बांबूच्या कोंबांची आमटी

Submitted by प्राची on 28 September, 2013 - 02:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बांबूचे कोवळे कोंब,
तूरडाळ,
खोबरे,
लाल तिखट,
हळद,
थोडा गूळ,
फोडणीचे साहित्य.

क्रमवार पाककृती: 

बालपणीच्या आठवणींचे गाठोडे सोडले की त्यातले गणपतीचे दिवस अवतीभवती फेर धरून नाचू लागतात.
माहेरी पूर्ण घराण्याचा गणपती आमच्याकडे असायचा. सगळ्यांचा मिळून एकच गणपती असायचा. त्यामुळे, ते दीड दिवस घरात नुसता कल्ला असायचा. प्रत्येकजण येताना आपल्या दैवतासाठी काहीतरी खास घेऊन यायचे.
या दिवसांत प्रमुख आकर्षण म्हणजे १ल्या दिवशी बनणारे खतखते. यात लागणार्‍या भाज्याही अश्याच वेगवेगळ्या गावांवरून यायच्या. Happy एखाद्या वर्षी एखादी काकी येताना आठवणीने कोंब घेऊन यायची. त्या वर्षी त्या खतखत्याची चवच काही निराळी असायची. आमच्या गावी कोंब मिळायचे नाहीत, मग ती एक अपुर्वाईच असायची आमच्यासाठी. मग त्यातलाच थोडा कोंब बाजूला ठवून दिला जायचा. आणि सगळी धामधुम संपली की एक दिवस आई मस्तपैकी कोंबाची आमटी करायची. तोंपासु. त्या दिवशी मी चापून भाताआमटी खायचे. बहिणीला कोंब आवडायचे नाहीत, मग तिला 'कसली सारस्वत ग तू..' म्हणू चिडवायचे. तसं तर तिला पातोळी आणि खतखतेही फार आवडायचे नाही. Happy
मग लग्न झाल्यावर बरीच वर्षे 'कोंब' कुठे मिळालेच नाहीत. लेहला असताना एकदा एका रेस्टॉ.मध्ये हक्क नुडल्स खाताना मला एका घासात कोंबाची परिचित चव जाणवली. मग लगेच नीट निवडून ते तुकडे मी वेगळे काढले. वेटरला बोलावून 'हे कुठे मिळेल? असे विचारून घेतले. त्याने सांगितल्याप्रमाणे लगेच समोरच्या दुकानातून टीन्ड बांबू शूट्स विकत आणले. आईला फोन लावून लगेच रेसिपीही विचारून घेतली. आणि करूनही पाहिली. घरातल्या इतर मेंबरांना धाक दाखवून खायला घातली. Happy
मग परत दोनेक वर्षे कोंब दिसले नाहीत. मागील महिन्यात इथल्या बाजारात अचानक कोंब दिसले. मस्त सोलून ठेवलेले, पांढरे शुभ्र. Happy मागच्या अनुभवामुळे मी विकत घेतले नाहीत. पण अजिबात राहवेना,म्हणून पुढच्या वेळी शोधले तर मिळालेच नाहीत.
आता गेल्या रविवारी एकाने आणून दिले. मग परत आईला फोन, आमटीची तयारी.. यावेळी फोटो बिटो काढून माबोवर रेसिपी द्यायची असे ठरवले होते, पण ते कोंब खराब आहेत असे कामवालीने सांगितले. ते कोवळे कोंब नव्हते, अर्धवट वाढलेल्या बांबूची वरची टोकं कापून पैश्यासाठी लोक विकतात. पण त्याची भाजी खाऊ नये, चवीला कडू आणि तब्येतीला हानीकारक असतात असे तिने सांगितले. तरीही मोह न सूटून मी एक तुकडा खाऊन पाहिला तर कडूजहर लागला. मग ते सगळे कोंब टाकून दिले. Sad

या दु:खात रेसिपी टाकणे कॅन्सल केले. Proud पण मग स्वप्नाची रेसिपी वाचून परत ही रेसिपी देते आहे.

१. कोंब स्वच्छ धूवून घेऊन पाण्यात घालून ठेवावे. रात्रभर पाण्यातच ठेवावे.
२. सकाळी पाणी काढून टाकून ते कोंब परत स्वच्छ धूवून घ्यावेत.
३. कोंबाचे एक इंचभर तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे एका भांड्यात घेऊन त्यात अगदी थोडे नावापुरते पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
४. त्याच वेळी हळद घालून तूरडाळही कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
५. खोबरे+ लाल तिखट मिक्सरमधून वाटून घ्यावे.
६. कढईत फोडणी करून त्यात कोंब घालावेत आणि जरा परतून घ्यावेत. मग त्यात डाळ घालून उकळी काढावी.
७. मग वरून मीठ आणि वाटण घालावे. थोडासा गूळ (हवा असेल तर) घालावा.
८. मस्त उकळी काढून त्यावर कोथिंबीर घालावी.
९. गरम भात-आमटी ओरपावी.

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

१. कोंबाला प्रचंड वास येतो. कोंब घरात आणताना तेवढी मानसिक तयारी ठेवावी. आमटीचा वास मस्त, भूक खवळवणारा असतो.
२. यात हवा असल्यास गोडा मसाला/ खडा मसाला भाजून पूड करून घातला तरी चालतो. पण जास्त मसाला घालू नये. कोंबाची चव आणि वास ही खरी युएस्पी आहे या आमटीची. Happy
३. आमटी/भाजी करूनही कोंब उरल्यास तुकडे करून, मीठ घालून बरणीत घालून ठेवावे. स्टीलच्या डब्यात घालू नये.

माहितीचा स्रोत: 
मांऽऽऽ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यांचं लोणचं माझं अतिशयच आवडतं आहे. तब्येतीला गरम पडतं म्हणे ते. त्यामूळे साबा फक्त थंडीपुरतंच पाठवतात दिवाळीला घरी गेलो की. यावेळी मात्र गेल्या महिन्यात दिर गेला तर त्यानेच घरी लोणचं घालायला मदत केली आणि ताजं ताजं लोणचं घेवून पण आला. साधे पराठे आणि माणो का आचार... आहाहा.

आता पुढच्या वर्षी आठवणीनं सिझनमध्ये गावाकडे जावून तुझी आमटी आणि स्वप्नाची भाजी करुन बघणार. Happy

Thanks Prachi! bajarat bambu baghitale aahet paN kadhee try kele nahit, aata nakkee karun baghate.

>>बहिणीला कोंब आवडायचे नाहीत, मग तिला 'कसली सारस्वत ग तू..' म्हणू चिडवायचे.

प्राची, मलाही आधी कोंबाची भाजी आवडायची नाही तेव्हा आई असंच ऐकवायची. Happy आमटीची कृती आईला वाचून दाखवते. तिची काही वेगळी पध्दत असेल तर टाकेन इथे. रेसिपीबद्दल धन्यवाद बॉस!