तीन लहान गझला

Submitted by बेफ़िकीर on 3 October, 2013 - 02:42

गेले मला तडे
बाकी तुझ्याकडे

मी एक शोधतो
तिसरेच सापडे

स्पर्शू नको हृदय
पडतात पोपडे

कोणी दिसेचना
कोणी चहूकडे

माझे अबोल मन
कर बोलघेवडे

================

काही दिवस तरी
नुसत्या दुधावरी

अपुलेच समजुनी
जगतो तुझ्या घरी

पापे करून घ्या
नंतर हरीहरी

या माणसांहुनी
झाडेबिडे बरी

भिज 'बेफिकीर' तू
आल्या नव्या सरी

===============

वाहू नकोस तू
पडशील ओस तू

आलास चालुनी
कित्येक कोस तू

माझ्यातुझ्यातला
हो पायपोस तू

उचलू नकोस ना
पाऊल ठोस तू

पुढचे पुढे बघू
हा जन्म सोस तू

आहे असाच मी
का हासतोस तू

================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेले मला तडे
बाकी तुझ्याकडे>> व्वा व्वा

स्पर्शू नको हृदय
पडतात पोपडे>> हृदयस्पर्शी

काही दिवस तरी
नुसत्या दुधावरी>> अप्रतिम

अपुलेच समजुनी
जगतो तुझ्या घरी>> मस्त

वाहू नकोस तू
पडशील ओस तू>> व्वा व्वा

पुढचे पुढे बघू
हा जन्म सोस तू>> व्वा व्वा

आहे असाच मी
का हासतोस तू>> मस्तच!

लहान वृत्तातही गझलेची झिंग आणलीत.

सगळेच सही आहेत सर...

मला
स्पर्शू नको हृदय
पडतात पोपडे

हा खूप आवडला...

मी एक शोधतो
तिसरेच सापडे

पापे करून घ्या
नंतर हरीहरी

पुढचे पुढे बघू
हा जन्म सोस तू

आहे असाच मी
का हासतोस तू

या द्वीपदी सर्वात विशेष वाटल्या.

गेले मला तडे
बाकी तुझ्याकडे......वाआआआ !

स्पर्शू नको हृदय
पडतात पोपडे......खल्लास !

माझे अबोल मन
कर बोलघेवडे...... सहीय !

++++++++++++++++++++

अपुलेच समजुनी
जगतो तुझ्या घरी

या माणसांहुनी
झाडेबिडे बरी

भिज 'बेफिकीर' तू
आल्या नव्या सरी

झक्कास शेर !

++++++++++

छोटे बहरही बहारदार !

बहोत आच्छे !

भूषणः
इथे परिस्थिती अशी झाली की कवी जास्त आणि प्रतिसाद देणारे कमी.
त्यामुळे अलीकडे मजा कमीशी झाल्यासारखे वाटत आहेत.
असो, नाइलाज आहे. आपल्या रचना वर आणणे तेवढा एकमेव पर्याय दिसतो स्वतःला पटला तर.

समीर

समीरजी +१

खरोखर, एखाद्या रचनेला प्रतिसाद न मिळणे ही दुःखदायक गोष्ट आहे . काही निवडक लोकच प्रतिसाद देतात असाच अनुभव येतो आहे गेले अनेक महीने. पण असेही लक्षात येत आहे की वाचकांची संख्या जास्त आहे, पण प्रतिसाद मात्र देण्यात येत नाही. प्रत्येकाकडे आपापलई कारणे असतील, पण प्रतिसाद न मिळणे ही क्लेषदायक गोष्ट आहे याबाबत शंका नाही

जयदीपः

आपल्याशी सहमत.
बहुतेक गझल पोस्ट करणारे धन्यवाद व्यतिरिक्त प्रतिसाद देत नाहीत.
ही मानसिकता पचायला कठीण आहे. निराशेतून मी माझ्या शेवटच्या पोस्टनंतर काही टाकले नाही.
भूषण, तुझ्या गझलेवर हे अपेक्षित नाही तेव्हा क्षमस्व.

भूषणः
इथे परिस्थिती अशी झाली की कवी जास्त आणि प्रतिसाद देणारे कमी.
त्यामुळे अलीकडे मजा कमीशी झाल्यासारखे वाटत आहेत.
असो, नाइलाज आहे. आपल्या रचना वर आणणे तेवढा एकमेव पर्याय दिसतो स्वतःला पटला तर.

समीर

............... प्रतिसाद देणारेही हातचा राखुन प्रतिसाद देतात.कधी कधी तर वाटते की केवळ मित्रामित्रातील संवाद आहे हा. इथे प्रत्येकाने आत्मपरिक्षण करायला हवे.जयदीप म्हणतात तशी ही खरोखर क्लेश्कारक बाब होय्.इथे अनुभवी म्हणवणार्‍यांनी नवोदितांना अशाप्रकारे सामावून घ्यायला हवे की त्यांना ही मायबोली आपली वाटावी. माफ करा पण विषय निघाला म्हणून बोललो........ बाळ पाटील