बहाणा पुरे हा मला टाळण्याचा

Submitted by सुचेता जोशी on 9 October, 2013 - 04:23

नको अर्थ काढू खुळ्या वागण्याचा
खटाटोप चाले तुला जाणण्याचा

अताशा अताशाच धरतेय खपली
नको घाट घालू पुन्हा डागण्याचा

तुझे ओठ वेचू कि डोळ्यात पाहू ?
नवा छंद जडला तुला वाचण्याचा

जगाची खुशाली तुला देव देवो !
जरी हक्क नाही मला मागण्याचा

तनावर मनावर तुझे राज्य चाले
खरा अर्थ कळला अता जागण्याचा

सख्या दे कबूली मजा त्यात आहे
पुरे हट्ट वेडा खरे झाकण्याचा

तुझी नोकरी अन उपद्व्याप सारे
बहाणा पुरे हा मला टाळण्याचा

तुझ्या आर्त उत्स्फूर्त मिस-यात भेटू
खुला मार्ग नाही तुला गाठण्याचा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
सुधारणा गरजेच्या पण आपोआपच होत जातील हळूहळू त़ज्ज्ञ मंडळी वेळोवेळी सांगतीलच
लिहीत रहा

तुझे ओठ वेचू कि डोळ्यात पाहू ?
खरा अर्थ कळला अता जागण्याचा
<<< ह्या ओळी छान उतरल्या
शेवटचा शेर जास्त आवडला

फुंकर हा शब्द ओळीच्या शेवटी बसवू शकता मग वृत्तात बसेल

मला एक असे सुचले ...

जखम गार व्हावी अशी घाल फुंकर
नको घाट घालू पुन्हा डागण्याचा

<<<<जखम गार व्हावी अशी घाल फुंकर >>>>>

वा वा आवडली सुचवणी पण त्या आधी दुरुस्ती केली होती .

खुप खुप आभार !

शशांक, रसप, भाग्यश्री, संजिव, दाद

धन्यवाद !

सुचेता, वैवकु...

जखम आग व्हावी अशी घाल फुंकर
नको घाट घालू मलम लावण्याचा

असा वाचला मी तो शेर Wink

Happy

.

जगाची खुशाली तुला देव देवो !
जरी हक्क नाही मला मागण्याचा
तनावर मनावर तुझे राज्य चाले
खरा अर्थ कळला अता जागण्याचा
--------
मस्तच

Pages