आधुनिक सीता - १४

Submitted by वेल on 4 October, 2013 - 10:04

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.
 
२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.
 
 भाग ९ - http://www.maayboli.com/node/45427
 भाग १० - http://www.maayboli.com/node/45475
 भाग ११ - http://www.maayboli.com/node/45523
 भाग १२ - http://www.maayboli.com/node/45579
 भाग १३ - http://www.maayboli.com/node/45598

*************************************************

रफिकने ठरवल्याप्रमाणे तो संध्याकाळी बुद्धीबळाचा पट खेळायला घेऊन आला.
'हा माणूस आहे का वेडा.' माझ्या मनात पुन्हा विचार आला. पण मग मी स्वतःलाच समजावलं, 'चला सरिता मॅडम आलिया भोगासी असावे सादर. सुटकेची अपेक्षा तर नाहीच आणि नशिबात हेच असेल तर हेच.. सीतेला थोडाच असा "विरंगुळा" मिळाला होता, तुला मिळतोय ना, तोसुद्धा रामरायाने पाठवला असं समजून गप्प राहा बाई.'

आज माझी पहिली कसोटी होती. आज मला कठीण जाणार होते. स्वतःच्या मनाला पूर्णपणे ताब्यात ठेवणे काय असते हे मला समजणार होते. मी मोठ्या शहाणपणाने रफिकला सांगितले होते, फारसे कळत नाही चेसमधले. मला वाटले होते, येत नाही म्हटल्यावर पुढे तो काही बोलणार नाही. इथे उलटे झाले. आता मला फारसे येत नाही असेच दाखवायला लागणार होते. माझ्या घरात आजोबा बाबा आणि दादा तिघेही बुद्धीबळप्रवीण. मीदेखील कॉलेज संपेपर्यंत स्पर्धांमध्ये भाग घेत होते. कधी हरलेही होते, पण जास्त वेळा जिंकले होते. बुद्धीबळ खेळता खेळता आम्ही जेवणखाण विसरायचो, आता मला खूप प्रयत्नाने खोटे खेळायला लागणार होते. माझे खोटे बोलणे पकडले जाऊन चालले नसते. रफिकने मला बुद्धीबळ समजवायला सुरुवात केली. जेवढा वेळ तो माझ्याबरोबर होता तेवढा वेळ तो बुद्धीबळ आणि त्याच्या चँपियनशिप्स याबद्दलच बोलत होता. मी मात्र खूप चांगला अभिनय केला, ह्या ब्लॉकला काय म्हणतात, हे कसं पुढे जाणार. असं विचारत राहिले. एक तास चांगल्या अभिनयाचा. मी सर्वसाधारणपणे खोटे न बोलणारी मुलगी. अभिनय सुद्धा कधी केला नव्हता. पण आजतरी पकडली जाण्यापासून वाचले होते.

तुरुंगातला एक दिवस संपला. मनात विचार आला. पण कितवा दिवस ह्या तुरुंगातला? आज तारिख काय आहे. मला इतके दिवस भानच नव्हत, दिवस रात्रीचं. समोर येईल ते खायचं आणि टी.व्हीवर कार्टून पाहात राहायचं. 'आता फातिमा जेवण घेऊन येईल. तिला विचारावं का, आज कोणता दिवस आहे? मी किती दिवसापासून इथे राहाते आहे? पण ती सांगेल का? का सरळ रफिकला विचारावं उद्या सकाळी. पण का बोलायचं मी स्वतःहून त्याच्याशी? मला तो एकतर अजिबात आवडत नाही.  पण त्याच्याशिवाय इतर कोणाशी बोलणार? माझा राम मला इथे येऊन सोडवून नेत नाही किंवा माझी सुटका होत नाही तोवर जगायचं तर आहेच, कारण मरणाचीही खात्री नाही. मग जोवर जगायचं आहे तोवर कसं जगायचं  - कुढत कुढत की गाणं म्हणत? मनावरचा ताण कमी झाल्याचे संकेत मनच मला देत होतं. कशाचा परिणाम? सकाळच्या रामरक्षेचा की बुद्धीबळ खेळण्याचा? पण मी तर बुद्धीबळ खूप तणावाखाली "शिकत" होते की हा परिणाम रफिकबद्दलची भीती दूर होण्याचा.

दुसर्‍या दिवशी माझा नाश्ता झाला होता होता रफिक आयपॉड घेऊन आला. आयपॉड्वर त्याने बरेचसे श्लोक आणले होते. मी खरंच चकित झाले. काय काय डाऊनलोड केलं होतं त्याने. रामरक्षा, मारुतीस्तोत्र, हनुमान चालिसा, दुर्गासप्तशती, अथर्वशीर्ष, आरत्या, गणपतीस्तोत्र, मनाचे श्लोक.... कधी केलं हे त्याने सगळं कोणाची मदत घेऊन केलं का स्वतःच?
"तुला इतकं सगळं कसं माहित रे?" मी विचारलं.
"झालीस ना इम्प्रेस? शाबास रफिक शाबास ... अग त्यात काय कठीण आहे. एक तर माझी कॉलेजमधली गर्लफ्रेन्ड - सुनिता तिच्याकडून खूप काही ऐकलं होतं, ते लक्षात होत आणि गूगल महाराजांची कॄपा."
" थँक्स."
"अरे त्यात थँक्स काय? तू माझ्यावर प्रेम करायला हव आहेस आणि त्याकरता मला तुला इम्प्रेस करायचं आहे. शिवाय तुझं इथे राहाणं तुला आवडेल की नाही कधी आवडेल हे मला माहित नाही पण तोपर्यन्त ते थोडंसं सुसह्य व्हावं ह्याचा प्रयत्न करतो आहे. तुला पुस्तक कोणती आवडतात ते सांग मग मी ती पुस्तकसुद्धा डाऊनलोड करून देतो. मराठी पुस्तकं फारशी नाहीत. इंग्लिश हवी असतील तर सांग. आणि हो तुझी पुस्तकं लायब्ररीतली पुस्तकं फातिमा आणून देईल थोड्या वेळाने. "
मी अचंबित झाले. किती करतोय हा माणूस मला इम्प्रेस करायला. आणि स्पष्टपणे सांगतोसुद्धा आहे तसं. कळस आहे नालायकपणाचा का का करतो आहे हा असा, का होतय हे सगलं माझ्याबरोबर. मी कधी कोणा पक्ष्याला कैद केलं नाही की कधी मासे सुद्धा पाळले नाहेत. मग मला का हा तुरुंग. ...

मनात आवाज आला. जणू आ़जीच बोलत होती,
"सरिता, अशी कोणाला नावं ठेवायची नसतात. माणूस मुळात वाईट नसतो. त्याचं वागणं वाइट असू शकतं आणि तेदेखील सापेक्ष असतं. तुला जे वाईट वाटतं ते समोरच्याच्या दृष्टीकोनातून योग्य असू शकतं. आणि ते तसं का असतं हे अजून कोणालाही कळलं नाहीये. मुळात तो जे वागला त्याचं तुला वाईट वाटलं हा तुझ्या मनाचा कमकुवतपणा आहे. सर्वात प्रथम त्याला क्षमा कर. आणि हे जे होतय त्यात ईश्वराची काही योजना असेल कदाचित. कदाचित तू कोणाला नकळत त्रास दिला असशील त्याचे भोग आहेत.कदाचित तू त्याच माणसाला गेल्या जन्मी त्रास दिला असशील. ठेविले अनंते तैसेची राहावे."
एकदा कॉलेजमध्ये असताना एकाने स्वतः कॉपी करून माझं नाव त्यात गोवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते प्रकरण खूप पेटलं होतं तेव्हा मला आलेल्या संतापाला आजी शांत करत होती तेव्हा हेच बोलत होती. आज अचानक आठवलं.
मी तेव्हा आजीला विचारलं होतं, 'ह्याचा अर्थ मी काहिच करायचं नाही असा होतो का?'
तेव्हा आजीने खूप वेगळं उत्तर दिलं होतं, मला पचेल असं आणि सांभाळेल असं. "ठेविले अनंते तैसेची राहावे ह्याचा अर्थ मनाने तसेच राहावे, मनाला विश्रांती द्यावी उगाच विचार करू नयेत. जे होतं आहे ते का हा विचार करून मनाला त्रास होऊ देऊ नये. जे होत आहे त्यातून बाहेर पडायचा नक्की प्रयत्न करावा पण जर त्यात यश आलं नाही तर खंतावू नये, नव्या उमेदीने सतत प्रयत्न करत राहावा. जो चूक आहे त्याला कायद्याने जी शिक्षा आहे ती देता येत असेल तर नक्की द्यावी पण स्वतः हातात कायदा घेऊ नये."
आता मी जर आजीशी बोलले तर काय सांगेल ती मला? रफिकला क्षमा कर त्याला समजून घे असं सांगेल का? ह्या तुरुंगातून सुटायचा प्रयत्न कर असं सांगेल का? आणि आता इथून सुटायचं तर ते कसं? पळून जानं शक्य नाही. जीव देणं शक्य नाही. रफिकने मला स्वतःहून इथून बाहेर काढलं तरच इथून सुटका होईल. तो कशाला करेल पण असं?
"आजी माझ्यात खंरच ताकद नाही उरत ग, तोच तोच विचार करून मी थकतेय."
'मग कशाला करतेस विचार? नको करूस. प्राणायाम शिकलीस ना? साधना येते ना करायला? सारे श्लोक, सार्‍या प्रार्थना आवाजाच्या माध्यमात तुझ्यापर्यंत पोहोचल्यात. मनाचे श्लोक ऐक. तुला हवी ती पुस्तक देतो म्हणालाय ना रफिक? इथे राहायचं तर स्वतःला का हा प्रश्न विचारत कुढत नाही जगायच. त्याने सांगितलय ना की तू हो म्हणाल्याशिवाय तुझ्या जवळ येणार नाही. त्यावर विश्वास ठेव. आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलय ते माहित नाही ना मग सर्वात आधी मनाची ताकद पुन्हा मिळव.' माझ्याच दुसर्‍या मनाने मला उत्तर दिलं.
आजीच्या शिकवणीची आठवण आल्याने माझं मन जागृत होत आहे त्याला पुढचा रस्ता मिणमिणत्या प्रकाशात का होईना दिसत आहे ह्याची जाणीव मला होऊ लागली होती. आणि त्याक्ष्णी मी ठरवलं हा जो वेळ मिळतो आहे त्याचा पूर्ण फायदा करून घ्यायचा, स्वतःच्या उन्नतीसाठी, सरिता साठी नव्हे तर सरिताच्या जन्माला आलेल्या ह्या शरिरात राहाणार्‍या 'मी'साठी.

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45696

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चालू आहे, फक्त संवादामधे व्यक्ती बदलतील तेव्हा ओळबदला. एकाच ओळीत दोन व्यक्तींचे संवाद आले की कन्फ्युजन होते.

मला ना आता खुप राग येतोय वल्लरी तुझा..
एकतर मी खास ही कथा वाचण्यासाठी येते आणि किती छोटे भाग टाकतेस तु. वाचायला सुरवात नाही करत तर लगेच संपते.
(तुला असा प्रतिसाद देण्यासाठी मी माबोवर सदस्यत्व घेतलं नाहीतर एव्हढे दिवस वाचकच होती)

खुप छान लिहतेस

मस्त चालू आहे, फक्त संवादामधे व्यक्ती बदलतील तेव्हा ओळबदला. एकाच ओळीत दोन व्यक्तींचे संवाद आले की कन्फ्युजन होते.>> अनुमोदन

निल्सन, सॉरी ग. अग जिथे मेन्दू बन्द होतो ना तिथे सोडून द्यावं लागतं लिहिणं शिवाय वेळेचं प्रेशर असतंच ग. (ऑफिस, घर) प्रयत्न करतेय, मोठे भाग टाकायचा किंवा पुढचे भाग लवकर लवकर टाकायचे.

साती, कोणताच माणूस मुळात वाईट नसतो, हेच सांगायचा प्रयत्न करतेय.

मामी, कथा मूळात मोठीच लिहिलिये. त्यावेळी त्यात संवाद नव्हते. आता अजून मोठी करते आहे, संवाद घालून.

कित्ती चांगला आहे हा रफिकमियां !
मी तर त्याच्या प्रेमातच पडत चालल्येय.>>>>>>>>>>>> मी पण Blush