आधुनिक सीता - ५

Submitted by वेल on 10 September, 2013 - 07:08

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग १ - http://www.maayboli.com/node/44930
भाग २ - http://www.maayboli.com/node/44956
भाग ३ - http://www.maayboli.com/node/45054
भाग ४ - http://www.maayboli.com/node/45057

*********************************************************************

माझ्याकडे फारसं काही नव्हतं सांगायला माझ्या नोकरीबद्दल. मला नोकरी करायला सुरुवात करून फक्त दोनच वर्ष झाली होती आणि मी सुरुवातीपासून पटवर्धन काकूंकडेच कौन्सिलर म्हणून काम करत होते आणि त्यांच्याच कौन्सेलिंग सेंटर मधून पुण्यातल्याच पाच शाळांमध्ये कौन्सिलर म्हणून काम पाहत होते. त्यामानाने सागरचा अनुभव खूप जास्त होता. त्याच्या इंटर्नशिप्स, त्याच्या हॉस्पिटल्सच्या नोकर्‍या आणि आता ही सौदीची नोकरी.
सागर सांगत होता त्याला ही नोकरी त्याच्या मित्रामुळे मिळाली, खरंतर, त्याच्या मित्राच्याच हॉस्पिटलमध्ये तो सर्जन आणि चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून होता. पगार तर खूप छान होताच शिवाय हॉस्पिटलच्याच आवारात राहायला बंगला आणि घरात कामासाठी मदतनीस देखील होते. काम देखील खूप होते पण सागरने ठरवले होते की पाच वर्ष पूर्ण झाली की परत येऊन स्वतःचे हॉस्पिटल काढायचे, त्याकरता एवढे कष्ट करायलाच हवे होते.
"कोण हा मित्र? फारच श्रीमंत दिसतोय" मी
"रफिक त्याचं नाव. माझ्यासोबत अकरावी बारावीला कॉलेजमध्ये होता. कॉलेजमधे असताना तो बर्‍याचदा घरी यायचा, खास मोदक, पुरणपोळी आणि कटाची आमटी खायला. नंतर इंजिनीयरिंग करायला गेला. अरब आहे. पण खूप छान मराठी बोलतो, अगदी आपल्या इतकं स्पष्ट. इतकंच कशाला आपल्या सगळ्या मोठ्या सणांची माहिती आहे त्याला. इंजिनीयरिंग हॉस्टेलच्या दिवाळीमधे त्याने मराठी गाणीसुद्धा म्हटली होती."
"अरे वा! बराच हुषार आणि रसिक दिसतोय तुमचा रफिक."
"अग त्याची एक खास मैत्रिण होती सुनिता खरे. इंजिनीयरिंग नंतर मुंबईमध्ये राहिला असता तर कदाचित त्याने लग्न केलं असतं तिच्याशी."
"काय सांगतोयस? अरब मुली खूप सुंदर असतात ना? आणि खूप आज्ञाधारक, मग त्याला आपली मराठी मुलगी कशी आवडली"
"अग ती खूप हुषार होती आणि एकदम बेधडक. रफिक घेऊन आला होता तिला आपल्या घरी. आईने झापलंसुद्धा होतं त्या दोघांना. आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर होती ती. अगदी तुझ्यासारखी."
"माझ्यासारखी?"
"अग हो खरच ती खूपशी तुझ्यासारखी दिसायची."
"मग काय झालं त्या दोघांचं?"
"रफिकच्या अब्बूंना कळलं, त्यांनी त्याला परत बोलावून घेतलं आणि लग्न लावून दिलं त्याचं. त्याची बायको रफिकपेक्षा जास्त श्रीमंत घरातली आहे म्हणे."
"बरं झालं बाई, आपल्यातली मुलगी, मुसलमान तेसुद्धा अरब मुलाशी लग्न केलं असतं काय झालं असतं तिचं."
आणि तो विषय तिथेच संपला.

आम्ही पुण्याला परत गेलो, आठ दिवसांनी सागर परत जाणार गेला. त्यापूर्वी लग्नाची तारिख, हॉल, लग्नाच्या कपड्यांची खरेदी सारं काही झालं होतं. आता सहा महिन्यांनी तो लग्नासाठी परत येणार होता. लग्न झाल्यानंतर व्हिसा अ‍ॅप्लिकेशन आणि मग मीसुद्धा जाणार होते सौदीला.

पाहाता पाहाता सहा महिने गेले. सागर पंधरा दिवसाच्या लग्नासाठीच्या सुट्टीवर आला. तो आल्याच्या तिसर्‍या दिवशी धूमधडाक्यात लग्न झालं आमचं. सागरची आई आणि आजी तशा पुढारलेल्या विचारांच्या त्यामुळे त्यांच्या घरी ग्रहमख, सीमान्तपूजन, हळद हे कुठलेही विधी होणार नव्हते. इतकंच कशाला, सर्वसाधारणपणे लग्नानंतर होणारी सत्यनारायणाची पूजासुद्धा होणार नव्हती. आमच्या घरी मात्र सगळं साग्रसंगीत. पण सासरी आल्यावर सागरच्या आजीने तर खूप कौतुक केलं माझं. दूर फिरायला जाण्याइतका वेळ नव्हता त्यामुळे आम्ही कुठेही जायचे नाही घरच्यांसोबत राहायचे असेच ठरवले होते. पण तरिही पुण्यातल्याच जाधवगडावर आम्ही हनिमूनसाठी तीन दिवस जाऊन आलो. ही कल्पनासुद्धा सागरच्या आजींचीच. सगळ्यांकडून लाड करून घेण्यात आमचा मुंबईला जाण्याचा दिवस कधी आला कळलंसुद्धा नाही. आम्ही दोन दिवस सागरससोबत मुंबईला राहणार होतो. त्यादरम्यान आम्ही माझे व्हिसाचे काम करणार होतो आणि मग सागर परत जाणार होता. सागर सोबत असतानाच व्हिसाचं अ‍ॅप्लिकेशन झालं. सागर निघाला. त्यालाही वाटत नव्हतं निघावं असं आणि मलाही वाटत नव्हतं त्याने जावं असं. पण बॉण्ड होता कमीतकमी चार वर्षांचा, जायला तर हवंच होतं. जाता जाता त्याने मला एक मस्त भेट दिली, ब्लॅकबेरी. रोज एकमेकांसोबत खूप खूप बोलता यावं म्हणून. सागर सौदीला गेल्यानंतर मी काही दिवस माझ्या मावशीकडे मुंबईमध्ये राहणार होते सागरच्या आईसोबत व्हिसासाठीची मुलाखत वगैरे कामासाठी. सागर सौदीला गेल्यापासून आम्ही ब्लॅकबेरीवर चॅट करायचो. स्काइपवर गप्पा बोलायचो. त्याच्या सहकार्‍यांना, विशेषतः रफिकला आमचे लग्नाचे फोटो पाहायचे होते. पण फोटो काढणारा दादाचा द ग्रेट मित्र, खूप वेळ लावत होता, त्यामुळे मला फोटो सागरलादेखील दाखवता आले नव्हते. फोटो येण्यापूर्वी माझा सौदीचा व्हिसा आणि तिकिट हातात आलं आणि मला सोडायलादेखील सारेजण मुंबईला आले. माझा हा देशाबाहेरचा पहिलाच प्रवास तोदेखील एकट्याने आणि तोही सौदीसारख्या देशात. मनात विचार आला, देव जाणे मी परत कधी येईन भारतात परत. त्याक्षणी असं वाटलं जाऊ नये.

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45250

Group content visibility: 
Public - accessible to all site users