आधुनिक सीता - १६

Submitted by वेल on 13 October, 2013 - 00:46

भाग ११ - http://www.maayboli.com/node/45523
भाग १२ - http://www.maayboli.com/node/45579
भाग १३ - http://www.maayboli.com/node/45598
भाग १४ - http://www.maayboli.com/node/45630
भाग १५ - http://www.maayboli.com/node/45696

*******************************************************************************************************************

मी रफिकच्या आयुष्यात राहायचा कधी विचार केला होता की मी इथे अडकले, मी स्वतःलाच विचारलं.

बर्‍याच दिवसांच्या मेडिटेशननंतर माझ्या लक्षात आलं की सौदीचे स्त्रियांसाठीचे नियम खूप कडक असतात ह्या ऐकीव माहितीवर मी बरीच घाबरून गेले होते. दादाने आणि मी ठरवलं होतं की इथल्या कायद्यांची पूर्ण माहिती काढायची, पण ते राहूनच गेलं होतं. आणि त्यामुळे मनातली भीती कमी न होता बळावली होती. ती भीती, रोजच्या रोज जाणवली नव्हती तरी कुठे तरी मनाच्या कोपर्‍यात तिने घर केलं होतं. जसजशी माझी सौदीला येण्याची वेळ जवळ येत होती तसतशी माझी भीती मनाच्या कोपर्‍यातून मनाच्या पृष्ठभागावर आली होती. मी परत येईन की नाही क तिथेच अडकून पडेन माझ्याकडून काही आगळीक तर घडणार नाही ना, मी तुरुंगात तर जाणार नाही ना हे विचार माझ्या मनात वारंवार येत असत. मनी वसे ते स्वप्नी दिसे नव्हे, संगे होतसे.. तसच झालं होतं. आता मी ह्याच नियमाला वापरून इथून बाहेर पडू शकेन का? पण कधी किती वेळात? हे खरच असं होऊ शकेल का? मनात शंका आली.
" छकुले, मनात शंका आली की देवसुद्धा ती गोष्ट घडवू शकत नाहीत. सश्रद्ध मनाने, पूर्ण विश्वासाने केलेली कोणतीही गोष्ट तडीला जाते. जसे खारीने छोटे छोटे दगड रामनाम लिहून समुद्रात टाकले आणि ते समुद्रात तरंगले. सेतू पूर्ण करायला खारीच्या दगडांनी मदत केली."
'आता पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने पुढचे पाऊल उचलायचे ज्यामुळे माझी इथून सुटका होईल.'
हा सगळा विचार मी मनाशीच करत असे. मिळालेल्या टॅबवर डायरी लिहिताना हे सगळं लिहायची सोय नक्कीच नव्हती.

इथून सुटण्यासाठी प्रथम रफिकचा विश्वास जिंकणं महत्वाचं होतं पण कसं?
रफिकचा विश्वास माझ्यावर तेंव्हाच बसला असता जेव्हा मी पूर्ण समर्पण त्याला केलं असतं.
'रफिकला समर्पण? सीतामाईची तयारी होती अनंत काळापर्यंत अशोकवनात राहायची पण तिने रावणाला समर्पण नव्हतं केलं. तुला वेड लागलय का? त्यापेक्षा अशीच इथे आरामात राहा.' माझ्या दुसर्‍या मनाने सांगितलं.
'राम सीतेचा काळ वेगळा होता. इथे तुल खात्री देता येते का की रफिक असाच प्रेमाने वागेल. तुला तो काहीही करणार नाही. तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. तुला इजा करनार नाही. त्यापेक्षा त्याला शरण गेलीस समर्पण केलस तर शारिरीक इजा तरी टळेल. शिवाय त्याचा तुझ्यावर विश्वास बसेल. सुटकेसाठी काहीतरी करता नक्की येईल. ह्याउलट रफिकला तुझ्यावर जबरदस्ती करायला लागली तर ह्या घराबाहेरचे सगळे मार्ग तुला बंद होतील.'
काय करायचं नीतिमत्ता सोडायची? सागरला कधीतरी भेटता येईल ह्या आशेवर सागरशीच प्रतारणा करायची? सागर, कसा आहेस रे? कुठे आहेस. कसं कळेल मला तुझ्याबद्दल? रफिकला माहित असेल ना? त्यालाच विचारू का?

त्या संध्याकाळी मी रफिकशी बोलायचं ठरवलं. संध्याकाळी रफिक आला तेव्हा विशेष खुशीत होता.
"आज काय खास, एकदम खुशीत दिसतो आहेस?"
"हो आजचा दिवस खासच आहे. ह्या दिवशी मी आणि सुनीता पहिल्यांदा भेटलो होतो. याच दिवशी आम्ही लग्नाचं वचन दिलं होतं एकमेकांना. इतकी वर्ष मी हा दिवस एकटाच सेलिब्रेट करायचो, ह्या वर्षीसुद्धा ती नसली तरी तू आहेस. आणि हो आजपासून मी तुला सरिता नाही म्हणणार सुनीता म्हणणार. माझी सुनू." आणि त्याने भावनांच्या आवेगात माझा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी काहीही न बोलता न हालता तशीच बसून राहिले, पहिले काही क्षण त्याच्या हातातून हात सोडवून पळून जावं असं वाटत होतं, मग स्वत:च्या मनाला सूचना देत राहिले. " आय अ‍ॅम रिलॅक्स्ड. माय बॉडी इज रिलॅक्स्ड. आय अ‍ॅम इन ओकेनेस." मग थोड्या वेळाने शरीरातला स्टीफनेस कमी झाला. हा बदल कदाचित रफिकला सुद्धा जाणवला. आणि त्याने हसून माझा हात सोडला.
"कधी कधी होतो मी असा इमोशनल."
"चांगलं असतं ते."
" आज तुला काही तरी द्यायचय. काय हवय माग, मागशील ते देईन फक्त तुला अटी माहित आहेत.. '
"हो आणि मी ते तुझ्याकडे मागून तुला धर्मसंकटात टाकणार नाही."
"गुड. काय हवय सांग."
" मी काय मागणार."
"अग, काय हव ते माग ग."
"मला काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. खरी. देशील?"
"जमेल तेवढी देईन."
"जमेल तेवढी नाही सगळी. मला खरं बोलणारी माणसं जास्त आवडतात. सत्य कितीही कटू असो. माझी पचवायची ताकद असते. पण मला खोटं पचत नाही. कारण जे नसतच ते कसं पचणार?"
"तू आता गोल गोल बोलते आहेस. मला कळत नाही आहे."
"तू मला निवडलस असं तू त्या दिवशी म्हणालास, त्याचा अर्थ काय."
"त्याचा काय अर्थ, काहीही नाही."
"रफिक मी सायकॉलॉजीची स्टुडण्ट आहे आणि मला खोटं आवडत नाही. तू खोटं बोलून स्वत:ची इमेज खराब करू नकोस. इतक्या दिवसात मी तू चांगला आहेस असं समजायला लागले आहे."
"म्हणजे मी आहेच चांगला, वाईटपणा फक्त इतकाच की तुझ्या परवानगीखेरीज मी तुला इथे ठेवले आहे. तुला आवडत नसताना. पण मी तुझ्याशी कधी वाईट नाही वागलो. तुझ्यावर जबरदस्ती नाही केली. मी तेही करू शकतो. माझ्या घरात आहेस तू."
"तू माझ्यावर जबरदस्ती केलीस तर फक्त माझं शरीर तुझं होईल. माझं मन नाही आणि मी तुला जितकं ओळखलय तुला माझ्या मनाची ओढ जास्त आहे, शरीराची कमी. शरीर तुला काय रे पैशाला पासरीभर मिळतील. पण सुनितासारखी असलेली सरिता तुझ्यावर प्रेम करायला हवीये तुला."
रफिक काहीच बोलला नाही.
"तू मला निवडलस ह्याचा. अर्थ काय?"
पुन्हा रफिक काहीच नाही बोलला.
"रफिक ह्याचा अर्थ मला असा लागतो. सागरच्या सोबत तू मला पाहिलस तेव्हा तू माझी निवड केलीस तुझ्या आयुष्यात यायला."
"हे बघ उगाच काहीतरी बोलू नकोस.'
"रफिक सागरला मी खूप चांगलं ओळखते. आणि त्याच्या घरच्यांनादेखील. इतका अभिनय नाही करता येत रे कोणाला आणि तुला भेट द्यायला सागरने मला इथे आणलं असतं तर त्याने मला कुमारिका ठेवलं असतं माझ्यावर हरवून जाऊन प्रेम नसतं केलं. मला कुमारीका म्हणून तुझ्या स्वाधीन केलं असतं तर तू त्याला नक्कीच जास्त पैसे दिले असतेस ना?"
"तू काय बोलते आहेस."
"रफिक प्लीज. तू सुनितावर आणि आता माझ्यावर जे प्रेम करतोस त्या प्रेमासाठी तरी खरं बोल. सागरला फसवून तू मला इथे आणवलस ना?"
"त्याने काय फरक पडणार आहे?"
"पडणार आहे. तू मला फसवून इथे आणलस. सागरला हाकलून दिलस. वर त्याच्या बँकेत पैसे ट्रान्स्फर केलेस. जरा सांग रे मला त्याने ते वापरले का? मला माहित आहे त्याने ते नसणार वापरले आणि मला हेदेखील माहित आहे की तो आत्ता तुरुंगात असणार."
"त्याने तुला काय फरक पडतो."
"पडतो. मला फरक पडतो. एक मी त्याच्यावर खरं प्रेम केलं होतं. दोन माझ्यामुळे त्याला असा आयुष्यभराचा त्रास होणार हे मला पटत नाही."
"म्हणजे काय अपेक्षा काय आहे तुझी."
"अपेक्षा पहिली - सागर आणि त्याच्या घरच्यांची ख्यालीखुशाली मला कळली पाहिजे. दुसरी - तो तुरुंगातून बाहेर आला पाहिजे. तिसरी - त्याचं स्वप्न, स्वतःचं हॉस्पिटल असावं हे पूर्ण झालं पाहिजे."
"म्हणजे काय मी तुला परत पाठवून द्यायचं का?"
"नाही. मी इथेच राहेन कायमची. तुझी बनून, तुझ्यावर प्रेम करत. पण मी तुझ्यावर प्रेम करावं ह्याकरता तुला तितकं चांगलं वागावं लागेल."
"म्हणजे काय करायचं मी?"
"तू सागरची पूर्ण माहिती काढायची. मला सांगायची, मग आपण ठरवू काय करायचं"
"मी का तुझ्यावर विश्वास ठेवू?"
"रफिक आपल्या दोघांकडे एकमेकांवर विश्वास ठेवण्यावाचून काही पर्याय आहे का? तू मला इथे मारून जरी टाकलंस तर कोणाला कळणार आहे? आणि मी तनामनाने तुझी होण्यासाठी तुला माझ्यासाठी माझ्या पहिल्या प्रेमासाठी एवढं करावच लागेल. नाहीतर तू माझं शरीर आतासुद्धा वापरू शकतोस. पण माझं मन मात्र सागरचंच राहिल. पण जर तू सागरला तुरुंगातून बाहेर काढलस आणि त्याच्या आयुष्याची घडी नीट बसवून दिलीस तर मात्र मी तो स्वतःचा पुनर्जन्म समजेन आणि माझ्या पूर्ण भूतकाळावर पडदा टाकून मी तुझी होईन. अगदी मनानेदेखील आणि आज जरी माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नसलं तरी मनात प्रेम निर्माण करणं तितकसं कठीण नसतं. माझा स्वतःच्या मनावर एवढा कंट्रोल नक्कीच आहे की मी स्वतःचं मन बदलू शकेन. पण त्याकरता मला तुझी साथ पाहिजे. तू प्रूव कर तू खरच चांगला आहेस, मी तुझ्यावर भरभरून प्रेम करेन. पण जर तू हे नाही केलस तर तुझ्याबद्दल माझ्या मनात कधीही प्रेम निर्माण होऊ शकणार नाही. तू माझ्या शरीराचा कशीही वापर करू शकतोस, कारण मी तुझी बंदी आहे पण माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत माझ्या मनात ही खंत राहील की माझ्यामुळे सागरच्या आयुष्याची वाताहात झाली. आता तू ठरव तुला काय करायचं आहे".
रफिक विचारात पडला. "कसं करणार हे सगळं तू."
"तो पहिल्यांदा तो कुठे आहे, कसा आहे ह्याची माहिती तर काढ. तोवर पुढचा विचार करू."
"नाही मला आत्ता माहिती हवीये तुझ्या डोक्यात काय चालू आहे."
"हे बघ सागर तुरुंगात ह्या कारणासाठी असणार की मी भारतात परत गेले नाही, माझा ठावठिकाणा तो सांगू शकत नाही आणि माझ्याशी कोणी संपर्क साधूशकत नाही. पण जर माझ्या घरचे माझ्याशी संपर्क साधू शकले, मी त्यांना पटवून देऊ शकले तर सागर तुरुंगातून सुटेल."
"हे बघ तू तुझ्या घरच्यांसोबत संपर्क साधायचा म्हणजे मी माझी मान स्वतःच्या हाताने कापायची. मला नाही हौस हाराकिरी करायची."
"मी माझ्या घरच्यांना पत्र लिहिणार. ते तर तू वाचू शकतोस ना? ते पाठवायचं की नाही हे तूच ठरवणार शेवटी. त्या पत्रात मी लिहिणार, मी माझ्या इच्छेने सागरला सोडून राहिले आहे. सागरपेक्षा जास्त श्रीमंत, जास्त देखणा आणि जस्त बुद्धीमान राजकुमार माझ्या आयुष्यात आला आहे आणि मला माझे आयुष्य त्याच्याच सोबत काढायचे आहे. असे असल्याने, माझ्या आई बाबांनी सागर आणि त्याच्या आई वडिलांना पटवून द्यावं की सागरने मला घटस्फोट द्यावा. केवळ घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी मी भारतात परत येऊ इच्छित नाही. कारण त्याला खूप वेळ लागणार. माझ्या आयुष्यातली सुंदर वर्ष मला अशी वाया नाही घालवायची. माझं पत्र त्यांनी वाचलं की त्यांना पटेल की सागर निर्दोष आहे आणि ते पोलिस केस मागे घेतील."
"तू इतक्या ठामपणे कसं सांगू शकतेस, की सागर तुरुंगात आहे, त्याने मी दिलेले पैसे स्वतःला सोडवायला वापरलेले नाहीत आणि तुझ्या घरचे तुला शोधत आले तर?"
"मी इतक्या ठामपणे सांगू शकते कारण माझ्या दादाला मी ओळखते, तो स्वस्थ बसणारा नाहीये. तो उपोषणाला बसू शकतो, मिडियामध्ये ही बातमी फुटवू शकतो, तो त्याच्या मित्रांची - काही राजकारणात असलेले, काही पोलिसात असलेले, काही मिडियात असलेले, मदत घेऊन तो कधी ना कधी तरी माझ्या पर्यंत पोहोचू शकतो. मान्य आहे की तुझ्या देशाचे कायदे थोडे वेगळे आहेत, तो इथे सहज सहजी नाही पोहोचणार. पण कधीच पोहोचणार नाही असं समजू नकोस. त्यापेक्षा मी जे सांगतेय ते तुझ्या फायद्याचं आहे आणि सागरच्याही. तो ह्यातून जितका लवकर सुटेल तितकी लवकर मी तुझी होईन, तू सुखरूप राहशील आणि माझ्यामुळे अडकलेलं सागरचं आयुष्य मार्गी लागेल."
"मला विचार करावा लागेल."
"नक्की कर. पण लवकर. मला माझं मन खूप खातं आहे की माझ्यामुळे एका चांगल्या कुटुंबाची वाताहात होऊ लागली आहे."
मी एवढं बोलल्यावर रफिक चिंतामग्न होऊन माझ्या समोरून उठला. त्याची, बुद्धीबळ खेळायची इच्छादेखील दिसली नाही.
"चाललास? आज चेस नाही खेळायचा?"
"मला विचार करायला हवा आहे."
"विचार कर पण कृती लवकर कर. मी तुझ्या जन्मभर आभारी राहेन"
"ह्ं."
आणि तो माझ्या खोलीबाहेर जाऊ लागला. माझ्याडोक्यात एक वेगळाच विचार आला. मी त्याचा हात पकडला. बेडवरून उठले, त्याच्या डोळ्यात निरखून पाहू लागले, क्षणभर स्वतःचे डोळे मिटले, सागरचा चेहरा डोळ्यासमोर आणला, हसले, मी पकडलेल्या रफिकच्या हातावर माझे ओठ टेकले. "मी दिलेल्या शब्दावर माझी मोहर, सागरला सोडून तू मला पुनर्जन्म दिलास तर मी तनमनाने तुझी होईन. फक्त तुझा विचार करेन, फक्त तुझ्यासाठी तू म्हणशील तशी जगेन."

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45869

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

खरच छान जमलाय भाग. पुढील भाग लवकर टाकायचा प्रयत्न कर , वल्लरी Happy
मनातले विचार, मुद्दे अगदी छान लॉजिकल मांडले आहेत >>>>.मामी +१

चिमुरी, थोडासाच लिहायचा राहिलाय, टाकतेच पाहा थोड्या वेळात नाहीतर परत असं वाटेल की मी छोटासाच भाग टाकला.