबद्दलचे मत मी मांडले आहे जे लय या शब्दाशी संबंधित आहे.

असो. धन्यवाद आणि शुभेच्छा.

'लय' या शब्दाचा प्रयोग कोणत्या अर्थाने केला वगैरे मुद्दे निरर्थक आहेत. लय या शब्दाला एक ठराविक अर्थ आहे.

या गझलेत प्रत्येक ओळीत १४ मात्रांनंतर यती आहे व यती न घेता वाचणे ही चूक आहे.

बाकी प्रतिसादात काही वेगळे किंवा नवीन नसल्याने दुर्लक्ष करत आहे.

अजयजी बेफीजी म्हणताय्त ते बरोबर आहे १४ मात्रांनंतर थांबायचे आहे
हे मात्रा वृत्त आहे १४ +१४ =२८ असे प्रत्येक ओळीत आहे (नाव माहीत नाही वृत्ताचे)
प्रत्येक ओळीत एकाच जागी थांबायचे आहे म्हणजे एकच यती आहे दोन तीन यती नाहीत इथे व सर्व ओळी ह्या हिशेबात अचूकच आहेत
आपणही ह्याच पद्धतीने वाचावेत

आता मुद्दा निघालाच आहे तर मला असलेली माहीती शेअर करतो...

ही मात्रावृत्ते (मात्रांचा हिशेब समसंख्या असलेली ) मी अखंड-गा मानतो
गा = ल+ल असे फोडावे लागलेच तर सलग लल असे करणे अधिक उत्तम आहे पण माझे निरीक्षण असे की ह्या दोन ल मध्ये जास्तीत जास्त एका गा चे अंतर म्हणजे लगाल असे आले तरी लयीची मजा जाणवावी इतकीही कमी होत नाही
अश्या वृत्तांत एकच यतिस्थान योजले आणि एका ओळीला २ खंड पाडले की मग ते दोन्ही अखंड-गा मानून वाचायचे ल आलेच तर वरील दोन्ही पैकी एका प्रकारे आले तर लयीला काही नुकसान वगैरे होत नाही असे माझे मत (माझ्या अनेक ओळी ह्याच पॅटर्न मध्ये आल्या आहेत ह्या अनुभवावरून मी असे म्हणत आहे

वर बेफीजींच्या ज्या ओळी आपणास खटकल्या तिथे हा ताळेबंद लगाल = गागा लावून पहावात मग आपणासही माझ्यासारखाच प्रत्यय येईल अशी खात्री आहे

ह्या २ ल मधील अंतर जितक्या गा नी वाढेल तितका लयीचा चुस्तपणा कमी होईल म्हणून मी माझ्या गझलेच्या बाबतीत केवळ एक गा चे अंतर असल्यास हरकत नाही असे मानत आलो आहे आजवर

मात्रांचा हिशेब समसंख्या नसेल तर ...त्या लयीत मी तरी एका ओळीत एक ल नुसता ल म्हणून फिक्स करून बाकी ओळीतही तो ल लयीच्या त्याच स्थानावर नुसता एक ल म्हणून पाळावा या मताचा आहे

राहीली बाब अशी की ह्या लयी (ह्याच कशाला कोणतीही लय )मनात घोळवतानाच अशा घोळवल्या की ओळी रचताना कसलीच जुळवाजुळव करावी लागत नाही मात्रा मोजतही बसाव्या लागत नाहीत आपोआपच मनातून शब्द त्या लयीतच बाहेर येतात
वाचतानाही ह्या लयींचा अखंड गा पॅटर्न वाचकानेही सवयीचा करून घ्यावा असे मला एक वचक म्हणून वाटते

असो

थांबतो Happy

आणि हो एक सांगायचे राहिले हा गा फोडण्याचे प्रकार जे मी म्हणालो की लल /लगाल .... त्यात हे दोन ल एकाच शब्दात न येता लगतच्या शब्दात विखरून आले तरी लयीला धक्का बसत नाही कारण यतिस्थानाच्या पर्यंतचे तुकडे/ खंड ..अखंड-गा असे मानूनच वाचायचे आहेत एक शब्द झाला की हलकेहलके थांबे घ्यायचे आहेतच(प्रत्येक शब्दाचा शब्दार्थ हाती लागावा यासाठीचे थांबे ) पण यतिसाठी जसे श्वासांना रीलॅक्स वाटेल इतपत थांबतो आपण तसे थांबायचे नाहीयेय
धन्यवाद अजयजी !
आणि हो... बेफीजी ..ह्या २ प्रतिसादात मी लिहिले ते आपणास काहीही अवांतर किंवा चुकीचे वाटल्यास क्षमस्व

वैवकु, तुमचे म्हणणे योग्य आहे. चिथावणीखोर पण निरर्थक अश्या अभिप्रायांची दखल नाही घेतली तरी चालू शकते, पण घ्यायची झाली तर अशीच मुद्देसूदपणे घ्यावी हे तुम्ही दाखवून दिलेत.

Pages