काल आणि आज

Submitted by सुनीता करमरकर on 21 October, 2013 - 06:51

एक दिवस मी रोजच्या सारखी ऑफिसला जाण्यासाठी बसची वाट बघत रस्त्यावर थांबले होते. समोरून एक काका आणि एक तरुण मुलगी रस्ता ओलांडून आले. ती मुलगी माझ्या जवळ येऊन थांबली आणि मला विचारू लागली कि अमुक एका ठिकाणी जाण्यासाठी इथून बस मिळेल का? मी म्हटले कि इथून तिथे जाण्या साठी बस तर नाही मिळणार पण सहा आसनी रिक्षा मिळेल. रस्त्यात एका ठिकाणी उतरून मग दुसरी रिक्षा बघावी लागेल.

मग रिक्षा कुठे थांबतील, वगेरे चौकशी तिचे वडील करू लागले. थोडे काळजीत असतील असे वाटले.
थोड्या वेळानी एक सहा आसनी रिक्षा आली. ती मुलगी त्यात बसून जाऊ लागली. जाताना वडिलांना हात हलवून टाटा - बाय बाय करून गेली. पोचलीस कि फोन कर असा काळजीयुक्त सल्ला द्यायला वडील विसरले नाहीत.

मी माझी बस येते आहे का हे बघायला लागले. मग ते काका मला सांगू लागले " कॉलेजात चालली आहे. आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. आम्ही इथे नवीन आहोत, काही माहिती नाही आहे. म्हणून तिला म्हटले कोणाला विचारून बघ. फोन करेल आता ती - कॉलेजला पोहोचलीकी . आमच्या गावात आजून मुली कोणी शिकत नाही बघा. हिच्या सगळ्या मैत्रिणींची लग्ने झाली. पण मी म्हटले तिला कि तू शिकायचे. खूप हुशार आहे ती. " काका स्वताहून बोलत होते. मी नुसती हसून मान डोलावली. काका दूर जाणाऱ्या रिक्षा कडे बघून मग मागे फिरले.

किती साधी घटना ! पण त्या घटने मुळे विचारांचे चक्र सुरु झाले.

रात्री बघितलेल्या रमाबाई रानडेंच्या मालिकेची दृश्ये परत एकदा दिसू लागली. घरातल्या सगळ्यांचा शिक्षणाला विरोध. त्यांनी शिकू नये म्हणून केलेले एक एक उपाय. बायकांना सततचे घरकाम, कोणते स्वातंत्र्य नाही. लहान वयात लग्न, मुले, प्रपंच. कसे आयुष्य होते ते ! विचार करून पुन्हा खूप अस्वस्थ वाटले.
मग आठवले माझे लहानपण.

मी आणि बहिण खूप लहान असताना आम्हाला आणि घरच्यांना सांभाळून शिकणारी आई. मग शिक्षण झाल्यावर शाळेच्या नोकरी साठी हट्ट धरणारी आई. शाळेत जायला उशीर नको आणि घराची कामे पण झाली पाहिजे म्हणून पहाटे उठणारी आई. सकाळी ७ वाजता सगळा स्वयंपाक आवरून घराबाहेर पडणारी आई. शाळेत पोहोचायला उशीर नको म्हणून भराभर चालणारी शिस्तप्रिय आई . आणि नुसते नोकरी आणि आहे तेवढ्या शिक्षणावर समाधान न मानता पुढे शिकणारी आई. 'एम. एड.' ला गोल्ड मेडल मिळवणारी आई.

काळ बदलायला सुरुवात झालीच होती.

पण नुसते एका हातानी टाळी वाजत नाही. जसे यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीर बाई असते. तसे यशस्वी बाईच्या मागे कुठे तरी पुरुष पण असतो. कधी विरोध करून तिची जिद्द वाढविणारा तर कधी मदत करून तिचा मार्ग सुखकर करणारा.

त्या मुलीच्या मागे तिचे वडील असेच उभे असतील म्हणून ती आजच्या काळात कोलेजात जात असताना तिला सोडायला काळजीने, कौतुकाने तिचे वडील बरोबर आले.

बस आली. मी बस मध्ये चढले. रस्त्या पलीकडे ते काका उभे होते. फोन वर कोणाशी तरी बोलत होते. मला सहज वाटून गेले कि त्यांनी मुलीलाच फोन केला असेल. पाठमोऱ्या काकांकडे बघितले आणि मला माझे बाबा आठवले.

सुरुवातीला आईच्या नोकरीला नापसंत करणारे आणि नंतर तिला लागेल ती मदत करणारे. आमच्या प्रत्येक निर्णयाला पाठींबा देणारे आणि त्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगणारे. आमच्या साठी काळजी करणारे आणि आमचा आभिमान बाळगणारे. वेळ पडली कि रागावणारे पण आमचे सगळे लाड, हट्ट पुरविणारे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हा मुलींवर कधी मुलगी म्हणून कोणती बंधने न टाकणारे. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देणारे आणि त्या बरोबर येणाऱ्या जवाबदारीची जाणीव करून देणारे माझे बाबा.

बस पुढे जात होती.

म्हटले काळ पुढे चालला आहे हे किती बरे आहे.

आजही जरी मुलींना पूर्ण स्वतंत्र्य नसले, आजही हुंडाबळी जात असले, आजही मुलींना दुय्यम वागणूक मिळत असेल, त्या सुरक्षित नसतील तरी सगळे काही निराशाजनक नाही आहे.

ज्या लहानश्या गावातून आजही ज्या वयात मुलींची लग्ने करून टाकण्याची पध्धत आहे त्याच गावातून एक वडील मुलीला शिकायला शहरात घेऊन येतात हे उद्याच्या आणखीन चांगल्या भविष्याचे चित्र नाही का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंयस. विचारही सुस्पष्ट आणि सुसंगत मांडले आहेत. लेख आवडला.

मायबोलीवर स्वागत! Happy