पत्र सांगते गूज मनीचे : पुरंदरे शशांक (बाल-मधुमेही)

Submitted by पुरंदरे शशांक on 18 September, 2013 - 08:30

बाबा आणि सोनू........

---------------- || श्री || -------------

दिनांक १७ सप्टेंबर २०१३
पुणे.

प्रिय सोनू,

खरं तर तू एवढी मोठी झाल्यावर हे पत्र मी तुला लिहितोय याचे तुला आश्चर्यच वाटेल - कारण मी तुझ्याशी कायमच मित्रत्वाने आणि मोकळेपणाने बोलू शकतो. पण मग पत्राचे कारण काय ? खरंच, कारण नक्की काय आहे असे विचारले तर माझ्याकडे काहीच कारण नाही.... तरी पण ...
एक कारण जरुर आहे.

तू अतिशय समजूतदार मुलगी असलीस तरी काही गोष्टी या वयात व पुढेही आयुष्यात तुझ्या कशा फायद्याच्या आहेत हे मी तुला येथे सांगणार आहे (काय हा पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतोय आणि बोअर करतोय असे वाटून न घेता हे पत्र नीट व शेवटपर्यंत वाच)

१) तुला टाईप १ डायबेटिस आहे हे वयाच्या पाचव्या वर्षी काय उमगले असणार ? पण तेव्हापासून तू जे सहकार्य केलेस - इन्शुलिन इंजेक्शनला कधी कंटाळली नाहीस वा शुगर चेक करण्यासाठी कितीही वेळा बोटांना प्रिक केले तरी कधी रडली नाहीस - हॅट्स ऑफ तुझ्या समजूतदारपणाला व तुझ्या सहनशक्तीला !! दोन - चार मोठी दुखणीही कशी काढलीस - तेही तुझे तुलाच माहिती .... केवळ तूच हे सारं निभावून नेलंस इतकेच म्हणेन मी ....

२) तुला हायपो झाल्यावर काय त्रास होत असेल - शारिरीक व मानसिक हे तुझे तुलाच माहित....
तू कसे ते सहन करु शकतेस याची मी कल्पनाही करु शकत नाही - कारण त्या वेळेस मी जास्तीजास्त त्रयस्थ राहून मेडिकल गोष्टींची पूर्तता कशी करता येईल हेच पहात असतो - एका मेल नर्सच्या दृष्टीने .. जे त्यावेळेस अत्यावश्यकच असते ...

या झाल्या तुझ्या पॉझिटिव्ह बाजू, आता तुला ज्याकरता पत्र लिहित आहे ते मुख्य कारण -

१) आतापर्यंत डॉ.नी अनेकवेळा सांगूनही तुझा व्यायाम नियमित होत नाही याचा कृपया गंभीरपणे विचार कर व कृतीही कर.

२) इन्सुलिन पंपमुळे तुझे जीवन खूपच सुकर झाले असले तरी गडबडीत अ‍ॅक्टिव्हा चालवताना हायपो होणार नाही याची काळजी घेत जा बेटा - शुगर थोडी वाढलेली असली तरी चालेल पण हायपो टाळ सोना.

३) आताचं तुझं वय हे जरा वेडं वयंच. या वयात तुला कोणी आवडत असेल आणि तूही कोणाला आवडत असशीलच - पण हे खूपच नैसर्गिक आहे - यात वावगे काहीच नाही. बट नॅचरल... पण एकदम कुठलीही कृती करुन मोकळी होऊ नकोस... एकदा काय लाख वेळा विचार कर सोना.... केव्हाही माझ्याशी बोलू शकतेस तू ... कुठल्याही परिस्थितीत मी तुला सोडून देणार नाही वार्‍यावर वा माझ्या इगोचाही प्रश्न करणार नाही बाळा ...

इथे एखादेही पाऊल उचलायच्या आधी तुझ्या जोडीदाराला मला प्रत्यक्ष भेटणे फार फार गरजेचे आहे बेटा.. इथे भावनिक न होता वस्तुस्थितीचा फार डोळसपणे विचार करावा लागेल आपल्या सर्वांनाच ...

कारण उघडच आहे - तू आहे तशी सांभाळणे - तेही जन्मभर... इतका समंजस, समजूतदार तुझा जोडीदार आणि त्याचे आई-वडिल आहेत का नाही हे कोण सांगू शकेल बेटा ??

४) आता हे शेवटचे पण अतिशय महत्वाचे - तुझी करिअर -
मी काय आई काय किंवा दादा काय - तुला कायमच मदत करणार - पण एक मात्र तुला नक्कीच सांगेन मी - अगदी काही नाही तरी निदान डायबेटिसवर होणारा तुझा खर्च भागेल एवढी तुझी कमाई असणे मला तर आवश्यक वाटते सोना.... एका जिद्दी, सक्षम मुलीसारखेच तुझ्यात पोटॅन्शिअल तर आहेच - पण ते जोपर्यंत प्रत्यक्षात उतरत नाही तोपर्यंत ते ध्येय समजूनच तुला वाटचाल करावी लागेल.

तू इतकी गुणी आहेस की तुझा बाबा म्हणवून घेण्यात मला खरोखरच खूप अभिमान वाटतो व आईलाही ... तुझ्यात असलेल्या या गुणांमधे अजून वाढ व्हावी असेही आम्हा दोघांना वाटत रहाते ....

बस्स अजून काहीही नाही ...

तुझे कायमच हित व सुख चिंतणारा ...
बाबा

-----------------------------------------------------------------

हे पॉप्स,

रिलॅक्स मॅन...., डोण्ट बी सो इमोशनल अँड डोण्ट अ‍ॅक्ट लाईक ग्रँडडॅड .... चिल मॅन ..

तू कायमच माझा बेस्ट फ्रेंड असताना हे काय सुरु केलंस पत्र-बित्र - तेही अगदी मुद्दे मांडून ( नाऊ डोण्ट टेल मी इट्स ममाज ऑर्डर - ओह गॉश, दॅट पुअर ओल्ड लेडी नोज जस्ट टू डिक्टेट अँड डिक्टेट - दॅट्स ऑल.... )

हे बघ, ते व्यायाम - एक्झरसाईज चं मी जमेल तसे करेन रे..... आणि तूही जमेल तशी आठवण कर - ओ के ?

ते कोणी आवडल्याचं वगैरे - मी तुला एकदा म्हटले होते ना - सिद बद्दल - तो आहे माझ्यात इंटरेस्टेड - पण मी ही त्याला सांगितलंय - फर्स्ट करिअर अँड देन ऑल अदर थिंग्ज - अरे, तो खूप आवडली म्हणतोय आत्ता - पण त्याच्या पेरेंट्सना जेव्हा कळेल ना की आपली होणारी सून डायबेटिक आहे म्हणून - तेव्हा कशी तंतरेल बघ या स्ट्राँग बॉयची ...... हा हा हा - आय अ‍ॅम अवेअर अँड प्रिपेअर्ड आल्सो - फॉर ऑल दोज थिंग्ज ....

करिअर बद्दल तू म्हणतोस ते एकदम अ‍ॅक्सेप्टेड - फर्स्ट करिअर - हे आता ग्रॅज्युएशन संपताना २-३ ऑप्शन्स आहेत माझ्याकडे - जॅपनीजची एक लेव्हल केलीच आहे मी - दॅट कॅन बी कंटिन्यूड, - आय ए टा विषयी मी सायशी बोललेच आहे -दॅट इज सेकंड ऑप्शन - नाही तर हे कंप्युटर कोर्सेस असतातच वेगवेगळे - सो नो प्रॉब्लेम - ओ के ?

आणि एवढा अगदी अभिमान वगैरे काय रे - तू खरंचच म्हातारा झालास हां आता - माय पुअर ओल्ड डॅड ... अ बिग हग टू यू ... अरे आहे ते अ‍ॅक्सेप्ट करायचं रे - सगळेच तर करतात - माझ्या बॅचचा प्रतिक -ही इज ब्लाइंड गाय - पण व्हेरी स्मार्ट, व्हेरी शार्प अँड इंडिपेण्डण्ट आल्सो..

तू काय आई काय आणि ब्रो काय - तुम्हीच तर सांभाळलंय मला लहानपणी - काही कळत नसताना मला -ते हायपो वगैरे व्हायचा तेव्हा - सो तुमचेच जास्त कौतुक आहे ... तू तर परदेशात करिअरला चान्स असूनही केवळ माझी काळजी घेण्यासाठी इथे राहिलास... आई तर कित्येक रात्री जागलीही असेल बिचारी .... ती फारच सिरीयसली घेते रे सगळे ... अजूनही सारखी सांगत असते हे नको करु, ते नको खाऊ...शुगर चेक केलीस का... कित्ती पांढरी पडलीयेस - अ‍ॅनिमिक दिसतेस.... ओ माय माय माय.....

अरे हां - परवाच्या त्या कँपमधे डॉ वेद मला विचारत होते - कि तुला इंटरेस्ट आहे का या काउन्सेलिंग जॉब मधे - ती नवीन नवीन पोरं येतात ना - टाईप १ डायबेटिकवाली- की त्यांचे पेरेंट्स जाम पॅनिक होतात ना ... आपली पोरं डायबेटिक आहेत म्हणून कळलं की - त्यांच्या साठी लागतातच माझ्यासारखे सिनिअर पेशण्टस - आय कॅन हँडल देम अँड टीच देम - प्रॉपरली -

अरे अगदी बेसिक गोष्ट सांगायची रे - टेन्शन लेनेका नही और टेंशन देनेका नही - मस्त जिंदगी जी ने का - क्या ?? - अरे, अपने मुन्नाभाय का फंडा ..
अँड सेकंड आल इज वेल ..... आल इज वेल...

अरे हां, ते एक राह्यलंच बघ - मॉमला आणि तुला एसेमेस केलाच आहे पण ती काय वाचणार नाय - तेव्हा तूच लक्षात ठेव आणि सांग तिला - मी आता सायबरोबर रिलॅक्सला चाललीये - उशीर होईल - जेवायला नसणारे - आठवणीने सांग हां...

बाय बाय

सोना......
(हे, ते उगाच ग्रामरला हासू नको हां - मतलब समझमें आ गया तो बस - क्या ???)
-----------------------------------------------------------------------------------------
विशेष टीप - टाईप १ डायबेटिस - हा इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिस म्हणून ओळखला जातो. यात या व्यक्तिला आयुष्यभर इन्सुलिन टोचून घ्यावे लागते तसेच नियमित ब्लड शुगर लेव्हल चेक करावी लागते. तसेच इतरही अनेक चाचण्या नियमित करुन शरीराला काही अपाय झाला नाही ना हे पहावे लागते.
पेशण्टला त्याच्या व्याधीचे सतत मॉनिटरिंग करणे मात्र आवश्यक असते.

हायपो - हायपोग्लायसेमिया - रक्तातील साखर जेव्हा ८० मिग्रॅ / १०० मिलि पेक्षा खाली जाते तेव्हा घाम फुटणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात - यावेळेस एकतर तोंडावाटे साखर देणे वा शिरेवाटे ग्लुकोज इंजेक्शन देणे अत्यावश्यक असते.
-------------------------------------------------------------------------------------------------------

माझ्या धाकट्या मुलीबद्दल (सोनूबद्दल) आणि तिच्या डायबेटिसबद्दल लिहिताना मनात खूपदा असं येत राहिलं की इतकी पर्सनल गोष्ट अशी चारचौघात उघड कशाला करायची. बहिणाबाई तर म्हणूनच गेल्यात -
“माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं, माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं.”

पण जसजसा लिहित गेलो तसतसे जाणवले की इथे लिहिण्यामागे आता कुठलाच सूर मनात उमटत नाहीये - ना काळजीचा, ना दु:खाचा, ना कोणाकडून काही सहानुभूती मिळवण्याचा, ना कोणाला काही संदेश देण्याचा - आता मी काय आणि माझे कुटुंबिय काय या सार्‍याकडे अतिशय त्रयस्थपणेच पाहू शकतोय,

इतकंच काय बहुतेक सोनूतही ती समज आलेली आहे....
कारण तिला टाईप १ डायबेटिस आहे याला आता पार १३ वर्षे झालीएत - त्यामुळे सुरुवातीची आमची होणारी उलघाल, तिची देखभाल, निष्कारण काळजी करणे - हे सगळं सगळं आता खूपच मागे पडलंय -
सोनूचीदेखील सुरुवातीची याबद्दलची जाणीव, दृष्टीकोन संपूर्णपणे बदलून गेलाय - सुरुवातीला हे कोणालाही कळता कामा नये असा विचार करणारी सोनू आता मात्र अगदी कोणालाही अगदी सहजपणे सांगू शकते - हो, आहे मला डायबेटिस ! इतकेच काय, डायबेटिस इज माय फ्रेण्ड ! असंही दिलखुलासपणे ती म्हणते..... तिने इतक्या सहजपणे हे कसं काय स्वीकारलंय हे मलाही सांगता येणार नाही...

आता हे सगळं इथे द्यायचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात चढ - उतार असतातच, ते ज्याचे त्याला भोगावेच लागतात - भले मग तुम्ही ते रडत रडत स्वीकारा नाही तर हसत - हसत ... यातला कोणताही अ‍ॅटिट्यूड तुम्ही कोणावरही लादू शकत नाही ना कोणाकडून कुठल्या अ‍ॅटिट्यूडची अपेक्षा करु शकत ....

पण जेव्हा का आपल्याला कळते की बुद्धिबळातील हत्ती हा सरळच जाणार आणि घोडा अडीच घरेच जातो तर मग तो खेळ तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे खेळू शकता - तुम्हाला ती अडचण न वाटता ती त्या खेळाची एक सक्त नियमावली म्हणून स्वीकारली जाते ....
आयुष्य तर यापेक्षाही अवघडच असते - कोणीतरी आपल्याला कळसूत्री बाहुल्यांसारखे खेळवतो आहे की काय हेच सतत जाणवत रहाते - बुद्धिबळात पुढची खेळी काय असू शकेल याच्या किमान काही पॉसिबिलिटिज (शक्यता) असू शकतात - आयुष्यात तर सतत अनिश्चितताच जाणवत रहाते -आत्ताचा क्षण सुटला की सुटलाच - आणि तोच क्षण जर कुठल्याही कारणाने मिळवता आला - सुखाचा, आनंदाचा करता आला तर - त्याक्षणापुरता का होईना मी भाग्यवानच ....
बस्स - सोनू प्रत्येक क्षणाकडे जरी नाही तरी बर्‍याच क्षणांकडे अशी पाहू शकली तर मला वाटते की बाकी काही फार अवघड नाहीये...
आतातर तिच्यापुढे (पुढील आयुष्यात) अजून मोठ-मोठी आव्हाने आहेत त्याला ती कशी तोंड देणार याची मला फार काळजी नाहीये -कारण तिच्या समोरील बुद्धिबळाच्या पटाची तिला बरीच लवकर ओळख झालीये इतकेच मी म्हणेन.
... आणि हो, या खेळात यशस्वी हो वगैरे म्हणण्यापेक्षा खेळाचा मनसोक्त आनंद तरी घे इतकेच सांगेन मी ... (कारण यशस्विता !!! - इथे प्रत्येकाच्या त्याच्या व्याख्या वेगवेगळ्याच असतात ना....)

तेव्हा, ऑल दि बेस्ट सोनू... अँड ट्राय टू एन्जॉय दी गेम....
------------------------------------------------------------------------------------------

इथे काही गोष्टी अजून नमूद कराव्याशा वाटतात - (ज्या शेअर करुन अनेकांना फायदाच होईल असे वाटते.)

१] डॉक्टरांचा सहभाग - हा सर्वात महत्वाचा आहे - डॉ. वामन खाडिलकर (एंडोक्रायनॉलॉजिस्ट), पुणे - यांनी ज्या पद्धतीने सोनूला व आम्हाला मार्गदर्शन केले आहे (व अजूनही करीत आहेत) हे इतके मोलाचे आहे की त्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नाहीत. त्यांचे या क्षेत्रातले सखोल ज्ञान, इतर पेशंट्सचे त्यांचे अनुभव यामुळे डायबेटिसबद्दलच्या विविध बाजू लक्षात येत रहातात व कोणत्या परिस्थितीत नेमके काय करायला पाहिजे हे नीट समजते.
अतिशय ऋजु व उमद्या व्यक्तिमत्वाचे, मृदु वाणी लाभलेले हे डॉ. नुसते पाहिले की रुग्णाचा आजार पळून जातो. त्यांची अतिशय मिठ्ठास वाणी ऐकून माझे जवळचे एक नातेवाईक गंमतीने मला म्हणाले देखील - यांचे हे इतके गोड बोलणे ऐकूनच डायबेटिस होईल की हो समोरच्याला... (हे डॉ. मुळचे पुण्याचे नाहीत हे चाणाक्ष वाचकांच्या लगेच लक्षात आले असेलच...) Happy Wink

- पण, असे असूनही वेळ पडली की किंचितही स्वर न चढवता हेच डॉ. सोनूला अतिशय सज्जड दमही देऊ शकतात हेही एक विशेषच. स्मित त्यांच्यामुळे आम्हाला जसा धीर मिळाला तसेच यात पालकांचा सहभाग कसा पाहिजे याविषयीही मोलाचे मार्गदर्शन मिळाले व अजूनही मिळत आहे.
विशेष म्हणजे ते सोनूचे जसे लाडके डॉ. आहेत तशीच ती ही त्यांची आवडती पेशंट आहे - त्यामुळे जे कँप्स ते अधूनमधून आयोजित करतात त्याला रोल मॉडेल म्हणून सोनूला बोलवले जाते.

२] माझे अनेक मित्र, नातेवाईक यांनीही सोनूला अनेक प्रकारे मदत केली आहे. शाळेत असताना तिचे शिक्षक/शिक्षिका व तिच्या मैत्रीणी सहकार्य करीत असत. तसेच माझ्या वा अंजूच्या वा मोठ्या मुलीच्या अनुपस्थितीत आमचे अनेक नातेवाईक हे तिची व्यवस्थित काळजी घेत असतात.

३] सुरुवातीला डिस्पोजेबल सिरींज-नीडलने इन्सुलिन इंजेक्शन देणे, नंतर इन्सुलिन पेन व आता अतिशय सुटसुटीत असा इन्सुलिन पंप हा प्रवास आम्ही अनुभवलाय. पंप हा तर एकप्रकारे कृत्रिम पॅनक्रियाज म्हणायला हरकत नाही इतका उपयोगी आहे. (हॅट्स ऑफ टू टेक्नॉलॉजी... )
सध्या आम्ही वापरत असलेल्या इन्सुलिन पंपचे कन्झुमेबल्स / स्पेअर्स देणारे पिनॅकल प्रा. लि. हे देखील अतिशय सुरेख प्रकारे सहाय्य करीत असतात, कधीही अडचण आली तर ती दूर करायला नेहेमी तत्पर असतात.

४] या प्रकारचा डायबेटिस ही मॅरेथॉनपेक्षाही लांब पल्ल्याची शर्यत आहे. १-२ महिने काय किंवा १-२ वर्षे काय चांगल्या प्रकारे शुगर कंट्रोल झाली एवढ्यावरच समाधान न बाळगता सदैवच शुगर कंट्रोल राखणे हे या व कोणत्याही डायबेटिसमधे अतिशय महत्वाचे आहे - हे देखील समजून आले आहे.
वेळोवेळी करायला लागणार्‍या इतर चाचण्या (टेस्टस्) महत्वाच्या असून सदैव डॉ. च्या सल्ल्यानेच जाणे गरजेचे आहे. सतत डॉ.शी संपर्क हा फार गरजेचा आहे.
इतर कोणतीही औषध योजना आपल्या मनाने वा कोणा ऐर्‍यागैर्‍याच्या सांगण्याने करणे अतिशय धोक्याचेच आहे.
योग्य व संतुलित आहार तसेच नियमित व्यायाम यांनाही कमालीचे महत्व आहे.

५] डायबेटिस ही अशी एक गोष्ट आहे की तुम्ही त्याच्याशी लढा न देता हातमिळवणी करुन राहिलात (त्याला ओळखून राहिलात तर..) तर तो त्रास वा व्याधी न वाटता एक चांगला मित्र व मार्गदर्शक म्हणून त्याचे नेहेमी आभारच मानाल.
-------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक
अरे काय लिहिलयंस रे! टचिंग!
दोन्ही पिढ्यांची भाषा अगदी सही सही !
आणि बापलेलीतलं नातं.........आणि लेकीचा अ‍ॅटिट्यूड ..........जबरदस्त!

सुंदर पत्र, नात्यातला ओलावा अतिशय सुरेख मांडला आहे.

बाप आणि मुलीच्या नातं खुप छान असते, पण बापाचा जीव मुलावरही तितकाच असतो, त्याच्या आजारपणात अतिशय कणखर असलेला तो किती अगतिक आणि हळवा होतो, हे मी आमच्या घरातच अनुभवतेय.

_/\_

शशांक, लेकीस पत्रे हा प्रकार नेहेमीच भावनेने ओथंबलेला, मनोज्ञ आणि हृद्य असतो. पण लेक-काया प्रवेश करून बापास पत्र हा भाग देखिल उत्तम साधला आहे. किंबहुना मला त्यातलाच टोन किंवा भाव जास्त आवडला. Happy

पुरंदरे शशांक,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पत्र सांगते गूज मनीचे' असं लिहा.

___/\___

__/\__

सुरेख लिहिलं आहेत. सर्वात जास्त आवडला तो तुमचा सकारात्मक दृष्टीकोन. आपल्या मुलीला एक असाध्य व्याधी आहे हे स्वीकारणं हीच एक खूप मोठी पायरी असते. तुम्ही सगळ्यांनीच ती नुसती स्वीकारली नाही, तर त्यावर मातही करू पाहताय. अनेकानेक शुभेच्छा तुम्हाला.

एकच नंबर ... निशब्द...

स्पर्धेचा म्हणा वा उपक्रमाचा हेतू साध्य झाला..
तुमच्यापुरतेच नाही तर इतरांनाही बरेच काही सांगून जाणारे पत्र !!!

atishay suMdar patra. taruNaaIchee bhaaShaa barobar pakaDalee aahe. muleechaa samajootadaarapaNaa aaNi baapaachee tagmagmanaalaa bhiDlee. hRudaysparshee likhaaN!

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

>>डायबेटिस इज माय फ्रेण्ड >>
खरेच आहे सोनूचे, ज्या गोष्टीमुळे एक आव्हान अन एक नवे भान मिळते, ती आपली मित्रच असणार.

पण जेव्हा का आपल्याला कळते की बुद्धिबळातील हत्ती हा सरळच जाणार आणि घोडा अडीच घरेच जातो तर मग तो खेळ तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे खेळू शकता - तुम्हाला ती अडचण न वाटता ती त्या खेळाची एक सक्त नियमावली म्हणून स्वीकारली जाते ....>> खर्‍या आयुष्यात हे 'स्विकारणं' हिच कळीची गोष्ट आहे. आणि त्याचे स्वाभाविक कारण म्हणजे, आपल्या आजूबाजूला कित्येक डाव चालू असतात आणि आपले नाही म्ह्टले तरी कधी ना कधी लक्ष जातेच त्या डावांकडे. मग माझ्याच डावात का ही सक्त नियमावली आणि त्यांना कसा सोप्या नियमांचा डाव मिळाला आहे या जाणिवेनं उदास व्हायला होतं. दुसर्‍या डावांकडे न पहाता स्वतःच्याच डावाचा आनंद घेत रहाण्यासाठी स्वतःच्या मनाचं 'कंडिशनिंग' करणे, हेच मोठं आव्हान आहे.

असो. शशांकजी, ह्रुदयस्पर्शी पत्रे....दोन्हीही.

खरचं निशब्द केलत तुम्ही Sad डोळ्यात पाणी आलं. पण लेखन अप्रतिम केलय जेणेकरुन इतरांनाही बरचं काही घेण्यासारखं आहे, नक्कीच! Happy

शशांकजी,
ह्रदयस्पर्शी ..!

लेखन अप्रतिम केलय जेणेकरुन इतरांनाही बरचं काही घेण्यासारखं आहे, नक्कीच! +१

तुमच्या मुलींने लिहिलेली ही बेसिक गोष्टच तिला लढण्यास आणखी बळ नक्कीच देईल.
लेनेका नही और टेंशन देनेका नही - मस्त जिंदगी जी ने का - क्या ?? - अरे, अपने मुन्नाभाय का फंडा ..
अँड सेकंड आल इज वेल ..... आल इज वेल !

मला वाटते ही नवीन पिढी आपल्याला वाटते त्या पेक्षा सहज आणि सक्षमपणे या गोष्टींचा मुकाबला करेल
Happy

Pages