स्मोकिंग अर्थात धुम्रपानाविषयी बोलायचंय !!!

Submitted by पियू on 15 September, 2013 - 12:51

प्रिय माबोकरांनो..

खुप दिवस या विषयावर लिहायचे मनात होते.

आजकाल आपल्याकडे स्मोकिंगचे प्रमाण वाढत चालले आहे.
माझ्या आसपास कित्येक कॉलेजगोईंग आणि त्यापेक्षा मोठी मुलेमुली स्मोक अर्थात धुम्रपान करतांना दिसतात.
त्याचा फार त्रास होतो.. शारीरीक आणि मानसिक सुद्धा..

मानसिक त्रास असा की आपण कुठे चाललो आहोत.. रोज किमान एकदा तरी ह्या ना त्या मार्गाने "धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills !!!" हा संदेश कानांवर आदळतोच. आणि तरी धुम्रपान करणे हा एक स्टेटस सिंबॉल बनु लागलेला आहे. पुढे मुले मोठी झाल्यावर त्यांना ह्या विळख्यात अडकण्यापासुन कसे रोखु शकु तेच कळत नाही.

मानसिक त्रास एकवेळ थोडा दुर्लक्षित करता येतो. इतर व्यसनांच्या बाबतीत ते सहजपणे करता येते. इतर कोणाला दारू ढोसतांना पाहीले तर "जाऊदे.. तो आणि त्याचे लिव्हर" असं म्हणुन सोडुन देता येतं.

पण ह्याचा शारीरीक त्रास हल्ली वरचेवर होऊ लागला आहे. त्या वासाने घुसमटल्यासारखे होते.. श्वास कोंडल्यासारखा होतो.. ह्या अनुशंगाने मला सगळ्यांशी थोडेसे बोलायचे आहे.

माबोवरील डॉक्टर्स किंवा या क्षेत्रातले तज्ञः

१. खरंच स्मोकिंग इतके हानीकारक आहे का? मी कोणालाही धुम्रपानाच्या दुष्परिणांमांविषयी समजवायला गेले तर "धुम्रपानाने मेलेला एक तरी माणुस दाखव" असे म्हणतात. ह्याचे कारण आजेसासरे (जे आता हयात नाहीत) तेही स्मोक करायचे पण त्यांना काही झाले नाही. माझे ४ही सासरे गेली अनेक वर्षे स्मोक करतात पण अजुनही सगळे ठणठणीत आहेत.

२. जर खरंच धुम्रपानामुळे काही रोग/विकार होत असेल तर याचा धोका त्यांना किती असतो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना हे रोग/विकार होण्याचा धोका किती असतो? घरात लहान मुल असेल तर त्याला किती धोका असतो?

३. कुठेतरी वाचले आहे की स्मोक करणार्‍याने घराबाहेर जाऊन स्मोक केले तरी त्यानंतर २ तास त्याच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला तेवढाच धोका असतो.

४. ज्याप्रमाणे दारुचे व्यसन हे व्यसन करणार्‍याच्या अपरोक्ष सोडवण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत तशी धुम्रपानासाठी आहेत का?

५. स्मोकिंग करणार्‍याच्या सतत संपर्कात राहणार्‍या व्यक्तीने कोणती औषधे इ. घेऊन ती दुष्परीणांमापासुन दूर राहू शकते का?

स्मोकिंग करणार्‍याच्या सतत संपर्कात राहणारे माबोवरील सदस्य:

१. तुमच्या निकटच्या व्यक्तीने स्मोकिंग केलेले तुम्हाला कितपत आवडते? आवडत नसेल तर तुम्ही काय करता?

२. अश्या व्यक्तीच्या सतत संपर्कात राहिल्याने आपल्याला व घरातील लहानग्यांना काही होईल अशी भिती तुम्हाला वाटते का? तुम्ही अश्या वेळी काय करता?

स्मोकिंग करणारे माबोवरील सदस्यः

माझ्या प्रश्नांचा कृपया राग मानु नका.. "आमचे पैसे..आमचे फुफ्फुस..आमची मर्जी..आमचे घर..आम्ही काहीही करु..तुम्ही कोण सांगणारे" हा तुमचा युक्तीवाद मी अनेकवेळा ऐकला आहे. पण..

१. रोज इतक्यावेळा "धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills !!!" ऐकुन तुम्हाला स्वतःला कधी स्मोकिंग सोडावेसे वाटते का?

२. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना (विशेषतः जोडिदाराला) तुमचे स्मोकिंग आवडते का?

३. तुम्ही स्मोक करत असतांना तुमच्या आसपास स्मोकिंग अज्जिबात न आवडणारी व्यक्ती असेल तर तुम्ही काय करता? तिच्या विनंतीचा मान राखता का?

४. आपल्या ह्या विशिष्ट व्यसनाने आपल्यासोबत इतरांचेही नुकसान होते आहे ह्यामुळे कधीही अपराधी वाटते का?

५. घरात कोणी लहान असले तर त्याच्यासाठी तुम्ही काय विशेष काळजी घेता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिगारेट पिणे आरोग्यास हानिकारक आहेच, हे सांगण्याची आवश्यकता नाहीच , मी कार्यालयातील कुठल्याही मानसाला कार्यालयात सिगारेट पिण्यासंबधी हटकतो. कित्येक वेळा यावरुन वाद सुध्दा झाला आहे. सध्यातरी आवारात पिणार्‍याचे प्रमाण कमी झाले आहे. सिगारेट पिणार्‍यापेक्षा त्याचेजवळ असणार्‍यांना आजारांचा धोका अधीक असतो.

गणपतीत सगळे एकत्र जमलेले असतांना सगळ्यांनी गणपतीसमोर एकत्र बसुन केलेले स्मोकिंग आणि एका सासरेबुवांनी तोंडावर सोडलेला धूर..
>>
कहरच आहे हा! देवासमोर एकत्र स्मोकिंग? ते ही इतरांना त्रास होतो हे माहिती असुनही?
शिवाय सरळ सरळ एका स्त्रीच्या "तोंडावर सोडलेला धूर"? Angry

कल्पनाच करवत नाही. या लोकांना स्वत:च्या स्वातंत्र्याची जाणीव आहे, पण दुसर्‍यांच्या स्वातंत्र्याची जराही जाणीव नाही? इतरांना त्रास होवो न होवो आम्ही वयाने मोठे म्हणजे हवे ते करणार.

अशक्य आहे! यांना बदलणे अशक्यच आहे.
आणि अश्या महाभागांना तुम्ही रोज सहन करता, तुम्हाला माझा साष्टांग प्रणाम.

एका सासरेबुवांनी तोंडावर सोडलेला धूर>>> अरारा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

फायदाच नाही काही बोलुन.
किती किमंत मिळेल तुमच्या बोलण्याला हे आधीच प्रेडिक्ट करता येतय.
सॉरी टु से धिस.
मी हे सहन करु शकत नाही अस नवर्‍याशी बोला.
आणि वेगळीकडे राहु शकता येत का ते बघा.
कारण सुस्पष्टपणे हेच सांगा की धुराचा त्रास होतो.
नंतर सासुबाइना फितुर करुन घ्या.

तुमच्या घरी कोणी आलं तर तिथे तुमचे नियम.
१) नो स्मोकिन्ग
२) स्मोकिन्ग करुन लगेच भेटायला न येणे..
कमी कमी दोन तास जाउ देणे.
अन्यथा भेटायला येवु नका.

सिग्रेटींची सवय एकदा लागली की सुटणे कठीण असते.

नीधप यांनी म्हटले तसे जोपर्यंत स्वतःला आतून मनापासून सोडावे असे वाटत नाही, तोवर इतर सर्व इलाज वायफळ आहेत. त्यांची सिगारेट सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, त्यांनी घरात पिऊ नये, प्यायचीच असेल तर गच्चीत वगैरे मोकळ्या ठिकाणी जावे आणि काय ते करावे, इतपत उद्दिष्ट ठेवले तर पुरे असे मला वाटते.

मास्क चा उपयोग इतकाच आहे, की पुनःपुन्हा आपल्या धुराड्यामुळे कुणालातरी त्रास होतो हे डोळ्यासमोर "व्हिजिबली" दिसावे.

दुसरा आणिक एक इलाज.

सिगारेट ओढत असाताना ओढणार्‍याने करायचा हा प्रयोग आहे. ओढत असाल तर तुम्हीदेखिल तुमच्या स्वतःच्या सिगारेटीसोबत हा प्रयोग करून पहायला हरकत नाही.

एक पांढरा हातरुमाल घ्या.

  • १. सिगारेटीचा एक झुरका मारा. धूर बाहेर सोडताना ओठांचा चंबू करा, त्यावर रुमाल (एकपदरी) ठेवून त्यातून धूर बाहेर सोडा.
  • २. पुढचा झुरका मारा. यावेळी धूर छातीत घेऊ नका, तसाच परत रुमालातून बाहेर सोडा, मघाच्या स्पॉट शेजारची जागा यासाठी वापरा.

रुमालावर जे काय जमेल ते (याला 'टार' म्हणतात) तितके, प्रत्येक झुरक्यासोबत छातीत जाते, व छातीतच रहाते, हे साहेबांना दिसू द्या. साहेबांचाच रुमाल यासाठी वापरा, त्यावरचे डाग साबण पाणी लावूनही धुतले जायला किती प्रॉब्लेम असतो, व ते किती दिवस टिकतात, याचा अनुभवही त्यांना घेऊ द्या.

इब्लिस प्रयोग चांगला आहे, सोडली नसती तर प्रयत्न नक्की केला असता,

पण मग त्या रुमालाच काय -एरियल, सर्फ एक्सल , निरमा , रिन कि ससा ? Happy

नीधप यांनी म्हटले तसे जोपर्यंत स्वतःला आतून मनापासून सोडावे असे वाटत नाही, तोवर इतर सर्व इलाज वायफळ आहेत. त्यांची सिगारेट सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, त्यांनी घरात पिऊ नये, प्यायचीच असेल तर गच्चीत वगैरे मोकळ्या ठिकाणी जावे आणि काय ते करावे, इतपत उद्दिष्ट ठेवले तर पुरे असे मला वाटते.

>> हो इब्लिस.. माझे उद्दिष्ट इतपतच आहे सध्यातरी.. माझ्यासाठी ते सिगरेट सोडतील वै. माझ्यासाठी स्वप्नच आहे..

हा रुमालाचा प्रयोग चांगला आहे.

डॉक्टर असल्याने तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा चांगला फायदा होतो आहे.

एक शंका:

फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? आणि त्याचा धुम्रपानाशी काय संबंध असतो?

वेगवेगळ्या उपायांमध्ये आणखी एक भर [कितपत यशस्वी होईल ह्याची गॅरंटी नाही!] :

सासूबाईंना घरातल्या धूम्रपानामुळे दम्याचा अ‍ॅटॅक आला की लगोलग त्यांना स्वयंस्फूर्तीने जवळच्या क्लिनिक हॉस्पिटल मध्ये उपचार किंवा विश्रांतीसाठी दाखल करावे. हवे असल्यास अगोदर त्या क्लिनिकच्या डॉकना पूर्वकल्पना द्यावी. आपणही सासूबाईंना सोबत म्हणून दोन दिवस तिथे जाऊन राहावे. घरचे सर्व काम, देखभाल इत्यादी हे धूम्रपान करणार्‍या मेंबरांवर सोपवावे. सासूबाईंच्या क्लिनिकमध्ये राहण्याचा व उपचारांचा खर्च ३-४दा सासरेबुवांना किंवा सासरेबुवांच्या सुपुत्रांना करावा लागला की कदाचित आपण घरात करत असलेले धूम्रपान आणि त्यामुळे येणारा वैद्यकीय खर्च यांचे गणित मांडल्यावर त्यांना घराबाहेर धूम्रपान करण्याची बुद्धी होऊ शकेल.

Pages