"पत्र सांगते गूज मनीचे" : कविन

Submitted by कविन on 18 September, 2013 - 01:23

माझ्या प्रिय प्रिय लिखाणा,

आता काढत बस चुका वरच्या मायन्यातल्या. "प्रिय प्रिय ह्या सर्वात वरच्या स्थानावर तर तुझी लेक आहे मग त्या स्थानावर आज लिखाण कसं? असा मार टोमणा Wink

बर आता मुद्याच बोलू? फार पटकन कंटाळा येतो रे आजकाल लिखाणाचा. बाकिच्यांना वाचायचा कंटाळा येईपर्यंत लिहूच नये असा शा.जो. मारायचा मोह होतोय तुला माहितेय मला तरीही सांगायचा वेडेपणा करतेय मी.

आणि हो तू बोलायच्या आधी मीच मान्य करते की मी कंटाळा येणार लिहीत नाही असही अजिबात मत नाहीये माझं. माझी छोटी उंची लिखाणातली आणि तसही एकंदरीतलीच मान्य करुनच मी आता तुला माझ्या मनातला हे सांगतेय. बरेच दिवस खरतर गेले एक दोन वर्षभर माझच लिखाण मला छळतय. एकतर नीट काही सुचत नाही, सुचलं तर उतरत नाही आणि जे उतरतं ते रुचत नाही माझ्याच मनाला. तोचतोचपणा त्रास देतो. कितीवेळा त्या डिलिट बटणाचा आधार घेतलाय मी हे तुलाही माहीत आहेच म्हणा.

टेक अ ब्रेक असं दरवेळी मनाशी ठरवत आता काहीही लिहायचं नाही हे स्वत:लाच बजावते. फक्त वाचायचं. निदान पुढलं एखाद दोन वर्ष तरी निव्वळ वाचनमात्र रहायचं.

आणि ज्या क्षणी हा विचार उचल खातो त्याच क्षणी एखादी कवितेची ओळ अलगद मनात उतरून वाकुल्या दाखवते.

मुळात माझ्यात पेशन्स नावाची चीज नाही असली तर अगदीच नावाला आहे. एखादी गोष्ट मुरेपर्यंत धीर धरणं माझ्या स्वभावातच नाही. इमोशन्सचे झटके येतात मला. वाटलं .. केलं... मोकळं झालं टाईपच्या गोष्टी त्यामानाने पुर्ण तरी होतात माझ्याकडून. रेंगाळलेल्या गोष्टीतला उत्साह मावळत जातो जसे दिवस पुढे पुढे जातात तसा.

एका आवेगात झटक्यात जे काही तोडकं मोडकं लिहीलं जातं तेच तेव्हढं पुर्ण होतं. ते १००% नसतच हे ही कळतं पण परत त्यावर काही काम होतच नाही झालं तर त्याचा चेहरा मोहरा असा बदलतो की ज्याच नाव ते.

मला आता तुझं तेच ते नेहमीच लेक्चरही देऊ नकोस की तोच तोच पणा हा निव्वळ एकाच प्रकारचे अनुभव घेण्यामुळे नसून तो एखादी गोष्ट एकाच परस्पेक्टिव्हने बघण्यातून आलेला आहे. तेव्हा दिशा बदला.. फ़ोकस बदला.

मला ते ऑटोकॅड ड्राईंगच आठवतात अशाने. उभा छेद द्या.. आडवा छेद द्या .. टॉप व्ह्यु बघा हॅव नि तॅव

तुझ्यासांगण्यावरुन मी एकच गोष्ट वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून कशी सरकेल पुढे असाही प्रयोग करुन बघितला गेल्यावेळी आणि काही नाही नेहमीप्रमाणे त्या वेड्यावाकड्या उमटलेल्या पाऊलखुणांना फ़िनाईलने पुसून मिटवून टाकलं.

हसू नकोस वाचताना आणि आता ह्या पुढे तुझी पाककलेतली उदाहरणंही नकोयत मला. काय तर म्हणे "दही बुत्तीला" तुप जीर कढीपत्त्याची फ़ोडणी दिली की झाली महाराष्ट्रीयन स्टाईल आणि नारळ तेलाची उडीद डाळ, लाल मिरची आणि कढीपत्ता घालून फ़ोडणी दिली की झाला साऊथवाला दहीभात. घे म्हणे व्हरायटी दही+भात ह्याच एका इनग्रेडीयंटची.

नॉट जमिंग. छोड दे. माझ्या लेखना तुझा मेंदूही माझ्या मेंदुसारखाच जड झालाय.

आता प्लीज मी पुन्हा एकदा पेनाला टोपण लावायचं मनावर घेतलय आणि वाचनमोड फ़क्त ऑन ठेवायचं ठरवलय तर ह्यावेळी मिश्कीलपणे मनात काही पेरुन त्या निर्णयाला सुरुंग लावू नकोस. (बघ तिथे किती जण ह्याचं टाळ्या वाजवून स्वागत करतायत त्यांच्याही पायावर धोंडा पडण्यापासून वाचव Wink )

- स्वत:वरच चिडलेली मी

----------
प्रिय स्वतःवर चिडलेल्या तू,

आमेन! तथास्तू! अजून काही म्हणू? अग्गो माझे बाई! प्रमाणिकपणा सर्वात वरती. आत्ताही इतकं सारं मनात साचलेलं लपलेलं टोचलेलं लिहीलस की मला. लिखाणच आहे की हे. उंचीची टेप दे फ़ेकून आणि मनाचा प्रामाणिक कौल घे बास.

आता घे माझं नेहमीच उदाहरण Wink - सुबक कळीदार मोदक एका दिवसात जमतच नाहीत त्यासाठी बरेच मोदक बिघडू द्यायची तयारी हवी आणि बिघडली त्या मोदकाची एखादी कळी तरी स्वत: केलेला मोदक खाण्याचा त्याहीपेक्षा तो करून बघण्यातला आनंद काही और असतोच की नाही. आणि त्याही पुढे जाऊन लक्षात आलं एकदा की हे इतपतच सुबक जमणारेत मोदक आपल्याला तर ठिक आहे की. आपले प्रयत्न १००% आहेत ना मग झालं तर. स्वत: बाबतीतला ओव्हर कॉन्फ़ीडन्स वाईट तितकाच न्युनगंडही वाईटच. आंजारु गोंजारु नये स्वत:ला पण हिडीस फिडीसही करु नये ग. जमलं जमलं, नाही जमलं तर नाही जमलं. ठिक आहे. होता है. मोकळं सोड स्वत:ला जमलच पाहिजेचा अट्टाहास नको आणि जमत का नाहीचा टोचाही नको.

स्वत:वर बंधनही घालून घेऊ नकोस. ठरवून लिहीता येत नाही (निदान तुला तरी) तसच ठरवून न लिहीणही जमत नाही, हे आलय ना लक्षात? जा पळ आता तो रिसायकल बीन चा डब्बा भरुन वहायला लागलाय त्याला रिकामा कर, पाटी कोरी कर आणि मनापासून वाटेल तेव्हा कर श्रीगणेशा.

- तुझं प्रिय प्रिय लिखाण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग काय ग हे Happy
लैच भारी................
मला तर अजिबात वाटलं नव्हतं की असही काही पत्र येईल.
एकदम झक्कास !

छान कल्पना. आवडलं. Happy

(अवांतर - माझं नेहमीचंच टुमणं -

विरामचिन्हांचा व्यवस्थित वापर केला नाहीस, तर तुझं प्रिय लिखाण, जे आत्ता आपल्या उत्तरात तुझी शांतपणे समजूत काढतं आहे, ते पुढल्या वेळी तुला रागे भरेल, हो Wink )

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383