आधुनिक सीता - ३

Submitted by वेल on 5 September, 2013 - 05:23

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली - सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग १ - http://www.maayboli.com/node/44930
भाग २ - http://www.maayboli.com/node/44956

*****************************************************

"प्रथम तुज पाहता जीव वेडावला ...' अगदी असंच झालं सागरला पाहता क्षणी. मी आले होते इथे त्याला नाही म्हणण्यासाठी पण 'नकळत सारे घडले ...' आणि माझ्या गालावरच्या स्मितहास्याने सगळ्यांना माझ्या भावना अगदी व्यवस्थित कळल्या. अगदी सागरच्या आई बाबांना सुद्धा. तरिही आम्हा दोघांना बोलायला मिळावे आणि पसंती असल्यास लगेचच लग्नापूर्वीचे कौन्सेलिंग व्हावे म्हणून आजीच्या सांगण्यावरून आम्हाला पटवर्धन काकूंच्या घरपर्यंत चालत जाऊन त्यांना भेटून येण्यास सांगितले.

"तुझी आजी भारी धोरणी आहे. तिने किती पुढचा विचार केला." सागर. मी फक्त हसले. "तुझं काय म्हणणं आहे, आपण काकूंना भेटायचं की नाही?"
"म्हणजे काय, काकूंना भेटण्यासाठी तर चाललो आहोत ना आपण."
"तुला मी आणि मला तू पसंत असल्यास आपण काकूंकडे जायचं आहे. नाही तर नाही."
"हं. "
"हं काय नुसतं, जायचं का नाही?"
"आता इथेपर्यंत आलो आहोत तर जाऊन येऊ."
"इथेपर्यंत आलो म्हणून भेटायचं असेल तर तू रोज त्यांना भेटतेस की आणि मी सुद्धा भेटलोय त्यांना कालच"
"मग?"
"मग काय, तेच विचारतो आहे"
मला सागरला अरे सुद्धा म्हणायचं नव्हतं आणि अहो सुद्धा. मी सरळ इंग्लिश मधे विचारलं "व्हॉट इज युवर ओपिनिअन? डू यु वॉण्ट टू मीट हर फॉर द रिझन अवर पेरेण्ट्स सेण्ट अस ऑर जस्ट लाइक दॅट?"
"आय वॉण्ट टू मीट हर बिकॉज आय लाइक्ड यु. इफ यु टू हॅव लाइक्ड मी ओनली देन वुई विल गो देअर.सो नाऊ यु टेल मी डू यु वॉण्ट टू मीट हर फॉर सेम रिझन?"
मी फक्त सागरकडे पाहून हसले, सागरने नंतर सांगितलं की मी लाजले होते.

काकूंकडे गेल्यावर त्यांनी आम्हा दोघांचे विचार ऐकून घेतले. मला तर काही सुचतच नव्हते बोलायला. पहिलीच भेट होती आमची, तेसुद्धा लगेच लग्नापर्यंत बोलणी पोहोचली होती. काकूंनी खूप प्रश्न विचारले मला सागरला. आमचं बोलणं चालू असतानाच सगळे तिथेच आले. सागरचे आई बाबा माझ्या घरचे सगळे आणि पुन्हा एकदा काकूंनी आमची सगळ्यांची पुन्हा एकदा मुलाखत घेतली.
मला असं कुठे तरी वाटत होतं की मी नकार देण्याचं ठरवून आले होते म्हणून आजी आजोबा काका काकू ह्यांनी नक्की काहीतरी प्लान बनवला होता की मला नाही म्हणताच येऊ नये.
दोन्ही बाजूंची पसंती येऊन एकमत झाल्यावर मी विचारलंच, "बाबा मी नाही म्हणणार म्हणून मला कन्व्हिन्स करण्यासाठी हा प्लान केलात ना?"
सागर मधेच बोलला, "हा प्लान तुझ्या बाबांचा नाही तर माझा होता. मी तुला काकूंच्या कन्सल्टिंगमध्ये पाहिले होते. मला तू आवडलीस म्हणून मी माझ्या आई बाबांशी बोलून, पटवर्धन काका काकूंशी बोलून ठरवलं की तुला मी आवडलो असेन तर तुझ्यासोबत इथेच यायचं आपण एकमेकांना अनुरूप आहोत की नाही हे काकूंकडूनच समजून घ्यायचं. आणि हे काकांनी तुझ्या आजीला सांगितलं, तिला ते पटलं. आणि तुला जर मी पहिल्या भेटीत आवडलो नसतो तर काही प्रश्नच नव्हता, पण मला असं कुठेतरी वाटत होतं की मीदेखील तुला आवडेन."
"ही चिटींग आहे." मी.
"ह्यात चिटींग काय आहे, मला तू आवडली होतीस, पण तुझे आणि माझे विचार जुळतील की नाही आपण अख्खं आयुष्य एकत्र काढू शकू की नाही मला माहित नव्हतं, मग एकमेकात गुंतून नंतर विचार न जुळल्याने वेगळं होण्यापेक्षा आधीच कौन्सेलिंग करणं योग्य वाटलं मला." सागर
"म्हणजे सरिताबद्दल तुला आधीच माहित होतं, ती कशी आहे वगैरे.." दादा
"नाही. मला फक्त ही कशी दिसते तिचं नाव काय शिक्षण काय आणि कुठे राहते तेवढच माहित होतं, काकूंनी मला सांगितलं जर तिला मी आवडलो तरच आमचं कौन्सेलिंग करेल ती आणि तिच्याच कडून ती कशी आहे हे मला कळेल." सागर
"पण कौन्सेलिंग करून घ्यायचं कसं मनात आलं तुझ्या?" दादा
"भास्कर, एक तर मी डॉक्टर आहे, त्यामुळे लोकांना काय काय प्रॉब्लेम येतात ते मला माझ्या सायकिअ‍ॅट्रिस्ट मित्रांकडून कळतं, शिवाय आत्ताच माझ्या मित्राच्या बहिणीला कौन्सेलिंग न केल्याने काय त्रास झालाय ते मी जवळून पाहिलय. सरिताऐवजी दुसरी कोणी मुलगी असती तरी मी कौन्सेलिंग न करता लग्न करणारच नव्हतो."
"हुषार आहेस" दादा
'आता तुमचे सगळे किंतु परंतु संपले असतील तर भास्कर बाहेर जाऊन गोड काही आणशील का?" बाबा
"सरिताच्या आई तुमची हरकत नसेल तर आपण दोघीसुद्धा जरा बाहेर जाऊन येऊया का? सरिताची ओटी भरेन म्हणते, तिच्यासाठी साडी घेऊन येऊ. तुम्ही तिच्या आवडीची साडी निवडू शकाल."
आणि माझी आई सागरच्या आई आणि दादा खरेदीला निघाले. त्याच दिवशी माझी ओटी भरून आमच्या साखरपुड्याची तारिख सुद्धा ठरवली.
ह्या सगळ्यात सौदीचे कायदे कानून किती कठिण आहेत त्याचा विचारदेखील कोणाच्याच मनात नाही आला. अगदी माझ्याही नाही.

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45057

Group content visibility: 
Public - accessible to all site users