आधुनिक सीता - ९

Submitted by वेल on 23 September, 2013 - 06:12

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग ४ - http://www.maayboli.com/node/45057
भाग ५ - http://www.maayboli.com/node/45139
भाग ६ - http://www.maayboli.com/node/45250
भाग ७ - http://www.maayboli.com/node/45278
भाग ८ - http://www.maayboli.com/node/45392

********************************************

लगेचच मी जाण्याची तयारी करून ठेवली. आता फक्त तिकिटांची वाट पाहात होते. आमचं हे बोलणं झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी रफिक आमच्याकडे जेवायला आला होता तेव्हा -
"अरे सागर उद्या संध्याकाळी काय करत आहात दोघे?"
"मी हॉस्पिटल आणि सरिता घरात थोडा अभ्यास करत असेल. का?"
"मग उद्या संध्याकाळी तुम्ही आमच्या घरी यायचं. तुमच्या लग्नाच्या पार्टीला फातिमा आली नव्हती, त्यामुळे तिने तुम्हाला घरी जेवायला बोलावलं आहे."
"अरे कसं जमणार मला यायला उशीर होतो माहित आहे ना. आणि सरिताला फारसं कुठे जायला आवडत नाही."
"मला सगळं माहित आहे. तरीसुद्धा उद्या संध्याकाळी तुम्ही दोघांनी आमच्या घरी यायचं आहे जेवायला. आता मी इतके दिवस तुझ्या बायकोच्या हातचं फुकट जेवतो आहे, आता एक दिवस तरी तुम्ही दोघं आमच्याकडे आलंच पाहिजे. खरतर उद्या एक संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे. तो आणि नंतर रात्री जेवण. आणि त्यासाठी तुझी उद्या उशीराची ड्युटी मी बदलली आहे. सकाळी लवकर हॉस्पिटलला जाऊन ये. आणि मी उद्या येत नाहिये जेवायला, जरा तयारी करायची आहे उद्याच्या कार्यक्रमाची. संध्याकाळी गाडी पाठवतो."
एवढं म्हटल्यावर आम्हाला बोलायला काय शिल्लक राहिलं होतं. आम्ही हो म्हणालो. विचार केला, एक दोन दिवसात माझं परतीचं तिकीट येणारच आहे. कशाला टेन्शन घ्या?
तरीसुद्धा रफिकच्या घरी जायची वेळ आली तेव्हा का कोण जाणे मनात पाल चुकचुकत होती.
तसा साधासाच पोषाख करून आम्ही रफिकच्या घरी जायला निघालो. तिथे पोहोचलो तर संगीताचा कार्यक्रम सुरू झाला होता. पण हॉस्पिटलच्या नेहमीच्या स्टाफपैकी तिथे कोणीही पाहुणे नव्हते. चार अरब मात्र तिथे बसले होते. तिथे कोणी स्त्रियादेखील नव्हत्या. असे वाटले पळून जावे तिथून.
आम्ही गेल्या गेल्या रफिकने मला बायकांच्या खास खोलीत जावयास सांगितले. तिथून संगीताचा कार्यक्रम पाहता यावा आणि ऐकता यावा अशी खास सोय केली होती.
जनानखान्यात रफिकच्या बायकोने फातिमाने माझे स्वागत केले. तिने स्वतःच स्वतःची ओळख करून दिली. उंच, गोरी, दिसायला खूप सुंदर. जणू एखादी परिकथेतली राजकन्या. खरंतर तिला हिंदी किंवा इंग्लिश अगदी मोडकं तोडकं येत होतं. पण माझी ओळख करून देताना ती इतकी गोड हसली की असं वाटलं जणू चांदण्यांचा सडा सांडला. तिला भेटल्यावर खरंतर मी रफिकच्या घरात असण्याबद्दलचं माझं टेन्शनच निघून गेलं. तिने खूप अगत्याने माझं स्वागत केलं.
अरेबिक संगीत मला काही फारसं कळत नव्हतं. थोड्या वेळाने जुन्या हिंदी सिनेमांची गाणी सुरू झाली. त्याच सुमारास जेवायची वेळ झाल्याचे फातिमाने मला सांगितले. रफिकच्या चार आया, त्याच्या सात बहिणींपैकी लग्न न झालेली एक छोटी बहिण आणि फातिमा स्वतः आम्ही एवढ्याच जणी जेवायला होतो. माझ्यासाठी खास शाकाहारी पदार्थ होते. चार घास पोटात गेले असतील नसतील मला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. आणि थोड्याच वेळात मी जागीच झोपून गेले.

मला जाग आली तेव्हा माझ्या एका बाजूला रफिक आणि दुसर्‍या बाजूला फातिमा बसली होती. मी अर्थातच त्या जेवणाच्या खोलीत नव्हते. डोकं जड वाटत होतं. "सागर, सागर ..." मी एवढेच बोलू शकले. फातिमाने मला उठून बसायला मदत केली. मला पाणी पाजलं. मला पाणी पाजताना, असं वाटलं जणू तिच्याच डोळ्यात पाणी तरळतय. पानी पिऊन झाल्यावर मला बरीच तरतरी वाटली. "सागर कुठे आहे?" मी विचारले.
रफिक माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, "येईल तो. तू तोवर जेवून घे. मगशी जेवता जेवताच चक्कर आली तुला आणि तू बेशुद्ध झालीस. तुझं जेवण अर्धवट झालय." "किती वाजलेत? किती वेळ मी बेशुद्ध होते? आणि मला इथे एकटीला सोडून सागर कुठे गेलाय?" "येईल तो इतक्यात तू आधी जेवून घे आणि काहीही बोलायचं नाही." हे बोलून रफिकने बायकोला खूण केली, तशी एक वाडगा घेऊन ती पुढे आली. गरम गरम सूप होतं त्यात. "वेजिटेरियन." एकाच शब्दात फातिमाने मला सांगितलं. मी ते सूप फातिमाच्याच हातून प्यायले. सूप प्यायल्यावर अजून थोडी तरतरी आली. "सागर कुठे आहे. किती वाजलेत." "तू आधी जेवून घे. सगळं शाकाहारी जेवण आहे." आणि त्याने फातिमाकडे वळून काहीतरी सांगितलं आणि तो खोलीबाहेर निघून गेला. मी खोलीत एकवार नजर टाकली. ती खोली अत्यंत स्वच्छ परंतु एखाद्या तुरुंगासारखी वाटत होती. "ईट" असे म्हणून फातिमाने मला जबरदस्तीने भरवायला सुरुवात केली. जेवण फारसे मसालेदार नव्हते. पण खाल्यानंतर हुशारी यावे इतके चवीष्ट आणि गरम गरम होते. माझे जेवून झाल्याची मी फातिमाला खूण केली. तिने मला प्यायला पाणी दिले आणि मला शांतपणे झोप अशी खूण केली. मला असे वाटले मी हॉस्पिटलमध्ये आहे की काय. सागर मला अ‍ॅडमिट करून राऊंडवर गेला असेल असे मला वाटले आणि मी शांतपणे डोळे मिटून पडले. मला डुलकी लागली असेल नसेल तितक्यात खोलीचे दार वाजले. दार उघडून रफिक आत येत होता. "सागर कुठे आहे मी कुठे आहे. मला काय झाले आहे?" मी थोड्याश्या रागातच विचारले.
"तुझे जेवून झाले?" रफिकने माझ्याकडे दुर्लक्ष करीत विचारले." आता तुला बरे वाटत आहे का?" मी रागातच त्याला ओरडून विचारले. "मी केंव्हापासून विचारते आहे, सागर कुठे आहे, मी कुठे आहे, इथे कशी आले मी, मला काय होतय. सागर कधी येणार आणि तुम्ही जेवण जेवण काय करताय. "
"तुला कसे वाटत आहे हे कळल्याशिवाय तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं मी उत्तर देणार नाही." रफिकने मागून आलेल्या एक डॉक्टरला खूण केली. माझ्या प्रतिकाराला न जुमानता तिने माझी तपासणी करयला सुरुवात केली. मग दोन चार मिनिटांमध्ये तिने मान डोलावली आणि ती त्या खोली बाहेर गेली. फातिमा कोपर्‍यात उभी होती. ती दोन पावले पुढे आली.
"आत ऐक. तू गेले आठ तास बेशुद्ध होतीस. आणि सागर तुला माझ्याकडे सोडून पुण्याला परत गेला आहेस."
"क्काय? कस शक्य आहे हे? काय मस्करी चालू आहे, सागरला बोलवा, मला जाऊ द्या."

क्रमशः

भाग १० - http://www.maayboli.com/node/45475

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे !!

छान. उत्सुकता वाढवणारा भाग.
सागर्ने मागून आलेल्या एक डॉक्टरला खूण केली. >>>>> इथे रफीक करा तेवढं

मूळ कथा इथपर्यंत होती - रफिक सरिताला बायकांच्या खोलीत पाठवतो. सागर परत जातो आणि तिथे त्याची काय अवस्था होते. ह्या पुढचा पूर्णपणे माझा कल्पना विलास.

मूळ कथेतही मी काही ठिकाणे बदल केले आहेत. त्याबद्दल विस्ताराने पुन्हा केव्हातरी.