मेळघाट मैत्री शाळा - एक झलक

Submitted by हर्पेन on 5 September, 2013 - 13:11

नुकताच मी मैत्रीतर्फे मेळघाटात जाउन परत आलो. खरेतर खूप जणांना, मैत्री आणि मेळघाट एकत्र उच्चारताच, सर्वप्रथम आठवतात, त्या वैद्यकीय संदर्भातील धडकमोहिमा. पण मी गेलो होतो शिक्षण संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमाकरता. मैत्रीच्या शैक्षणिक मोहिमेचे हे तिसरे वर्ष.

पहिल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०११-१२ शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता, चिलाटी येथे १०० दिवसांची निवासी शाळा आयोजित केली होती. याद्वारे ४३ मुलांना शाळेत परत प्रवेश घेण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यात आले. त्या सर्वच्या सर्व मुलांनी त्यानंतरच्या वर्षी आपापल्या गावातल्या शाळेत प्रवेश घेतला.

त्यानंतरच्या वर्षी (शैक्षणिक वर्ष २०१२-१३) मैत्रीतर्फे, चिलाटी परिसरातील ३ गावांमधल्या शाळांमधून स्वयंसेवकांच्या मदतीने एकूण १०० दिवसंकरता, शैक्षणिक उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. त्यानंतर अनेक ग्रामस्थांनी असाच उपक्रम वर्षभर घ्यावा, जेणेकरून शाळा संपूर्ण वर्ष चालतील, असे सुचवले. स्थानिकांच्या अशा उत्साहवर्धक प्रतिसादामुळे यावर्षीच्या उपक्रमाची आखणी स्वयंसेवक व स्थानिक लोक यांचा मेळ घालून केलेली आहे.

चालू (२०१३-१४) शैक्षणिक वर्षासाठी असा उपक्रम राबवण्याकरता मेळघाटातील ११ गावांची निवड करण्यात आली आहे. या ११ गावांमधून ९-१० वी शिकलेले स्थानिक (कोरकू या आदिवासी जमातीचे) युवक (ज्यांना गावमित्र असे संबोधण्यात येते) यांनाही सामील करून घेण्यात आले आहेत. हे गावमित्र, शाळेत जाणाऱ्या सर्व मुलांना शाळा भरायच्या आधी एक तास गोळा करतील आणि त्यांना काही मूलभूत कौशल्ये शिकवतील, ज्यामुळे शाळेमध्ये शिकताना येत असलेल्या त्यांच्या अडचणी कमी होतील अशी योजना आहे. मी जाउन आलो तो अशा उपक्रमाचा दुसरा महिना. शिक्षणासंदर्भात तिथल्या मुलांची मुख्य अडचण आहे ती भाषेची (कारण मातृभाषा कोरकू), पण गावमित्र स्थानिक (कोरकू) आहेत आणि त्यांना मराठी पण चांगले कळते त्यामुळे ते मुलांशी नीट संवाद साधू शकतात.
तर अशा गावामित्रांकरता दर महिन्याला चिलाटीमध्ये एक शिबिर/ कार्यशाळा असते. त्या शिबिरात त्यांना पुढच्या महिन्यात मुलांकडून काय काय करुन घ्यायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. याकरता प्रत्येक महिन्यातील स्वयंसेवकांच्या तुकडीत या आधी जाउन आलेले किमान 2 स्वयंसेवक असतील असे बघितले जाते. त्यांनी चिलाटीमध्ये गावामित्रांना हे प्रशिक्षण देण्याबरोबरच स्वतः दोन गावांमध्ये शाळेत जाउन मुलांना शिकवून दाखवणे / पाठ घेणे अपेक्षित असते. या आधी जाउन आलेला स्वयंसेवक म्हणून माझ्या कामाचे स्वरूप हेच होते. माझ्या बरोबर निगडीस्थित प्राची कुलकर्णी यापण जुन्या स्वयंसेवक होत्या. आमच्या गटातले नवीन दोनही स्वयंसेवक, अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांचे प्रमुख काम आम्हाला जनरल मदत करणे व इतर उपक्रमाची साधने बनवणे असे होते.

इथे लिहायला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो की मायबोलीकर सुनिधी यांनी वास्तुरूपी दिलेली देणगी (प्रत्येकी २०० पाट्या, वह्या, पेन्सिली खोडरबरे ई. साहित्य आम्ही पुण्याहून नेउन मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम पण आमच्या हातून व आमच्या समोर घडले.

मेळघाटातला निसर्ग खूपच सुंदर आहे. पण ‘जितका सुंदर तितका खडतर’ हा निसर्गाचा सार्वकालीन नियम इथेही लागू पडतो. पण अशा खडतर परिस्थितीतही पाठपुराव्यानंतर का होईना पण होत सरकारतर्फे झालेली / होत असलेली काही कामे पाहून या वेळची ही भेट मनास अधिकच समाधान देणारी होती.

तर माझ्या ह्या मेळघाटभेटीची ही सप्रकाशचित्र झलक.

ही असे चिन्ह दाखवणारी पाटी सारखी सारखी बघून निर्माण झालेले कुतूहल लगेचच शमले. जिथे जिथे पाणी रस्त्याला ओलांडून वाहते तिथे एरवी ह्यूम पाईप टाकून छोटा पूल ज्याला कल्व्हर्ट असे म्हणतात त्या ऐवजी त्या ठिकाणचा रस्ताच ‘उतार सपाट व चढ’ अशा स्वरूपाचा आणि काँक्रीटचा केलेला होता, ह्याने प्रवासाचा वेग अगदी कमी झाला तरी पावसाने रस्ता वाहून जाण्याचे प्रमाण नगण्य झालेले दिसले. रस्त्यावरून जास्त पाणी जात असताना रस्ता नक्कीच बंद पडत असेल पण पाणी ओसरल्यावर लगेच वाहतूक चालू होऊ शकते. अगदी ऑगस्ट मध्ये देखील बरेच ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहून जात होते.

सध्या पावसाळ्यामुळे रस्ता खराब झाल्याने, नेहेमी चिलाटी वरून पुढे रूईपठार या गावापर्यंत जाणारी आपली एसटी महामंडळाची लालबस, चिलाटीच्या अलीकडे ३ किमी अंतरावर असलेल्या हातरु या गावापर्यंतच जाते आहे असे कळले. त्यामुळे आम्ही पुण्याहून नेत असलेले सामान कसे न्यायचे अशी विवंचना होती. पण हे साहित्य नेण्याकरता मैत्रीतर्फे एक जीप ठरवून दिली व ह्या साहित्य बरोबरच इतरही महिनाभराचे किराणा व भाजीपाला असे सामान घेउन आम्ही चिलाटीस पोचलो.

मैत्रीचे चिलाटी येथील कार्यालय

गावमित्रांचे प्रशिक्षण शिबीर

पुण्याहून नेलेले शैक्षणिक साहित्य - हे सामान बरोबर न्यायचे असल्याकारणाने मागच्या वेळेस गेलो होतो तसे आगगाडीने बडनेरापर्यंत पुढे तिथून (अर्धा तास शेअररिक्षा) अमरावतीपर्यंत मग अमरावती ते परतवाडा (दीडतास एसटी) व तिथून पुढे परत रुईपठारच्या बसने (चार तास) चिलाटी असा प्रवास त्रासाचाच ठरणार होता. त्यामुळे परतवाड्यापर्यंत जाणारी खासगी बस घ्यायचे ठरले जे थोडे त्रासदायक असले तरी सामान नेण्याच्या दृष्टीने सोयीस्कर ठरले.

शैक्षणिक साहित्याचे गावमित्रांकडे हस्तांतरण

कुही नावाच्या गावातल्या एका शाळेला भेट - इथे मी ६ किमी चालत गेलो. जंगलातल्या वाटेने जाताना दिसणारी वृक्षसंपदा बघत बघत व त्या झाडांबद्द्ल, त्यांच्या उपयोगाबद्दल गावमित्रांकडून माहिती करुन घेत असताना वाट कशी सरली तेच कळले नाही.

निम्म्या वाटेवर असताना...

गाव जवळ आल्यावर

तिथे पोचेतोवर मुलांची खिचडी खाण्याची वेळ झाली होती.

मग तिथेही सर्वप्रथम साहित्य वाटपाचे काम उरकले.

मग मी पाठ घेऊन दाखवला आणि नंतर गावमित्रांनी पण पाठ घेतले.

अगदी लहान मुलांकडून तर गिरवूनच घ्यावे लागत होते. अगदी लहान खेडी, शाळा सुटल्यावर कुठेही अक्षर दिसायाची मारामार, मग शिकवले तरी लक्षात कसे रहाणार....

ही मुले खरेतर अंगणवाडीतली, पण नवीन पाट्या मिळताहेत म्हटल्यावर ही देखिल मधेमधे येऊन लुडबुड करायला लागली, मग त्यांना पण जुन्या पाट्या दिल्या आणि पहा कशी रंगून गेली आहेत.

मग नंतर रंगांची ओळख व्हावी म्हणून टिपी टिपी टिप टॉप हा खेळ, अंकांशी ओळख व्हावी म्हणून एका एका होडीत किती किती जण असे काही खेळ घेतले.

ही कुहीची शाळा बाहेरुन आणि माझ्या बरोबर आलेले गावमित्र व शाळेचे शिक्षक

हा कुहीचा गावमित्र शाळेच्या वर्गात

वर्गात बरेच तक्ते वगैरे होते

And last but not least, ही मैत्रीच्या गावमित्रांची टीम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत एकदा धन्यवाद सर्वांना,
अकु उशीर झाल्याबद्दल माफ केले असावेस अशी आशा आहे.

हर्पेन ,
तुमचे खूप कौतुक वाटते.
तिथल्या वास्तव्यातील तुमचे अनुभव लिहिलेत तर वाचायला आवडेल.
शुभेच्छा.

हर्पेन, माफी वगैरे कैच्याकै हां... Happy फोटो बघूनच डोळे निवळले...
मैत्रीचा सूचनाफलकही छान आहे तिथला... त्याचा फोटू पण टाक ना जमलं तर!

किती स्तुत्य उपक्रम आहे हा. हर्पेन तुमचे आणि तुमच्या टीमचे खूप कौतुक वाटले.
त्या छोट्या मुलांचा फोटो किती गोड आला आहे!

माशा, हे फोटो टाकायलाच इतका वेळ लागलाय, अनुभव कधी लिहुन होतील आणि इथे टाकले जातील देव जाणे Happy

झेलम, मो धन्यवाद..

अकुने मागणी केलेला फोटो - जरा बारकाईने वाचावा लागतो आणि इतके कोण वाचणार म्हणून टाकला नव्हता

हा फलक मी मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा नव्हता, आता शेवटच्या वाक्यामुळे परत जावेच लागेल Happy

रुनी,नंदिनी, स्वाती_आंबोळे सर्वांना अनुमोदन.
हर्पेन, तुमच्या टीमचे खुप कौतुक. अमुल्य काम करत आहांत तुम्ही मंडळी. छान फोटो. लहान बाळांचे तर फार गोड. तिथे पोचायला लागणारा वेळ व प्रवासाचा मार्ग वाचुन तर थक्क व्हायला झाले.
(आणि प्लिज, लाजवु नका. आम्ही काहीही केले नाहीये).

मस्त! खुप खुप कौतुक तुमचे आणि मैत्रीच्या ग्रुपचे. तसेच गावमित्रांचेही!!! मी मदत करु शकले नाही त्याबद्दल क्षमस्व! Sad

अर्रे आदिती१, असं होते कधी कधी. मला अशी इच्छा प्रत्यक्षात आणायला काही वर्षे लागली होती.
ज्योती कामत धन्यवाद. Happy

हस्तकलेच्या वस्तूंचे एक विशेष प्रदर्शन..

"मैत्री"च्या मेळघाट प्रकल्पाच्या मदतीसाठी पुण्यातील काही हौशी कलाकार एकत्र आले आहेत. त्यांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तू पहा आणि खरेदी करा!

कलाकारांनी स्वत:च्या हातानी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध.

"मैत्री"च्या कामाला मदत करण्यासाठी, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अजून कुठेही मिळाणार नाहीत अशा भेटवस्तू घेण्यासाठी भरपूर वेळ काढून "मैत्री" जत्रेला भेट द्या!

"मैत्री" जत्रा शनिवार २६ आणि रविवार २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ दरम्यान सर्वांसाठी खुली असेल...

स्थळ - नटराज सोसायटी सभागृह, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वे नगर, पुणे.
कुठेही मिळणार नाहीत अशा दिवाळीसाठीच्या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी नक्की या!

अरे वा! छान उपक्रम! प्रदर्शनाला भेट द्यायला पाहिजे.

हर्पेन ...आम्ही लाम्ब राहुन जी मदत करु शकतो ति म्ह्णजे --- मी माझ्या नाते वाईक आणी मैत्र मैत्रीणीना आपला उपक्रम कळवला आहे ...ब्ते भेट देतिल अशि आशा करते..

आपल्या कामा बद्दल आधी पण आपण बोललो होतो तरीही परत ..हॅट्स ऑफ टू यू!

शुभेच्छा

स्तुत्य उपक्रम. एक भेट द्यायला आवडेल. तसाही मेळघाटच्या पुनर्भेटीचा योग बराच रेंगाळला आहे; कधी जमतेय ते पाहते.

धन्यवाद सुहास्य...

आतिवास, आपले स्वागत आहे, मैत्रीच्या कार्यालयाशी संपर्क साधा. या वर्षी हा उपक्रम वर्षभर चालणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती खालील दुव्यावर मिळेल.
http://www.maayboli.com/node/44146

मेळघाटातल्या ह्या शैक्षणिक वर्षाचा उपक्रम ठरवल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडला. आता शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. आपण शाळा व्यवस्थित चालाव्या म्हणून नेमलेले, मेळघाटातील १२ युवक गावमित्र, सध्या पुण्याच्या दौर्‍यावर आलेले आहेत. पुण्यात त्यांचे वास्तव्य १ मे ते ४ मे असेल. त्यादरम्यान त्यांच्यासाठी काही कार्यशाळांबरोबरच, कम्युनिटी रेडीयो केंद्र, कात्रज सर्पोद्यान आणि प्राणी संग्रहालय, दूध डेअरी यांना भेटी देण्याच्या कार्यक्रमांचाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या सोबत मुक्त गप्पांचा एक कार्यक्रम शनिवार दि. ३ मे रोजी पुण्यातील राजेन्द्रनगर भागातील इंद्रधनुष्य सभागृहामधे संध्याकाळी ५ ते ८ च्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

मेळघाटातील मैत्रीचे काम कशा रीतीने चालते आहे, त्याची माहिती आपल्याला प्रत्यक्ष कोरकू गावमित्रांच्या तोंडून ऐकायला मिळू शकेल.

तरी समस्त मायबोलीकरांना ह्याकरता आग्रहाचे निमंत्रण देत आहे.

येण्याचे अगत्य करावे.

Pages