कश्मिरी अंगूर- गोड- पौर्णिमा

Submitted by पूनम on 16 September, 2013 - 02:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

ग्रूप- पनीर + फळ

साहित्यः
१) पनीर २०० ग्रॅम
२) साखर- २ वाट्या (साधारण पाव किलो)
३) मैदा- २ टटीस्पून
४) सफरचंद- दोन
५) मिल्क पावडर- ५० ग्रॅम
६) खजूर, काजू, बदाम- सर्व मिळून एक वाटी
७) दूध- एक लिटर
८) केशर- १५-२० काड्या

क्रमवार पाककृती: 

रसगुल्ले:

१) पनीर किसून घेणे (मी विकतचे पनीर आणले आहे. मूळ बंगाली पद्धत अर्थातच दूधात लिंबू पिळून पनीर घरी करायची आहे)
२) किसलेले पनीर मोकळे करून घेणे आणि भरपूर मळून घेणे. मळताना त्यात दोन चमचे मैदा घालणे. सगळा मिळून एक मऊ गोळा करून घेणे. त्याचे छोटे छोटे रसगुल्ले करणे. रसगुल्ला अगदी छोटा असावा.
३) पाणी उकळायला ठेवणे. सहा वाट्या पाण्याला एक वाटी साखर घालणे. साखर विरघळवून घेणे. पाणी उकळले की त्यात रसगुल्ले घालून भांड्यावर झाकण ठेवणे. पाच-सात मिनिटानी झाकण काढून बघणे. रसगुल्ले आकाराने जवळपास दुप्पट झाले असतील आणि पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगत असतील.

सफरचंद रबडी:
१) खजूर, काजू, बदाम- भिजवून ठेवणे. पाव वाटी दुधात केशराच्या काड्या भिजत घालणे.
२) दोन सफरचंदांची सालं काढून त्याचा कीस करून घेणे. कीसात दोन चमचे साखर घालून कीस शिजवून घेणे.
३) दूध उकळायला ठेवणे. सतत ढवळत रहाणे. दूध निम्म्यापर्यंत आटले की त्यात साखर घालून परत उकळवणे.
४) थोड्या दुधात दूध पावडर एकत्र करून ते मिश्रण दुधात घालणे.
५) पाण्यात भिजवलेल्या खजूर, काजू आणि बदामाची पेस्ट करून घेऊन ती दुधात घालणे.
६) दूध पुरेसे आटले की गॅस बंद करणे आणि रबडी रूम टेम्परेचरला थंड होऊ देणे.
७) रबडी किंचीत गार झाली की किसून शिजवलेले सफरचंद त्यात एकत्र करून नीट एकजीव करणे.
८) रबडी जशी निवत जाईल, तशी घट्ट होत जाईल. रूम टेम्परेचरला आली, की फ्रीजमध्ये ठेवणे.

सर्व्ह करताना:
१) रसगुल्ल्यातील साखरेचा पाक/ पाणी चमच्याने दाबून काढून टाकणे. ते रसगुल्ले बाऊलमध्ये ठेवणे.
२) वरून गार सफरचंद रबडी घालणे.

कश्मिरी अंगूर आस्वाद घेण्यासाठी तयार आहेत.

angoor1.jpg

वाढणी/प्रमाण: 
२०-२५ रसगुल्ले होतील
माहितीचा स्रोत: 
रसगुल्ल्यांची कृती इन्टरनेटवरून घेतली. सफरचंद रबडी- कॉमन सेन्स आणि स्वयंपाकाच्या अनुभवातून.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल दसर्याला कश्मिरी अंगूर केले! अतिशय शाही तरीही कमी वेळखाऊ पक्वान्न! प्रत्येकाने तारीफ केली आणि मी विनम्रपणे सर्व श्रेय पूनमला दिले. Happy
पाककृती इतकी व्यवस्थित लिहीलेली आहे की कुठेही चुकायचा, फसायचा, अनुभवातून शहाणे व्हायचा प्रसंग यायची शक्यताच नाही. विकतच्या रसमलाई किंवा अंगूर मलईतल्या पात्तळ दुधापेक्षा ही रबडी शाही वाटते आणि अंगूर आवडणार्यांना हवे तितके अंगूर खाता येतात. दोन वाट्यांच्या वर फक्त पैजा लावणारेच खाऊ शकतील त्यामुळे जास्त माणसं असली तरी बिनधास्त करू शकतो. इतक्या भारी रेसिपीसाठी धन्यवाद पूनम!

असे रसगुल्ले आधी करून ठेवता येतील का? कोरडे ठेवायचे की पाकात घालून मग काढून फ्रीजमध्ये ठेवायचे?
रबडी सुद्धा आधी करुन ठेवता येईलच ना? Happy ( दिवाळी पार्टीची तयारी Wink )

अरे हो, यात सांगायचं राहिलं. ही रबडी आदल्या दिवशी रात्री करून फ्रीजमधे ठेवली तर दुसर्या दिवशी अगदी मस्त चव लागते. मुरलेल्या सफरचंदाचा स्वाद चढतो अगदी. अंगूर मात्र आतून गोड झाले नाहीत माझे. मी दिवाळी पार्टीला करणार आहे, नुसती सफरचंद रबडी, अंगूर वगळून.

आशू थँक्स Happy केलेस तू ना? मग श्रेयही तुझंच.
अंगूर गोड होण्यासाठी साखरेचं प्रमाण वाढवून बघ.
संपदा, रसगुल्ले आधी करून ठेवता येतील. पण पाकात घालूनच ठेव, कोरडे नको.

मी ही एकदा स्पर्धेसाठी म्हणून केली. मग करणंच झालं नाही. आता परत करेन.

मी विकेंडला केली होती. आधी दूध आटता आटेना त्यामुळे ऑलमोस्ट फसली असं वाटताना जमून गेली. मी अंगूर्/रसगुल्ले घरीच केले. दूध आटवल्यावर सफरचंद घालायचं प्रयोजन कळेना म्हणून ते स्कीप करून नॉर्मल रबडीच केली शेवटी.

इतक्यात नुसतीच अ‍ॅपल रबडी दोनदा केलीय. सफरचंदाचा कीसही आधी वेगळा शिजवून घेतला नाही.
रबडीत मुरलेल्या सफरचंदाचं टेक्स्चर आणि चव अतिशय भारी लागतात.

Pages